– गिरीश कुबेर

‘‘तुम्ही टाळेबंदी जरा जरी सैल केलीत तर मृत्यूचे प्रमाण भयावह गतीने वाढेल. साथ इतकी झपाटय़ाने पसरेल की रुग्णालये ते दडपण हाताळू शकणार नाहीत. व्हेंटिलेटर्सची संख्या तर इतकी कमी आहे की तुमच्या निर्णयाची काळजी वाटते,’’ असे इत्यादी इत्यादी उद्गार ज्यांनी काढले त्यांचे नाव डॉ. अँथनी फौची. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर सध्या अमेरिकन चित्रवाणीवर दिसणारा क्रमांक दोनचा चेहरा. डॉ. फौची अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅलर्जी अ‍ॅण्ड इन्फेक्शस डिसीजेस’ या महत्त्वाच्या संस्थेचे प्रमुख. पण सध्या ते विलगीकरणात आहेत.

वर उल्लेखलेला इशारा त्यांनी ज्यांना दिला त्यांचे नाव ब्रायन केम्प. ते अमेरिकेतल्या जॉर्जिया या राज्याचे गव्हर्नर. म्हणजे आपल्याकडच्या भाषेत मुख्यमंत्री. लोकांनी निवडून दिलेले. केम्प हे अध्यक्ष ट्रम्प यांच्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचे आहेत. डॉ. फौची यांनी केम्प यांना हा इशारा दिला तो २२ एप्रिल रोजी. अमेरिकेत करोनाचे थैमान सुरू झाले होते. वादळात झाडावरून फळे पडावीत तशी टपाटप माणसे करोनाने मरत होती. त्या काळात प्रवाहाविरोधात जाण्याचा धाडसी निर्णय या केम्प यांनी घेतला. त्यांनी जाहीर केले : दोन दिवसांत जॉर्जियातील टाळेबंदी हळूहळू सैल केली जाईल. साधारण २४ एप्रिलला त्यांनी तशी सुरुवातही केली. त्या दिवशी शहरातील व्यायामशाळा, केशकर्तनालये, बोलिंग खेळाचा क्लब वगैरे अनेक गोष्टी त्या राज्यात सुरू झाल्या. एप्रिल अखेपर्यंत बाकीचे अनेक निर्बंध उठवले गेले. जनजीवन संपूर्ण पूर्वपदावर नाही तरी जवळपास तसे झाले. अर्थात हे सर्व सध्याचे अंतर नियम, मुखपट्टय़ा वगैरे पाळून झाले.

पण त्या वेळेस समस्त जॉर्जियावासी त्यांच्या अंगावर आले. मानवी जिवांची काही किंमत दिसत नाही या आपल्या गव्हर्नरला.. अशा प्रकारची टीका त्यांच्यावर झाली. या राज्याची राजधानी अटलांटा. या अटलांटात फार लोकप्रिय असा एक टॅव्हर्न आहे. टॅव्हर्न म्हणजे मोकळ्या अंगणात नारळाच्या झावळ्यांच्या सावलीत, मंद प्रकाश आणि संगीताच्या साथीने मद्य दिले जाते अशी निवांत जागा. (अटलांटाला भेट देणारे पर्यटक दोन गोष्टी पाहतात. बाहेरून सीएनएन सेंटर आणि आतून कोका-कोला संग्रहालय. असो). तर या टॅव्हर्नमध्ये धाकटय़ा जॉर्ज बुश यांनी आपल्या राजकीय प्रवासाची घोषणा केली होती आणि बराक ओबामा याच टॅव्हर्नमध्ये अध्यक्ष असतानाही येऊन गेले होते. इथे त्याचा उल्लेख करायचे कारण म्हणजे या टॅव्हर्न मालकानेही आपल्या गव्हर्नरच्या निर्णयाचा कडक शब्दांत निषेध केला आणि आपल्या आश्रयदात्यांची क्षमा मागून टॅव्हर्न बंदच राहील अशी घोषणा केली. (तरीही या टॅव्हर्नवर कोणत्याही सरकारी यंत्रणेची धाड पडली नाही की सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तेथे धुडगूस घालून त्यांचा निषेध केला नाही.) इतकेच  काय पण खुद्द अटलांटाच्या महापौरांनी आपल्या गव्हर्नरच्या निर्णयाविषयी काळजी व्यक्त केली.

आज या शहराचा करोना आलेख केवळ सपाट नाही. तर तो उतरंडीला लागला आहे. शहरातल्या रुग्णालयांत जितके व्हेंटिलेटर्स लागतील असे सांगितले जात होते त्यातले निम्मे सध्या वापराविना पडून आहेत. रुग्णालये ७५ टक्के भरलेली आहेत. पण ओसंडून जातील अशी स्थिती अजून तरी नाही. गव्हर्नर केम्प सावधपणा दाखवत म्हणू लागलेत.. आपण योग्य मार्गावर आहोत!

केम्प यांना करोनावर विजय वगैरे काही मिळवायचा नाही. त्यांचे तसे उद्दिष्ट कधीही नव्हते. करोनाबरोबर जगायचे आहे आपल्याला तर त्याचा बाऊ तरी किती करणार, असा प्रश्न त्यांचा. आणि त्यांची चिंता आहे ती जॉर्जियाच्या अर्थव्यवस्थेची. आपण करोना करोना करत किती काळ बसायचे, असे ते विचारतात. काही माध्यमांनी सांख्यिकी प्रतिरूपाचा आधार घेत जॉर्जियात करोनाचे रुग्ण वाढणार अशा बातम्या दिल्या. त्यावर केम्प यांनी असा सांख्यिकी आधार, त्याचे संदर्भ आणि मुख्य म्हणजे या अंदाजांचा पाया ज्यावर असतो ती माहिती केंद्रे यांचे विश्लेषण करणाऱ्यांचा आधार घेतला आणि या अंदाजाचा उगाचचा कर्कश्शपणा उघडा पाडला. खूप माणसे मरणार, आकाश कोसळणार.. असे सांगणे माध्यमांवर आवडते का?

एकच संकट. पण त्याला भिडण्याच्या अनेक तऱ्हा. एकच परिणाम. पण त्या परिणामाकडेही पाहण्याच्या अनेक तऱ्हा. करोनामुळे हे सगळे अनेकातले वेगळेपण पुढे आले. ही साथीची संधी साधत कडकडीत टाळेबंदी लादून आपला वज्रनिर्धार दाखवणारे नेते याच काळात जसे दिसले तसे या साथीच्या काळातही नेहमीसारखेच जगून आजाराशी दोस्ताना केल्यागत वागणारेही या काळात समोर आले. यात परत एकाच देशातल्या अनेकांच्या तऱ्हाही याच काळात पाहायला मिळतात. अमेरिका हे त्याचे उदाहरण. आपल्याप्रमाणे तो देशदेखील संघराज्य म्हणतात असा. पण तिथल्या राज्यांचे प्रमुख आपल्या केंद्रीय प्रमुखाचे उगाचच दडपण घेत नाहीत आणि अध्यक्षच्याच पक्षाचे असले तरी उगाच त्याच्या तालावर नाचत नाहीत. जॉर्जियाचे गव्हर्नर म्हणजे तसे आपल्याकडेच स्वतंत्र प्रांताचे, राज्याचे मुख्यमंत्रीच.. पण..

@girishkuber