03 June 2020

News Flash

कोविडोस्कोप : कसा सूर्य अज्ञानाच्या..

सूर्यप्रकाशामुळे आपल्या त्वचेखाली मोठय़ा प्रमाणावर नायट्रिक ऑक्साइड रक्तात मिसळते.

संग्रहित छायाचित्र

– गिरीश कुबेर

इंग्रजीत एक फारच सुंदर, व्यापकार्थी वाक्प्रचार आहे- ‘सनलाइट इज द बेस्ट डिसइन्फेक्टंट’! सूर्यप्रकाश हा सर्वोत्तम कीटकनाशक आहे, हे विधान अनेकार्थानी वापरले जाते. म्हणजे सत्य समोर आणणे, वास्तव दाखवणे इत्यादी. पण येथे मात्र त्याचा जो दिसतो तोच अर्थ अभिप्रेत आहे. तो सांगावा लागतो याचे कारण सध्याच्या करोना काळात प्रत्येकाने घरातच बसून राहायला हवे, हा सर्वाचा आग्रह. तो किती योग्य? अयोग्य?

सूर्यप्रकाशाचा आपल्या आरोग्याशी संबंध काय? पूर्वी मुडदूस झालेल्या बालकांना सकाळच्या कोवळ्या उन्हात बसवायची प्रथा होती. आता कष्टकरी सोडले तर कोणीच ऊन अंगाला लागू देत नाहीत. आणि हल्ली तर जगात सरसकट सर्वाना ‘डी’ जीवनसत्त्वाची कमतरताच. कारण शरीराला ऊनच मिळत नाही. पण करोना आणि हे ऊन यांचा काही संबंध आहे का? सूर्य आला म्हणजे तपमानही आले. करोनाशी या तपमानाचे काही नाते आहे काय? असल्यास ते काय? सातत्याने विज्ञानविषयक लेखन करणारे मरखम हैद हे अत्यंत विस्तृतपणे हा संबंध उलगडून दाखवतात. ते दाखवताना ते अनेक दाखले देतात. पण त्यातला एक पटकन स्पर्शून जातो. जेम्स ओकीफ हे अमेरिकेतल्या सेंट ल्यूक्स मिड अमेरिका हार्ट इन्स्टिटय़ूटमधले एक प्रख्यात डॉक्टर. ते विचारतात : ‘‘आपल्या अंगावर माकड, कुत्रा, अस्वल आदींसारखे केस आहेत काय? नाही. याचे कारण आपल्या शरीरास जास्तीत जास्त सूर्यप्रकाश शोषून घेता यावा यासाठी निसर्गाने केलेली ही सोय आहे. आता करोना काळ आहे म्हणून तुम्ही लोकांना घरातच बसून ठेवणार असाल तर आपल्या आरोग्याचे नुकसानच होईल’’.

ते कोणकोणत्या पातळीवर होते याचे विवेचन या लेखात आहे. त्याचे सार असे की अमेरिका वा युरोपात थंडीच्या हंगामात दरवर्षीच फ्लू येतो. त्याच्या प्रसाराची कारणे दोन. एक म्हणजे अर्थातच घसरते तपमान आणि दुसरे म्हणजे थंड हवेत घरात एकमेकांच्या उबेत बसण्याचे वाढते प्रमाण. हा लेख दाखवून देतो की याआधीच्या करोना विषाणूच्या आवृत्त्या याच काळात आलेल्या आहेत. तसेच तपमान जसजसे वाढू लागले तसतसा त्या करोना विषाणूंचा प्रभावही ओसरलेला आहे. आताही अमेरिकेत इतक्या हाहाकारानंतरही अनेक राज्ये टाळेबंदीला नारळ देताना दिसतात. त्याचा संबंध वाढत्या सूर्यप्रकाशाशी कसा आहे, हे हा लेख समजावून सांगतो. अमेरिकेत सर्व जनजीवन सुरळीत करू पाहणाऱ्या राज्यांना ‘‘बघा हं..करोनाचे प्रमाण वाढेल,’’ असे घाबरवणारे इशारे अनेकांनी दिले होते. पण त्याकडे दुर्लक्ष करत अनेक राज्यांनी टाळेबंदी उठवली. पण म्हणून करोना रुग्ण काही वाढलेले नाहीत. त्याचे कारण या सूर्यप्रकाशात आहे.

सूर्यप्रकाशामुळे आपल्या त्वचेखाली मोठय़ा प्रमाणावर नायट्रिक ऑक्साइड रक्तात मिसळते. त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या लवचिक राहतात. हे असे नायट्रिक ऑक्साइड अधिक झिरपण्याचे प्रमाण तरुणांत अधिक असते. याचा अर्थ असा की तरुणांचे ठीक, पण जे वयाने तरुण नाहीत त्यांनी जमेल तितके ऊन खायला हवे. याच्या जोडीला ‘डी’ जीवनसत्त्व हा मुद्दा आहेच. याची कमतरता नसलेला जीव आजकाल सापडणे मुश्कील. अनेक जण हल्ली या डी जीवनसत्त्वाच्या गोळ्या खात असतात. पण या डी जीवनसत्त्वाचा संबंध केवळ वैयक्तिक आरोग्याशीच आहे असे नाही. त्यात आणखी एक मुद्दा आहे.

अमेरिकेत करोना काळात बळी पडणाऱ्यांत अफ्रिकी नागरिकांचे प्रमाण धक्कादायकरीत्या अधिक आहे. मध्यंतरी तर अनेक राज्यांनी आपापल्या भागातील कृष्णवर्णीयांना तसा धोक्याचा इशाराही दिला होता. इकडे इंग्लंडमधेही करोनात प्राण सोडणाऱ्यांत गौरेतर अधिक आहेत. सुरुवातीला वाटले यामागे त्यांच्यातील गरिबी, त्यातून येणारी व्यसनाधीनता, खाण्यापिण्याची आबाळ अशी कारणे असावीत. आपल्याकडेही अनेक शहरांतील झोपडीवासीयांचे प्राण करोनाने मोठय़ा प्रमाणावर घेतले. तसेच काही तिकडेही असेल, असाच सर्वाचा समज.

पण तो खरा नाही. तर या समाजातील नागरिकांत असलेली डी जीवनसत्त्वाची विशेष कमतरता या वाढत्या करोना मृत्यूंमागे आहे, हे त्या प्रांतातील अनेक वैद्यकतज्ज्ञ आता बोलून दाखवतात. काहींच्या शरीरातील जनुकीय रचनाही या डी जीवनसत्त्वाच्या कमतरतेमागे असू शकेल. पण तरीही या सर्वाना ऊन मिळाले असते किंवा ऊनच नसेल तर डी जीवनसत्त्वाच्या गोळ्या वगैरे देण्यात आल्या असत्या तर परिणाम कदाचित वेगळा असला असता.

या सगळ्याचा अर्थ इतकाच की.. ज्येष्ठाचे ऊन कडाडले आहे, रस्तोरस्ती तमन फुलले आहेत, गुलमोहर बहरले आहेत, बहाव्यातील सोने ऊतू जाते आहे..आणि येऊ घातलेला आषाढ सूर्याची ढगबंदी करायच्या आत हा.. इंदिरा संत म्हणतात तो.. ‘ग्रीष्माचा उदभार’ भोगून घ्यायला हवा.

पण ‘कसा सूर्य अज्ञानाच्या वाहतो पखाली..’ ही टाळेबंदीची अवस्था काही संपायला तयार नाही.

@girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2020 12:42 am

Web Title: covidoscope article sunlight coronavirus relations abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 बालनाटय़काराची घडण!
2 कोविडोस्कोप : एका वेदनेचे वर्धापन..
3 कोविडोस्कोप : पुराव्यानिशी सिद्ध होईल..
Just Now!
X