News Flash

क्युबाचा क्रांतिसूर्य

घरदार सोडून, केस वाढवून हिप्पींचे थवे समाधानाच्या शोधात उन्मुक्त वणवण करू लागले.

विसाव्या शतकातलं साठचं दशक अनेकार्थानी महत्त्वाचं आहे. अठराव्या शतकातली औद्योगिक क्रांती, विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली साम्यवादी क्रांती आणि दोन जागतिक महायुद्धं आणि त्यानंतर सुरू झालेलं शीतयुद्ध यांच्या बेरजेतून अवतरलेल्या जगाने कूस पालटली ती या दशकात. तो काळ मोठा विचित्र होता. परंपरांची पडझड झाली होती. नवी मूल्यव्यवस्था उदयास येऊ लागली होती. पिढय़ान् पिढय़ा चालत आलेल्या सामाजिक-राजकीय-कौटुंबिक संस्था उद्ध्वस्त धर्मशाळा बनल्या होत्या. अस्वस्थतेचा गारठा जणू अवघ्या आसमंतात भरलेला होता. हे टिपेला पोचलं अन् साठचं दशक उगवलं.

अमेरिकेत ‘काळ्या’ संगीतातून बंडखोरीची रागदारी आळविली जाऊ लागली. घरदार सोडून, केस वाढवून हिप्पींचे थवे समाधानाच्या शोधात उन्मुक्त वणवण करू लागले. तरुणांच्या ओठीची प्रीतीगीतं जाऊन तिथं क्रांतीचे रोमँटिक पोवाडे रुळू लागले. ‘युग की जडता’च्या विरोधात ‘इन्कलाब’चे नारे घुमू लागले. अशा भारलेल्या वातावरणात, क्युबातली हुकूमशाही सत्ता उलथवून लावणारा फिडेल कॅस्ट्रो नावाचा अवघ्या विश्वातला बंडखोर तरुणाईचा नायक बनला नसता तर नवलच होतं.

क्युबा अमेरिकेच्या परसदारातला, लॅटिन अमेरिकेतला एक एवढासा देश. आपल्या कोकणासारखा. ऊस, तंबाखू, कॉफी पिकवणारा. मँगनीझ, कॉपर, निकेल, अशा विपुल खनिजसंपत्तीने संपन्न असा. पण महासत्तेच्या पर्जन्यछायेत असणाऱ्या देशाला महासत्तेचं अंकित बनून राहण्याखेरीज गत्यंतर नसतं. क्युबाची साधनसंपत्ती अमेरिकी भांडवलशाहीचे खिसे भरीत होती. आणि त्या हितसंबंधांना बाधा येत नव्हती तोवर तिथं काय चाललंय, हे पाहण्यात अमेरिकेला रस नव्हता. उलट तिथल्या क्रूर, जुलमी हुकूमशाही राजवटीकडं कानाडोळा करणं हेच अमेरिकेच्या सोयीचं अन् हिताचं होतं. परिणामी क्युबाचा हुकूमशहा बाटिस्टा लोकांची सुखेनैव पिळवणूक करीत होता. एकीकडं हुकूमशाही राजवट आणि दुसरीकडं व्यापारी, खाणमालक आणि ऊस मळेवाले यांचं शोषण या चरकात सर्वसामान्य शेतकरी, कामकरी पिळून निघत होते. फिडेल यांचा लढा जुलूमशाहीविरोधात होता. विद्यापीठात शिकणारा हा बुद्धिमान तरुण. सुरुवातीला सदनशीर मार्गानेच त्याने आपली लढाई सुरू केली. पण संगिनीचा मुकाबला अर्ज-विनंत्यांनी करता येत नसतो, हे लक्षात आल्यावर त्यानेही हाती बंदूक घेतली. ज्या व्यवस्थेतून मूठभर प्रस्थापितांची बेशरम श्रीमंती आणि बाकीच्यांची कंगाली ही विषमता येते ती व्यवस्था बदलणं हे त्याचं ध्येय होतं. समता प्रस्थापित करणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. म्हणजे तो साम्यवादी होता का? तर तसं काही नव्हतं. हे सगळं ज्या इझममध्ये बसतं तोच त्याचा इझम होता. त्याला साम्यवाद म्हणायचं की समाजवाद हे त्याने जगावर सोडून दिलं होतं. वस्तुत: पोथीबंद साम्यवाद आणि साम्यवादी पक्ष याबद्दल त्याला फारस ममत्व नव्हतं. लेबलच लावायचं, तर त्याला ‘मुक्त साम्यवादी’ म्हणता येईल. बंडखोर क्रांतिकारक चे गव्हेराच्या साथीने फिडेलने उभारलेल्या लढय़ाला जानेवारी १९५९ मध्ये यश आलं. मूठभर साथीदाराच्या साह्य़ाने गनिमी काव्याने लढत त्याने अमेरिकाधार्जिण्या बटिस्टाची जुलमी राजवट उलथवून क्युबाची सत्ता हस्तगत केली. हा अमेरिकेला मोठाच धक्का होता.

शीतयुद्ध ऐन भरात असलेला तो काळ. तिकडं व्हिएतनाम पेटलेलं. चिलीमध्ये जनरल पिनोशेच्या राजवटीविरोधात वणवे भडकलेले. तशात क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रोनेही क्रांती घडविली. या घटनेने अमेरिकन राज्यकर्ते किती चिडले होते याचं प्रत्यंतर लगेच आलं. १९६१ मध्ये जॉन एफ केनेडींनी क्युबावर छुपं आक्रमण केलं. पण त्या प्रकरणात अमेरिकेची मोठी नाचक्की झाली. यावर अमेरिकेने क्युबाविरोधात आर्थिक र्निबधांचं हत्यार परजलं. त्याला उत्तर म्हणून फिडेल यांनी आपण साम्यवादी असल्याचं घोषित करून सोव्हिएत युनियनशी जवळीक साधली. एकीकडे रशियाकडून मिळणारी मदत आणि दुसरीकडे जमीनसुधारणा कायद्यांच्या माध्यमातून जमिनीचे फेरवाटप अशा मार्गानी आता फिडेल यांचा दारिद्रय़ाविरोधातला लढा सुरू झाला. देशाची उभारणी करायची तर त्यासाठी स्वस्थता हवी. पण शेजारीच अमेरिका क्युबातला प्रतिक्रांतीवादी शक्तींना गोंजारीत बसलेली असताना ते मिळेल याची खात्री नव्हती. रशियाला क्षेपणास्त्र तळासाठी क्युबाची भूमी देण्याचा निर्णय या परिस्थितीतून आला होता. १९६२ च्या या ‘क्युबन मिसाईल क्राइसिस’नंतर बलाढय़ अमेरिकेसमोर छाती काढून ठाम उभा राहणारा नेता म्हणून फिडेल यांची प्रतिमा अधिक उजळली. व्हिएतनाम युद्धाच्या विरोधात अमेरिकेतील तरुण पिढीने जेव्हा बंड पुकारलं तेव्हा त्यांच्यासमोर आदर्श चे आणि फिडेल यांचेच होते.

गेली सलग पाच दशके कॅस्ट्रो या नावाची जादू, त्याचा करिष्मा अभंग आहे. हे कशामुळे झालं? बलाढय़ महासत्तेला आयुष्यभर टक्कर दिली म्हणून? सीआयएने अनेकवार खुनाचे प्रयत्न करूनही त्यातून सहीसलामत सुटले म्हणून? जगभरातील क्रांतिकारांना, पॅलेस्टिनसारख्या मुक्तिलढय़ांना सक्रिय पाठिंबा दिला म्हणून की सहकारी शेती, जमिनीचं फेरवाटप यांसारख्या उपायांनी, समाजवादी विचारसरणीने राष्ट्रउभारणीचे प्रयत्न केले म्हणून? खरं तर हे सगळं मिळून जे रसायन तयार होतं तोच कॅस्ट्रोंचा करिष्मा होता.

गाजलेली विधाने

मला दोषी ठरवा. त्याला काहीही महत्त्व नाही. कारण इतिहासच मला दोषमुक्त ठरवील. (सांतियागो डे क्युबा येथील लष्करी बराकीवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली सुरू असलेल्या खटल्याच्या वेळी युक्तिवाद करताना. १९५३)

***

क्रांती म्हणजे गुलाबांची शय्या नाही. क्रांती म्हणजे भविष्य आणि वर्तमान यांतील संघर्ष आहे.

***

क्रांती म्हणजे शोषकांची शोषितांविरोधातील हुकूमशाही.

***

मी ८२ जणांसह क्रांतीस प्रारंभ केला. आता मला पुन्हा क्रांती करावी लागली, तर मी ती १०-१५ जणांसह आणि संपूर्ण विश्वासाने करीन. तुमच्याकडे विश्वास असेल आणि कृतीची योजना असेल, तर तुम्ही किती लहान आहात याने काहीही फरक पडत नाही.

***

मी मार्क्‍सवादी-लेनिनवादी आहे आणि आयुष्याच्या अंतिम दिवसापर्यंत तसाच असेन.

***

माझं ज्यांवर पोषण झालं त्या कल्पना आणि त्या प्रतीकाची.. येशू ख्रिस्त नावाच्या त्या असामान्य व्यक्तीची कल्पना यांच्यात मला कधीही विसंगती दिसली नाही.

***

ते समाजवादाच्या अपयशाबद्दल बोलत असतात. पण आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत तरी कुठं भांडवलशाहीचं यश दिसतंय?

***

मला भांडवलशाहीची घृणा वाटते. ती घाणेरडी आहे, अश्लील आहे, अलगतावादी आहे.. कारण तिच्यातून युद्ध, ढोंग आणि स्पर्धा जन्माला येते.

***

कधी तरी अमेरिकेतील भांडवलशाही व्यवस्था नाहीशी होईल. कारण कोणतीही सामाजिक वर्गव्यवस्था अमर नसते. एके दिवशी वर्गीय समाज नाहीसा होईल.

***

मी महापौरांना मत देणार नाही.. ते त्यांनी मला रात्रभोजनाला बोलावलं नाही म्हणून नाही; तर विमानतळावरून इथं शहरात येताना रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत म्हणून!

***

मनुष्य आपल्या नियतीला आकार देत नसतो. त्या-त्या काळासाठी नियती मनुष्याला जन्माला घालत असते.

अमेरिकेची नाचक्की झाली, ते प्रकरण..

क्युबातील कॅस्ट्रो यांची साम्यवादी राजवट म्हणजे अमेरिकेसाठी कायमच डोकेदुखी होती. आजवर अटलांटिक महासागरपार दूर पूर्व युरोपमध्ये क्षितिजावर जाणवणारा साम्यवादाचा धोका आता थेट अमेरिकेच्या उंबरठय़ावर येऊन दारावर टकटक करत होता. त्यामुळेच कॅस्ट्रो यांची राजवट उलथवून टाकण्याचे अनेक प्रयत्न अमेरिकेने केले. त्यापैकी सर्वात गाजलेली कारवाई म्हणजे ‘बे ऑफ पिग्ज.’

कॅस्ट्रो यांना हटवण्याच्या मोहिमेसाठी तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष ड्वाइट डी. आयसेनहॉवर यांनी सीआयए या गुप्तचर संस्थेला मार्च १९६० मध्ये १३.१ दशलक्ष डॉलचा निधी मंजूर केला. कॅस्ट्रो यांच्या क्रांतीनंतर अनेक क्युबातील अनेकांनी अमेरिकेतील मायामी आणि आसपासच्या प्रदेशात स्थलांतर केले होते. त्यांना हाताशी धरून सीआयएने योजना आखली. या निर्वासितांना शस्त्रे आणि प्रशिक्षण देण्यात आले आणि शेजारच्या ग्वाटेमाला या देशात ब्रिगेड २५०६ नावाने गनिमी सैन्य सज्ज करण्यात आले. आयसेनहॉवर यांच्यानंतर अध्यक्ष झालेले जॉन एफ. केनेडी यांनी ४ एप्रिल १९६१ रोजी या मोहिमेला हिरवा कंदील दाखवला.

त्यानुसार क्युबाच्या दक्षिण किनाऱ्यावरील ‘बे ऑफ पिग्ज’ या ठिकाणी सीआयएच्या मदतीने १४०० गनिमांना उतरवण्याचे ठरले. १३ एप्रिल १९६१ रोजी हे सर्व गनीम ग्वाटेमालात एकत्र जमले. १६ एप्रिलला ते बोटीने बे ऑफ पिग्ज येथे उतरले. तत्पूर्वी सीआयएने पुरवलेल्या बी-२६ विमानांनी क्युबात दोन दिवस बॉम्बफेक केली होती. कॅस्ट्रो यांच्या सैन्याने या हल्लेखोरांचा जोरदार प्रतिकार केला. या मोहिमेत अमेरिकेचा हात असल्याचे जगाच्या नजरेसमोर येऊ लागताच अमेरिकेने हवाई हल्ले थांबवले आणि गनीम एकाकी पडले. अखेर २० एप्रिलला हे गनीम क्युबाच्या सैन्यासमोर शरण आले. अमेरिकेच्या मदतीने लढणारे शेकडो गनीम मारले गेले तर कित्येक बंदी झाले. क्युबातील कॅस्ट्रो यांची राजवट उलथवून टाकण्यास हा हल्ला अयशस्वी ठरला. उलट त्याने अमेरिकेची जगभर नाचक्की तर झालीच आणि कॅस्ट्रो यांची सत्तेवरील मांड अधिक पक्की झाली.

क्षेपणास्त्र पेचप्रसंग

शीतयुद्धाच्या काळात क्युबातील क्षेपणास्त्र पेच विशेष गाजला होता. ऑक्टोबर १९६२ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांना अशी माहिती मिळाली की, क्युबात रशियन बनावटीची क्षेपणास्त्रे लावण्यात आली आहेत. अमेरिकेच्या यू २ या हेरगिरी विमानांनी घेतलेल्या छायाचित्रात क्युबात रशियाने क्षेपणास्त्रे लावल्याचे स्पष्ट झाले होते. अध्यक्ष केनेडी यांनी लगेच त्यावर कठोर भूमिका घेतली. रशियाचे पंतप्रधान निकिता क्रुश्चेव यांच्याशी त्यांचा नजरेला नजर भिडवून संघर्ष सुरू होता. एकमेकांचा विनाश करण्याची भाषा यात बोलली गेली. त्यावेळी युद्ध झाले असते तर लाखो लोक मारले गेले असते. २९ ऑक्टोबर १९६२ रोजी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा मंडळाची बैठक झाली.

अखेर केनेडी व त्यांच्या सल्लागारांनी एकत्र बसून अनेक पर्याय शोधले. आठवडाभर गुप्त चर्चेनंतर अमेरिकेने क्युबात येणाऱ्या शस्त्रपुरवठय़ाची नौदलामार्फत कोंडी करण्याचे ठरवले. दोन आठवडे तणावाखाली गेले, कुणीच माघार घ्यायला तयार नव्हते. क्युबावर हल्ला करण्याचा एक पर्याय त्यावेळी होता पण अमेरिकेने असे ठरवले की, रशियाने क्षेपणास्त्रे मागे घेतली तर हल्ला करायचा नाही. हा पर्याय फेटाळला गेल्यास २४ तासांत क्युबावर हल्ला करण्याची धमकी अमेरिकेने दिली होती. अमेरिकेने क्युबावर हल्ला करू नये व  तुर्कस्थानातील क्षेपणास्त्रे सहा महिन्यांत माघारी घ्यावीत तर आम्ही क्युबातील क्षेपणास्त्रे मागे घेऊ असे पत्र क्रुश्चेव यांनी पाठवले व तो प्रस्ताव मंजूर झाल्याने पुढचा अनर्थ टळला. रशियाची क्षेपणास्त्रे अमेरिकेतील फ्लोरिडापासून ९० मैल अंतरावर होती. त्यावेळी केनेडी यांनी हा धोका २२ ऑक्टोबर १९६२ रोजी टीव्हीवरील भाषणात जाहीरपणे मांडला होता व लष्करी बळाचा वापर करण्याची तयारी दर्शवली होती. या पेचप्रसंगात दोन्ही महासत्ता युद्धाच्या टोकावर होत्या. रशियाने पाठवलेली क्षेपणास्त्रे अण्वस्त्र सज्ज होती. रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव यांनी आण्विक धाक निर्माण करण्यासाठी क्युबात क्षेपणास्त्रे तैनात केली होती कारण त्याच वेळी तुर्कस्थान व पश्चिम युरोपातील क्षेपणास्त्रे रशियाच्या दिशेने रोखलेली होती.

भारत-क्युबा मैत्रीचे गाढ नाते

भारताचे आणि क्युबाचे संबंध कायमच मित्रत्वाचे आणि सौहार्दपूर्ण राहिले आहेत. फिडेल कॅस्ट्रो आणि त्यांचे सहकारी चे गव्हेरा यांच्या नेतृत्वाखाली १९५९ साली क्युबाचे तत्कालीन अध्यक्ष फुल्गेशियो बॅटिस्टा यांची जुलमी राजवट उलथवून जी साम्यवादी राजवट प्रस्थापित झाली तिला सर्वप्रथम पाठिंबा देणाऱ्या मोजक्या देशांपैकी भारत एक होता. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व मिळण्यासाठी क्युबाने भारताला कायम पाठिंबा दिला आहे आणि क्युबावरील अमेरिकी र्निबध उठवले जावेत यासाठी भारताने सतत प्रयत्न केले आहेत.

शीतयुद्धाच्या काळात भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या अलिप्ततावादी चळवळीने दोन्ही देशांना आणखी जवळ आणले. भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी ऑक्टोबर २०१३ साली क्युबाची राजधानी हवानाला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी कॅस्ट्रो यांचा उल्लेख ‘अलिप्ततावादी चळवळीचा झळाळता तारा’ असा केला होता. कॅस्ट्रो सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांनी अनेक वेळा एकमेकांना भेटी दिल्या होत्या. क्युबातील क्रांतीनंतर लगेचच १९५९ साली चे गव्हेरा यांनी दिल्लीला भेट दिली होती. त्यानंतर १९६० साली नेहरू  आणि कॅस्ट्रो यांची न्यूयॉर्कमध्ये झालेल्या अलिप्ततावादी चळवळीच्या परिषदेच्या निमित्ताने भेट झाली होती.

भारताच्या मैत्रीबद्दल कॅस्ट्रो नेहमीच कृतज्ञतेने बोलत. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते, ‘मला भेटायला आलेली पहिली व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नेहरू. ते मी कधीच विसरू शकत नाही. मी ३४ वर्षांचा होतो आणि मला कोणी फारसे ओळखतही नव्हते. मी थोडा तणावाखाली होतो. मात्र नेहरूंनी मला धीर दिला आणि माझा तणाव कुठल्या कुठे पळून गेला.’

त्यानंतर १९८५ साली राजीव गांधी आणि २००६ साली मनमोहन सिंग यांनीही क्युबाला भेट दिली होती. कॅस्ट्रो यांनी १९७३ आणि १९८३ साली भारताला भेट दिली होती. दोन्ही वेळा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. कॅस्ट्रो यांनी इंदिरा गांधी यांना दिलेले आलिंगन आणि त्याचे छायाचित्र ‘कॅस्ट्रो हग’ म्हणून बरेच गाजले आणि भारत-क्युबा संबंधांचे प्रतीक बनले.

शीतयुद्धाच्या काळात क्युबाला सोव्हिएत युनियनचा मोठा आधार होता. १९९१ ते १९९३ या काळात सोव्हिएत संघ विसर्जित झाल्यानंतर तो आधार नाहीसा झाला, पण भारताने क्युबाची साथ सोडली नाही. अमेरिकेने लादलेल्या र्निबधांमुळे क्युबात अन्नधान्य आणि अन्य अत्यावश्यक सामग्रीचा तुटवडा जाणवत होता. त्या वेळी भारताने क्युबाला दहा हजार टन तांदूळ आणि दहा हजार टन गहू पाठवला. कॅस्ट्रो यांनी कृतज्ञतेने या मदतीचा उल्लेख ‘ब्रेड ऑफ इंडिया’ असा केला आणि तो बराच गाजला. कारण भारताने पाठवलेल्या गव्हापासून तयार झालेल्या पावाची किमान एक तरी लादी क्युबाच्या त्या वेळच्या ११ दशलक्ष लोकसंख्येपैकी प्रत्येक नागरिकाच्या वाटय़ाला आली असती. त्यानंतर क्युबातील भूकंपावेळी भारताने २ दशलक्ष डॉलर इतकी मदत केली होती.

जीवनपट

१३ ऑगस्ट १९२६ : पूर्व क्युबातील बायरन येथे कॅस्ट्रो यांचा जन्म. वडील स्पॅनिश स्थलांतरित जमीनदार. विद्यार्थी म्हणून उत्तम प्रगती. शेती सोडून शिक्षणावर भर.

२६ जुलै १९५३ : सांतियागो डे येथे क्युबाच्या लष्करी बराकीवर हल्ल्याचे नेतृत्व, कॅस्ट्रो यांना अटक.

२ डिसेंबर १९५६ : मेक्सिकोतून ग्रॅनमा जहाजाने ८१ साथीदारांसह क्युबात येऊन सिएरा माएस्ट्रा येथे २५ महिने लष्करी मोहीम.

१ जानेवारी १९५९ : हुकूमशहा फुलगेनशियो बॅटिस्टा देशाबाहेर पसार. कॅस्ट्रो यांचे हवानात विजयी आगमन.

१५ ते २७ एप्रिल १९५९ : अमेरिकेचे उपाध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्याशी भेट.

१९६० : रशियाशी राजनैतिक संबंध प्रस्थापित.

१९६१ : अमेरिकेशी राजनैतिक संबंध तोडले.

१७ ते १९ एप्रिल १९६१ : कॅस्ट्रोविरोधी १४०० जणांचा ‘बे ऑफ पिग्ज’मधील आक्रमणात पराभव.

१३ फेब्रुवारी १९६२ : अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे क्युबावर र्निबध

ऑक्टोबर १९६२  : रशियाने क्युबात क्षेपणास्त्रे पाठवली, पण अमेरिकेचे क्युबावरील संभाव्य आक्रमण टळले.

एप्रिल १९६३ : रशियाला पहिली भेट.

१९६५ : क्युबात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना.

१९७५ : अंगोलाच्या स्वातंत्र्यासाठी सैन्य पाठवले.

१९८० : १२५००० शरणार्थीना बाहेर जाण्यास परवानगी.

१९९० : सोविएत रशियाच्या विघटनानंतर क्युबाची आर्थिक कोंडी.

१९९५ : चीनला भेट

१९९८ : पोप जॉन पॉल द्वितीय यांचे क्युबा भेटीत स्वागत

मार्च २००३ : ७५ विरोधी नेत्यांच्या अटकेचे आदेश.

३१ जुलै २००६ : आतडय़ाच्या शस्त्रक्रियेनंतर सत्ता बंधू राऊल कॅस्ट्रो यांच्याकडे हस्तांतरित.

फेब्रुवारी २००८ : राऊल कॅस्ट्रो अध्यक्षपदी.

२२ मार्च २०११ : फिडेल कॅस्ट्रो यांनी अधिकारपद सोडल्याचे जाहीर केले.

१७ डिसेंबर २०१४ : राऊल कॅस्ट्रो यांच्याकडून अमेरिकेच्या मैत्रीप्रस्तावास प्रतिसाद .

२० जुलै २०१५ : अमेरिका व क्युबा यांचे एकमेकांच्या देशात दूतावास सुरू.

२५ नोव्हेंबर २०१६ : फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2016 2:25 am

Web Title: cuban revolutionary fidel castro
Next Stories
1 स्वरभाषेचा सांगाती..
2 बहुआयामी, व्यासंगी आणि अजातशत्रू
3 आठवडय़ाची शाळा : ठेंगण्या शाळेला उंच ताठ कणा मिळतो तेव्हा..
Just Now!
X