विसाव्या आणि एकविसाव्या शतकात युद्धाची प्रचंड वाढलेली संहारकता आणि जागतिक मुक्त व्यापारी व्यवस्थेत विविध देशांचे एकमेकांच्या अर्थव्यवस्थांमध्ये गुंतलेले हितसंबंध यामुळे आता प्रत्यक्ष रणभूमीवर युद्धे होण्याची शक्यता काहीशी कमी झाली आहे. मात्र शत्रुत्व ओसरलेले नाही. केवळ एकमेकांवर कुरघोडी करण्याचे मार्ग बदलत आहेत. आपली उद्दिष्टय़े साध्य करण्यासाठी शत्रुराष्ट्रावर प्रत्यक्ष हल्ला करण्याची आता फारशी गरज उरलेली नाही. जर त्या देशाच्या नागरिकांची किंवा एकंदर समाजाची मानसिकता बदलता आली, त्यांना आपल्याला हव्या त्या प्रकारे विचार करायला भाग पाडता आले तरी खूप काही साध्य करता येते. यालाच ‘सायकॉलॉजिकल वॉर’ (सायवॉर) किंवा ‘इन्फर्मेशन वॉर’ असे म्हणतात. अर्थात मानसशास्त्रीय किंवा माहिती युद्ध. नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रक्रियेत रशियाने केलेले कथित हॅकिंग हे त्याचे ताजे उदाहरण. त्यानिमित्ताने या संदर्भातील घडामोडींचा वेध..

अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत रशियाची काय भूमिका होती?

  • मतदानाला बराच अवकाश असताना रशियाच्या गुप्तहेर यंत्रणांनी अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही प्रमुख पक्षांच्या राष्ट्रीय समितीच्या संगणक सव्‍‌र्हरमधील ई-मेल आणि अन्य माहिती हॅकिंग करून चोरली. याशिवाय हिलरी क्लिंटन यांच्या प्रचार मोहिमेचे प्रमुख जॉन पोडेस्टा यांचा खासगी संगणक सव्‍‌र्हर हॅक करून त्यांचे ई-मेल चोरले.
  • त्यानंतर रशियाच्या सरकारच्या मध्यस्थांनी क्लिंटन यांच्यासंबंधी निवडक माहिती ‘विकिलिक्स’ आणि ‘गुसिफर २.०’ यांसारख्या संकेतस्थळांना आणि ब्लॉगना पुरवली. त्यांनी ती जगजाहीर केली.
  • सुरुवातीला अमेरिकेच्या तपास यंत्रणांना आणि अनेक तज्ज्ञांना असे वाटले की रशियाला केवळ अमेरिकी जनमानसांत गोंधळाचे वातावरण निर्माण करायचे आहे. मात्र नंतर ‘सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी’ला (सीआयए) जाणवले की, रशियाचा हेतू केवळ तेवढा नसून डोनाल्ड ट्रम्प यांना अनुकूल वातावरणनिर्मिती हे आहे.

ट्रम्प यांच्या बाजूने अमेरिकी जनमत तयार करण्यात रशिया कितपत यशस्वी झाली?

  • ‘सीआयए’ आणि अन्य तज्ज्ञांच्या मते याचे नेमके उत्तर देणे अवघड आहे, कारण निवडणुकीत अनेक घटक प्रभाव पाडत असतात आणि त्यापैकी एखाद्या घटकाचा नेमका परिणाम मोजणे कठीण काम आहे.
  • सामाजिक आणि राजकीय अभ्यासकांच्या आणि संशोधकांच्या मते अगदी हवामानातील बदल, एखाद्या खेळातील विशिष्ट संघाची कामगिरी अशा बाबीही मतदानावर परिणाम करू शकतात.
  • मतदारांच्या मानसिकतेवर झालेला अल्पसा परिणामही निर्णायक ठरू शकतो. ट्रम्प यांना अमेरिकेच्या मध्य आणि पश्चिमेकडील तीन राज्यांत निसटते बहुमत मिळाले आहे. अशा ठिकाणी मतदारांवरील थोडासाही परिणाम निर्णायक ठरू शकतो.
  • रशियाने समाजमाध्यमांवर आणि अन्य प्रसारमाध्यमांद्वारे क्लिंटनविरोधी माहितीचा रतीब घातला होता, पण रशियन माध्यमांचा अमेरिकेतील प्रभाव मर्यादित आहे. त्यापेक्षा त्यांचा युरोपमध्ये अधिक प्रभाव आहे.
  • ‘सीआयए’च्या मते प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी मतदारांनी मोकळ्या वातावरणात स्वतंत्रपणे आपला हक्क बजावला. मात्र त्याने रशियाच्या हॅकिंग उपद्व्यापाचे गांभीर्य कमी होत नाही.
  • क्लिंटन यांनी परराष्ट्रमंत्री असताना सरकारी कामासाठी खासगी ई-मेल सव्‍‌र्हर वापरल्याच्या प्रकरणी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सीआयएने नवे गौप्यस्फोट केले. त्याचाही रशियाच्या कारभारांना नकळत उपयोग झाला.

सीआयएच्या मते ट्रम्प यांना मदत करावे असे रशियाला का वाटले असावे?

  • वास्तविक प्रत्यक्ष मतदानाच्या खूप आधी रशियाने दोन्ही पक्षांच्या सव्‍‌र्हरमधून माहिती हॅक केली होती.
  • क्लिंटन यांनी पूर्वी त्यांच्या परराष्ट्रमंत्रिपदाच्या कार्यकाळात रशियाच्या विरोधात भूमिका घेतली होती. तसेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना विजय मिळाला, त्या निवडणुकीत भ्रष्टाचार आणि गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे क्लिंटन निवडून आल्यास त्यांचे धोरण रशियाविरोधी असेल असे पुतिन यांना वाटत होते.
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात पुतिन यांची प्रशंसा केली होती व रशियाला अनुकूल भूमिका घेतली होती. त्यामुळे रशियाने ट्रम्प यांच्या बाजूने वजन खर्ची घालण्याचा निर्णय घेतला असावा.

हे सगळे करण्यामागे रशियाची काय उद्दिष्टय़े असू शकतात?

  • याबाबतीत दोन मतप्रवाह आहेत. पहिला असा की, सुरुवातीला क्लिंटन विजयी होण्याची बरीच शक्यता होती. त्या वेळी त्यांच्याविषयी उलटसुलट माहिती पसरवून अमेरिकी नागरिकांच्या त्यांच्या सरकारवरील आणि व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करायचा.
  • दुसरा मतप्रवाह असा की, हे करत असताना ‘बोनस’ म्हणून ट्रम्प यांना मदत करण्याचा निर्णय झाला असावा आणि रशियाने अधिकचा फायदा साधला असावा.
  • गेल्या काही वर्षांत अमेरिका आणि युरोप आपल्या अस्तित्वावर उठले असल्याची भावना रशियामध्ये आहे. युक्रेन-क्रिमिया प्रश्न आणि सीरियातील यादवी युद्ध यामध्ये रशियाला होत असलेल्या विरोधातून ती भावना बळावली आहे. त्यामुळे अमेरिका आणि युरोपविरोधात रशिया सायबर हल्ले, मानसशास्त्रीय आणि माहिती युद्ध असे पर्याय अवलंबत आहे.

 

अनुवाद – सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com