News Flash

भविष्याच्या विळख्यात ‘ स्वयंभू उद्यमनगर’!

परदेशांतील कित्येक अभ्यासक आता धारावीच्या समाजजीवनावर, तेथील औद्योगिक व्यवस्थेवर संशोधन करत आहेत.

‘आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी’ म्हणून कुख्यात असलेल्या ‘धारावी’मध्ये मात्र, ‘विकास की परंपरा’ हे प्रश्नचिन्ह अधोरेखित होऊ पाहत आहे.

loksatta-verdha01
परदेशांतील कित्येक अभ्यासक आता धारावीच्या समाजजीवनावर, तेथील औद्योगिक व्यवस्थेवर संशोधन करत आहेत. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्थिक केंद्राच्या गाभ्यातदेखील, ‘धारावी’ नावाचे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा ढाचा जपणारे, सामूहिक विकासाचे प्रारूप ठरू शकेल असे ‘विशेष आर्थिक क्षेत्र’ कितीतरी पूर्वीपासून ‘स्वयंभूपणे’ निर्माण झाले आहे, हे या संशोधनातून समोर आले आहे.

मुंबईचा सांस्कृतिक वारसा, परंपरा जपण्यापेक्षा मुंबईच्या विकासाला प्राधान्य देण्याची मानसिकता शासन आणि प्रशासनकर्त्यांमध्ये मूळ धरू लागली आहे. या मानसिकतेची सुरुवात झाली तेव्हापासून मुंबईचा चेहरामोहरा बदलू लागला. मुंबईची जुनी ओळख असलेल्या खाणाखुणा इतिहासजमा झाल्या आणि जागतिकीकरणाची झळाळी आपोआपच मुंबईवर दिसू लागली. मुंबईला विकासाची गरज आहे असा वैचारिक गजर आता अधिक गतिमान झाला आहे. यामुळेच, मुंबईच्या परंपरा आणि ‘सांस्कृतिक भविष्या’समोर एक नवे प्रश्नचिन्ह उभे राहील, अशी भीती मुंबईच्या सांस्कृतिकतेशी नाळ जोडलेल्या समाजाचा एक घटक सतत व्यक्त करत असतो. मुंबईच्या प्रत्येक कानाकोपऱ्याला त्याचा त्याचा इतिहास आहे. त्याच्या खुणा या वर्गाने जाणीवपूर्वक जपल्या आहेत. पण एक कोपरा असाही आहे, जेथे इतिहासाच्या नव्या खुणा निर्माण होत गेल्या आणि गरजेपोटी त्या आपोआप जपल्या गेल्या. या कोपऱ्याचे नाव ‘धारावी’..
मुंबईकडे जगाचे लक्ष जाण्याच्या आधीपासूनच ‘आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी’ म्हणून कुख्यात असलेल्या ‘धारावी’मध्ये मात्र, ‘विकास की परंपरा’ हे प्रश्नचिन्ह अधोरेखित होऊ पाहत आहे. कधीकाळी असंख्य गरजवंतांनी आपल्या तुटपुंज्या साधनसामग्रीनिशी गरिबीच्या पडद्याआड उभे केलेले एक हे एक उद्योगविश्व ‘प्रगती’ आणि ‘परंपरा’ यांच्यातील संघर्षांत सापडले आहे. परंपरांचा बळी देऊन प्रगती साधण्याच्या मानसिकतेपुढे या विश्वाला आज ना उद्या गुडघे टेकावे लागतील, आणि एकेकाळची गलिच्छ वस्ती असलेले हे उद्यमनगर, जागतिक रेटय़ामुळे विकासाच्या दिखाऊ झगमगाटात न्हाऊन निघेल. धारावीचे हे भविष्य आता निश्चित झाले आहे. कारण मुंबईची विकासाची भूक वाढलेली आहे. यासाठी झोपडय़ांच्या केविलवाण्या िभतीआड चालणाऱ्या परंपरागत उद्योगांमध्ये ही भूक भागविण्याची क्षमता नाही. कारण हातावरच्या पोटांची भूक भागविण्यापुरतेच हे उद्योग उपयोगाचे आहेत..
मध्य रेल्वेचे सायन-माटुंगा स्टेशन आणि पश्चिम रेल्वेचे माहीम-माटुंगा स्टेशन यांच्यामध्ये ‘सँडविच’सारखा सापडलेला हा भूभाग म्हणजे भौगोलिकदृष्टय़ा मुंबईचे खरेखुरे हृदय असला, तरी पन्नास-साठ वर्षांपूर्वीच्या मुंबईच्या तत्कालीन विकासाचे वारे या स्वतंत्र गावाने आपल्या वेशीत येऊ दिले नव्हते. देशाच्या कानाकोपऱ्यातून आपली आपली परंपरागत उद्योगकौशल्ये सोबत घेऊन आलेल्या बलुतेदार समाजाला या भूभागाने पहिला आसरा दिला आणि धारावी हा मुंबईमधील देशाचा पहिलावहिला ग्रामीण संस्कृतीचा आरसा ठरला.
aniv06‘स्लमडॉग मिलिओनेअर’ चित्रपटाने धारावीचे चित्रण करून मुंबई आणि देशाच्या दारिद्रय़ाचा गलिच्छ चेहरा जगासमोर आणला, असे एक वादग्रस्त काहूर मध्यंतरी माजले, पण या चित्रपटाच्या निमित्ताने धारावीच्या चेहऱ्यामागचे ‘खरे रूप’ ‘शोधण्या’ची एक धडपडही सुरू झाली. धारावीचा फेरफटका मारल्यानंतर ‘उघडय़ा डोळ्यां’ना फक्त गलिच्छपणा, दारिद्रय़ आणि गरिबीच्या गत्रेत अडकलेले केविलवाणेपण दिसते. धारावीचे हे रूप टिपणाऱ्या अनेक कथा-कादंबऱ्या आणि चित्रपटांनीही जन्म घेतला; पण धारावीच्या साडेपाचशे एकरांच्या पसाऱ्यात आतवर डोळसपणे शोध घेतला, तर धारावी एक विकासाचे प्रारूप आहे, याची प्रचीती येते. आता जगालाही या वास्तवाची जाणीव होऊ लागली आहे. मुंबईत वर्षांनुवष्रे वास्तव्य करणाऱ्यांपकी अनेकांना केवळ प्रसारमाध्यमांमध्ये दिसणारी आणि ‘वाचता येणारी’ धारावी माहीत असते. त्यामुळे धारावी नेहमीच सर्वसामान्य मुंबईकराच्या कुतूहलाचा विषय राहिली आहे. तेथील समाजजीवन, अर्थकारण, धारावीतील घरे आणि उद्योगधंदे, व्यापार यांविषयी असंख्य ‘आख्यायिका’ सामान्यांच्या जगात कुतूहलाने चघळल्या जातात. मध्यमवर्गीय मुंबईकर तर आजही धारावीच्या वाटेला फारसा वळत नाही. एकीकडे आलिशान इमारतींचा विळखा वाढत असताना, मुंबईच्या या मध्यभागातील दलदलीच्या आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लपलेले ‘वेगळेपण’ शोधण्यासाठी जगाची पावले मात्र धारावीकडे वळत आहेत. ‘स्लम टुरिझम’च्या नावाखाली परदेशी पर्यटकांना धारावीची ‘सफर’ घडवून आणण्याचा ‘धंदा’ सुरू झाल्याची ओरड अलीकडे सुरू झाली होती; पण केवळ धारावीतले दारिद्रय़ आणि गलिच्छपणा टिपण्यासाठी पर्यटकांची पावले तिकडे वळली नव्हती, हे आता आपल्या ध्यानात येत आहे. धारावीतल्या ‘स्लम टुरिझम’मागे फक्त तेथील दारिद्रय़ाची ‘कुचेष्टा’ नव्हे, तर तिथल्या ‘स्वयंभू व्यवस्थे’विषयीचे ‘कुतूहल’देखील असावे. जे वास्तव आसपास राहणाऱ्यांनीही ओळखले नाही, ते शोधण्यासाठी जगाची धडपड सुरू होती, हे आता उघड झाले आहे. परदेशांतील कित्येक अभ्यासक आता धारावीच्या समाजजीवनावर, तेथील औद्योगिक व्यवस्थेवर संशोधन करत आहेत. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आíथक केंद्राच्या गाभ्यातदेखील, ‘धारावी’ नावाचे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा ढाचा जपणारे, सामूहिक विकासाचे प्रारूप ठरू शकेल असे ‘विशेष आíथक क्षेत्र’ कितीतरी पूर्वीपासून ‘स्वयंभूपणे’ निर्माण झाले आहे, हे या संशोधनातून समोर आले आहे.
‘धारावी’ हा मुंबईचा सर्वात दाट लोकवस्तीचा भाग आहे. तेथील अस्ताव्यस्त गल्लीबोळांमधील प्रत्येक घर हे एक ‘उद्योग केंद्र’ आहे. म्हणूनच, धारावी हा उद्यमशील मुंबईचा सर्वाधिक कृतिशील आणि ‘जिवंत कोपरा’ आहे. नुसत्या डोळ्यांना इथे जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसतात; पण या कचऱ्यातूनच ‘सोने’ वेचण्याचे उद्योग इथल्या कानाकोपऱ्यात सुरू असतात. शहरी संस्कृतीच्या प्रभावामुळे ग्रामीण भारतातील बलुतेदार पद्धती हळूहळू लोप पावत चालली आहे; परंतु शेकडो वर्षांपूर्वी, जगण्यासाठी मुंबईच्या आश्रयाला आलेल्या बलुतेदारांच्या वारसांनी आपल्यासोबत आणलेल्या ग्रामीण परंपरांचा आणि हस्तकलांचा वारसा धारावीतील आपापल्या पत्र्याच्या, कुडाच्या नाहीतर पुठ्ठय़ाच्या झोपडीतच जपला आणि जोपासला. म्हणूनच, धारावीतला कुंभारवाडा गुजरातेतल्या मातीकामाची परंपरा जपतो, तर चामडे कमाविण्याचा ग्रामीण भागातूनही नामशेष होत चाललेला उद्योग धारावीच्या आश्रयाने फोफावतो. या उद्योगातून निर्माण होणारी उत्पादने देशातीलच नव्हे, तर परदेशातील दिवाणखानेदेखील सजवतात. धारावीच्याच एखाद्या कोपऱ्यात कचरयातून गोळा केलेल्या प्लॅस्टिकवर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू असतात, मुंबईच्या ‘पाणीपुरी’ आणि ‘इडलीसांबार’ अशा खाद्य संस्कृतीला खतपाणी घालणारी लहान-मोठी उत्पादने तयार होत असतात, तर कुठे शेकडो हात कापडावर जरीकामाची कलाकुसर करत असतात. थोडक्यात, धारावी ‘क्लस्टर’ पद्धतीच्या एसईझेडचे स्वयंभू मॉडेल आहे. धारावीच्या या उद्यमशीलतेमुळेच, कचऱ्याने वेढलेली, गलिच्छपणाचा मुखवटा घेतलेली आणि ‘कळकटलेली’ धारावी खरे तर केव्हापासूनच ‘मिलिओनेर’ झाली आहे. धारावीच्या घराघरांत चालणाऱ्या असंख्य उद्योगांनी मुंबईत रोजीरोटीसाठी येणाऱ्या लोंढय़ांना ‘चारा’ दिला आहे आणि त्यांच्या ग्रामीण हातांनी बनविलेल्या असंख्य वस्तूंना निर्यातीची गुणवत्ता प्राप्त झालेली आहे.
विशेष म्हणजे, कोणतेही सरकारी नियोजन नाही, कोणताही कृती आराखडा नव्हता, पारंपरिक ज्ञानाच्या जोरावर उद्यमशीलता राबविणाऱ्या या नगरासाठी सरकारने कोणताही झोन आखून दिलेला नव्हता, किंवा इथल्या पसाऱ्यासाठी वास्तुरचना शास्त्राचा कोणताही संकेत नव्हता. तरीही हे स्वयंभू उद्योगकेंद्र आपल्या गरजेनुसार, लपूनछपून विकसित होत गेले आणि हातावरचे पोट असलेले हजारो गरजवंत मुंबईत जगू शकले. त्यामुळे धारावीची ही यशोगाथा सरकारी किंवा प्रशासकीय कौशल्याची यशोगाथा ठरू शकत नाही, तर ती केवळ परंपरांच्या आधाराने पोटाची खळगी भरणाऱ्या गरजवंतांच्या सामूहिक प्रयत्नांची आगळी यशोगाथा आहे. आपल्या गावाकडच्या परंपरांचा वारसा घेऊन मुंबईत दाखल होणाऱ्या प्रत्येकाचा या यशोगाथेमध्ये वाटा आहे. देशी-परदेशी अभ्यासकांनी धारावीला काही शिकवण्याऐवजी, धारावीकडूनच काहीतरी शिकावे, असाच खरे तर या उद्यमनगराचा इतिहास आहे.
माहितीच्या महाजालावर फेरफटका मारला, तर धारावीविषयीच्या जागतिक कुतूहलाचे हे मायाजाल सहज कुणालाही अनुभवता येईल. या पाश्र्वभूमीवर, धारावीच्या विकासाचा आराखडा नवा आराखडा आता येऊ घातला आहे. नव्या विकासात धारावीच्या एकत्रित भूखंडावर टोलेजंग इमारती निर्माण होतील. अनेक नवे उद्योग उभे राहतील. स्थानिक रहिवाशांना त्यातून रोजगारही मिळतील आणि गलिच्छ घरांऐवजी पक्की मोठी घरेही मिळतील; पण एका बाजूला ‘सॅटेलाइट’ विकासाची वाटचाल करणाऱ्या मुंबईच्या या परिसरात कधीपासून उमटलेल्या गांधीवादी विकासाच्या खाणाखुणा मात्र नव्या विकासात पुसल्या जातील. ‘मुंबईला परंपरांची नव्हे, तर विकासाची गरज आहे’ हा टाहो खूप वर्षांपासून सुरू असला, तरी धारावीचे विकासाचे अस्सल देशी मॉडेल आपले अस्तित्व टिकवून नवा चेहरा धारण करणार, की जुना चेहरा टाकून देऊन नवा मुखवटा धारण करणार, याचे कुतूहल आता वाढणार आहे. धारावीचे जुने रूप बदलेल, तेव्हा कोळशाची खाण म्हणून कुख्यात असलेला एक इतिहासदेखील कदाचित पुसला जाईल. कदाचित त्याबरोबर या खाणीतील अस्सल हिरेही काळाच्या पडद्याआड दडून जातील..
दिनेश गुणे – dinesh.gune@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 2:05 am

Web Title: dharavi identity of mumbai
Next Stories
1 लोकल ते ग्लोबल : खाद्यसंस्कृती ते फूड कल्चर
2 मुंबईतील बाजार..
3 मुंबईतील वाहतूक- आज व उद्या
Just Now!
X