निश्चलनीकरणानंतर प्रारंभी अगतिकता म्हणून रोकडरहित व्यवहारांकडे जनसामान्य वळले. मार्च-एप्रिलपर्यंत नवनव्या डिजिटल पर्यायांमधून विनिमय वाढतही गेला; परंतु पुढे जसजशी रोकड उपलब्ध होऊ लागली आणि रोकडरहित व्यवहारांवर शुल्क आकारणी सुरू झाली, तसे लोक पुन्हा रोख नोटा देऊन होणाऱ्या व्यवहारांकडेच वळल्याचेही आढळून येते.

रोकडरहित व्यवहारांसाठी उपलब्ध असलेल्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड, यूपीआय, यूएसएसडी, प्रीपेड पेमेंट इस्ट्रुमेंट (पीपीआय) आणि एनईएफटी, आयएमपीएस, नेटबँकिंग या सर्व पर्यायांतून होणाऱ्या विनिमयांचा मासिक तपशील रिझव्‍‌र्ह बँकेकडून जाहीर केला जातो. रिझव्‍‌र्ह बँकेच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात १२४ लाख कोटी रुपये मूल्यांचे रोकडरहित व्यवहार झाले. हे प्रमाण ऑगस्ट महिन्यातील १०९ लाख कोटी रुपयांच्या व्यवहारांच्या तुलनेत १३.५ टक्क्यांनी वाढले आहे. महिनागणिक वाढ दिसत असली तरी नोटाबंदीनंतच्या मार्च महिन्यात १४९ लाख कोटी रुपयांचे रोकडरहित व्यवहार झाले होते. त्यानंतर त्यात घसरण होत गेली आहे. शिवाय ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमधील उलाढालीही अनुक्रमे ८८.३४ कोटी ते ८६.५८ कोटी अशा घसरल्या आहेत.


रोकडरहित व्यवहारात मुख्यत: एनईएफटीद्वारे पैशांच्या हस्तांतरणात लक्षणीय वाढ स्पष्टपणे दिसून येते. यूपीआय आणि मोबाइल पाकिटांच्या व्यवहारांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. सरलेल्या सप्टेंबर महिन्यात यूपीआयच्या व्यवहारांमध्ये ८५ टक्क्यांची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात यूपीआयच्या माध्यमातून ५२९३ कोटी रुपयांचे व्यवहार झाले.  त्याउलट डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या व्यवहारांमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे; किंबहुना निश्चलनीकरणापश्चात काही महिन्यांत डेबिट कार्डद्वारे व्यवहार ४७ टक्क्यांनी वाढले, तेही आता पूर्वपदावर आले आहेत. शिवाय त्यातही ९० टक्के व्यवहार हे एटीएममधून रोख काढण्यासाठी होत असल्याचे पाहता, रोख बाळगण्याला आजही लोकांचे प्राधान्य असल्याचे स्पष्ट होते.

‘भीम’ आवाकाही छोटाच!

सरकारी मोबाइल वॉलेट भीम अ‍ॅपचा वापर करण्यास अद्याप फारसे भारतीय उत्सुक असल्याचे दिसून येत नाही. अ‍ॅपचे डाऊनलोड आणि नोंदणी असलेल्या ग्राहकांची संख्या जास्त असली तरी प्रत्यक्ष व्यवहार मात्र फारच कमी होताना दिसतात. खासगी मोबाइल वॉलेट्सच्या माध्यमातून दिवसाला ५० ते ६० लाखांचे व्यवहार होताना दिसतात. तेच प्रमाण भीम अ‍ॅपसाठी अवघे १० ते १५ लाखांपर्यंतचे आहे.

सकारात्मक चित्र

नोटाबंदीनंतर सुरुवातीच्या काळात लोकांकडे व्यवहार करण्यासाठी विशेष पर्याय नव्हते. यामुळे लोकांनी मोबाइल वॉलेट्स वापरण्यास सुरुवात केली. त्या काळात रोकडरहित व्यवहारांशी जोडले गेलेले बहुतांश लोक आजही रोकडरहित व्यवहार करत असल्याचे ‘सीआयआय’चे पश्चिम विभागाचे अध्यक्ष निनाद कर्पे यांनी स्पष्ट केले. सरकारी तसेच महाविद्यालयीन पातळीवर रोकडरहित व्यवहारांना चालना देण्यात येत आहे.  येत्या काळात हे व्यवहार अधिक वाढतील, असेही ते म्हणाले.