सुनील सुकथनकर

मला सुमित्रा भावे यांच्याकडे स्वतंत्रपणे बघणे खूप कठीण जात आहे. जवळची व्यक्ती, सामाजिक व्यक्ती, कलावंत आणि विचारवंत म्हणून त्या मला वेगळ्या दिसत आहेत. ज्या व्यक्तीबरोबर मी जगत आलो, एकत्र काम करत आलो, मूलभूत शाश्वत मूल्यांचा शोध घेणारी व्यक्ती म्हणून त्या किती मोठ्या होत्या, हे अचानक त्या नाहीत तेव्हा प्रकर्षाने जाणवते.

त्या म्हणायच्या ‘माणसाच्या आयुष्यामध्ये काही मूल्यं सांस्कृतिक असतात आणि काही शाश्वत मूल्यं असतात. शाश्वत मूल्यांचा शोध आणि अंगीकार करणं महत्त्वाचे आहे. सांस्कृतिक मूल्यं ही येतात आणि जातात. पोशाखांच्या फॅशनसारखी असतात. अनेकदा माणसं त्या सांस्कृतिक मूल्यांमध्येच अडकतात. त्याने आयुष्य दु:खी करून घेतात. काही वेळा त्याचे भयानक त्याचे परिणाम दिसतात. पण शाश्वत मूल्यं ही सत्य, पे्रम, करुणा यांसारखी असतात. या शाश्वत मूल्यांमध्ये कधी शोषण नसते. अन्याय नसतो. हा शोध सतत त्यांच्या मनामध्ये सतत सुरू होता. चित्रपट निर्मिती हा त्याचा एक भाग होता. चांगल्या मूल्यांचा शोध घेण्याच्या भूमिकेतून त्या चित्रपटाकडे वळल्या. त्यातून या माध्यमाचा शोध त्यांनी सुरू केला.

सध्या त्या आयुष्याच्या ज्या टप्प्यावर होत्या, ते पाहता हा शोध एका नव्या आध्यात्मिक जाणिवांकडे चालला होता. ‘दिठी’ हा त्यांनी स्वतंत्रपणे केलेला अखेरचा चित्रपट होता. दि. बा. मोकाशी या त्यांच्या आवडत्या लेखकाच्या कथेवर आधारित हा चित्रपट संपूर्ण जीवन आणि मृत्यू या रहस्याविषयी गोष्ट आहे. ती बनविताना वारकरी पंथ, विठ्ठल आणि ते सगळे अध्यात्म याचा जीवन-मृत्यूच्या गूढतेचा शोध असा तो चित्रपट आहे. खूप वर्षे चाललेला हा प्रकल्प त्यांनी दोन वर्षांपूर्वी पूर्ण केला. इथून पुढे त्यांना आलेल्या जीवनातील तºहेतºहेच्या अनुभवांमधील साधे, सूक्ष्म अध्यात्म त्यांच्या हातून लिहिलं गेलं असतं. मांडलं गेलं असतं. ती संधी आपण त्या नसल्यामुळे गमावली आहे, असे वाटते.

त्यांचे वय पाहता त्या अत्यंत कृतकृत्य आणि समाधानकारक आयुष्य जगल्या. त्यांनी खूप मोठे काम उभे केले आणि खूप माणसे घडविली. कलावंतांची वेगवेगळी पिढी त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आली होती. तीसेक वर्षांचा फरक असलेले आमच्यापैकी अनेक जण आहेत की जे असे म्हणू शकतात ‘आम्ही या स्कूलमधून तयार झालो आहोत’. मग कोणी लेखक आहेत. कोणी दिग्दर्शक तर कोणी अभिनेते, कोणी तंत्रज्ञ आहेत. असे अनेक जण त्यांनी घडविले. इथेच त्यांचे काम संपले असे म्हणता येणार नाही. तर, इथून आयाम ओलांडून पुढे जाऊ शकले असते. ते जाऊ शकत नाही याचा त्रास होत आहे. वयाने त्या मोठ्या असल्या तरी हा मृत्यू अकाली आहे असे वाटते.  आणखी १५ वर्षे त्या उत्कृष्ट काम करू शकल्या असत्या. आपल्याला खूप काही मिळाले असते. त्याला आपण मुकलो. माणूस जातो तेव्हा बरोबर काय काय घेऊन जातो तर, कलावंताची बुद्धिमत्ता, संपूर्ण महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास समजणारी अशी एक व्यक्ती की जिला सगळ्या जातिव्यवस्थेपासून ते स्त्री-पुरुष समानतेपर्यंत सगळी मूल्ये लावून त्यातून संस्कृती समजते असे प्रगल्भ व्यक्तिमत्त्व, हे सगळे कोठून आणायचे. हे मन आणि मेंदू कोठून आणणार? हे  दु:खी करणारे आहे.

आदरांजली

सखोल चिंतन-निरीक्षण

माझ्या संस्कारक्षम वयात सुमित्रा मावशीची भेट झाली. मी शाळेत होते तेव्हा माझी आई ज्योती सुभाष तिच्याबरोबर काम करत होती. त्यामुळे तेव्हापासून माझी तिच्याशी ओळख आहे. तिचा ‘चाकोरी’ हा लघुपट माझा पहिला चित्रपट होता. आयुष्यातला प्रत्येक क्षण ती वरवर कधीच जगली नाही. प्रत्येक गोष्ट अनुभवत, त्यावर सखोल चिंतन-निरीक्षण करून ती मांडत असे. आयुष्याकडे जवळून पाहण्याची ताकद तिच्यात होती. ती तिच्या अनुभवातून आम्हाला देत गेली आणि आम्ही आपसूक घेत गेलो.

– अमृता सुभाष, अभिनेत्री

लिखाणातच ताकद…

त्यांच्या लिखाणात, त्यांनी रंगवलेल्या प्रसंगात एक  ताण असायचा. मानवी नात्यातील ताण त्यात अचूक पकडलेला असायचा. जितके  खरे तितके  ते बरोबर हा त्यांचा आग्रह होता. आणि सेटवरच्या प्रत्येकाकडून आम्ही तो प्रसंग अचूक साकारावा ही त्यांची अपेक्षा असायची. या अपेक्षांबद्दल त्यांनी कधी जाहीर चर्चा के ली नाही, मात्र ती समोरच्याला समजून-उमजून पूर्ण करायलाच लागायची. आयुष्य ही समजून घेण्याची गोष्ट आहे, असे त्या म्हणत असत.

– सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री

सृजनशील समाजमन

सुमित्रा भावे यांच्या जाण्याने स्वातंत्र्योत्तर काळातील चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एका महत्त्वाच्या विचारी, सृजनशील समाजमनाला आपण मुकलो आहोत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सखोल समाजचिंतन, स्त्री जाणिवेचा सुस्पष्ट विचार आणि त्या विषयीच्या सृजनशील संवेदना यांचा नेमका संगम होता, जो त्यांच्या कलाकृतीत गेली ३०-३५ वर्षे आपण बघत आलो आहोत.

– सतीश आळेकर, नाटककार

तिची शिकवण जपली

सुमित्रा भावे ही माझी सख्खी मावशी. त्यामुळे लहानपणापासून मी तिच्याबरोबर काम करायला सुरुवात केली होती. सिनेमा हा यशासाठी किं वा पैशासाठी करायचा नाही ही तिची आग्रहाची शिकवणूक होती. तुमचे जगणे, तुमचे अनुभव, तुमचे एकमेकांबद्दलचे विचार यांची देवाणघेवाण करणे ही कलाकृतीची गरज असते. त्यामुळे एक कलाकार म्हणून नाही तर माणूस म्हणून चित्रपट माध्यमाकडे पाहिले पाहिजे ही तिची शिकवण आम्ही आजही जपली आहे.

देविका दफ्तरदार, अभिनेत्री

चित्रपट नावाची गोष्ट मला सुमित्रा मावशीमुळे समजली. मावशीच्या एका मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा कॅमेरा अनुभवला. मावशी माझ्यासाठी चित्रपटाचे विश्व खुले करणारी दूत होती.

– गिरीश कुलकर्णी, अभिनेता

सुमित्रा भावे या माझ्या चित्रपट क्षेत्रातील गुरू. त्यांना भेटल्यामुळेच मी या माध्यमाकडे ओढला गेलो.  माणसाच्या मनाच्या आतले न आकळलेले पोत शोधण्याचा प्रयत्न त्यांच्या कलाकृतींनी केला.

– उमेश कुलकर्णी , दिग्दर्शक

सुमित्रा भावे यांच्याबरोबर मी ‘नितळ’ या चित्रपटात सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. फक्त कलेच्या प्रेमापोटी त्यांनी वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले त्यांच्या चित्रपटात कुठल्याही प्रकारची व्यावसायिक गणितं नव्हती.

– मंगेश जोशी