पराग परीट

कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या पश्चिम भागात गेल्या वर्षी उन्हाळी हंगामात नाचणी पिकाच्या लागवडीचा प्रयोग करण्यात आला. आत्मा, महाबीज, विभागीय कृषी संशोधन केंद्र आणि काही प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून केवळ पंधरा एकरांवर केलेला हा प्रयोग यशस्वी झाल्याने यंदा गावागावात खरिपात भात आणि उन्हाळी नाचणी अशा नवी पीक पद्धतीचा अवलंब सुरू केला आहे. या नव्या प्रयोगाबद्दल..

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये उसाचे उत्पादन कमी येते आणि शेतकऱ्यांना ते आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही हे आता बऱ्याच अंशी सिद्ध झाले आहे. तरीदेखील उसाला तितक्याच ताकदीचा पर्याय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांकडून नाईलाजाने आजवर उसाचेच उत्पादन घेतले जात आहे. परंतु आता याच भागात एका यशस्वी प्रयोगाने खरिपात भात आणि उन्हाळ्यात नाचणी ही पीक पद्धती लोकप्रिय झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भाग खरेतर भात, नाचणी या पारंपरिक पिकांचा. परंतु पुढे कारखानदारी वाढल्याने या पीक पद्धतीत उसाचा शिरकाव झाला आणि या पीक पद्धतीला फाटा मिळाला. परंतु या भागात उसाचे उत्पादनही कमी आणि आर्थिकदृष्टय़ा ते न परवडणारे असे होऊ लागल्याने शेतकरी पर्यायी पीक पद्धतीच्या शोधात होते. या अशा स्थितीतच आता हा नवा प्रयोग नवी दिशा दाखवणारा ठरला आहे.

उसाच्या खालोखाल पश्चिमेकडील या भागात खरीप हंगामात भाताचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. कोरडवाहू आणि डोंगरउतारावरील शेत जमिनींचे प्रमाण जास्त असल्याने खरिपात भात, नाचणी काही प्रमाणात भुईमूग ही पिके घेतली जातात. डोंगरउतारावरील वरकस जमिनीवर जिथे अन्य कोणतीही पिके सहसा घेता येत नाहीत तेथे नाचणी कित्येक वर्षांपासून घेतली जात होती. मात्र काही वर्षांपूर्वी बाजारात दर मिळत नसल्याने आणि ज्या भागात नाचणी पिकते तिथल्याच लोकांच्या आहारातून नाचणी जवळपास हद्दपार झाल्याने नाचणीची लागवड खूप कमी झाली होती. मात्र, आता बदलत्या जीवनशैलीत नाचणीला पुन्हा मागणी वाढू लागली आहे. तिला चांगला दरही मिळू लागल्याने शेतकरी पुन्हा या पिकाचा विचार करू लागले होते. हा बदल ओळखून पन्हाळा तालुक्यातल्या अठरा प्रयोगशील शेतकऱ्यांनी खरिपात पिकणारी नाचणी उन्हाळ्यात घेता येते का, याची गतवर्षी चाचपणी केली. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, महाबीज, विभागीय कृषी संशोधन केंद्र आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी पन्हाळा तालुक्यात पंधरा एकरावर हा प्रयोग केला आणि त्याला यश आले. हे पीक खरिपासोबतच उन्हाळी हंगामात घेता येते आणि ते खरिपापेक्षा चांगले उत्पादन देते असे स्पष्ट झाले. या नव्या पीक पद्धतीने आणि तिच्यातील यशाने या भागातील शेतीला एकप्रकारे नवी दिशाच मिळाली. शेतकऱ्यांमध्ये या प्रयोगाची चर्चा सुरू झाली. यंदा या प्रयोगाची व्याप्ती अजून वाढत पन्हाळा तालुक्यात शंभर एकराहून जास्त क्षेत्रावर उन्हाळी नाचणीची लागवड  झाली आहे.

गेल्या वर्षी खरिपात भाताचे पीक घेतलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी त्याच शेतात यंदा उन्हाळी नाचणी पीक घेतले आहे. गतवर्षी अतिवृष्टीने झालेल्या भात पिकाच्या नुकसानीची भरपाई उन्हाळी नाचणीच्या माध्यमातून होईल या आशेने उन्हाळी नाचणी घेणारे शेतकरीही जास्त आहेत. दोन पिके तीही या भागातील हवामान, जमिनीला अनुकूल अशी घेतल्याने उत्पादन, उत्पन्न वाढले. तसेच एखादे पीक कुठल्या आपत्तीत फसले तर दुसरे पीक आधार देऊ लागले.

या पीक पद्धतीमध्ये खरिपातल्या भात पिकाची ऑक्टोबरमध्ये कापणी केल्यानंतर साधारणपणे एक ते दीड महिना जमिनीच्या मशागतीला अवधी मिळतो. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवडय़ात नाचणीची गादी वाफ्यावर रोपवाटिका करतात. एक एकर नाचणी लागवडीसाठी दोन गुंठे क्षेत्रावरील रोपवाटिका पुरेशी होते.

डिसेंबरमध्ये थंडी जास्त असल्यास रोपांची वाढ मंदावते. त्यामुळे रोपे सर्वसाधारणपणे एक महिन्याने पुनर्लागणीस तयार होतात. मुख्य शेतात नाचणीची रोपे लावण्याआधी एक ते दीड महिना शेत रिकामे असते. अशावेळी ताग किंवा धैंच्याचे पीक हिरवळीच्या खताच्या उद्देशाने घेऊन जमिनीत गाडल्यास त्याचा नाचणीला खूप फायदा होतो.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगरउताराच्या तांबडय़ा मातीच्या आणि अतिवृष्टी होणाऱ्या भागात एकरी उसाचे सरासरी उत्पादन तीस टनापेक्षा जास्त मिळत नाही. उसासाठी एकरी या भागात पंधरा ते वीस हजार रुपये खर्च केला जातो. एक एकरातून जास्तीत जास्त तीस टन उत्पादन आणि उत्पादन खर्च वजा जाता मिळणारा निव्वळ नफा पाहिला तर तो एकरी सत्तर ते नव्वद हजाराच्या आसपासच असतो. मात्र त्याऐवजी खरिपात इंद्रायणी सारख्या बाजारात मागणी असलेल्या भाताची लागवड केली तर त्याद्वारे योग्य व्यवस्थापनेत एकरी साधारणपणे पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटल भाताचे उत्पादन मिळते. दोन हजार सातशे ते तीन हजार रुपये क्विंटलला दर मिळतो. सर्वसाधारणपणे एक एकर इंद्रायणी उत्पादनासाठी बारा ते चौदा हजार रुपये खर्च येतो. खर्च वजा जाता साठ ते सत्तर हजार रुपये निव्वळ नफा मिळू शकतो.

खरिपातील भातानंतर उन्हाळी हंगामात नाचणीचे पीक घेतले तर चांगल्या व्यवस्थापनेत नाचणी धान्याचे सोळा ते अठरा क्विंटल एकरी उत्पादन मिळते. सध्याचा घाऊक बाजारभाव दोन हजार ते दोन हजार पाचशेच्या आसपास आहे. नाचणी पिकाचा एक एकराचा उत्पादन खर्च फार कमी म्हणजे आठ ते दहा हजार रुपये आहे. खर्च वजा जाता नाचणीतून किमान तीस ते पस्तीस हजार रुपये मिळतात. नाचणीची कणसं खुडून झाल्यानंतर ऐन उन्हाळ्यात जनावरांना सकस चारा उपलब्ध होतो. एक एकरातून नाचणीचा चार ते पाच टन हिरवा चारा मिळतो. या नाचणीच्या चाऱ्यापासून मूरघास तयार करून विकल्यास पंधरा ते वीस हजार रुपये मिळतात, हे गेल्या वर्षी प्रयोगशील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. मूरघास न करता जागेवर आहे त्या स्थितीतही काही शेतकऱ्यांनी दोन हजार रुपये टन किंवा आठ ते दहा हजार रुपये एकरातला चारा विकला आहे. याचा अर्थ खरिपात भात आणि उन्हाळ्यात नाचणी पीक घेऊन एकरातून एक लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळू शकतो.अभ्यासपूर्ण आणि प्रयोगशील शेतकरी ही नवी पीक पद्धती स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे. खरिपातल्या भातातून मिळणारे पिंजर आणि उन्हाळी नाचणीचा मिळणारा हिरवा सकस चारा किंवा त्यापासून तयार करता येऊ  शकणारे मूरघास यांचा घरच्या जनावरांसाठी जरी वापर केला तरी दुग्धोत्पादन खर्चातही मोठी बचत शक्य होईल.

नाचणीच्या या प्रयोगाखालील क्षेत्रात पुढील वर्षी तिप्पटीने वाढ होईल असे चित्र आहे. एखाद्या शेतकऱ्याला या प्रयोगातून मिळत असलेले यश पाहता आता गावागावात उन्हाळी नाचणी पिकाबाबत  जिज्ञासा वाढू लागली आहे. परिणामस्वरूप उन्हाळी नाचणीच्या लागवडीकडे त्यांचा कल वाढत आहे. खरिपात भात आणि त्यानंतर उन्हाळ्यात नाचणी ही नवी पीक पद्धती या भागात आता मूळ धरू लागली आहे. शेतक री बांधवांनी प्रयोगशीलता जपायला पाहिजे. उन्हाळी नाचणी आणि उन्हाळी वरी उत्पादनाचा प्रयोग म्हणजे आमच्या पन्हाळा तालुक्यातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी राज्यभरातल्या शेतकऱ्यांना, संशोधकांना दिलेली एक अनोखी भेटच आहे.

(लेखक पन्हाळा तालुका कृषी विभागात तंत्रज्ञान व्यवस्थापक आहेत.)