तरुण तेजांकीत उपक्रमातील परीक्षकांची भावना

मुंबई :  युवकांमधील ऊर्जा, उद्यमशीलता, जिद्द, प्रतिभेला गौरवणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वासाठी सर्वच परीक्षक राज्यभरातून आलेल्या उत्तम अर्जातून गुणवंतांची निवड करीत आहेत. या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असली, तरी  प्रज्ञावंतांची निवड करताना आलेल्या अनुभवांबद्दल परीक्षकांनी व्यक्त केलेल्या भावना.

सर्वच अर्ज उत्तम

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमासाठी परीक्षक समितीवर काम करतानाचा अनुभव अतिशय समृद्ध करणारा होता. खरोखरच सांगतो की, आलेले सर्वच अर्ज उत्तम होते. प्रत्येकाच्या कामात वेगळेपणा आणि महत्त्वाचे म्हणजे सच्चेपणा होता. या पुरस्काराच्या निवडीदरम्यान आम्हा परीक्षक समितीचीही भरपूर चर्चा झाली. प्रत्येक अर्जावर सर्व बाजूंनी चर्चा झाली, जी निवड प्रक्रियेसाठी महत्त्वाची होतीच, पण आम्हालाही व्यक्तिश: अनेक विषयांची नवी माहिती देणारी आणि समृद्ध करणारी होती. आम्ही परीक्षक समितीतर्फे काही नव्या शाखा, क्षेत्रे, विभाग यामध्ये जोडण्याची विनंती ‘लोकसत्ता’ला केलेली आहे, त्याकडे ते लक्ष देतीलच याची खात्री आहे. या उन्नत अनुभवाबद्दल ‘लोकसत्ता’चे धन्यवाद!

– विक्रम लिमये, एनएसई लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक

मोठी जबाबदारी

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ हा अतिशय उत्तम उपक्रम आहे. याविषयी मी ऐकले होते, वाचले होते आणि यंदा या उपक्रमात परीक्षक समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली, याचा आनंद वाटतो. ही एक मोठी जबाबदारी होती. कला आणि मनोरंजन क्षेत्रातील पुरस्कारांची निवड करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. या क्षेत्रातून निवड करणे खरोखरच कठीण झाले. कारण आलेल्या अर्जातील प्रत्येकाकडेच चांगले कलागुण आहेत. परीक्षक समितीवर आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्ती असल्याने प्रत्येक अर्जाचा वेगवेगळ्या पैलूंतून अभ्यास झाला. सगळेच अर्जदार उत्तम काम करणारे होते त्यामध्ये जे आम्हाला अधिक उत्तम वाटले, त्यांना पुरस्कार मिळाले. ज्यांना मिळाले नाहीत त्यांनी नाउमेद होऊ नये, पुढच्या वर्षी पुन्हा अर्ज करावा. ‘लोकसत्ता’ला विनंती आहे की, कला आणि मनोरंजन विभागामध्ये नाटय़, नृत्य, संगीत अशा उपशाखा जर केल्या तर अधिक कलाकारांना न्याय देता येईल. हा उपक्रम असाच विस्तारावा आणि धडपडणाऱ्या तरुणांसाठी उपयोगी ठरावा, याच शुभेच्छा!

– दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ अभिनेते

योग्य टप्प्यावर कामाची ओळख..

आपल्याकडे सर्वसामान्यपणे कारकीर्द संपत आल्यावर ओळख मिळते, मानसन्मान मिळतात. पण जेव्हा लोकांपर्यंत पोहोचण्याची, चांगले व्यासपीठ मिळण्याची खरी गरज असते, तेव्हाच ते मिळाल्यास काम करण्याचा हुरूप मिळतो. लोकांचा पाठिंबा मिळण्याची जास्त शक्यता निर्माण होते. म्हणूनच विविध क्षेत्रांत धडपडणाऱ्या गुणी तरुणांचा सन्मान करणारे ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’चे व्यासपीठ मला महत्त्वाचे वाटते. या उपक्रमातील अर्ज भरण्याची पद्धत, त्याची छाननी आणि अंतिम निवड ही सारीच प्रक्रिया अतिशय पारदर्शी आणि विचारपूर्वक केलेली आहे. परीक्षक समितीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्ती असल्याने वेगवेगळे दृष्टिकोन चर्चिले जातात. एकांगी विचारांचा धोका टळतो. तरुणांच्या कामांचा विविध अंगांनी विचार होतो परिणामस्वरूप निवड प्रक्रियेचा दर्जा वाढतो. मला वाटतं चार-साडेचारशे अर्ज तर या उपक्रमासाठी येतातच, पण महाराष्ट्रातल्या धडपडणाऱ्या तरुणांची संख्या पाहता ही अर्जसंख्या आता हजारांच्या घरात नक्कीच जायला हवी.

– प्रियदर्शिनी कर्वे, ज्येष्ठ संशोधक

चाकोरीबाहेरील कामाची ओळख..

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ हा खरोखरच एक मानाचा पुरस्कार आहे. राज्यामध्ये विविध क्षेत्रांतील तरुणाई जे चाकोरीबाहेरील काम करण्याचा प्रयत्न करत असते, त्याला न्याय देण्याचा हा एक उत्तम प्रयत्न आहे. या पुरस्कारासाठीची निवड प्रक्रिया नि:संशय पारदर्शी आणि केवळ गुणांना महत्त्व देणारी आहे. प्रत्येक अर्जाची छाननी करताना आम्ही संपूर्ण दिवस घालवलेला आहे, अर्थातच हा संपूर्ण काळ आम्हा प्रत्येकालाच नवी माहिती देणारा आणि खऱ्या अर्थाने ‘क्वालिटी टाइम’ होता असे म्हणेन. ज्यांना यंदा हा पुरस्कार मिळाला आहे, त्यांचे अभिनंदन पण ज्यांना मिळाला नाही त्यांनी नाराज न होता पुढील वर्षी नक्की अर्ज करावा, तेव्हा कदाचित तुमचे काम अधिक विस्तारले असेल आणि पुरस्काराची माळ तुमच्या गळ्यात नक्कीच पडेल.

– डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक

तरुणांनी प्रेरणा घ्यावी

‘हे कसे होईल या प्रश्नाला ज्यांनी सुळावर चढवले आहे आणि जे वैफल्यग्रस्त होत नाहीत; ते तरुण,’ अशी तरुणांची व्याख्या माझे आजोबा बाबा आमटे यांनी केली होती. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारासाठी परीक्षक समितीमध्ये काम करताना अशा अनेक जिद्दी तरुणांची उदाहरणे पाहायला मिळाली. यंदा निवड करताना परीक्षक समितीमध्ये आम्हा सगळ्यांनाच भरपूर त्रास झाला, पण सकारात्मक. कारण आलेले सगळेच अर्ज गुणवत्तापूर्ण होते. शेवटी पुरस्काराला संख्येचेही बंधन असतेच. ज्यांची निवड झालेली नाही त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा अर्ज करावेत. कारण केवळ पुरस्कारासाठी या तरुणांनी कधीच काम सुरू केले नव्हते याची मला खात्री आहे. पुढील वर्षभरात ते आपल्या कार्याला नक्कीच पुढच्या टप्प्यावर नेतील, अशी आशाही मला आहे. ज्यांना पुरस्कार मिळाला आहे, त्यांच्यापासून प्रेरणा घेत महाराष्ट्रातील इतर तरुणांनीही वेगळ्या वाटा निवडण्याचा प्रयत्न करावा. कारण इथे अर्ज करणारी ही सगळी मंडळी तुमच्या-आमच्यातीलच आहेत. त्यांचे वेगळेपण त्यांच्या ध्येयनिवडीत आणि अविरत कष्टामध्ये, जिद्दीमध्ये आहे. त्यांच्या या जिद्दीला खरोखरच सलाम.

– कौस्तुभ आमटे, सामाजिक कार्यकर्ते

प्रायोजक : सारस्वत बँक, रुणवाल समूह आणि सिडको सहप्रायोजित या सोहळ्याचे पॉवर्ड बाय पार्टनर एम. के. घारे ज्वेलर्स असून, एबीपी माझा हे टेलिव्हिजन पार्टनर, तर पीडब्ल्यूसी हे नॉलेज पार्टनर आहेत.