कॅथॉलिक चर्चचा धर्मगुरू होण्यासाठीच्या प्रशिक्षण वर्गात एक तरुण सहभागी होता. त्या वेळी ख्रिश्चन धर्मसंस्थेत पदाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांपेक्षा चांगले अन्न दिले जात होते हा भेदभाव या तरुणाच्या डोक्यात बसला, तेथील अनुभवातून अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा घेऊन  वयाच्या १९व्या वर्षी त्याने ती धार्मिक प्रशिक्षण संस्था सोडून थेट मुंबई गाठली, नंतर कामगार नेता, दक्षिण मुंबईचा खासदार, मुझफ्फरपूर- नालंदा या मतदारसंघाचा खासदार, मंत्रिपदे असे सर्व काही मिळवले. त्या तरुणाचे नाव जॉर्ज फर्नाडिस. इंग्रजी, हिंदी, कन्नड, कोंकणी व मराठी या सर्व भाषा त्यांना येत होत्या. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांबाबत त्यांना आदर होता, त्यामुळे त्यांनी सियाचीनला तीसहून अधिक वेळा भेट दिली. ख्रिसमसला ते जवानांसाठी केक घेऊन जायचे. त्यांनी पाकिस्तान हा क्रमांक एकचा शत्रू मानण्याऐवजी चीन हा भारताचा क्रमांक एकचा शत्रू असल्याची भूमिका घेतली होती. विद्यमान नौदल प्रमुख विष्णू भागवत यांना डिसेंबर १९९८ मध्ये त्यांनी पदावरून काढून टाकले होते. कारण उपनौदल प्रमुख म्हणून हरिंदर सिंग यांच्या नियुक्तीस भागवत यांनी विरोध केला होता. १९७७च्या आणीबाणीनंतर ते मुझफ्फरपूर मतदारसंघातून निवडून आले होते. त्या वेळी बडोदा डायनामाइट प्रकरणाचा खटला त्यांच्यावर सुरूच होता. त्यांच्या निकटच्या सहकारी जया जेटली यांच्यावर संरक्षण खात्यातील मध्यस्थाचा आरोप झाला तेव्हा त्यांच्या स्वच्छ प्रतिमेस धक्का लागला. त्या वेळी तेहलकाने स्टिंग ऑपरेशन करून फर्नाडिस यांना संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले होते. त्यांचे व्यक्तिगत जीवन वादग्रस्त होते. ते समता पक्षातील त्यांच्या सहकारी जया जेटली यांच्या समवेत राहात होते. त्यांच्या पत्नी लीला कबीर व मुलगा हे अमेरिकेत राहतात. त्यांनी फर्नाडिस यांच्या भावांवर मालमत्ता हडपण्यासाठी जया जेटली यांच्याशी साटेलोटे केल्याचा आरोप केला होता. नंतर न्यायालयाने त्यांच्या पत्नीच्या बाजूने निकाल दिला. त्यांनी फर्नाडिस यांचा ताबा घेतला तेव्हा त्यांना (फर्नाडिस) स्मृतिभ्रंश झाला होता. नवी दिल्लीतील पंचशील पार्कमध्ये ते राहत होते.

कामगार संघटनांच्या चळवळीतून पुढे आलेले आक्रमक समाजवादी नेते जॉर्ज फर्नाडिस यांनी एक काळ गाजवला. जात, धर्म, प्रादेशिक अस्मिता यांच्या पलीकडे जाणारे राजकारण त्यांनी केले. मंगलोर येथे १९३० मध्ये ख्रिश्चन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कट्टर काँग्रेस विरोधी नेते म्हणून ते पहिल्यापासून सर्वाना परिचित होते. १९९०च्या मध्यावधीत त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली व त्यामुळे आघाडीच्या राजकारणात भाजपची अस्पृश्यता संपली. त्यानंतर अनेक धर्मनिरपेक्ष पक्षांनी भाजप आघाडीत सामील होण्याचे धाडस केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार त्यानंतर दोनदा सत्तेवर आले याचे कारण मित्रपक्षांनी दाखवलेली स्वीकार्यता हे होते.

फर्नाडिस यांनी आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून मोठे काम केले. त्या वेळी ते विरोधी पक्षातील आघाडीचे नेते होते. त्यांचे हात उंचावलेले निग्रही भूमिका दर्शवणारे छायाचित्र अजूनही सर्वाच्या स्मरणात आहे. लोकशाहीशी एकनिष्ठता राखलेले व आपली भूमिका पुढे नेण्यासाठी कोणत्याही टोकाला जाणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांना आणीबाणीच्या काळात  प्रेरणा देणारे ठरले. १९६७ मध्ये त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्या वेळी त्यांनी स. का. पाटील यांचा संयुक्त सोशालिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून पराभव केला होता.  सक्रिय कामगार नेते म्हणून ते १९७४ च्या रेल्वे संपात आघाडीवर होते. त्या वेळी देशातील सगळी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. त्याचा परिणाम म्हणून सरकारला धरपकड करावी लागली. नंतर जॉर्ज फर्नाडिस यांनी त्यांचा राजकीय तळ बिहारमधील मुझफ्फरपूर येथे हलवला व तेथून १९७७ मध्ये ते निवडून आले. जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते उद्योगमंत्री होते. त्या वेळी त्यांनी कडक सरकारी निर्बंध घातल्याने कोकाकोला व आयबीएम या बहुराष्ट्रीय कंपन्यांना गाशा गुंडाळावा लागला होता. भाजपचे ते कडवे टीकाकार होते. त्याचबरोबर संघाचे विचारही त्यांना पसंत नव्हते तरी लालकृष्ण अडवाणी व वाजपेयी यांच्याशी त्यांनी राष्ट्रीय राजकारणात मिळतेजुळते घेतले. बिहारमध्ये लालूप्रसाद यांच्याशी मैत्री केली.

नीतिशकुमार यांना पुढे आणण्यात फर्नाडिस यांचा मोठा वाटा होता. कारण त्या वेळी फर्नाडिस यांच्याप्रमाणेच नीतिशकुमार हे लालूंपासून दूर चालले होते. १९९५ मधील विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमध्ये फर्नाडिस यांचा कल भाजप आघाडीकडे होता. वाजपेयी सरकारच्या काळात ते संरक्षणमंत्री होते. त्यांच्याच काळात १९९८ मध्ये पोखरण येथे अणुचाचण्या झाल्या व पाकिस्तानविरोधात १९९९ मध्ये कारगिल युद्ध झाले. स्मृतिभ्रंश आजाराने त्यांना ग्रासले होते, त्यामुळ ेते सार्वजनिक जीवनातून निवृत्त झाले होते. त्यांचे कुटुंबीय त्यांची काळजी घेत होते. फर्नाडिस यांना जनता दल संयुक्तने उमेदवारी नाकारल्यानंतर २००९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक मुझफ्फरपूरमधून एकाकी अवस्थेत लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला तोच त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा शेवट होता.