29 November 2020

News Flash

‘हिमरू’ कलेचा सृजनशील तंत्रज्ञ

हिमरू’ विणकाम कला ही मुळात इराणमधील ‘किनख्वाबी’ या पर्शियन विणकाम कलेतून उगम पावलेली आहे

विजय दिवाण

औरंगाबाद या ऐतिहासिक शहरात ‘जागतिक वारसा’ म्हणून प्रसिद्ध असणारी ‘हिमरू-मशरू’ विणकाम कला टिकवून ठेवण्यासाठी आयुष्यभर धडपडणारे ज्येष्ठ विणकामतज्ज्ञ अहमद सईद कुरेशी यांना यंदाचा ‘अनंत भालेराव पुरस्कार’ २६ ऑक्टोबरला प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्ताने, सातशे वर्षांचा इतिहास असलेल्या या ‘हिमरू’ कलेबद्दल, आणि त्यातील अहमद कुरेशी यांच्या योगदानाविषयीचे हे टिपण..   

भारतात केवळ औरंगाबाद शहरातच आढळणारी ‘हिमरू’ विणकाम कला ही मुळात इराणमधील ‘किनख्वाबी’ या पर्शियन विणकाम कलेतून उगम पावलेली आहे. तिकडे सोन्या-चांदीची जर वापरून किनख्वाबी कापडाचे विणकाम केले जात असे. बाराव्या शतकात या सोनेरी जरीपासून तयार होणाऱ्या कापडांची वस्त्रे तिकडे इराणी आणि तुर्की अमीर-उमराव आणि सरदार लोक वापरत असत. चौदाव्या शतकात महंमद तुघलकाच्या राजवटीत इराणहून आलेले कित्येक विणकर दिल्लीत किनख्वाबी विणकाम करीत असत. इ.स. १३२७ मध्ये महंमद तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलवली, तेव्हा तुघलकाच्या सैन्याबरोबर किनख्वाबी विणकाम करणारे काही विणकरही इकडे आले. महंमद तुघलक १३२७ ते १३३४ अशी आठ वर्षे औरंगाबादनजीकच्या दौलताबाद किल्ल्यात राहिला. त्या काळात खुल्दाबाद, खडकी (औरंगाबाद), जालना अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे विणकर हाताने किनख्वाबी वस्त्रे विणण्याची कामे करू लागले. आपल्याकडे त्या वस्त्रांना ‘किनखापाची वस्त्रे’ म्हणत. मात्र, इथे त्यासाठी सोने-चांदी वापरण्याऐवजी रेशीम आणि कापूस यांचे धागे वापरून त्या मिश्र धाग्यांचे ‘हिमरू’ कापड विणण्यास त्यांनी सुरुवात केली. ‘हिमरू’ हे नाव ‘हम-रूह’ या फारसी शब्दावरून रूढ झालेले आहे. या कापडावरील नक्षीकाम हे मूळ किनख्वाबी नक्षीशी मिळतेजुळते (हम-रूह) असल्याने त्यास ‘हिमरू’ म्हटले जाऊ लागले. ज्या कापडात जास्त गुंतागुंतीची नक्षी असेल त्यास ‘मशरू’ हे नाव दिले गेले. पुढे सुलतान महंमद तुघलक हा १३३४ साली दिल्लीला परत गेला. परंतु तुघलकाबरोबर आलेले विणकर मात्र परत न जाता इथेच राहिले, आणि त्यांनी औरंगाबादेत ‘हिमरू-मशरू’ वस्त्रांचे उत्पादन सुरू ठेवले.

नंतर इथे काही काळ अहमदनगरची आदिलशाही राजवट राबली. त्या काळात खडकी (औरंगाबाद) येथे आदिलशाहचा हुशार वजीर मलिक अंबर याने हे विणकाम करणाऱ्या हिमरू विणकरांना चांगलेच प्रोत्साहन दिले. त्या काळी हे संपूर्ण विणकाम केवळ हातांनी केले जाई. परंतु विसाव्या शतकाच्या प्रारंभी तऱ्हेतऱ्हेचे सुंदर नक्षीकाम असलेल्या हिमरू वस्त्रांच्या विणकामासाठी हातमागांचा वापर सुरू झाला. नंतर १९२५ साली यंत्रमाग असणारी ‘औरंगाबाद सिल्क मिल’ स्थापन झाली. या मिलमध्ये यंत्रांद्वारे उत्पादन सुरू झाले. अशा रीतीने सर्वात आधी विणकरांनी घरोघरी हातांनी विणलेले, मग कुटिरोद्योग म्हणून हातमागावर विणले जाणारे आणि नंतर मिलमधील यंत्रांवर विणले जाणारे, असे हे हिमरू कापडाचे उत्पादन गेली सातशे वर्षे औरंगाबाद शहरात अव्याहतपणे सुरू आहे. अर्थात, औरंगाबाद सिल्क मिलमध्ये यंत्रावर होणाऱ्या विणकामापेक्षा जास्त चांगले डिझाइन आणि नक्षीकाम हे पारंपरिक हातमागांवर विणलेल्या वस्त्रांतच राखले जाते. हातमागांवर तयार होणाऱ्या हिमरू पद्धतीच्या शाली, साडय़ा, चादरी आणि इतर वस्त्रे ही उत्पादने चांगल्या दर्जामुळे आणि मोहक नक्षीकामांमुळे अत्यंत लोकप्रिय ठरली आहेत. इथे येणाऱ्या पर्यटकांना या उत्पादनांचे मोठे आकर्षण असते. त्यामुळेच तब्बल सातशे वर्षांची परंपरा असणारे हिमरू विणकाम हे औरंगाबाद शहराचे एक ऐतिहासिक वैशिष्टय़ बनलेले आहे.

या ऐतिहासिक हिमरू वस्त्रोत्पादनात गेली ५० वर्षे त्या कपडय़ांचा पोत, रंग, नक्षीकाम या गोष्टींबाबत सातत्याने विचार करून वेळोवेळी निर्णय घेणारे आणि त्यांची अंमलबजावणी करणारे एक तज्ज्ञ गृहस्थ औरंगाबादेत आहेत. त्यांचे नाव अहमद सईद कुरेशी. ते आज ७८ वर्षांचे आहेत. त्यांचे वडील ए. एच. कुरेशी हेही हिमरू कलेतील मोठे तज्ज्ञ होते. त्यामुळे वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षांपासूनच अहमद कुरेशी यांचे हिमरू उत्पादनाचे प्रशिक्षण सुरू झाले. सुती आणि रेशमी धागे निवडणे, त्यांना योग्य ते रंग देणे, त्यांची उभी आणि आडवी वीण घालणे, विणकामातच नक्षीचा अंतर्भाव करणे या गोष्टी ते लहानपणापासूनच शिकत गेले. डिझाइन आणि नक्षीकामात त्यांना विशेष रस वाटू लागला. त्या काळच्या हिमरू उत्पादनांत मोजक्या पारंपरिक नक्षीकामाचाच वापर केलेला असे. अहमद कुरेशी यांनी त्यात नवनवीन आणि अभिनव अशा नक्षीरचनांचा अंतर्भाव सुरू केला. उदाहरणार्थ, त्यांनी अजिंठय़ाच्या गुंफा-चित्रांतील कमळांची चित्रे हिमरू वस्त्रांवर उतरवली. तसेच इतर सृजनात्मक आणि नावीन्यपूर्ण नक्षीकामेही त्यांनी निरनिराळ्या हिमरू-मशरू वस्त्रांवरील डिझाइन्समध्ये समाविष्ट केली. या नव्या डिझाइन्सच्या औरंगाबाद सिल्क शाली आणि इतर वस्त्रे पर्यटकांमध्ये फारच लोकप्रिय झाली, आणि त्यांमुळे देश-परदेशात या सिल्क-शालींचा खपही फार वाढला.

त्यांच्या या कार्याबद्दल अहमद सईद कुरेशी यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. औरंगाबादेत लयास जाऊ पाहणाऱ्या हातमाग उद्योगास आणि ऐतिहासिक हिमरू शालींच्या उत्पादनास नवी उभारी देण्याबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राज्य शासनास विनंती करून अहमद कुरेशी यांनी मुंबईच्या राज्य विणकर केंद्रामार्फत राज्यातील गरजू महिलांसाठी विणकामाची अनेक प्रशिक्षण सत्रेही आयोजित केलेली आहेत. औरंगाबादेत तर ते स्वत:च प्रशिक्षण सत्रे आयोजित करीत असतात. निम्नवर्गीय गरीब स्त्रियांना स्वयंरोजगारास सक्षम करून त्यांना उपजीविकेचे चांगले साधन मिळावे यासाठी अहमद कुरेशी हे प्रयत्नशील असतात. हिमरू-मशरू शाली आणि इतर वस्त्रे आजही हातांनी किंवा हातमागांवरच विणली जावीत, त्यासाठी यंत्रांचा वापर होऊ नये असे त्यांचे ठाम मत आहे. हाताने किंवा हातमागावर विणकाम झाले तरच या प्राचीन हिमरू विणकाम कलेचे सत्त्व आणि त्यातील सृजनशीलता टिकून राहील अशी त्यांची धारणा आहे. या पारंपरिक विणकाम कलेचे संवर्धन करू पाहणाऱ्या या ज्येष्ठ तंत्रज्ञाला ‘अनंत भालेराव पुरस्कार’ मिळतो आहे, ही समाधानाची बाब आहे.

vijdiw@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 12:36 am

Web Title: himru expert ahmed qureshi anant bhalerao award 2020 zws 70
Next Stories
1 पुलंच्या विधानाला जागलेले विनायकदादा..
2 ध्रुवीकरणाचा ‘धर्म’प्रश्न..
3 चाँदनी चौकातून :  नड्डांचं नेतृत्व