डॉ. विनय कुलकर्णी

करोनावरील बचावकारक ठोस लस अजून उपलब्ध नाही. अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देणे गरजेचे असल्यामुळे पूर्ण किंवा अपूर्ण संचारबंदी हे मार्गही आता जवळजवळ बंद झाले आहेत. कार्यालये, शाळा-महाविद्यालये सगळेच आज ना उद्या पूर्वपदावर आणावे लागेल. पण हे करताना साथ पुन:पुन्हा उचल खाणार आहे. काम तर सुरू ठेवायचे, पण त्याच वेळी साथीला मात्र आवर घालायचा, ही तारेवरची कसरत करतच पुढे जायचे आहे. अशा या करोनाकाळात व्यक्ती आणि समाज म्हणून काय काय करता येईल?

भारतात कोविडच्या साथीने प्रवेश करून पाच महिने होऊन गेले. आणखी किमान सहा-आठ महिने तरी आपल्याला सजग राहावे लागणार असल्याने या साथीचा वेग कमी करण्यासाठी, तिच्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नेमके काय करायला हवे, हे समजावून घेऊन कृती करायला हवी. नवीन शास्त्रीय माहिती पुढे येत आहे, तिचा उपयोग करायला हवा.

यासाठी आधी काय करता आले असते, काय चुकले, काय केले गेले आणि गेल्या अनेक वर्षांत काय केले गेले नाही, यावर खूप साधकबाधक चर्चा होते आहे. त्यातून पुढे आलेल्या मुद्दय़ांचा उपयोग- आता पुढे काय करायला पाहिजे, यासाठी करायला हवा. या महासाथीला प्रतिसादाचे मुख्य तीन भाग करता येतील :

(१) सरकार, (२) आरोग्य व्यवस्था आणि (३) समाज, म्हणजे तुम्ही-आम्ही!

महासाथ, कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि आर्थिक दुर्बलता या कात्रीत सरकार सापडलेले आहे. बंधने सुरू ठेवावीत, तर बहुतेकांचे जगणे कठीण होते. सैल करावीत, तर मृत्युसंख्या वाढते. ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं’ अशी अभूतपूर्व कोंडी आहे. त्यावर अर्थकारणी, राजकारणी चर्चा करत आहेत. आरोग्य-व्यवस्थेबाबत बोलायचे, तर सार्वजनिक आरोग्य-व्यवस्था कुपोषित, अपुरी; आणि खासगी आरोग्य-व्यवस्था अनिर्बंध होती, हे तर निर्विवाद. तरीही गेल्या चार-पाच महिन्यांतील एकदंरित प्रतिसाद बघता बदनाम सार्वजनिक आरोग्य-व्यवस्थेने व काही खासगी रुग्णालयांनी चांगली कामगिरी केली आहे. चिंतेची बाब ही आहे की, करोना साथ आता निवडक मोठय़ा शहराकंडून इतर शहरांकडे, निमशहरी आणि ग्रामीण भागात पसरणार आहे. बरे करणारे औषध किंवा बचावकारक लस अजून उपलब्ध नाही. अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देणे गरजेचे असल्यामुळे पूर्ण किंवा अपूर्ण संचारबंदी हे मार्ग आता जवळजवळ बंद झाले आहेत. अशा वेळी तिसऱ्या घटकाची- म्हणजे समाजाची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते.

व्यक्ती आणि समाज म्हणून आपण काही गोष्टी निश्चित करू शकतो. व्यक्ती म्हणून त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, मुखपट्टी (मास्क)चा सार्वत्रिक वापर. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी (दुकाने, कार्यालये, सार्वजनिक किंवा खासगी वाहतूक व्यवस्था आदी) दोन किंवा अधिक व्यक्ती एकमेकांच्या नजीक येतात तिथे गर्दी टाळायला हवी, शक्य तिथे ‘दो गज की दूरी’ सांभाळायला हवी आणि मुखपट्टी लावायलाच हवी. आपल्यापैकी कोणी ना कोणी आता घराबाहेर पडणार आणि त्यामुळे लागण घरात येणार हे गृहीत धरून, घरातही ‘दो गज की दूरी’ पाळता येत नसेल तर मुखपट्टी वापरायला हवी. वारंवार हात धुवायला हवेत. पोटा-पाण्यासाठी सर्व कामकरी जनतेला कार्यालये, दुकाने, कारखाने, बसगाडय़ा, रेल्वे इथे एकत्र येणे अटळ आहे. अशा वेळी सुरक्षित अंतर राखणे आणि मुखपट्टीचा अधिक कटाक्षाने वापर, टेबल्स-काउंटर्स आदी पृष्ठभागांची आणि स्वच्छतागृहांची वारंवार स्वच्छता, वारंवार हात धुणे हे सर्व कटाक्षाने करायला हवे. हे सर्व करण्यात व्यावहारिक अडचणी आहेत. बसगाडय़ा, रेल्वेंची संख्या गरजेच्या मानाने खूप कमी असल्याने तिथे गर्दी टाळणे हे आपल्या हातात नसते. सतत अनेक तास मुखपट्टी लावणे गैरसोयीचे आहे. पण त्यातील काही अडचणींवर नेटाने मात करता येईल. चार महिन्यांच्या ‘स्थानबद्धते’मुळे उबगल्याने मित्र-नातेवाइकांच्या भेटीगाठी, सणसमारंभ, उत्सव जोमाने सुरू व्हायला लागलेले दिसत आहेत. हे कटाक्षाने टाळायला हवे. आवश्यक तेव्हाच आणि आवश्यक तेवढेच बाहेर पडायला हवे. हा विषाणू बंदिस्त जागांमध्ये जास्तच वेगाने पसरतो; त्यामुळे हॉटेल्स, दुकाने, मॉल्स या ठिकाणी आवश्यक तेव्हाच जायला हवे.

काय करायचे हे माहिती असूनही, प्रत्येक वेळी कृती करण्यात कमतरता राहतात किंवा चुका होतात. मानवी वागणुकीतील बदल कसा होतो, याबद्दल झालेले अभ्यास काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. यात दोन महत्त्वाचे घटक असतात. पहिला म्हणजे, आपल्याला जोखीम (रिस्क) किती आहे याची जाणीव; आणि दुसरा, सुयोग्य सवय अंगी बाणवता येऊ शकेल याबद्दलची जाणीव किंवा क्षमता (सेल्फ-एफिकसी)! या दोन घटकांचा विचार केला, तर चार गटांत लोकांची विभागणी होते : (१) उत्तम जाणीव आणि उत्तम क्षमता, (२) उत्तम जाणीव आणि अपुरी क्षमता, (३) कमी जाणीव आणि पुरेशी क्षमता, आणि (४) कमी जाणीव आणि कमी क्षमता.

क्षमता प्रत्यक्ष कृतीत उतरणे हा त्यापुढील वेगळा टप्पा असतो; कारण कधी कधी क्षमता असूनही वातावरण त्याला पूरक नसते. उदा. मी गर्दी टाळू शकतो, पण मला प्रवास लोकल ट्रेननेच करावा लागतो. यातील फक्त पहिला गट हा प्रतिबंधासाठी योग्य कृती करतो. दुसरा गट जाणीव असली तरी योग्य कृती करत नाही. तिसरा गट चुकीच्या गोष्टी करत राहतो आणि चौथा गट काहीच करत नाही व नशिबाच्या भरवशावर सारे सोडून देतो. ‘प्रयास आरोग्य संस्थे’ने या करोना महासाथीच्या काळात केलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळले की, पहिल्या गटात फक्त ११ टक्के, दुसऱ्या गटात ४६ टक्के आणि तिसऱ्या व चौथ्या गटात मिळून ४३ टक्के व्यक्ती होत्या. येथे हेही लक्षात घ्यायला हवे की, हे मुख्यत: शहरी आणि शिक्षित लोकांमधील ऑनलाइन सर्वेक्षण होते. इतर गटांमधील परिस्थिती कमी अधिक वेगळीही असेल. ही परिस्थिती तातडीने बदलण्याची गरज आहे. सरकार जाहिरातींमधून फारफार तर माहिती पोहोचवेल, पण सुयोग्य सवयी/ कृती रुजवण्यासाठी विशिष्ट प्रयत्न लागतील. त्यासाठी तसेच पोषक सामाजिक वातावरण लागेल. गेल्या अनेक दशकांच्या प्रयत्नांमुळे एचआयव्हीची जोखीम जास्त असलेल्या गटांमध्ये कोविडची जाणीव लवकर झाली. विषाणू, ते कसे पसरतात याबद्दल त्यांना आधीच कल्पना होती. एचआयव्ही-लागण टाळण्यासाठी कण्डोम वापरणे हा मुद्दा जाणीव/नेणिवेचा भाग झालेला असल्याने त्यांना मुखपट्टीला आपलेसे करण्यास फारसा वेळ लागला नाही. परंतु कोविडबाबत हे सुशिक्षित वर्गातदेखील पुरेसे रुजलेले नाही. ही परिस्थिती फार वेगाने बदलण्याची गरज आहे. सामाजिक सहभागाला येथे खूप मोठा अवकाश आहे.

काय काय करता येईल? या आजारात मृत्यू किंवा गंभीर आजाराचा धोका तरुण, निरोगी लोकांसाठी फारच कमी आहे. वयस्कर किंवा इतर व्याधीग्रस्त व्यक्तींना जास्त जोखीम आहे. पण या अतिजोखीम गटांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी मात्र सर्वाची आहे. स्वत:ला निर्धोक समजून काळजी न घेणारे तरुण हे त्यांच्या घरातील आणि घराबाहेरील असुरक्षित व्यक्तींची जोखीम वाढवतात. एक समाज म्हणून कोविड साथीकडे बघितले गेले तरच प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव होऊ शकते. म्हणून लोकसहभागातून या आव्हानाला प्रतिसाद द्यायला हवा. यासाठी सजग नागरिक, कार्यकर्ते यांचे छोटे गट तयार करता येतील, जे संवादक म्हणून लोकांना माहिती देतील. असा संवाद फक्त आजाराची व्यक्तिगत जोखीम, व्यक्तिगत काळजी इतक्यापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. त्याबरोबरीने, या आजाराचा प्रसार कसा होतो, तो वेगाने वाढण्याची जोखीम का दुणावते, त्यासाठीच्या प्रतिबंधक कृतीमागचे तर्कशास्त्र हेदेखील लोकांपर्यंत पोहोचवणे फार महत्त्वाचे आहे.

या साथीत दुसरा प्रकर्षांने पुढे आलेला प्रश्न म्हणजे आजाराचा धसका. भीती प्रमाणात असेल तर ती आपल्याला संरक्षणाला प्रवृत्त करते. परंतु अतिरिक्त भीती चिंता, बधिरता, घबराट यांना वाट करून देते. त्यातून निर्माण होते दूषण देण्याची, वाळीत टाकण्याची प्रवृत्ती. ती जरी अनामिक, अचानक संकटाच्या भीतीतून निर्माण होत असली तरी अनावश्यक आहे; शिवाय या साथीला आवर घालण्यासाठी आवश्यक असलेले   ‘टेस्टिंग, ट्रेसिंग, क्वारंटाइन आणि ट्रीटमेंट’ यांतील प्रत्येक टप्प्यात अडथळे निर्माण करते आहे. त्यामुळे संसर्गापासून बचाव तर होत नाहीच, उलट आजार पसरण्यास हातभारच लागतो. या प्रत्येक टप्प्यावर मदतीची आज खूप गरज आहे. यासाठीदेखील अनेक गोष्टी करता येतील. उदा. स्वयंसेवकांच्या तुकडय़ा तयार करून त्यांना प्रशिक्षित करता येईल. असे स्वयंसेवी गट संसर्ग झालेल्या लोकांना, त्यांच्या नातलगांना प्रत्यक्ष किंवा फोनवरून सल्ला-मार्गदर्शन देऊ शकतात. टेस्टिंग-ट्रेसिंगमध्ये मदत करू शकतात. घरात विलग केलेल्या व्यक्तींना मदत, आधार देऊ शकतात. कामगार/ वाहनचालक/ ट्रेड युनियनसारखे गट कामाच्या ठिकाणी घ्यायच्या प्रतिबंधक उपायांवर एकत्रित काम करू शकतात. बचत गट, भिशी गट, तरुण मंडळे, एखाद्या वस्तीत किंवा सोसायटीमधले लोक त्या ठिकाणच्या रहिवाशांना काय अडचणी आहेत ते समजून घेऊन मदतीचे पर्याय उभे करू शकतात. वाळीत टाकण्याचे प्रकार रोखू शकतात. अर्थात हे घडावे, लोकसहभागाची प्रक्रिया सुकर व्हावी यासाठीही मदत लागेलच. असे काही मंच निर्माण करावे लागतील, जिथे लोकांना त्यांच्या काळजी, चिंता, भीती, प्रश्न व्यक्त करायला, साधकबाधक चर्चा करायला संधी मिळेल, त्यातून उत्तरांकडे जाण्याची दिशा मिळेल. स्वयंसेवक, कार्यकर्ते यांना वेळोवेळी तज्ज्ञांची मदत, मार्गदर्शन लागेल. सरकारी व्यवस्थेचे पाठबळ लागेल. सामाजिक संघटना, आरोग्य विषयात कार्यरत असणारी तज्ज्ञ मंडळी आणि सरकार या सगळ्यांचा पुढाकार यादृष्टीने फार मोलाचा आहे. हे अशक्य नाही. मुंबईतील धारावीसारख्या ठिकाणी साथ आटोक्यात आणण्यात तेथील लोकसहभाग हा महत्त्वाचा घटक होता, हे आता स्पष्ट झाले आहे. हे सगळीकडे व्हायला हवे.

२४ मार्चनंतर जवळपास साडेचार महिने झाले. आता धंदे-व्यवसाय अधिकाधिक सुरू करायला हवे. कार्यालये, शाळा-महाविद्यालये सगळेच आज ना उद्या पूर्वपदावर आणावे लागेल. पण हे करत असताना साथ पुन:पुन्हा उचल खाणार आहे. काम तर सुरू ठेवायचे, पण एकीकडे साथीला मात्र आवर घालायचा, ही तारेवरची कसरत करतच पुढे जायचे आहे. आरोग्यव्यवस्था आणि प्रतिबंधन या दोन्ही बाजू सक्षम असणे त्यासाठी नितांत गरजेचे आहे.. आणि त्यासाठी लोकसहभागाला पर्याय नाही!

(लेखक ‘प्रयास आरोग्य गटा’चे समन्वयक आहेत.)