रचनात्मक काम करणाऱ्या संस्था आणि अशा कामांत स्वार्थनिरपेक्षपणे व्यक्तिगत जीवन झोकून देणारी माणसे यांची एक अजोड परंपरा महाराष्ट्रात पूर्वीपासून रुजलेली आहे. समाजातीलच उपेक्षित, वंचित आणि दुर्बलांना आधार देण्याचे आणि त्यांच्यात जगण्याची उमेद फुलविण्याचे काम करणाऱ्या संस्था आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम सुरू केला, आणि अशा संस्थांच्या रचनात्मक कामात थेट किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होता यावे, यासाठी जणू आतुरलेल्या समाजातून त्याला भरभरून साथ मिळत गेली.राज्याच्या कानाकोपऱ्यात, पडद्याआड राहून आणि प्रसिद्धीपासूनही अंतर राखून सुरू केलेले ही कामे किती महान आहेत, याचा प्रत्यय या उपक्रमातून मिळालेल्या संवेदनशील प्रतिसादामुळे संस्थांना आला. सर्वकार्येषु सर्वदा उपक्रमातून उभ्या राहिलेल्या आर्थिक साह्य़चे धनादेश सामाजिक जाण असलेले अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या हस्ते गेल्या शनिवारी या संस्थांना प्रदान करण्यात आले, आणि असंख्य हातांच्या भक्कम आधाराच्या आगळ्या अनुभूतीने एक्स्प्रेस टॉवर्समधील लोकसत्ता सभागृहातील हा अवघा सोहळा भारावून गेला. ‘स्वत्व विसरून ईश्वरी काम करणाऱ्या अनामिक सेवाव्रतींचा हा सत्कार आहे’, अशा सार्थ शब्दांत अमरापूरकर यांनी संस्थांचा गौरव केला, आणि रचनात्मक कार्यास साथ देण्यासाठी असंख्य संवेदनशील मने उत्सुक असतात, याचा आगळा अनुभव आला.. ‘लोकसत्ता’मध्ये या संस्थांच्या कामाची माहिती प्रसिद्ध झाल्यापासून पुढे सतत दूरध्वनी, पत्रांद्वारे या संस्था समाजातील सहानुभूतीची सावली अनुभवत होत्या. आर्थिक मदतीचा तर अक्षरश ओघ सुरू झाला आणि या उपक्रमामुळे माणसे जोडली गेल्याचे आगळे समाधान अनुभवत संस्थाचालकही भारावून गेले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध सामाजिक प्रश्नांसाठी काम करणाऱ्या दहा विविध संस्थांच्या कामाचा परिचय लोकसत्ताने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाद्वारे वाचकांना करून दिला होता.  

रुग्णोपयोगी संस्थेला निधीरुपी ‘ग्लुकोज’ मिळाले!
एका अपघाताने १९३२ मध्ये या संस्थेचा जन्म झाला. मोठे काका टायफॉइडने आजारी पडले. त्यावेळी डॉक्टरांनी बेडपॅन वगैरे आणायला सांगितले. वडील शाळामास्तर होते. पण हे सगळं आणणार कुठून? गावभर फिरून त्यांनी ते जमवलं. काका बरे झाल्यानंतर वडिलांनी विचार केला की, आपल्याला नशिबाने या गोष्टी मिळाल्या. पण इतरांना कशा मिळणार? मग त्यांनी अक्षरश घरोघरी फिरून एक एक गोष्ट जमवली. त्यामुळे आमच्या संस्थेचं नावही रुग्णोपयोगी वस्तु‘संग्रह’ केंद्र असं आहे. हा सगळ्या गोष्टींचा संग्रहच आहे. मग मोफत दवाखाना, ट्रिपल पोलिओ, रुग्णवाहिका, रक्तदान असे एकामागोमाग एक उपक्रम सुरू केले. एकदा एक गरोदर बाई रस्त्याने जात होती. माझे वडील शाळेत चालले होते. ती बाई वाटेतच प्रसुत झाली. सगळ्या विद्यार्थ्यांना विचारलं की, काय करता येईल. त्यावेळी विद्यार्थ्यांनी थ्री व्हिलर टेम्पो घेण्याचा सल्ला दिला आणि मागच्या दाराचा स्ट्रेचर म्हणून वापर सुरू झाला. वडिलांनी तीन गाडय़ा घेतल्या आणि मग युनिसेफने आमचं कार्य पाहून एक नवीकोरी रुग्णवाहिका भेट दिली. माझ्या पत्नीचा उल्लेख मी केला नाही, तर योग्य ठरणार नाही. माझ्या पत्नीने नोकरी सोडली या संस्थेच्या कामासाठी! केवळ माझ्या एका शब्दावर तिने राजीनामा दिला. वडील गेले, त्यावेळीही आम्ही सकस आहार शाळेत सत्तर मुलांना दिला होता. ऑक्सिजन सिलिंडर, फिरता दवाखाना वगैरे सुरू केलं. आजही माझ्या संस्थेत पहिला मजला संपूर्ण एचआयव्हीग्रस्त रुग्णांसाठी ठेवला आहे. हे काम गेली ८० वर्षे आम्ही सुरू ठेवलं आहे.
रमेश भावे (रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह केंद्र, सोलापूर)

विद्यार्थी नाही, कलाकार घडवायचे आहेत
कल्याण गायन समाजाची स्थापना १९२६ मध्ये भास्करबुवा बखले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झाली. तेव्हापासून संगीताचा हा यज्ञ चालू आहे. एक मानसोपचारतज्ज्ञ म्हणून मी सांगतो की, गाण्याचा मानसिकतेशी खूप जवळचा संबंध आहे. गेल्या वर्षी बेगम परवीन सुलताना आमच्याकडे आल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘खूप चांगलं काम चाललंय. कारण सध्या ख्याल आणि ठुमरी ही जर्मनीत शिकायची गोष्ट झाली आहे.’ आमची संस्था गायन, वादन आणि नृत्याचं सांस्कृतिक केंद्र बनलं आहे. आम्ही जे काम करत आहोत, त्यात आमची अशी इच्छा आहे की, या संस्थेने सामान्य रसिकांत शास्त्रीय संगीताची अभिरूची वाढवण्याचं काम करावं. या संस्थेच्या कामाची परंपरा खूप मोठी आहे. आमच्या संस्थेची वास्तू खूप जीर्ण झाली होती. पण देवस्थळी साहेब, म्हैसकर फाऊंडेशन वगैरेंनी खूप मदत केली आणि आता नवीन वास्तू दिमाखात उभी आहे. लोकांनी तिथे यावं, अशी इच्छा आहे. आम्ही दिनकर संगीत विद्यालय चालवतो. पण आम्ही विद्यार्थी घडवण्यापेक्षा कलाकार घडवण्याच्या दृष्टीने कल्याण गायन समाजाने आता एका गुरुकुलाची स्थापना केली आहे. इथे गुरुकूल पद्धतीने संगीताची दीक्षा दिली जाणार आहे. ‘लोकसत्ता’ने अशा विविध संस्थांना सशक्त करून त्यांची दिशा निरोगी करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न नक्कीच यशस्वी झाला आहे, हे मी सांगू शकतो.     (- डॉ. संदीप जाधव  कल्याण गायन समाज, कल्याण)