वर्षभरापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांची सिंगापूरमध्ये परिषद झाली. ‘फॅण्टॅस्टिक’ आणि ‘ग्रेट’ असे तिचे वर्णन दस्तुरखुद्द ट्रम्प यांनी केले होते. उत्तर कोरियाकडील अण्वस्त्रे नष्ट करण्याबाबत त्यात चर्चा झाली. त्यानंतरही अनेकदा ट्रम्प आणि किम यांची भेट झाली, पण त्यातून अद्याप तरी काही फलनिष्पत्ती झालेली नाही. उलट उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्यांचा धडाका सुरूच ठेवला. गेल्या महिनाभरात उत्तर कोरियाने अशा सहा चाचण्या केल्या. त्यातल्या दोन चाचण्या शुक्रवारी करण्यात आल्या. विशेष म्हणजे, त्याच्या आदल्या दिवशी-म्हणजे गुरुवारी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन यांनी कोरियन द्वीपकल्पाचे एकत्रीकरण करण्याबरोबरच हा भाग अण्वस्त्रमुक्त करण्याबाबत भाष्य केले होते. त्यावर उत्तर कोरियाने तिखट शब्दांत निवेदन प्रसिद्ध करत दक्षिण कोरियासोबतच्या शांतता चर्चेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संयुक्त लष्करी कवायती म्हणजे युद्धाची रंगीत तालीम असल्याची प्रतिक्रिया उत्तर कोरियाने आधीच व्यक्त केली होती. आता युद्धस्थिती निर्माण झाली असताना शांतता चर्चा कशी होणार, असा प्रश्न उपस्थित करून उत्तर कोरियाने ‘मून हे निर्लज्ज आहेत’ अशी कडवट टिप्पणी केली आहे.

कोरियन द्वीपकल्पातील या परिस्थितीबाबत ‘बीबीसी’ने केलेल्या विश्लेषणात तेथील घडामोडींचा क्रम उलगडण्यात आला आहे. ‘ट्रम्प आणि किम यांच्यातील चर्चेसाठी मदत करणाऱ्या मून यांना हा मोठा धक्का आहे. ट्रम्प यांच्याशी थेट संपर्क होत असल्याने मून यांच्याऐवजी ट्रम्प यांच्याशीच चर्चा करणे अधिक सयुक्तिक असल्याचे किम यांना वाटत असावे. क्षेपणास्त्रांसह सहा चाचण्यांनंतरही ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचा निषेध केलेला नाही,’ याकडे ‘बीबीसी’च्या संकेतस्थळावरील एका लेखात लक्ष वेधण्यात आले आहे.

‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने ‘नॉर्थ कोरिया स्पिट्स आऊट इन्सल्ट्स, लॉन्चेस मिसाइल्स अ‍ॅण्ड रिजेक्ट्स टॉक्स विद साऊथ’ या शीर्षकाखाली वृत्त दिले आहे. ‘उत्तर कोरियाने कोरियन द्वीपकल्पात शांततेची भाषा करणाऱ्या मून यांच्या जणू कानशिलात लगावली. मून यांनी सातत्याने शांतता चर्चेचा आशावाद व्यक्त केला असला, तरी तो वास्तवाशी विसंगत आहे. उत्तर कोरियाने अमेरिकेशी चर्चेचे दार बंद केलेले नसले तरी अण्वस्त्रमुक्ततेबाबतच्या या चर्चेतून फार मोठी फलनिष्पत्ती होण्याची शक्यता धूसर आहे,’ असे त्यात म्हटले आहे. ‘उत्तर कोरियाच्या चाचण्यांबाबत ट्रम्प यांचे मौन, दक्षिण कोरियासोबतच्या संयुक्त लष्करी कवायतींच्या खर्चभारामुळे त्यांनी केलेली प्रतिकूल टिप्पणी यामुळे किम यांचे धाडस वाढले. उत्तर कोरियाच्या नव्या क्षेपणास्त्र चाचण्या ट्रम्प यांच्यावर दबाव वाढविण्यासाठी आहेत. ट्रम्प यांनाही आपल्या समर्थकांना खूश करता येईल, असा करार उत्तर कोरियासोबत करण्याची घाई आहे,’ असे निरीक्षण दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय व्यवहार या विषयाचे प्राध्यापक रॉबर्ट कॅली यांनी नोंदवले आहे.

‘द न्यू यॉर्क टाइम्स’मधील यासंबंधीच्या वृत्त आणि लेखातही हाच धागा सापडतो. क्षेपणास्त्र चाचण्यांचा कठोर शब्दांत निषेध करण्याऐवजी त्याबाबत अमेरिकेला चिंता करण्याची गरज नसल्याचे सूतोवाच ट्रम्प यांनी केले. ‘त्यामुळे किम यांचा उत्साह दुणावला असून, ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे दक्षिण कोरिया आणि तेथील अमेरिकी सैन्यापुढील धोका वाढला आहे,’ असे विश्लेषण ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मधील एका लेखात करण्यात आले आहे. शांतता चर्चेतील महत्त्वाचा घटक म्हणून दक्षिण कोरियाला दुर्लक्षित करण्यापर्यंत उत्तर कोरियाची मजल गेल्याचे मत दक्षिण कोरियाचे माजी उपपरराष्ट्रमंत्री किम संग-हॅन यांनी व्यक्त केल्याचे या लेखात म्हटले आहे. ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये ‘किम जोंग-उन्स टेरिबल, हॉरिबल, नो गुड, व्हेरी बॅड इयर’ या लेखात कोरियन द्वीपकल्पातील परिस्थितीचे सखोल वर्णन करण्यात आले आहे.

उत्तर कोरियाच्या ‘कोरियन सेण्ट्रल न्यूज एजन्सी (केसीएनए)’ने नव्या चाचण्यांनंतर किम यांचे गुणगान गायले आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्या असून, त्यामुळे लष्कराचा आत्मविश्वास दुणावला असल्याचे ‘केसीएनए’च्या वृत्तात म्हटले आहे. मात्र त्यात या चाचण्यांबाबत अधिक तपशील देण्यात आलेला नाही. लष्करी अधिकाऱ्यांसोबत किम या चाचण्यांची पाहणी करतानाचे छायाचित्रही ‘केसीएनए’ने प्रसिद्ध केले आहे. दक्षिण कोरियाने अमेरिकेकडून केलेली शस्त्रखरेदी, क्षेपणास्त्र क्षमता वाढविण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर ‘केसीएनए’ने कोरियन द्वीपकल्पातील अशांततेचे खापर फोडले आहे.

संकलन : सुनील कांबळी