06 March 2021

News Flash

किशोरीताईंचा सूरप्रवास..

किशोरीताई आमोणकर या हिंदुस्थानी गानपरंपरेतील महत्त्वाच्या गायिका होत्या.

किशोरीताई आमोणकर या हिंदुस्थानी गानपरंपरेतील महत्त्वाच्या गायिका होत्या.  संगीतातील जयपूर घराण्याच्या त्या अध्वर्यू मानल्या जात.  किशोरीताईंचा जन्म मुंबई येथे १० एप्रिल १९३२ रोजी झाला. १९४० च्या दशकात त्यांनी भेंडी बझार घराण्याच्या गायिका अंजनीबाई मालपेकर यांच्याकडे गाण्याचे धडे घेण्यास सुरुवात केली. आपल्या आई मोगुबाई कुर्डीकर यांच्या तालमीत त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. ख्याल, ठुमरी, भजन या प्रकारच्या गायनात त्यांचा विशेष हातखंडा होता. जयपूर घराण्याच्या गायकीचे त्यांच्यावर संस्कार झाले असले तरी पुढे त्यांनी अनेक गायन प्रकारांत प्रभुत्व संपादन केले. पुढे त्यांनी चित्रपट संगीतातही आपला विशेष ठसा उमटवला. ‘गीत गाया पत्थरों ने’ या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी १९६४ साली प्रथन पाश्र्वगायन केले. मात्र काही काळातच त्या पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळाल्या. त्यानंतर थेट १९९० मध्ये ‘दृष्टी’ या हिंदी चित्रपटासाठी गायल्या. अन्य घराण्याच्या गायकींचा मिलाफ घडवून त्यांनी जयपूर घराण्याच्या कक्षा रुंदावल्या असल्या तरी त्यांना या कामाबद्दल कौतुकाबरोबरच टीकेचेही धनी व्हावे लागले. त्या काळी अधिक साचेबद्ध असलेल्या शास्त्रीय संगीतामध्ये त्यांनी भावुकतेचा बाज आणला.

मुंबईतील एलफिन्स्टन महाविद्यालयातून त्यांचे शिक्षण झाले होते. किशीरीताईंचा विवाह १९८० मध्ये रवींद्र आमोणकर यांच्याशी झाला. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी किशोरीताईंना १९८५ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९८७ साली पद्म भूषण, २००२ साली पद्म विभूषण हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. त्यांना २००९ साली संगीत नाटक अकादमीची फेलोशिपही मिळाली होती.

ताई आज आपल्यात नाही हा एक मोठा धक्का आहे. एकादा राग वेगळ्या नजरेतून बघणे हे त्यांचे गुण केवळ दैवी होते. जरी त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या संगीताचा अमूल्य ठेवा कायम आपल्यात अविरत राहील.

सावनी शेंडे, गायिका

किशोरीताई भारतीय संगीतासाठी एक देणगी होत्या. त्यांचे संगीतसृष्टीसाठीचे योगदान अनमोल आहे. एखाद्या मुलाला आई गेल्याचे जे दु:ख होईल त्याच्य़ाशी याची तुलना करता येईल.

शशी व्यास, संगीतज्ज्ञ

किशोरीताईंना आदर्श मानून आम्ही वाटचाल केली. तीच आमची गंगोत्री होती. आता अचानक पुढे काय हा आमच्यासाठी प्रश्न आहे.

सीमा शिरोडकर, ज्येष्ठ संवादिनी वादक

किशोरीताईंच्या निधनाने हिंदुस्थानी संगीताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे गाणे कायम अजरामर राहिल.

शंकर महादेवन, गायक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 3:26 am

Web Title: kishoritai amonkar singing journey
Next Stories
1 सूरसंवाद !
2 होय, येऊ दे ‘भारतीयता’..
3 नव्वद मतांची शोकांतिका
Just Now!
X