बोटांनी सांकेतिक भाषेत संवाद साधणे, हे आदिवासींचे वैशिष्टय़; परंतु आज वर्धा जिल्ह्य़ाच्या सीमेवर समुद्रपूर तालुक्यातील लाहोरी उच्च प्राथमिक शाळेत आदिवासी मुलांची बोटे सराईतपणे संगणकाच्या कळफलकावर फिरत आहेत. संगणकावरचे खेळ असो वा एखादी माहिती शोधण्याचे काम असो, शाळेतली चिमुरडी ही कामे लीलया पेलतात. पिढय़ान्पिढय़ा अक्षरओळख न झालेल्या या समाजाची मुले आज शहरातील शाळेतील मुलांशी स्पर्धा करीत आहेत. हे चित्र स्तब्ध करणारे आहे.

लाहोरीची ७० टक्केव बाजूच्या हरिणखुरी गावची १०० टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. त्यामुळे लाहोरीच्या शाळेचे वैशिष्टय़ म्हणजे इथली ९० टक्के मुले-मुली आदिवासी कुटुंबांतून आली आहेत. शाळेपासून आदिवासी पाडे लांब आहेत, पण सरकारकडून मिळालेल्या सायकलींच्या मदतीने त्यांना शाळा गाठणे शक्य होते. शाळेचा चार एकरांचा परिसर आहे. त्यात छोटेखानी वास्तूत शाळा भरते.

कागदमुक्त शाळा

शाळा लहानच असली तरी ती संगणकमय करण्याचा चंग शिक्षकांनी बांधला आणि या दिशेने गावकऱ्यांसह सर्व कामाला लागले. केवळ लोकवर्गणीतून ५ लाख ७० हजार रुपये गोळा झाले. शाळा कागदमुक्त करण्याच्या हेतूने दोन संगणक संच, २० टॅबलेट, प्रोजेक्टर, इंटरअ‍ॅक्टिव्ह बोर्ड, इंटरनेट सेवा व आनुषंगिक साहित्य घेण्यात आले. प्रारंभी टॅबलेट पाहून त्याला हात लावायला विद्यार्थीच काय तर शिक्षकही बिचकत; परंतु आता शिक्षकही विद्यार्थ्यांप्रमाणे टॅबलेट लीलया हाताळतात. आज ही मुले संगणकावर प्रश्न विचारताच चटकन उत्तर शोधून देतात. त्याचे उत्तरही प्रिंटरवरून काढून देतात. शिक्षणाधिकाऱ्यांनी ‘पत्ता’ दिल्यावर पटकन ‘ई-मेल’ही करतात. संगणकामुळे प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, गुणपत्रिका हे शब्द शाळेतूनच हद्दपार झाले आहेत. टॅबलेटवरच मुले प्रश्नपत्रिका सोडवितात. त्यांची उत्तरे त्यावरच तपासली जातात.

सायंकाळी गुणपत्रिका तयार असते. इंटरनेट सेवा असल्याने मुले हवी ती माहिती गुगलवर शोधतात, वाचतात. आता शाळेतील ६५ टॅबलेट व यंत्रे वायफोयच्या माध्यमातून जोडण्यासाठी जिल्हा दूरसंचार विभागाकडे शिफोरस करण्यात आली आहे. यामुळे ही शाळा दफ्तरमुक्त झाली आहे. तंत्रज्ञानामुळे शाळेने अध्ययन-अध्यापनात क्रांती आणली आहे. दोन आठवडय़ांपूर्वी हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.

समाजातून मदतीचा हात

शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची धडपड पाहून शाळेला मदत करण्यास सर्व गावकरीच नव्हे तर गावाशी तसा काही संबंध नसलेलेही तत्पर असतात. टॅबलेट पुरेसे नव्हते तेव्हा आणायचे कुठून, हा प्रश्न पडला. त्या वेळी बजाज कुटुंबीयाने त्याला प्रतिसाद दिला. बजाज कुटुंबातील एका व्यक्तीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पावणेदोन लाख रुपये किमतीचे २० टॅबलेट शाळेला भेट देण्यात आले.

परसबाग

शाळेत पाणी नव्हते. जवळच असणाऱ्या पी.व्ही. टेक्स्टाईल्स कंपनीने सामुदायिक उत्तरदायित्व म्हणून शाळेत विहीर, पंप, पाण्याची टाकी व चार एकरांसाठी पाइपलाइनची कामे करवून दिली. आज शाळेत पाणी भरपूर आहे. म्हणून मग शाळेत परसबागही फु लली आहे. मुलांसह गावकरीही परसबागेत काम करतात. शाळेची परसबाग ताज्या भाजीपाल्याचे भरघोस उत्पन्न देणारे साधन ठरली आहे. या परसबागेमुळे भेंडी, वांगी, दोडके, शेंगा, सांबार, वगैरे ताजे उत्पादन शालेय पोषण आहारात येऊ लागले. पोषण आहाराचा दर्जा वाढल्याने त्याचा परिणाम उपस्थितीवरही झाला. आज शाळेची उपस्थिती शंभर टक्के आहे.

बचतीसाठी बँक

मुलांना बचतीची सवय लागावी म्हणून विद्यार्थी बँक सुरू करण्यात आली आहे. मुलेच या बँकेचे व्यवस्थापन पाहतात. पालकांनी, आप्तांनी भेटीदाखल वा खाऊकरिता दिलेले पैसे मुले बँकेत जमा करतात. या साठलेल्या पैशाचा उपयोग सहल व शैक्षणिक कामांसाठी होतो. एकलव्य निवासी शाळा, नवोदय विद्यालय व अन्य उपक्रमांत येथील मुलांची निवड झाली आहे. या मुलांच्या वाडवडिलांनी गावाची वेसही कधी ओलांडली नसेल, पण ही पिढी संगणकाद्वारे देशापार पोहोचत आहे. विविध सहलींद्वारे गावाबाहेरचे जग अनुभवू लागली आहे. सुरुवातीला शाळेसमोर अनंत अडचणी होत्या; परंतु ठाण्यातील पंचेपाडा येथील संदीप गुंड यांच्याकडून शाळा स्वयंपूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली, असे शाळेचे शिक्षक पुरुषोत्तम बावणे यांनी सांगितले. ‘गुंड यांनी घडविलेली शाळा आम्ही प्रत्यक्ष पाहिली. आपणही हे बदल केले तर शाळेचे रुपडे पालटेल, असे वाटले. अर्थात त्याकरिता गावकऱ्यांचे सहकार्य लागणार होते. त्यांच्याशी बोललो. अशिक्षित, गरीब असले तरी गावकऱ्यांना मुलांच्या भवितव्याची चिंता आहे. त्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. पुढे सगळे सहज घडत गेले. आता ही शाळा महाराष्ट्रातील सवरेत्कृष्ट शाळा प्रथम ठरावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आता शाळेने सौरऊर्जा तयार करण्यासाठी १ लाख १० हजार रुपये खर्चाची योजना आखली आहे. ती मंजूर झाली की शाळेची विजेचीही गरज भागेल. शिवाय गावालाही वीजपुरवठा करण्याइतपत शाळा सक्षम होईल. शाळेतील श्रमदानातून बांधलेला वनराई बंधारा, स्प्रकलरवर फु लणारी परसबाग व अन्य शेती, शंभरावर सागाची झाडे, हे चित्र मनोवेधक आहे.

जवळच्या इंग्रजी शाळेत न जाता पाच किलोमीटरवरच्या या शाळेत विद्यार्थी का येतात, याचे उत्तर शाळेला भेट दिल्यावर सहज गवसते. शाळेची पटसंख्या सतत वाढते आहे. पण संख्यात्मक विस्ताराएवढाच गुणात्मक विस्तारावर भर देण्याचा शिक्षकांचा प्रयत्न आहे. त्यांच्या प्रयत्नांना गावकऱ्यांचीही साथ असल्याने गर्द वनराईत वसलेल्या या विद्येच्या प्रांगणात डिजिटल क्रांती घडून आली आहे.

 

संकलन – रेश्मा शिवडेकर

reshma.murkar@expressindia.com

प्रशांत देशमुख