|| हर्षद कशाळकर

खासदारकीच्या कार्यकाळात जवळपास नऊ वर्षे केंद्रात ऊर्जा आणि अवजड उद्योगसारखी खाती भूषवूनही मतदारसंघात फार काही प्रभाव पाडू न शकलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते यांना मतदारसंघातील अकार्यक्षमता आणि पक्षांतर्गत नाराजी भोवली आहे. गेली १० वर्ष अनंत गीते हे रायगडचे खासदार होते. त्याआधी चार वेळा त्यांनी रत्नागिरी जिल्ह्य़ाचे प्रतिनिधित्व केले होते. खासदारकीच्या या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांना जवळपास नऊ  वर्षे केंद्रीय मत्रिमंडळात स्थान होते. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय ऊर्जामंत्रिपदाची जबाबदारी संभाळली होती. तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये ते केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदावर कार्यरत होते. संसदेतील विविध कमिटय़ांवर त्यांनी काम केले होते. त्यामुळे केंद्रातील शिवसेनेच्या प्रभावी नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. मात्र देशभरात पुन्हा एकदा मोदी लाटेचा प्रभाव कायम असताना अनंत गीतेंना मात्र यंदा पराभवाला सामोर जावे लागले.

पक्षांतर्गत नाराजी आणि मतदारसंघातील अकार्यक्षमता याला कारणीभूत ठरली. मतमोजणीनंतर समोर आलेली आकडेवारी पहाता शिवसेनेला दक्षिण रायगडात मोठा फटका बसला. ज्या ठिकाणी शिवसेनेला मताधिक्य मिळणे अपेक्षित होते, त्या ठिकाणी सेना खूपच मागे पडली. गीते यांच्याबद्दल शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती ती दूर करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही. दुसरीकडे या नाराजीचा फायदा सुनील तटकरे यांनी उचलला. केंद्रात मंत्री असताना रायगड किंवा रत्नागिरी जिल्ह्य़ात कोणताही मोठा प्रकल्प उभा करू शकले नाही. मतदारसंघात प्रभाव पडेल असे कोणतेही काम त्यांच्याकडून झाले नाही. शिवसेनेची ताकद असतानाही गीते यांना त्याचा लाभ उठविता आला नाही. ‘मातोश्री’चे निकटवर्तीय या एकाच मुद्दय़ावर ते मंत्रिपदी टिकून होते. त्याचा ना शिवसेनेला फायदा झाला ना गीते यांना! रायगडमध्ये या पराभवामुळे शिवसेनेसमोर विधानसभेत आव्हान असेल.