गोंधळातही लोकसभेत सरोगसी आणि तृतीय पंथींसंदर्भातील महत्त्वाची विधेयकं संमत झाली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत मंजूर झाली असली तरी राज्यसभेत ती अडकून पडण्याची शक्यता अधिक आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार डॉ. काकोली घोष-दस्तीदार यांनी दोन्ही विधेयकांवरील चर्चेत आक्षेपांचे अचूक मुद्दे उपस्थित केले होते. सरोगसीच्या व्यापारीकरणाला आळा घालणाऱ्या विधेयकावर दस्तीदार यांनी सिनेस्टारवर बोचरी टीका केली. बॉलीवूडमधल्या कोणाही अभिनेता वा अभिनेत्रीचं त्यांनी नाव घेतलं नाही. पण, सिनेस्टारच्या प्रवृत्तीवर त्यांनी बोट ठेवलं. बॉलीवूडमधील अनेक तारे-तारकांनी सरोगसीच्या माध्यमातून मुलं जन्माला घातली आहेत. ही ‘फॅशन सरोगसी’ झाली. दस्तीदार मुद्देसूद मांडणी करतात त्यामुळं त्यांचं भाषण लक्ष वेधून घेतं. दस्तीदार स्त्रीआरोग्यतज्ज्ञ आहेत. डॉक्टर असल्यानं त्यांना वैद्यकीय क्षेत्राची खोलवर जाण आहे. सरोगसीचं व्यापारीकरण कसं होतं गेलं आणि त्याचा गैरफायदा कसा घेतला गेला हे दस्तीदार यांनी पाहिलेलं असल्यानं त्यांनी सिनेसृष्टीतील लोकांवर मारलेल्या ताशेऱ्यांवर कोणालाही प्रतिवाद करता आला नाही.

कॅमेऱ्यांचं भान..

संसदेची दोन्ही सभागृहं सकाळी अकरा वाजता सुरू होतात. त्याआधी पंधरा-वीस मिनिटं संसदेचा परिसर गजबजलेला असतो. प्रश्नोत्तराच्या तासाला ज्या मंत्रालयाशी संबंधित प्रश्न असेल, त्या खात्याच्या मंत्र्यांच्या गाडय़ा यायला लागतात. टीव्हीवाले खासदारांचे बाइट घेण्यात मग्न असतात. पण, खरी गंमत असते ती गांधीजींच्या पुतळ्यासमोर होणाऱ्या निषेधाच्या आणि मागण्यांच्या घोषणांमध्ये. गेल्या आठवडय़ात विरोधाभास पाहायला मिळाला. महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर शिवसेनेच्या खासदारांनी राम मंदिरासाठी घोषणाबाजी केली. शिवसेनेचा हा मुद्दा दोन दिवसांत विरून गेला आणि लोकसभेत या पक्षाच्या खासदारांची उपस्थितीही तुरळक झाली. हिवाळी अधिवेशनात न चुकता घोषणाबाजी करताना दिसले ते तेलुगु देसमचे खासदार. आंध्र प्रदेशला विशेष पॅकेज मिळवण्यासाठी सभागृहात आणि बाहेरही लक्ष वेधून घेण्याचा या खासदारांचा प्रयत्न असतो. खासदार शिवप्रसाद हे दररोज कोणत्या वेशात येतात हा संसदेतला उत्सुकतेचा विषय असतो. कधी शिवाजी महाराजांच्या तर कधी, कृष्णाच्या वेशात ही स्वारी संसदेत वावरताना दिसते. सभागृहात फलकबाजी करणं, तेही लोकसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन करणं, हे हिवाळी अधिवेशनातलं नेहमीचंच दृश्य होऊन गेलं आहे. त्यातही खासदार फलकबाजी करताना सभागृहातील कॅमेऱ्यांचा विचार करून उभे राहतात. लोकसभा अध्यक्षांसमोरील कॅमेऱ्यात दिसेल अशा रीतीने ते फलक घेऊन अध्यक्षांकडं पाठ करून उभे राहतात. एखादा खासदार बोलायला लागला की, त्याच्या तोंडासमोर फलक आणतात त्यामुळं त्या खासदाराच्या चेहऱ्याऐवजी फलक टीव्ही कॅमेऱ्यात टिपले जातात. खासदाराचं कॅमेऱ्यांचं भान सभागृहाच्या कामकाजावर मात्र परिणाम करू लागलंय.

प्रेक्षकांचा हिरमोड

प्रत्येक अधिवेशनाला संसदेचं कामकाज पाहायला देशभरातून लोक येत असतात. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात मात्र त्यांचा हिरमोड झालेला दिसला. चालू अधिवेशनात एक दिवसदेखील पूर्णवेळ कामकाज झालेलं नाही. राज्यसभा तर सकाळी सुरू झाल्या-झाल्या दिवसभरासाठी तहकूब केलेलीच या प्रेक्षकांनी पाहिली. दोन्ही सभागृहांबाहेर लांबलचक रांगा लागलेल्या दिसतात. पण, सुरक्षेचे सर्व सोपस्कार आटोपून प्रेक्षक गॅलरीत जाऊन बसेपर्यंत सभागृहाचं कामकाज स्थगित होत होतं. आता तर बुधवापर्यंत संसद बंद राहील. दर शनिवार-रविवार कामकाजाला नियमित सुट्टी असते. ख्रिसमस मंगळवारी असल्यामुळं अलीकडचा आणि पलीकडचा दिवसही संसदेला सुट्टी असेल. पुढचे दोन दिवस कामकाज होईल आणि पुन्हा शनिवार-रविवारची सुट्टी पडेल. मग, येईल वर्षअखेर. तेव्हाही सुट्टी असेल. ८ जानेवारीला हिवाळी अधिवेशन संपेल. तसं पाहिलं तर संसदेत चार-पाच दिवसच काम होईल. लोकसभा निवडणुकीमुळं पूर्ण अर्थसंकल्पी अधिवेशनही होणार नाही. हिवाळी अधिवेशनच तहकूब करून फक्त लेखानुदानासाठी फेब्रुवारीमध्ये दोन दिवसांचं अधिवेशन होईल. त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवडय़ात निवडणूक आचारसंहिता जाहीर होणार आहे. त्यामुळं आता केंद्रातील नव्या सरकारच्या कार्यकाळातच म्हणजे जूनमध्ये अर्थसंकल्पी अधिवेशनात प्रेक्षकांना संसदेचं कामकाज बघता येईल. खरं तर हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरमध्ये सुरू होतं आणि ख्रिसमसच्या आधी संपत. पण, गेल्या वर्षीही ते जानेवारीपर्यंत चालवलं गेलं होतं. खासगी विधेयकं मांडली जात असल्यामुळं आणि खासदारांना मतदारसंघात जायचं असल्यामुळं शुक्रवारी तशीही संसदेत गजबज कमी असते. लागोपाठ पाच दिवस सुट्टी असल्यामुळं या शुक्रवारी दुपारपासूनच संसदेत शांतता पसरलेली होती.

 

राहुल आणि गोंधळ

विधानसभा निवडणुका जिंकल्यामुळं राजकीय वजन वाढलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी विश्रांतीसाठी सिमल्याला रवाना झाले. पुढच्या आठवडय़ात संसदेत राफेलवर चर्चा झालीच तर ते अधिवेशनासाठी येईल. त्यांच्या अनुपस्थितीत दोन्ही सभागृहांत मात्र राहुल यांचा उल्लेख होत राहिला. लोकसभेत ‘राफेल’च्या मुद्दय़ावरून काँग्रेस आक्रमक झाल्यामुळं जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न भाजपचे खासदार करत होते. काँग्रेसचे खासदार ‘जेपीसी’ची मागणी करत होते तर, सत्ताधारी चर्चेला तयार असल्याचं सांगत होते. काँग्रेसच्या ‘जेपीसी’ला राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी करून रोखायचं असं बहुधा भाजपनं ठरवलं असावं. राहुल गांधींनी माफी मागण्याचा ‘आग्रह’ भाजपसदस्यांनी शेवटपर्यंत सोडला नाही. ‘यथावत’ मासिकाने राहुलवर टिप्पणी करणारा मजकूर छापलेला आहे. राफेल विमानांवर राहुलचा चेहरा असलेल्या या मासिकाचं कव्हर भाजपचे खासदारांनी लोकसभेत आणलेलं होतं. पृष्ठभागावर ‘राफेल आ मुझे मार’ हे राहुल यांना उद्देशून लिहिलेलं वाक्य ठळकपणे दिसत असल्यानं काँग्रेसच्या फलकबाजीला प्रत्युत्तर दिलं जात होतं. लोकसभेत मंगळवारी फलकबाजीचा गोंधळ इतका टिपेला गेला की कामकाजावर पाणी फेरलं गेलं. राज्यसभेत गुरुवारी भाजपनेते विजय गोयल यांनी राफेलवरून काँग्रेसवर टीका केली होती. पण, काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी गोयल यांना विरोध करत त्यांचे शब्द मागं घेण्याची मागणी केली. शर्मा याचं म्हणणं होतं की, गोयल यांनी भाषणात राहुल यांचं नाव घेतलं आहे. राहुल राज्यसभेचे सदस्य नसताना त्यांचं नाव घेऊन टीका का केली? गोयल म्हणत होते, राहुल यांचं नाव घेतलेलंच नाही. अखेर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी हस्तक्षेप करून गोयल यांचं भाषण तपासलं जाईल, असं सांगितलं. गोयल यांनी राहुल यांचं नाव घेतलेलं नाही त्यामुळं गोयल बरोबर आहेत असा निर्वाळा शुक्रवारी नायडूंनी दिलाही. त्यावर शर्मानी चित्रफीत दाखण्याचा आग्रह धरला होता. या गोंधळात राज्यसभा तहकूब झाली. संसदेत इतकं सगळं होत असताना राहुल शांतपणे त्यांच्या बहिणीचं उभं राहात असलेलं घर बघायला गेले आहेत.

– दिल्लीवाला