चैतन्य प्रेम

मनुष्य या शब्दातच ‘मन’ आहे. माणसाला बुद्धीचं वरदान आहे आणि म्हणून त्यानं बुद्धीचा वापर करून वागावं, देवभोळेपणा करू नये, अशी आधुनिक विचारमांडणी आहे. अज्ञानाचा गैरफायदा घेण्याचे प्रकार पाहता आणि अध्यात्माचा तेजीत असलेला बाजार पाहता ती मांडणी पूर्णपणे चुकीचीही नाही. पण आधीच म्हटल्याप्रमाणे माणूस म्हणजे नुसती बुद्धी नव्हे, त्याच्या बुद्धीवरही मनाचाच अंमल चालतो. मनाला जे पटतं, ते दुसऱ्याला पटवण्यासाठी बिचारी बुद्धी राबवली जाते! तेव्हा माणूस बुद्धीनं विचार करीत नाही, तो मनाच्या कलानंच सदैव विचार करतो. हे मन म्हणजे तरी काय? तर देहभावानुसार उमटणाऱ्या अनंत भावना, कल्पना, कामना यांचा महासागर! या सर्व भावना, कल्पना आणि कामना जन्मोजन्मी देहसुखालाच चिकटून असतात. त्या देहाचं आणि हा देह ज्या चैतन्याच्या आधारावर तगून आहे त्या आत्मतत्त्वाचं खरं सुख न जाणताच जे त्या त्या घडीला इंद्रियांना हवंसं वाटतं ते मिळणं हेच सुख, अशी मनाची धारणा असते. अशाश्वतात शाश्वत सुख शोधण्याच्या धडपडीमुळेच मग माणसाचं भावनाशील मन अभावग्रस्त होतं. म्हणूनच या मनावर खऱ्या, विशुद्ध भावप्रेमाचे संस्कार करणं अत्यंत आवश्यक असतं. त्याच हेतूनं संतांचे अभंग प्रकटले, गाथा साकारल्या, मात्र  भावसंस्कार करण्यासाठी लहानपणी मनाचं बोट प्रथम पकडलं ते प्रार्थनास्तोत्रे आणि आरत्यांनी. त्यातली समर्थ रामदासांनी रचलेली गणपतीची आरती तर आपल्या अत्यंत परिचयाची. या आरतीचा पहिला चरण आहे: सुखकर्ता दु:खहर्ता, वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची! आपल्या कानांवर अनंत वेळा ही अनंताची आरती पडली आहे. साधकाला हा चरण काय सांगतो, त्या चौकटीत या चरणाचा विचार करू. साधकासाठी ‘गणपती’ अर्थात त्याच्या इंद्रियगणांचा अधिपती आहे तो सद्गुरूच. या सद्गुरूची कृपा कशी आहे? तर ती शाश्वत सुख निर्माण करणारी आणि भवदु:खाचं हरण करणारी, विघ्नाची वार्तादेखील न उरू देणारी (वार्ता विघ्नाची न उरवी) आणि सदोदित प्रेम पुरवणारी आहे! खरं सुख म्हणजे काय, ते कशात आहे आणि ते कसं प्राप्त होतं, हे सद्गुरूच्या कृपेशिवाय उकलत नाही. शाश्वत सुख हवं असेल, तर ते शाश्वताच्याच आधारावर मिळेल, याची जाणीव त्या सद्गुरू बोधानुरूप साधना करतानाच होऊ लागते. पण एवढय़ानं भवप्रभाव ओसरत नाही. त्यासाठी साधनेतील चिकाटी, आंतरिक जागरूकता आणि अनुसंधान टिकावं लागतं. जेव्हा परम सुख म्हणजे काय, हे ज्ञान होऊ लागतं तेव्हाच अज्ञान ओसरू लागतं आणि अज्ञानामुळे निर्माण होत असलेलं भवदु:खंही आपोआप विरू लागतं. मन सदैव शाश्वतापाशीच स्थिरावू लागतं. मग विघ्नाची वार्ता कुठून येणार? अशा साधकाच्या अंतर्मनात त्याच्या साधनेच्या अर्थात आत्माभ्यासाच्या प्रमाणात वेगळीच निश्चिंती, वेगळीच निर्भयता, नि:शंकता विलसू लागते. तो आत्माभ्यास जसजसा दृढ होत जातो तसतशी ही स्थितीही सहजतेनं त्याच्या जीवनात दृष्टीगोचर होते. मग सद्गुरू प्रेमभावाची जाणीव अशा भक्ताच्या अंत:करणाला व्यापून टाकते.  त्याच्या हृदयात हे विशुद्ध प्रेम असं काठोकाठ सदैव भरून असतं की अशा भक्ताच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या सूक्ष्म मनावरदेखील भक्तीचे भावसंस्कार होऊ लागतात. त्या इंद्रियगण-नायक सद्गुरूंची कृपाव्याप्ती अशी अनंत आहे.