मराठा, बहुजन, दलित, मुस्लीम मोर्चे निरनिराळे निघाल्याने सामाजिक भेद दिसले; पण शोषित प्रत्येक समाजात असल्याचेही दिसले. या शोषितांनी एकत्र येण्याची महाराष्ट्रीय परंपरा आता तरी आठवून पाहावी! 

भाजपच्या हस्तक्षेपामुळे मराठा आंदोलनाची आग विझली, मराठा मोर्चाना व त्यांवर प्रतिक्रिया म्हणून निघालेल्या दलित मोर्चाना भाजप व मुख्यमंत्र्यांनी रसद पुरविण्यास सुरुवात केल्याने या मोर्चाचा प्रभाव ओसरला अशी निरीक्षणे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अलीकडेच नोंदविली होती. मराठा क्रांती मोर्चाला नागपूर येथे अत्यल्प प्रतिसाद, ३१ जानेवारी रोजी फसलेले नियोजनशून्य ‘चक्का जाम’ आंदोलन व अनेकदा पुढे ढकलत येत्या ६ मार्च रोजी मुंबईत होऊ घातलेला मराठा मोर्चा बेमुदत लांबणीवर पडल्याची ताजी बातमी.. आणि जि.प. निवडणुकीत या मोर्चाचे मुद्दे निष्प्रभ ठरल्याचे चित्र, या पाश्र्वभूमीवर पवारांनी नोंदविलेल्या या निरीक्षणाचे महत्त्व आहे. लाखोंच्या संख्येत निघणाऱ्या मराठा मोर्चामागे शरद पवार व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्याचे आरोप झाले होते. हा आरोप खरा असेल तर पवारांना आज मुख्यमंत्र्यांनी बाजी उलटविल्याचे दु:ख होणे स्वाभाविक आहे. परंतु मराठा मोर्चात भगव्या टोप्या घालून सहभागी होणारे व मोर्चाच्या आयोजकांना आपल्या कह्य़ात घेऊन या आंदोलनाचा शक्तिपात घडवणारे भाजपचे नेतेही दोषी आहेत हे मान्य करावे लागेल. मराठा मोर्चावर प्रतिक्रिया म्हणून निघालेल्या दलित, बहुजन व मुस्लीम मोर्चानाही फूस लावण्याचे उद्योग काही धूर्त राजकारणी मंडळींकडून सुरू होते व त्याचा लाभही नगर परिषदांच्या निवडणुकांत घेतला गेला ही वस्तुस्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर मराठा मोर्चा व दलित, बहुजन, मुस्लीम मोर्चाच्या आयोजकांना आपल्या भूमिका, मागण्या व पुढील लढय़ाचे डावपेच यांवर गांभीर्याने विचार करावा लागेल, कारण या मोर्चाचा उद्देशच काही राजकारण्यांचा अजेंडा राबविण्याचा नव्हे तर समाजाला न्याय मिळवून देण्याचा आहे.

मराठा क्रांती मोर्चाने प्रारंभीच केलेल्या प्रमुख मागण्यांमुळे, मागासवर्गीय समाजांमधे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. आरक्षणाच्या आपल्या हक्कात मराठा समाज वाटेकरी होणार, या शंकेने ओबीसीदेखील हक्क रक्षणासाठी एकवटू लागले. मुस्लिमांना आरक्षणाची मागणीही जोर धरू लागली. यातूनच मुस्लीम आरक्षण कृती संघर्ष समिती व सकल मुस्लीम मोर्चाच्या वतीने नांदेड, बीड, औरंगाबाद, लातूर येथे मोठय़ा संख्येत मुस्लिमांचे मोर्चे निघाले. दलित, ओबीसी, मुस्लीम एकजुटीचे (१६५ संघटनांचे) प्रतिनिधित्व करणारे बहुजन क्रांती मोर्चेही नाशिक, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, नागपूर येथे लाखांच्या संख्येत निघाले. हे मोर्चे जरी मूक असले तरी या सर्व मोर्चातील तरुणांच्या मनातील न्याय व संधी नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा आक्रोश व्यक्त होत होता. मराठा मोर्चे असोत वा मुस्लीम वा बहुजन क्रांती मोर्चे जसजसे पुढे जात गेले तसतसे त्यांनी पुढे केलेल्या मागण्यांना ठोस व नेमके स्वरूप प्राप्त होत गेले. आरक्षण व दलित अत्याचार प्रतिबंध कायदा या संबंधीच्या मागण्यांबाबत मतभेदाचे मुद्दे असले तरी एकंदरीत जगण्याच्या व समाजाच्या प्रगतीच्या संदर्भातील, आर्थिक व शैक्षणिक मागण्यांबाबत मात्र या सर्व मोर्चामध्ये साम्य व एकवाक्यता दिसून येते. अशा परिस्थितीत, ज्या मागण्या सर्वच समाजांच्या- मग ते मराठा असोत वा मागासवर्गीय, ओबीसी असोत वा मुस्लीम, सर्वसाधारणपणे आर्थिक, शैक्षणिक वा सामाजिकदृष्टय़ा मागे पडलेल्या शोषित वर्गाच्या आहेत. त्या मागण्यांसाठी एकत्र यावयास हवे, नव्हे ती काळाची गरज आहे. कोणत्या समाजाला किती आरक्षण मिळू शकते हा प्रश्न सर्वस्वी घटनेच्या चौकटीतील आहे. सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष दोन्ही आरक्षणाच्या मुद्दय़ावर सर्वच समाजांना हाताच्या बोटांवर नाचवू पाहत असताना त्यांच्या हातचे बाहुले होऊन किती काळ आरक्षणाचा संघर्ष आपापसात लढायचा याचा निर्णय घेऊन या सर्व शोषित समाजांना अन्य मागण्यांसाठी एकत्र यावे लागेल. जे आरक्षणाचे तेच दलित अत्याचार-प्रतिबंधक कायद्याचे! ‘या कायद्याचे सुरक्षा कवच मागासवर्गीयांना असावयास हवे, तसेच या कायद्याचा गैरवापरही रोखावयास हवा’ हे जर सर्वच समाजांना मान्य असेल तर सर्व समाजांतील निवडक उच्चशिक्षित व उच्चपदस्थ अनुभवी मंडळींनी एकत्र चर्चा करून आरक्षण व दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा यांबाबत एकमताची भूमिका मांडावी लागेल. हे जर घडले तर अन्य समान मागण्यांसंदर्भात शोषितांच्या जात व धर्मविरहित एकजुटीस चालना मिळू शकेल.

अलीकडे समाजामध्ये जातीय व धार्मिक अस्मिता तीव्र झाल्या आहेत. जात बाजूस ठेवून एकत्र येण्याचा विचार सहजपणे रुजणे मान्य होत नाही व पचनीही पडत नाही; परंतु अशा मंडळींची दैवतेही दोनच म्हणजे अर्थातच रयतेचे राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज व समता व सामाजिक न्याय ही तत्त्वे भारताला देणारे घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दोन्ही दैवतांना मानणाऱ्यांनीच त्यांच्या शिकवणीला हरताळ फासण्याचे ठरविले आहे की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवरायांवर मराठा समाजाचाच अधिकार असे वाटणारे इतिहास विसरतात की शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या संघर्षांपैकी बहुतांश संघर्ष त्यांना स्वत:स राजे व उच्चकुलीन समजणाऱ्या स्वकीयांशी करावा लागला. रयतेचे म्हणजे सर्वसामान्यांचे राज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवाजीराजांवर लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या भावनेतून आपले प्राण ओवाळून टाकण्यासाठी आघाडीवर होते ते खालच्या जातींचे समजले जाणारे गोरगरीब शेतकरी, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय!  जिवा महाला (संकपाळ), शिवा काशिद , बहिर्जी नाईक.. ही नावे सहसा माहीत असतात, पण मायनाक भंडारी हे छत्रपतींच्या आरमाराचे सुभेदार होते आणि या आरमारामध्ये कोळी, सोनकोळी, भंडारी या दर्यावर्दी समाजाच्या सैनिकांचा समावेश होता. शिवछत्रपतींच्या दूरदृष्टीचे असामान्य उदाहरण म्हणून ज्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा उल्लेख होतो त्यासाठी गाबित या (आज ‘विशेष मागासवर्ग’ प्रवर्गातील) समाजाने दिलेल्या योगदानाची इतिहासात नोंद आहे. मुसलमान राज्यकर्त्यांशी लढताना, अनेक मुसलमान सरदारांवर आपल्या फौजेतील मोठय़ा जबाबदाऱ्या सोपविण्यासाठी लागणारा मनाचा मोठेपणा शिवाजी महाराजांपाशी होता कारण त्यांच्या राज्यकारणात धर्मद्वेष्टेपणाचा लवलेशही नव्हता. तोफखानाप्रमुख इब्राहिमखान, आरमारप्रमुख दर्यासारंग दौलतखान, पन्हाळगडाच्या वेढय़ात सिद्दी जौहरच्या सैन्याला भिडणारा सरदार सिद्दी हिलाल, आगऱ्याहून सुटकेप्रसंगी जीव धोक्यात घालणारा मदारी मेहतर अशी कैक उदाहरणे इतिहासकार सांगतातच. येथे तो इतिहास सांगणे हा हेतू नाही.

‘रयतेवर अन्याय करणारी जुलमी राजवट संपवून गोरगरीब, शेतकरी, महिला यांच्या रक्षणाची ग्वाही देणारे स्वराज्य’ स्थापन करण्यासाठी ही सर्व माणसे जात धर्म विसरून शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभी राहिली होती, याची आठवण आज ठेवली पाहिजे. अन्याय व शोषणाचा अंत करायचा असेल तर सर्वाना सोबत घ्यावे लागेल, याची जाण त्या जाणत्या राजाला होती. म्हणूनच त्यांनी केवळ मराठय़ांच्याच नव्हे तर सर्व शोषितांच्या हृदयांत क्रांतीची ज्वाला धगधगत ठेवली. स्वातंत्र्य, समता व बंधुता या अनमोल तत्त्वांच्या पायावर भारतीय राज्यघटनेची निर्मिती करणाऱ्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची, देशात सामाजिक न्याय प्रस्थापित होण्याबाबत आग्रही भूमिका होती.  पीएच.डी.च्या प्रबंधाचे पुस्तक बाबासाहेबांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना अर्पण केलेले आहे. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दिलेले सहकार्य व त्यांची केलेली प्रशंसा यांबद्दलही बाबासाहेबांच्या मनात कृतज्ञतेची भावना होती. चवदार तळ्याचा सत्याग्रह असो वा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दलितेतर सहकारी, समतेच्या व परिवर्तनाच्या लढय़ामध्ये बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर होते ते शोषणाविरोधातील संघर्ष हा कुण्या एका जातीचा संघर्ष नसून सर्वच शोषितांचा आहे असा ठाम विश्वास बाबासाहेबांनी रुजविल्यानेच!

छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त मराठय़ांचेच नव्हे तर रयतेचे राज्य स्थापन करावयाचे होते; तसेच डॉ. आंबेडकरांना फक्त दलितांच्या किंवा स्वजातीच्या जीवनात परिवर्तन घडवायचे होत असे नसून सर्वच शोषितांच्या जीवनात क्रांती घडवून व दबलेल्या मूक समाजाला नव्या युगाची भाषा बोलणारी वाचा द्यायची होती. महाराष्ट्राच्या मातीमध्ये परिवर्तनाचा व सामाजिक क्रांतीचा विचार रुजविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक विचारांना गाडण्याचे प्रयत्न आज महाराष्ट्रामध्ये जातीजातीचे व समाजासमाजांचे वेगवेगळे मोर्चे काढणाऱ्या त्यांच्याच अनुयायांकडून व्हावेत, हे दुर्दैवी म्हणावे इतके अनाकलनीय आहे.

मराठा क्रांती मोर्चा असो, बहुजन क्रांती मोर्चा असो वा सकल मुस्लीम मोर्चा, हे सारे जोपर्यंत एकत्र येऊन अन्यायकारी समाजव्यवस्थेविरोधात एल्गार पुकारत नाहीत तोपर्यंत असे कितीही मोर्चे स्वतंत्र चुली मांडून निघाले तरी त्यांची आग विझविण्याचे काम धूर्त व लबाडांकडून चोखपणे केले जाईल. मोर्चेकरी समाजाला तोंड भरून आश्वासने दिली जातील, रसदही दिली जाईल व रिकाम्या ओंजळीत फक्त निराशा घेऊन मोर्चामध्ये सहभागी तरुण-तरुणी घरी परततील ते पुन्हा मोर्चामध्ये न येण्यासाठी! शोषण करणारी समाजव्यवस्था बदलण्याचे सामथ्र्य असलेली मनगटे नुसतीच चावत बसावी लागलेली युवाशक्ती योग्य दिशा न मिळाल्याने वाया जाण्याची भीती निर्माण होईल. हे टाळण्यासाठी शिवप्रभूंच्या व बाबासाहेबांच्या  विचारांचे पाईक असलेल्यांनी येथून पुढचा संघर्ष निदान समान मुद्दय़ांवर लढण्याच्या विचाराने एकजुटीने पुढे निघायला हवे. शोषितांच्या जीवनात परिवर्तन घडवू शकतील अशा (शिक्षण, रोजगार, कामगारांना श्रमाच्या योग्य मूल्यासह सुयोग्य जीवनाची हमी वा बळीराजाला त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला..) मागण्यांसाठी मराठा-बहुजन-मुस्लीम एकता मोर्चा निघेल तो सुदिन! महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले रयतेचे व समतेचे राज्य आणण्यासाठी ‘मराठा-बहुजन शिवक्रांती’चा तो प्रारंभ ठरेल.

ajitsawant11@gmail.com