12 December 2017

News Flash

काळ्या मातीचे जळीत..

पंधरा दिवसांपासून पावसाची ओढ, मूग, उडीद हातातून गेले

सुहास सरदेशमुख, (औरंगाबाद) | Updated: August 13, 2017 2:07 AM

  • पंधरा दिवसांपासून पावसाची ओढ, मूग, उडीद हातातून गेले
  • सोयाबीन, तूर, मका उत्पादन घटणार
  • लातूर, उस्मानाबाद, परभणीत दुष्काळस्थिती

भरून येणारे आभाळ वारा पळवून नेतो. पाऊस हा आता बरसेल, असे वातावरण रोज निर्माण होते, आणि पुन्हा ऊन अंगावर येते.. मराठवाडा पुन्हा एकदा दुष्काळ उंबरठय़ावर उभा आहे. किती आहे तीव्रता?- पैठण तालुक्यातील १२२६ हेक्टर मूग शेतकऱ्यांनी उपटून टाकून दिले आहे. मका वाळून जातो आहे. सोयाबीनचे हिरवेगार रान आता कोमेजून गेले आहे. कोणत्याही क्षणी हे पीक काढून टाकावे लागेल, अशी स्थिती आहे. पुन्हा मराठवाडा दुष्काळाच्या दिशेने निघाला आहे.

गणपतीच्या काळात मराठवाडय़ात पाऊस येतो, असा नेहमीचा अंदाज असला तरी तोपर्यंतही पीक तगणार नाही अशी स्थिती आहे. हतबल होऊन जळणारे पीक पाहात बसण्यापलीकडे काही करता येत नाही, अशी स्थिती आहे. नांदेड जिल्ह्य़ातील काही तालुके वगळता संपूर्ण मराठवाडय़ात दुष्काळ हातपाय पसरू लागला आहे. मूग, उडीद ही पिके हातातून गेली आहेत. सोयाबीन, मका, तूर या पिकांचे उत्पादन ६० टक्के घटेल, असा अंदाज कृषी अधिकाऱ्यांनी सरकारला सादर केला आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद होऊच शकले नाहीत. एकटय़ा औरंगाबाद जिल्ह्य़ात  टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. एक वर्ष चांगले गेले, की तीन वर्षे वाईट अशी दुष्काळ साखळी, तर निर्माण होत नाही ना या शंकेने मराठवाडय़ातील माणसाला ग्रासलेय. अवस्था अशीच राहिली तर पुन्हा टँकर, चारा छावण्या नशिबी येणार. परिणामी, जगण्यासाठी हातपाय हलवणारा मराठवाडय़ातील माणूस पुन्हा कोलमडून पडेल काय, या धास्तीने बाजारपेठेतील व्यवहार थंडावले आहेत. निराशेने सारे वातावरण ग्रासलेय.

वाढ खुंटलेली पिके वाचवायची कशी, असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. जलयुक्त शिवार हे दुष्काळावरचा रामबाण इलाज, असे भासवून काम सुरू झाले होते. त्याला जनचळवळीचे रूपही आले. पण नव्याने दुष्काळ दबक्या पावलाने दाखल झाला आणि या कामाच्या मर्यादाही आता स्पष्ट होऊ लागल्या. पाऊस नसल्याने सारे काही पुन्हा बदलू लागले आहे. औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्य़ांत तसे सोयाबीनचे प्रमाण कमी. मात्र, कापूस आणि मका या पिकांवर मोठा परिणाम झाला असून, ऐन वाढीच्या काळात पावसाने ताण दिल्याने वाढ खुंटली आहे. त्यातच पिकांवर रोगही वाढले आहेत. औरंगाबाद, जालना, बीड या तिन्ही जिल्ह्य़ांत रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. सोयाबीनवर उंटअळी आली आहे. चक्री भुंगाही दिसत असल्याने जे काही हाती येईल असे वाटत होते तेसुद्धा मिळेल का, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासलेय. पिकांवरील ही कीड दूर व्हावी म्हणून फवारणी केली जाते. रिमझिम पावसाची सर आली तरी आशा वाढते. पण गेल्या ४२ दिवसांपासून पुरेसा पाऊस नसल्याने आता करावे तरी काय, हा यक्षप्रश्न बनला आहे. मराठवाडय़ात सरासरीच्या केवळ ३२.२ टक्के पाऊस नोंदला गेला आहे. काही गावांमध्ये आतापासून उन्हाळय़ासारखी स्थिती निर्माण झाली आहे.  तासभर मोटार चालली तरी भागेल, पण तेवढेही पाणी नसल्याने येत्या पंधरा दिवसांत पाऊस आला नाही, तर पीक काढून रान मोकळे करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. लातूर जिल्ह्य़ातील लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, रेणापूर या तालुक्यातील पीक परिस्थिती चांगली नाही. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील भूम, परंडा, कळंब या तालुक्यांत पिके वाळून चालली आहेत. परभणी जिल्ह्य़ातील काही गावे आता दुष्काळात सापडली आहेत, असेच चित्र आहे.

भय फक्त किडीचे..

हर्षद कशाळकर : राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत कोकणात पीक परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र अनियमित पावसामुळे रायगड जिल्ह्यात भात पिकावर किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. जुलै महिन्यात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे रायगडात भाताची लावणी पूर्ण झाली आहे. पाऊस उशिरा सुरू झाला, तरी तो शेतीला पूरक होता. सध्या भाताच्या हळव्या जाती फुटव्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे शेतात पाणी असणे आवश्यक आहे. परंतु ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाने विश्रांती घेतली, त्यामुळे शेतात पाणी नाही. अजून काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास पिकावर कीड रोगाचा देखील प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.

First Published on August 13, 2017 2:07 am

Web Title: marathi articles on drought in maharashtra part 5