News Flash

स्थलांतर.. : माझ्याच चक्रव्यूहातला मी अभिमन्यू!

परदेशात जाणं हे आताच्या काळात सहज वाटत असलं तरी त्यामुळे समाजात काही नवे प्रश्न निर्माण होऊ लागलेत, हे निश्चित.

स्थलांतर माणसाला नवीन नाही. पाण्यानं समृद्ध प्रदेशात सुरक्षित वसतिस्थानाचा शोध हा माणसाच्या स्थलांतराचा मूलभूत उद्देश.

नीलिमा बोरवणकर

‘‘यतीन वयाच्या पासष्टाव्या वर्षांपर्यंत नोकरी करू शकतो. मग रिटायरमेंटनंतर भारतात परत यायची इच्छा होती गं आमची..’’ प्रज्ञा भागवत सांगत होती. गेली जवळपास पस्तीस र्वषे अमेरिकेत वास्तव्य असलेली प्रज्ञा. दर दोन-तीन वर्षांनी सुट्टीवर यायचं. सासरी, माहेरी कसेबसे आठ-दहा दिवस राहायचं. सगळे नातेवाईक, मित्रमंडळींना भेटायचं. ‘वैशाली’, तुळशीबाग, एखादं नाटक, पुस्तकांची दुकानं अशी बरीचशी ‘मस्ट’ यादी पूर्ण करायची आणि अतृप्त मनानं परत जायचं. हे नेहमीचंच रूटिन. कारण येताना पूर्ण वीस दिवसांची सुटी नजरेसमोर दिसत असली तरी इतक्या कार्यक्रमांत ते दिवस विमानाच्या वेगापेक्षाही जास्त वेगात पळतात हे पहिल्या भेटीतच कळून चुकलं होतं. वर्षांगणिक दोघांच्या आई-वडिलांची वाढती वयं, अधूनमधून उद्भवणारी आजारपणं, हळूहळू त्यांचं येत जाणारं परावलंबित्व यालाही सामोरं जावं लागत होतंच.

इतकी र्वष अमेरिकेत काढूनही दोघं अस्सल मराठीपण टिकवून असलेले. उत्तम मराठी वाचन, घरात आवर्जून मराठीतून संवाद, मराठी खाद्यपदार्थ करणं, सगळे सण साजरे करणं. अगदी मनापासून. मातीपासून दुरावलो तरी संस्कृतीपासून नाही, ही धारणा. आपल्या आवडीच्या शिक्षणासाठी, कामासाठी इतकी र्वष इकडे राहिलो, निवृत्तीनंतर परत जावं, आई-वडिलांजवळ राहावं. जिथून निघालो तिथे परत यावं, ही इच्छा ते नेहमी बोलून दाखवीत. या वेळेस प्रज्ञाच्या बोलण्यात ‘इच्छा होती’ असं आलं. याचा स्पष्ट अर्थ- ‘आता येणार नाही’ असा होत असल्यानं साहजिकच कारण विचारलं, ‘‘होती म्हणजे? आता उरली नाही का ती?’’

‘‘प्रश्न आमच्या इच्छेचा नाहीए. पण मुली नाही म्हणतात गं.’’ अश्विनी चक्क म्हणाली, ‘‘तुम्ही इकडे आल्यामुळे आम्हाला आमचे आजी-आजोबा खूप कमी मिळाले, आता तुम्ही तिकडे गेलात की आमच्या मुलांनापण आजी-आजोबा किती कमी मिळतील. आता नाही जायचं परत.’’ गंमत अशी की हिच्या मुलींची लग्नंही झालेली नाहीत अजून.

परदेशी जाणाऱ्या माणसांचे असे असंख्य अनुभव आपल्याला येत असतात. त्यांची घरं, गाडय़ा, त्यांचं स्वतंत्र आयुष्य याबरोबरच त्यांचे तिथले कष्ट, तिथल्या हवामानाशी जुळवून घेणं, मुलं लहान असताना त्यांना सांभाळण्यासाठी कुणाची मदत नसणं, तिथे काही आजारपण आलं तर येणारा ताण, ते तिकडे गेल्यामुळे इथल्या त्यांच्या कुटुंबावर ओढवणारी परिस्थिती असं बरंच काही आपल्याला इकडून तिकडून कळत असतं. परदेशात जाणं हे आताच्या काळात सहज वाटत असलं तरी त्यामुळे समाजात काही नवे प्रश्न निर्माण होऊ लागलेत, हे निश्चित.

स्थलांतर माणसाला नवीन नाही. पाण्यानं समृद्ध प्रदेशात सुरक्षित वसतिस्थानाचा शोध हा माणसाच्या स्थलांतराचा मूलभूत उद्देश. पुढे टोळ्या, समूह असं होत होत कुटुंबव्यवस्थेपर्यंत तो येऊन पोहोचला. वर्षांनुर्वष ज्या प्रदेशात आपले पूर्वज, कुटुंब राहिलेलं असतं तो भूभाग सोडून एखाद्या नवीन, अनोळखी प्रदेशात जाऊन माणूस राहू लागतो, त्या परक्या मातीत भिजतो, रुजतो, फुलू-फळू लागतो. तिथली माती, माणसं, भाषा, संस्कृती आपलीशी करू लागतो. ज्या सहजतेनं कोकणातला माणूस चांगल्या राहणीमानाच्या शोधात मुंबईतला चाकरमानी झाला, त्याच सहजतेनं हळूहळू तो देशाचा उंबरा ओलांडून परदेशी जाऊ लागला.

‘‘देवा, चांगली बुद्धी दे!’’ अशी देवाला आळवणी करताना ‘चिंता, क्लेश, दारिद्य््रा्र, दु:ख अवघे देशांतरा पाठवी’ हा श्लोक लहानपणी आपण सर्रास म्हणत असू. इतकं दूर वाटणारं देशांतर माणसं किती सहजगत्या करू लागली, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

गुजराती, पंजाबी, केरळी माणसाच्या तुलनेत मराठी माणसाचं परदेशी जाणं पुष्कळ उशिरा सुरू झालं. स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी बाळ गंगाधर टिळकांपासून शंतनुराव किर्लोस्कर, दादासाहेब फाळके, बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक बुद्धिमान तरुण परदेशी जात ते प्रामुख्यानं उच्च शिक्षणासाठी. पण शिक्षण संपताच ते परत येत. १९६० च्या दशकात मराठी तरुण इंग्लंड- अमेरिकेत गेले, तेही उच्च शिक्षण घ्यायलाच. तेव्हा त्यांना निरोप देणारे आई-वडील ‘‘यशस्वी होऊन लवकर परत ये,’’ असा आशीर्वाद हमखास द्यायचे. पण शिक्षण संपलं तरी परतीचा प्रवास मात्र कमी कमी होत तिथेच स्थिरावण्याचा ओघ वाढत गेला. आणि आता बहुतेक पालक निरोप देतानाच तो आता परत येणार नाही, हे गृहीत धरून फक्त ‘‘यशस्वी हो..’’ एवढाच आशीर्वाद देतात.

आज विचारही करता येणार नाही इतका तो काळ वेगळा होता. जाताना सोबत फक्त पाच डॉलर्स घेऊन जाता यायचं. एअर इंडियाच्या विमानानं गेलं तर शंभर डॉलर्स नेता यायचे. पण विमान तिकीट परवडणाऱ्या किमतीत नसल्यानं बहुसंख्य मराठी मुलं बोटीनं इंग्लंडला जायची. काही तिथेच राहायचे. काहींना पुढे अमेरिकेत जायचं असायचं. वनारसे नावाच्या मराठी बाई लंडनमध्ये अशा तरुण मुलांची राहण्या-जेवण्याची सोय अगदी थोडक्या पशांत करत असत. तिथे राहून, काम मिळवून पसे कमवायचे आणि मग शिक्षण सुरू करायचं, किंवा अमेरिकेच्या तिकिटापुरते पैसे जमवून प्रवासाचा पुढचा टप्पा सुरू करायचा.

आई-वडिलांना खुशाली कळवायची ती पत्रांतून.. जे पत्र पोहोचायला किमान दोन आठवडे आणि त्यावर उत्तर यायला पुढचे दोन आठवडे लागायचे.

जागतिकीकरणाच्या लाटेपर्यंत ही परिस्थिती फारशी बदललेली नव्हती. डॉलर्स घेऊन जाण्यावर मर्यादा, फोन अतिशय महाग असणं- असं सगळं. ‘उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस रवाना’ असे फोटो वर्तमानपत्रांत छापून आणले जात. विमानतळावर पोहोचवायला अख्खं कुटुंब जाऊन परदेशी जाणाऱ्याच्या गळ्यात पुष्पहार घालणं वगरे सोपस्कार केले जात. कारण तोपर्यंत परदेशगमन हे दुर्मीळ होतं.

१९९० पर्यंत शिक्षणासाठी मुली परदेशी जाण्याचं प्रमाण हाताच्या बोटावर मोजण्याइतकं होतं. ज्या मुलींना परदेशी आयुष्याची भूल पडायची त्यांच्यासाठी लग्न करून जाणं हा पर्याय होता. तिथे नोकरी करणारे तरुण दहा-पंधरा दिवसांसाठी भारतात येऊन आई-वडिलांनी अनेक मुलींतून दोन-तीन निवडलेल्या मुलींतून एक पसंत करून, ‘चट मंगनी, पट ब्याह’ करून परत जात. तिथलं राहणीमान, सासू-सासऱ्यांची जबाबदारी नसणं, अशा कारणांमुळे परदेशातल्या स्थळांवर उपवर मुलींच्या पालकांच्या अक्षरश: उडय़ा पडायच्या.

काळ किती बदललाय बघा! आजच्या सुशिक्षित, स्वत:च्या करिअरबाबत ठाम भूमिका असणाऱ्या मुली परदेशातल्या मुलांशी लग्न करून तिथे ‘डिपेन्डंट व्हिसा’वर जायला नाखूश असतात.

परदेशातल्या उच्च शिक्षणासाठी कर्ज मिळणं सुलभ झालं तसं मुलं परदेशी जाण्याचं प्रमाण बघता बघता प्रचंड वाढत गेलं. डॉलरमध्ये भरायच्या फीसाठी अर्थात कर्जाची रक्कम डोळे फिरवणारी असते. वयाच्या विशीत पन्नास-साठ लाखांचं कर्ज डोक्यावर घेतलं की ते फेडण्यासाठी डॉलरमधलीच कमाई हवी.

सलील रानडेनं इंडस्ट्रियल इंजिनीअिरगमध्ये अमेरिकेत एम. एस. केलं. त्यानंतर त्याला तिथे किमान पाच हजार डॉलरची नोकरी मिळू शकते, पण भारतात आल्यावर जेमतेम साठ-सत्तर हजारांची! या पगारात कर्ज कधी व कसं फेडणार? स्वत:चं घर कसं घेणार? अशा प्रश्नांना उत्तर म्हणून सरळ तिकडचीच नोकरी घेण्याचा पर्याय निवडला जाऊ शकतो, असं त्याचं म्हणणं. अर्थात त्यानं परत येऊन चीझ बनवण्यासारखा वेगळाच व्यवसाय सुरू केला.

साहिल नावाच्या एका मारवाडी मुलाची गोष्ट. अतिशय बुद्धिमान आणि चाकोरीबाहेर विचार करणाऱ्या या मुलाला एकाच वेळी अनेक निरनिराळे विषय शिकायचे असल्यानं आणि इथे आपल्या मायदेशात फक्त आर्ट्स-कॉमर्स-सायन्स अशा ठरावीक साच्यात बसणारीच शिक्षणव्यवस्था असल्यानं त्यानं अमेरिकेत ‘लिबरल आर्ट्स’मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. राजकारण, माध्यमांत दाखवल्या जाणाऱ्या चर्चा, मतांमुळे प्रेक्षकांवर कोणता परिणाम होतो, असा काहीसा विषय त्यानं अधिक अभ्यासासाठी निवडला होता. शिकताना त्याला फार मजा आली. उत्तम ग्रेड मिळवली. पण भारतात त्याच्या या ‘विशेष’ ज्ञानाची कदर होईल का, या प्रश्नानं त्याच्या आई-वडिलांची झोप उडालीय. एकुलत्या एका मुलानं परत यावं अशी त्यांची तीव्र इच्छा आहे. पण घरच्या व्यवसायात त्याचं मन रमणार नाही आणि त्याने घेतलेल्या शिक्षणाचा इथे उपयोग होणार नाही याचीही त्यांना जाणीव आहे. जसा एक माणूस दुसऱ्यासारखा नसतो, तसेच यातले गुंतेही वेगवेगळे असतात.

मुलांना इथून तिकडे गेल्या गेल्या सुरुवातीला घराची, आईच्या हातच्या जेवणाची फार आठवण येते. हळूहळू ओळखी होतात. मित्र जमतात. नव्या वातावरणाशी जुळवून घेतलं जातं. आणि मग इथून उपटून नेलेलं रोपटं तिथे रुजायला लागतं. शिक्षण संपून नोकरी लागली की पशाची चिंता मिटते. नवनवे प्रदेश फिरावेत, चांगली गाडी घ्यावी, घर घ्यावं अशा एकेक महत्त्वाकांक्षा डोकं वर काढू लागतात. पंख फुटलेल्या पाखरानं घरटं सोडून विस्तीर्ण आकाशात भरारी घ्यावी हे स्वाभाविकच असतं. ‘काही र्वष राहू इथे, पुरेसे पसे साठवू आणि मग परत मायदेशात जाऊ..’ असं ठरवणाऱ्या मुलांचा परतीचा क्षण येता येता फार उशीर झालेला असण्याची शक्यता जास्त. मायदेशी परतल्यावर आपल्या योग्यतेची नोकरी, पसा, मुलांच्या शिक्षणाच्या सुविधा, परदेशात इतकी र्वष सवयीचं झालेलं राहणीमान भारतात मिळेल का? या काळजीनं तो क्षण पुढे पुढे नेला जातो आणि हळूहळू परतीचे दोर कापले जातात.

माझ्या चुलतभावाची- शैलेश अळवणीची सात-आठ वर्षांची मुलगी सरळ आई-बाबांना म्हणते, ‘‘यू आर इंडियन्स, आय अ‍ॅम अ‍ॅन अमेरिकन.’’ या मुलीला घेऊन ते कसे परत येऊ शकतात?

अर्थात काही तरुण जे घ्यायला गेलो- म्हणजे शिक्षण किंवा कामाचा अनुभव- ते पूर्ण होताच कुठल्याही अधिकाचा मोह न धरता सरळ मायदेशी परततात.

‘‘मनात आलं की हवी तिथे पाणीपुरी खाल्ली नं की परत आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं..’’ असं पदव्युत्तर पदवी आणि नामांकित विद्यापीठातून पीएच. डी. मिळवल्यानंतर, तिथल्या पगाराच्या मोठय़ा आकडय़ाची सवय लागली की परत येणं अवघड होत जाईल, म्हणून लगेच मायदेशी परत आलेली तेजस लेले हसून सांगते तेव्हा तिथे राहणाऱ्या मुलांना कशाकशाची आठवण येत असेल आणि ती किती कष्टानं दूर सारावी लागत असेल याची झलक मिळते.

‘‘तिथे मिळणाऱ्या संशोधनाच्या सहज संधी, साधनांची उपलब्धता, त्यासाठीचा निवांतपणा, निधी, कामाची लवचीक वेळ असं खूप काही अतिशय उत्तम असतं. इथल्या प्रयोगशाळेत काम करताना जी साधनं मिळवण्यासाठी महिनाभर वाट बघावी लागते, ते तिथे सहजी मिळतं. प्राध्यापकांबाबत मात्र माझे आणि इतर सहकाऱ्यांचे अनुभव संमिश्र प्रकारचे होते. म्हणजे इथल्या लोकांना वाटतं की तिकडे राजकारण नसतं, सर्वाना समान संधी मिळते. तर ते शंभर टक्के खरं नाही. किमान माझा तरी तसा अनुभव नाही. (जर्मनीतल्या ‘मॅक्स प्लँक’सारख्या अनेक नोबेल प्राइज मिळवणाऱ्या संशोधकांसाठी प्रसिद्ध असलेल्या संस्थेत तिनं शिक्षण घेतलंय.) पीएच. डी. गाइडनं काही गरप्रकार केलेले मी स्वत: पाहिलेत. आपल्या किती विद्यार्थ्यांना पीएच. डी. मिळाली वगरेवर त्यांना मिळणारा पगार किंवा संशोधनासाठीचा निधी मिळणं अवलंबून असतं. त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ठरावीक मुदतीत पीएच. डी. मिळावी असा त्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी काही रीिडग्ज बदलायला आडून आडून सुचवणं, पेपरमध्ये बदल करणं असे प्रकार केलेले मी पाहिलेत. त्यामुळे इकडचं सगळं भारी आणि भारतातलं कमी दर्जाचं असं माझं मत कधीच बनलं नाही. शेवटी मनुष्यस्वभाव सर्वत्र सारखाच, हे फार लवकर माझ्या लक्षात आलं. मग जशा तिकडे काही गोष्टी चांगल्या आहेत, तसंच आपल्या देशातलं आपल्या सवयीचं हवामान, आपली माणसं, एकमेकांना असणारी आपली सोबत याचा विचार करून मी पीएच. डी. मिळवून परत यायचा निर्णय घेतला,’’ तेजस लेले सांगत होती. इथे आल्यावर फग्र्युसन महाविद्यालयात लेक्चरर म्हणून काम करताना तिकडच्या संशोधनाच्या संधी, पेपर्स वाचनाच्या निमित्तानं जागोजागचे मिळणारे अनुभव इथे मिळत नाहीत. इथे आरक्षणाच्या कायद्यामुळे जसा काहींना न्याय मिळतो, तसा काहींवर अन्यायसुद्धा होतो. तरी इथे असल्यामुळे मुलीला आजी-आजोबा आणि काका-मामा-मावश्यांची जी माया मिळते, ती केवळ अमूल्य असल्याचं तिचं ठाम मत आहे. त्यामुळे इथले खड्डे, पावसानं उडणारी दैना या कशाचाही त्रास तिला होत नाही. तिनं अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे तिकडचे आणि इथले डॉक्टर यांच्यातला फरक. तिथे आधी त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते, नाहीतर इमर्जन्सीमध्ये जावं लागतं. इथे डॉक्टर कधीही भेटू शकतात, त्यांच्याशी फोनवर बोलता येतं. ही भावनाच धीर देणारी असते. विशेषत: मूल लहान असताना.

अर्थात काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावं लागतं, हे खरंच. काय साधायचं आणि काय त्यागायचं, हा निर्णय प्रत्येकाला आपापलाच घ्यावा लागतो. बा. भ. बोरकरांच्या एका कवितेत त्यांना प्रश्न पडलाय..

‘चालले हे उंट कोठे, तप्त रेताडातुनी?

स्वार झाल्या प्रेषितांना कोण हाकी कोठुनी?

का निघाले टाकुनी हे बायका, पोरे, घरे,

ना जरी वाटेत कोठे पान, पाणी, पाखरे?

पाणियाला पाठमोरी कोणती यांची तृषा?

आणि डोळे बांधणारी कोणती यांची दिशा?’

अनिवासी भारतीयांचा विचार करताना ही कविता आठवते. आखाती देश सोडता बायका, मुलांना सोडून कुणी सहसा राहत नाहीत. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, अगदी आफ्रिकेतल्या देशांतसुद्धा सहसा लोक राहतात ते आपल्या कुटुंबासोबतच. ‘पण का निघाले टाकुनी?’ यात आपले आई-वडील, भावंडं- आणि मुख्य म्हणजे आपली माती..? हा प्रश्न पडतोच.

‘‘आमचा मुलगा खूप हुशार. अगदी आय. आय. टी.तसुद्धा तो रँक मिळवून पदवीधर झाला. आता त्याच्या क्षेत्रात त्याला चांगली संधी मिळवायला त्यानं अमेरिकेत जाणं अगदी स्वाभाविक होतं. ती त्याची आणि आमचीसुद्धा इच्छा होती. २००० मध्ये तो परदेशी गेला. पीएच. डी. आणि पोस्ट डॉक्टरेट केलं. एवढं शिकल्यावर तो तिथे स्थायिक होणार, हे नक्कीच. तो तिकडे राहणार हे आम्ही तो गेला तेव्हाच मनोमन मान्य केलं होतं..’’ शुभा कर्णिक सांगतात.

रोहित त्यांचा एकुलता एक मुलगा. पण त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यानं अमेरिकेत राहायला पर्याय नाही, असं त्यांचं मत. आपल्या म्हातारपणाचं नियोजन म्हणून त्यांनी पुण्यात पाषाणच्या ‘अथश्री’ सहनिवासात घर घेतलं. पती निवृत्त झाल्याबरोबर ते उभयता तिकडे राहायला लागले. मुलं दूर असणाऱ्या उच्च मध्यमवर्गीय लोकांसाठी परांजपे स्कीम्सनं उभा केलेला ‘अथश्री’ हा गृहप्रकल्प अशा पालकांमध्ये अतिशय लोकप्रिय होत चालला आहे. त्याची सुरुवात पाषाणपासून झाली. पुढे बावधन, मगरपट्टा अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी हे प्रकल्प उभे केले. मुलं दूर असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही उत्तम व्यवस्था आहे. पोहण्याचा तलाव, व्यायाम, योगासनं करण्यासाठी जिम, घरी स्वयंपाक करायचा नसल्यास रेस्टॉरंट, डॉक्टरची व्यवस्था, बाथरूमसह सर्वत्र व्हीलचेअर जाऊ शकणं, पूर्णवेळ काळजी घेणारा स्वयंसेवक अशा सगळ्या सुविधा तिथे उपलब्ध असल्यानं वृद्ध तिथे आरामात वास्तव्य करू शकतात. तिथे अनेक स्पर्धा, उपक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम सादर होत असल्यानं ज्येष्ठांना आपल्या वयोगटात राहण्याचा आनंद घेता येतो आणि मुलं जवळ नसल्याचं दु:ख बरंच सुसह्य़ होतं.

अर्थात हा उच्चभ्रूंचा सहनिवास आह. निम्न आर्थिक गटातल्या वृद्धांसाठीचे अन्य सहनिवास इतके आनंददायी नसतात. अनेकदा परदेशातली मुलं पालकांना भेटायला फिरकतसुद्धा नाहीत. गोव्यात ‘स्नेहमंदिर’ नावाच्या वृद्धनिवासातला अनुभव. तिथे अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांची उत्तम काळजी घेतली जाते. तिथल्या परिचारिका एकदा म्हणाल्या होत्या, ‘‘आम्ही यांची इतकी सेवा करतो, पण यांच्या तोंडी अखंड मुलाचं नाव.’’ कितीही व्यावहारिक विचार करत असले तरी आई-वडिलांना आपली मुलं जवळ असावीत ही भावना किती तीव्र असते, याची ही झलक.

गेल्या साधारण वीस वर्षांत पालकांचीच इच्छा असते की मुलांनी परदेशी शिकायला जावं आणि तिथेच वास्तव्य करावं. उच्च मध्यमवर्गीय घरांत मुलांना परदेशी जायला आर्थिक मदतसुद्धा केली जाते. ‘इथे आरक्षणामुळे उच्च जातीय मुलांना नोकऱ्या मिळतात कुठे?’.. ‘काय तो इथला भ्रष्टाचार!’..‘तिकडची नोकरी सुखाची. संध्याकाळी सहा वाजता घरी येता येतं. इथल्यासारखं राब राब राबवून नाही घेत.’ ‘तिकडे श्रमाला प्रतिष्ठा आहे. बुद्धीला मान आहे.’ ‘आय. टी. क्षेत्रात शेवटी परदेशी प्रोजेक्टवरच तर काम करावं लागतं. मग इथे बसून, इथला पगार घेऊन त्यांच्या वेळेनुसार काम करण्यापेक्षा तेच काम तिथे राहून, तिथल्या चलनात पगार घेऊन केलेलं काय वाईट?’.. ‘इथे दहावी पास राजकारणी आय. ए. एस. झालेल्यांना हुकूम सोडतो.’ अशी असंख्य कारणं मुलांना देऊन ‘तू आपला परदेशी जा..’ अशी स्वप्नं पालकच मुलांच्या मनात पेरू लागले आहेत.

परदेशी वास्तव्य म्हणजे आर्थिक सुबत्ता, मोठी घरं, गाडय़ा यामुळे मुलांचा सामाजिक स्तर उंचावलाय असं अनेक पालकांना वाटतं. आणि त्यामुळे अप्रत्यक्षपणे आपलाही स्तर उंचावल्याचा भास इथल्या पालकांना होत राहतो. ‘ठेवलंय काय या देशात?’ हे वाक्य बरेच जण सहज उच्चारतात, तेव्हा एक देशप्रेमी म्हणून मला वैयक्तिकरीत्या वाईट वाटत राहतं.

‘‘सगळे उच्चशिक्षित जर परदेशी जाऊ लागले तर आपला देश चांगला करायची जबाबदारी कुणाची?’’ हा प्रश्न मी अनेक पालकांना विचारला. मिळालेली उत्तरं अशी : ‘‘असं कसं होईल? सगळे उच्चशिक्षित थोडेच परदेशी जातात?’’

‘‘मुलं तिकडून इथल्या कितीतरी सामाजिक संस्थांना आर्थिक मदत देत असतात. उलट, परदेशस्थ लोकांना भारताला मदत करण्याचा विचार जास्त असतो.’’

‘‘आलेली संधी का सोडायची? स्वत:च्या प्रगतीचा विचार करणं चुकीचं आहे का?’’

‘‘हा तुमचा प्रश्न फार बाळबोध आहे हो. हल्ली कुणी असा देशाबिशाचा विचार नाही करत. सनिकसुद्धा पगार मिळतो म्हणूनच नोकरी करतो.’’

नागपूरच्या एका व्यक्तीचं उत्तर ऐकून तर मी सर्दच झाले. ते म्हणाले, ‘‘जिथे पसा मिळतो तिथे जावं. स्वत:च्या कमाईतून सुख मिळवण्यात पाप कसलं? मला तर वाटतं, अजून ५० वर्षांनी आपल्या देशाचे तुकडे पडलेले असतील. आपण जेत्याच्या भूमीत असायला हवं. कुणीतरी पुन्हा आपल्यावर राज्य करेल. त्यापेक्षा आताच हा देश सोडावा, हे बरं नाही का?’’ त्यांचा मुलगा ऑस्ट्रेलियात आणि मुलगी सिंगापूरला असते.

यावर मी समाजऋण वगरे विषय काढून डॉ. अभय बंग, जयंत नारळीकर अशी नावं घेतली तेव्हा त्यांनी सध्याच्या राजकारणाला लागलेली कीड वगरे विषय उपस्थित केले. स्वत:चा अनुभव सांगितला. पोलीस खात्याच्या आवाहनानुसार परदेशी जाताना पोलीस चौकीत कळवलं तर म्हणे हमखास घर लुटलं जातं.

नुकत्याच पाहिलेल्या ‘मिशन मंगल’ चित्रपटाचा दाखला देऊन पाटील नावाचे एक पालक म्हणाले, ‘‘माझ्या मुलाला स्पेस रिसर्च करायचा होता. आपल्या देशात स्पेस रिसर्चमध्येही कसं राजकारण केलं जातं. त्यासाठी किती कमी निधी मिळतो. एक आयुष्य मिळतं हो आपल्याला.. ते संघर्षांत घालवायचं का? आता तुम्ही परत येऊन ‘इस्रो’ सुरू केलेल्या थोर शास्त्रज्ञांची नावं घ्याल. पण प्रत्येकाचा िपड वेगळा. आमचा मुलगा प्रयोगशाळेत रमणारा आहे.’’

एका गोष्टीत मात्र ठळक फरक जाणवला. इतरप्रांतीय लोक प्रामुख्यानं पसे कमावण्यासाठी परदेशी जातात. कुणी छोटे व्यवसाय करत यशस्वी होतात आणि मग आपल्या गावच्या, नात्यातल्या इतरांना बोलावून घेतात. मराठी मुलांचा दृष्टिकोन वेगळा असतो. ही मुलं शिक्षणासाठीच परदेशी जातात. उच्च शिक्षण घेऊन पसे कमावतात. पण मूळ हेतू असतो तो शिक्षण आणि अनुभव घेणं हा.

मुलं विशी-बाविशीत परदेशी जातात तेव्हा आई-वडिलांचं सरासरी वय पन्नासच्या जवळपास असतं. त्यांना त्यांचे व्याप असतात, उमेद असते. मुलं जरा स्थिरावली की मुलांकडे जाऊन त्यानिमित्तानं प्रवासाची हौस भागवू अशी त्यांची आस असते.

पूर्वीच्या काळी एक मूल परदेशी गेलं तरी बाकी दोन-तीन मुलं इथे असायची. ‘हम दो, हमारे दो’ किंवा आता ‘हमारा एक’च्या जमान्यात मूल तिकडे गेलं, किंवा दोन असली आणि दोन्ही तिकडे गेली की आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा राजा-राणीचा संसार सुरू होतो. निवृत्तीनंतर हाताशी वेळ, पशाची ऊब आणि कुठली जबाबदारी नसलेले अनेक परदेशस्थ मुलांचे पालक पुन्हा एकदा मधुचंद्राचा काळ जगू लागतात. नाटकं, सिनेमे, प्रवास, सवाई गंधर्व महोत्सव, दिवाळी पहाट अशा तारुण्यात करता न आलेल्या गोष्टींत मन रमवू लागतात. वर्षांतले तीन-चार महिने मुलांकडे परदेशी जाऊन येतात.

पण मधुचंद्राचा सोनेरी काळ जसा फार टिकत नाही, तसाच हाही. गणपती आणायला मुलं बरोबर नाहीत, दिवाळीचा फराळ खायला कुणी नाही, या भावना डोकं वर काढू लागतात. मुलं आता तिकडेच राहणार या वास्तवाचा बुद्धीनं कितीही स्वीकार केलेला असला तरी काळजात त्यांच्या आठवणीनं कळ उठायची राहत नाही. सुरुवातीला मुलं दरवर्षी येतात. पण त्यांच्या मुलांच्या शाळा आणि इतर गोष्टींत अडकणं वाढतं. त्यांचे तिकडचे खर्च वाढतात. प्राधान्यक्रम बदलतात. तसं मग त्यांच्या येण्याचं गणित पुढेमागे होऊ शकतं. शिवाय तोपर्यंत आई-वडिलांच्या वाढत्या वयामुळे दरवर्षी मुलांकडे जायच्या प्रवासाचा त्यांना त्रास होऊ शकतो. तरी जोवर पती-पत्नी दोघांच्या तब्येती चांगल्या असतात तोवर मजेचा काळ सुरू राहतो. दोघांपकी एकाच्या तक्रारी सुरू झाल्या की मात्र धाबं दणाणतं. दवाखान्याच्या चकरा, पथ्यपाणी सांभाळणं, आजाऱ्याची सेवा हे सगळंच जोडीदाराला मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा दमवणारं असतं.

परदेशातली मुलं आजारपणात येतात, पण अंतरामुळे त्यात वेळ जातो. आखाती देशातून, सिंगापूरहून मुलं ताबडतोब येऊ शकतात. पण अमेरिका, ऑस्ट्रेलियाहून पोहोचता पोहोचता दोन-तीन दिवस उलटलेले असतात. कधी एवढय़ा वेळात आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. माझ्या सख्ख्या मामाच्या बाबतीतली घटना. त्याचा मुलगा कॅनडात स्थायिक. मामी अपघातात मृत्यू पावल्यानं मामा आणि आजी असे दोघंच घरात असताना मामाला पॅरेलेसिसचा अ‍ॅटॅक आला. आजीनं न डगमगता आम्हाला ताबडतोब फोन केला. पण पुण्याहून निघून मुंबईला पोहोचायला किमान चार तास हवेत. मग तिनं माझ्या भाचीला कळवलं. ती येऊन अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत मामाची अवस्था गंभीर झालेली. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलेलं. मामा सतत आम्हाला सांगायचा की, ‘मला आयुष्याचा कंटाळा आलाय. परावलंबी आयुष्य मला आवडणार नाही.’ कुणालाच ते आवडत नाही. पण इथे तर सेवा करायलाही कुणी नाही. मामा ७४ आणि आजी ९४ वर्षांची. कॅनडात तेव्हा बर्फाचं साम्राज्य. मुलगा राहायचा तिथे तर उणे ४० तापमान. त्यामुळे विमान सुटण्याची शक्यताच नाही. आम्ही डॉक्टरांना कळकळीची विनंती करूनही व्हेंटिलेटर काढायला त्यांनी सपशेल नकार दिला. ‘हे ठरवण्याचा अधिकार फक्त बायको, मुलांना असतो,’ हे कारण देत. ती वेळ टळली. पण पुढे त्याला अंथरुणावर खिळून सहा महिने काढावे लागले.

अशा घटनांचा विचार करून प्रत्येकानं- किमान मुलं जवळ नसलेल्यांनी तरी ‘लििव्हग विल’ करणं अत्यावश्यक आहे. मृत्युपत्र करण्याविषयी आता जागरूकता निर्माण झाली असली तरी इच्छापत्र करण्याची जागरूकता अद्याप झाली नसल्याचं अनेक डॉक्टर सांगतात. ठरावीक विहित नमुन्याचं इच्छापत्र उपलब्ध आहे. ‘‘माझ्यावर कोणते उपचार करावेत आणि कुठल्या टप्प्यावर ते बंद करावेत, मी ते निर्णय घेण्याच्या अवस्थेत नसलो तर माझ्यावतीनं ते निर्णय कोण घेऊ शकेल? त्यांची नावं..’’ असं सगळं त्यात लिहून ठेवावं. स्थावर, जंगम मालमत्तेचे असंख्य प्रश्न उभे राहू शकतात म्हणून शक्यतो त्रयस्थ आणि तुमच्याहून तरुण व्यक्तीची त्यासाठी निवड करावी, असा सल्ला डॉ. शिरीष महाजन यांनी यानिमित्तानं दिला. तो नक्कीच अमलात आणायला हवा. आयुष्य अतिशय अनिश्चित असल्यानं प्रत्येकानंच असं इच्छापत्र लवकरात लवकर करून टाकावं.

आई-वडिलांना आजारपण आलं तर किमान वाढत्या वयात काहीतरी व्हायचंच अशी मनाची समजूत तरी काढता येते. पण दुर्दैवानं परदेशात राहणाऱ्या मुलांच्या कुटुंबातल्या कुणाला काही झालं तर अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होते.

वीसेक वर्षांपूर्वीची घटना. रंजना देसाई-कुलकर्णीची मी तेव्हा एक मुलाखत घेतली होती. ही एक अतिशय देखणी, हुशार, श्रीमंत मुलगी लग्न करून परदेशी गेली. नवरा आणि दोन मुलांचं सुखी कुटुंब मजेत जगत असताना अचानक सगळ्या आयुष्यानं रोलर कोस्टरसारखं तीव्र, अवघड वळण घेतलं. पण रोलर कोस्टर सावरून पुन्हा जागेवर तरी येतो. तसं घडणं तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या नशिबात नव्हतं. चौघं गाडीतून जात असताना अतिशय भीषण अपघात झाला. त्याची तीव्रता इतकी मोठी होती, की ती अख्खं वर्ष दवाखान्यात होती. तिच्या पाठीच्या मणक्याचे तुकडे झाल्यानं ती उठूसुद्धा शकत नव्हती. पूर्ण परावलंबित्व आलेलं. नोकरी आणि लहान मुलांना सांभाळून तिच्या दवाखान्यात तिला रोज भेटायला जाणं नवऱ्याला शक्य होईना. शेवटी सगळं सोडून त्या कुटुंबाला भारतात परत यावं लागलं. इथे नर्स ब्युरोच्या साहाय्यानं पुढे अनेक र्वष ती व्हीलचेअरवर जखडून होती. पण स्वयंपाकाला, मुलं सांभाळायला बायका, दोघांचे पालक अशा सगळ्या सहकार्यानं किमान इथे ही परिस्थिती त्यांना हाताळता तरी आली.

कुणाला मतिमंद किंवा अपंग अपत्य झालं तर इथे कुटुंबाची किंवा पगारी मदत मिळू शकते. परदेशात हे दोन्ही अवघड असल्यानं त्या मुलाच्या आई-वडिलांनाच मुलाला सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी उचलावी लागते.

रागिणी (नाव बदललं आहे.) या डॉक्टर बाईंचा अनुभव अतिशय केविलवाणा आहे. त्या जोडप्याला लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी मुलगा झाला. तो ऑटिस्टिक आहे. ही मुलं अत्यंत चंचल, अस्थिर असतात. या मुलाबाबत सांगायचं तर तो प्रवासाला खूप घाबरतो. एका जागी मुळीच बसत नाही. त्याला घेऊन हिला प्रवास शक्य नाही. आणि त्याला सोडून कुठे जाऊही शकत नाही. गेल्या तेरा वर्षांत ही इंग्लंडहून मायदेशात येऊ शकलेली नाही. अगदी तिचे वडील गेले तेव्हाही. आता तिची आईसुद्धा वयस्कर झाल्यानं तिलाही प्रवास झेपत नाही. सबब गेल्या तेरा वर्षांत हिची आणि आईची गाठभेट नाही. वडील भेटले नाहीत आणि आता आईबाबत तसं होऊ नये, ही प्रार्थना करण्याखेरीज हिच्या हातात दुसरं काही नाही.

परदेशी जाणाऱ्या लोकांना आणि त्यांच्या पालकांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. इचलकरंजीसारख्या निमशहरी भागातले अनेक तरुण हल्ली परदेशी जाऊ लागलेत, ते मुख्यत्वे तिथला हातमागाचा व्यवसाय बंद पडू लागल्यामुळे. यात मालकांच्या मुलांबरोबर कामगारांच्या मुलांचाही समावेश होतो. अर्थात त्यांचे प्रश्न मात्र वेगवेगळे आहेत. कर्ज मिळवण्यापासून ते अर्धशिक्षित पालकांमुळे मार्गदर्शनासाठीसुद्धा त्यांना दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते.

मध्यमवर्गीय पालकांना तब्येतीच्या किंवा अन्य अडचणी आल्या आणि मुलं परदेशी असली तर ते पगारी मदत घेऊ शकतात, जे कनिष्ठ आर्थिक गटातल्या लोकांना शक्य नसतं. किंवा परदेशातल्या मुलाला अडचण आली तर या पालकांना स्वत:च्या पशानं तिकीट काढून ताबडतोब तिकडे जाता येत नाही. पसा हे जगण्याचं सर्वस्व नसलं तरी त्याची ऊब अनेक समस्या सोडवायला मदत करते, हे नाकारता येत नाही.

एक मूल परदेशी आणि दुसरं इथे अशा पालकांना मानसिक स्थर्य असतं असं आपल्याला दुरून वाटू शकतं. पण त्यांनाही भावनिक िहदोळ्यांवर झुलण्याचा अनुभव येत असतो. मुलगा तिकडे आणि मुलगी इथे असेल तर सारखा तिच्यावर भार असं वाटू शकतं. याच्या उलट असेल तर मुलीकडून ज्या हक्कानं सेवा करून घेता येते तो हक्क सुनेबाबत वाटत नाही. तिच्याकडून ते करून घेताना संकोच वाटतो. या विषयाला अनेक आयाम, बाजू आहेत.

सर्व मुलं परदेशात असली तर म्हातारपणी त्यांना तिकडेच नेण्याचा काही मुलांचा प्रयत्न असतो. पण ज्येष्ठांना तिकडे करमत नाही. मग इथेच राहण्याचा हट्ट धरला जातो. पण जवळच्या नातेवाईकांना अनेकदा त्यांची जबाबदारी नको असते. ‘इस्टेट मुलांना आणि सेवा करून घ्यायला मात्र भाचे-पुतणे!’ हा दृष्टिकोन यामागे असू शकतो.

मुलं परदेशी का जातात? तिकडेच का स्थायिक होतात? त्यानंतर त्यांच्या, त्यांच्या मुलांच्या आणि इथल्या पालकांच्या आयुष्यात कोणत्या घडामोडी घडतात? या दोन-तीन पिढय़ांचे आपापसात कसे संबंध असतात? बंध किती जुळलेले असतात? आयुष्याच्या शेवटाकडे या परदेशस्थ लोकांना मायदेशाची ओढ लागते का? आपल्याला शेवटी आपले आई-वडील दिसतील का? या प्रश्नाची उकल ते कसे करत असतील?

पूर्वीच्या कहाण्या हमखास साठा उत्तराच्या असत. पण ही परदेशस्थ माणसांची कहाणी आहे ‘साठा प्रश्नांची’! यातल्या कुठल्याच प्रश्नांना गणिती उत्तरं नाहीत. दुसऱ्यानं सोडवलेल्या पेपरची कॉपी करता येत नाही. प्रत्येक प्रश्न सोडवायला निराळं समीकरण. स्वत: विणलेल्या कोषातून आयुष्याची नक्षी कशी बनवायची याचा विचार करत प्रयत्न करत राहणं फक्त हातात असतं.

आपली मुलं मोठी व्हावीत, ही सर्व काळांतल्या सर्वच पालकांची इच्छा असते. पूर्वीच्यांना वाटे, यानं आपल्या मातीशी नातं सोडू नये. मुलांवरही तेच संस्कार असल्यानं त्यांची तिथे राहताना कुतरओढ होई. आताच्या पालकांना आणि मुलांनाही माती आपली की परदेशातली, याचा फरक पडत नाही. मुलांचं सुख महत्त्वाचं. पण तिकडे राहून मुलं आणि पालक खरंच सुखी असतात का? सुख म्हणजे नक्की काय असतं?

पुन्हा प्रश्नांचं मोहोळ. आपल्या अवतीभवती उठणाऱ्या अशा असंख्य प्रश्नांतून आपण कोणते धडे घ्यायचे तेवढं मात्र आपण नक्की ठरवू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 12:35 pm

Web Title: migration within your own circle loksatta diwali issue 2019 dd 70
टॅग : Diwali Issue
Next Stories
1 स्थलांतर.. : पल्याड देशीचे…
2 स्थलांतर.. : परदेशस्थ, दूरस्थ की इथलाच?
3 सत्यजित रेंची दोन लग्नं
Just Now!
X