महालक्ष्मी येथील शक्ती कम्पाऊंडमधील सामूहिक बलात्कारातील आरोपी अमली पदार्थाचे सेवन करीत होते, ही बाब समोर आली आहे. कदाचित त्यामुळेच त्यांच्यामध्ये लैंगिक भावना चाळवल्या गेल्या असाव्यात. उच्चभ्रूंच्या पाटर्य़ामध्येही अमली पदार्थ सहज उपलब्ध असतात. तेथेही शक्ती मिल कम्पाऊंडसारख्या घटना घडतात. पण त्या एकतर संमतीने असतात वा त्याची वाच्यता होत नाही. अमली पदार्थाच्या तस्करांची ही आर्थिक उलाढाल अनेकांच्या फायद्याची आहे. संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा तो कणा आहे. पोलीसही थातुरमातुर कारवाई करतात. आरोपींना शिक्षा देण्यास आपला कायदाही अपुरा पडतो. याचा लाभ अमली पदार्थाच्या पुरवठादारांनी पुरेपूर उठवला असून मुंबईला अमली पदार्थाच्या विळख्यात त्यांनी कधीच नेऊन ठेवले आहे..
महालक्ष्मी येथील शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये झालेला सामूहिक बलात्कार आणि त्याआधी काही दिवसांपूर्वी झालेले महिलांवरील हल्ले, बलात्काराचा प्रयत्न याचे मूळ कुठेतरी गर्दुल्ल्यांशी जोडले गेल्याचे आढळून आले आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींनी घटना घडली त्या वेळी अमली पदार्थाचे सेवन केलेले नव्हते, असे स्पष्ट झालेले असले तरी ते अधूनमधून अमली पदार्थाचे सेवन करीत होतेच याकडे एका पोलीस अधिकाऱ्यानेच लक्ष वेधले आहे. चोऱ्या करायच्या आणि त्यातून अमली पदार्थ तसेच मद्यपान करायचे, अशा त्यांचा शिरस्ता होता आणि त्यासाठी त्यांना शक्ती मिल कम्पाऊंड हे उत्तम ठिकाण होते.
मुंबईत अमली पदार्थ सहज मिळतात, हे लपून राहिलेले नाही. काही केल्या पोलिसांना त्यावर नियंत्रण ठेवता आलेले नाही. अमली पदार्थावर संपूर्णपणे नियंत्रण मिळविले म्हणजे गुन्हेगारी संपुष्टात येईल, अशी भाबडी आशा बाळगण्यातही अर्थ नाही. परंतु खरोखरच तसे केले तर मोठय़ा प्रमाणात गुन्हे कमी होतील. त्यातही महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्य़ात खूपच घट येईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
चरस, गांजा ओढणारे गर्दुल्ले अशा व्यक्तींची निर्जन ठिकाणे अड्डे बनतात. त्यांच्या तावडीत एखादे सावज सापडले तर लुटण्याच्या घटना घडतातच. पण प्रसंगी शक्ती मिल कम्पाऊंडसारखी घटनाही घडू शकते. याआधीही शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये बलात्काराच्या घटना घडल्या. पण त्यांना वाचा फुटली नाही. ज्यांना परवडत नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांना परवडते अशा सर्वासाठी मुंबईत मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थ उपलब्ध असल्याचेही अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांमधील कारणांपैकी एक कारण आहे. हे झाले ऐपत नसलेल्यांचे. पण उच्चभ्रूंच्या रेव्ह पाटर्य़ासाठी महागडे कोकेन तर सहज उपलब्ध होते. मुंबई, ठाण्यातील काही महाविद्यालयांबाहेरही अमली पदार्थ उपलब्ध असल्याचे वेळोवेळी आढळून येते. मात्र ते पोलिसांना कधीच दिसत नाही. अमली पदार्थाच्या पुरवठादारांची एक साखळीच वावरत असून ती हप्तेबाजीच्या जोरावर आपले साम्राज्य पसरवून आहे. मुंबापुरी अमली पदार्थाच्या विळख्यात केव्हाच सापडली आहे. मात्र ते दृश्य स्वरूपात नसले तरी जेव्हा पाहिजे तेव्हा अमली पदार्थ उपलब्ध होत आहेत.
मुंबई पोलिसांचा स्वतंत्र अमली पदार्थविरोधी विभाग आहे. परंतु या विभागाच्या कारवाईवर नजर टाकली तर मुंबईत अमली पदार्थ फारसे उपलब्ध नाहीत की पोलिसांना त्याबाबत माहिती मिळत नाही वा पोलिसांची इच्छा नाही, असे नानाविध प्रश्न उभे राहतात. चरस, गांजा हा तुलनेने स्वस्त अमली पदार्थ. त्याचा साठा वेळोवेळी थोडय़ा फार प्रमाणात पकडला जातो. परंतु या तस्करीतील फारच कमी आरोपींना शिक्षा  होते. ते तांत्रिकदृष्टय़ा सुटतात आणि पुन्हा त्याच धंद्यात परततात. मुंबईतील अनेक महाविद्यालयांबाहेर ज्यांना हवे आहेत त्यांना अमली पदार्थ उपलब्ध होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. जुहू परिसरातील एका महाविद्यालयाबाहेर असलेल्या पानाच्या टपरीवर विशिष्ट कोड वापरला की, अमली पदार्थ उपलब्ध होते. जोगेश्वरी पूर्वेकडील एका महाविद्यालयाच्या विस्तीर्ण पटांगणात अमली पदार्थाचे हे वाहक आढळतात. काही नामांकित महाविद्यालयांबाहेर असलेल्या चहाच्या टपरीवरही असे वाहक आपली गिऱ्हाईके शोधत असतात. ही मंडळी स्वत:हून विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचत नाहीत, त्यामुळे तक्रारी होत नसल्या तरी कधी तरी कुठला तरी विद्यार्थी त्यांना बळी पडत असतो.
अगदी चर्चगेट रेल्वे स्थानकासमोरील पदपथावर रात्री आठनंतर गर्दुल्ले चरस ओढताना हमखास आढळतात. तीच परिस्थिती महालक्ष्मी, लोअर परळ, एल्फिन्स्टन रोड, दादर, माटुंगा, खार, अंधेरी, मालाड तसेच सायन, कुर्ला, विक्रोळी, विद्याविहार, मस्जिद, डॉकयार्ड रोड, शिवडी, वडाळा आदी रेल्वे स्थानकांच्या कोपऱ्यात बऱ्याच वेळा आढळतात. हेच गर्दुल्ले बऱ्याच वेळा वेगवेगळ्या गुन्ह्य़ांत असल्याचे आढळून येते. रेल्वे पोलिसांनी गर्दुल्ल्यांविरुद्ध कारवाई केली तरी त्यांना ठेवायचे कुठे असा प्रश्न पडतो. तर या गर्दुल्ल्यांना मिळणाऱ्या अमली पदार्थाच्या पुरवठादारांवर आजतागायत कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.  एखादी घटना घडली की, काही काळ त्या घटनेमागच्या मूळ कारणांचा शोध घेतल्यासारखे दाखवायचे आणि पुन्हा शांत बसायचे, अशीच काहीशी पद्धत गुन्हेगारांच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळेच आजही अमली पदार्थाचा सुखेनैव वावर सुरू आहे.
हेमंत करकरे हे अमली पदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त असताना त्यांच्या पथकातील चकमकफेम पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी अंधेरी येथे हाकीम नावाच्या आफ्रिकन ड्रग माफियाला ठार केले होते. त्या वेळी तो २० लाख रुपये किलो दराने कोकेनची मुंबईत विक्री करीत होता. या कारवाईनंतर गेल्या एकही ड्रग माफिया आढळलेला नाही. त्याच वेळी एक बाब पुढे आली होती ती म्हणजे व्हिसा संपला तरी मुंबईत वास्तव्य करून राहणाऱ्या या आफ्रिकन तरुणाकडे अमली पदार्थ हमखास सापडायचे. आजही तीच परिस्थिती आहे. याचा परिणाम म्हणजे मुंबईत अमली पदार्थ सहज उपलब्ध आहेत. याची पोलिसांनाही कल्पना आहे. पण कारवाई करण्याची कोणाचीच का इच्छा नाही, हे मात्र न उलगडणारे कोडे आहे.
ड्रग माफिया म्हणविला जाणारा इक्बाल मिरची हा तर दाऊदचा उजवा हात होता. मुंबईतून पळ काढल्यानंतर दाऊदला अमली पदार्थाच्या तस्करीचाच प्रामुख्याने आसरा मिळाला. परंतु नंतर तर याच तस्करीने दाऊदला गडगंज श्रीमंत बनवून टाकले. मिरचीला तो मुंबईत असताना अमली पदार्थविरोधी कक्षाने अनेक वेळा पकडले. परंतु अमली पदार्थाच्या तस्करीच्या जोरावरच तो गब्बर बनला. तरीही मिरची शेवटी सांगत होता की, आपला अमली पदार्थाच्या तस्करीशी काहीही संबंध नाही. अमेरिकेने अमली पदार्थाच्या तस्कराची जी दहा जणांची यादी जाहीर केली होती. त्यात मिरचीचा समावेश होता. १९८५ ते १९९५ या काळात अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने हजारो परकीय नागरिकांना अटक केली. त्यामध्ये आफ्रिकन नागरिकांचा सर्वाधिक समावेश होता. त्या खालोखाल अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंकन नागरिकांचा क्रमांक लागतो. मात्र गेल्या दहा-बारा वर्षांत ही कारवाई का थंडावली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.