25 March 2019

News Flash

एकात्मिक वाहतूक व्यवस्था शक्य

मुंबईमधील ७० ते ७५ टक्के प्रवाशी दर दिवशी सार्वजनिक वाहतूक सेवेतून प्रवास करीत असतात.

अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालिका, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन

अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालिका, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन

सु लभ, सुखकर आणि सुरक्षित प्रवास घडावा यासाठी प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून मुंबईत एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभी करायला हवी. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणाऱ्या यंत्रणांनी परस्परांमध्ये स्पर्धेऐवजी सहकार्याची भावना जोपासण्याची नितांत गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने एकात्मिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणे शक्य होऊ शकेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोफत वा स्वस्तात उपलब्ध होण्याऐवजी ती गुणवत्तापूर्ण असावी, असाच दृष्टिकोन प्रवाशांनी ठेवायला हवा.

मुंबईमधील ७० ते ७५ टक्के प्रवाशी दर दिवशी सार्वजनिक वाहतूक सेवेतून प्रवास करीत असतात. रेल्वेकडून पुरविण्यात येणाऱ्या उपनगरीय सेवेला बेस्टकडून पूरक सेवा उपलब्ध करण्यात येत आहे. घरातून निघालेला प्रवासी बेस्टच्या बसने रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचतो आणि रेल्वेचा प्रवास संपल्यानंतर तो बेस्टनेच कार्यालयात पोहोचतो. भविष्यात उपनगरीय रेल्वे आणि मेट्रोला बेस्टची बस पूरक सेवा ठरू शकेल. त्यादृष्टीने बेस्टने आपले बस मार्ग आणि बसगाडय़ांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.

रेल्वेतून अथवा मेट्रोतून उतरल्यावर अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळच उपलब्ध व्हायला हवी. यादृष्टीने आझाद मैदान येथील मेट्रोचे भूमिगत स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला जाणाऱ्या भुयारी पादचारी मार्गाला जोडण्यात येणार आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच मेट्रोचे स्थानक उभारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तात्काळ रेल्वेतून मेट्रोकडे पोहोचणे शक्य होईल. मुंबई सेंट्रल येथेही उपनगरीय रेल्वे स्थानक आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराजवळच मेट्रो स्थानक उभारण्यात येत आहे. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुंबई सेंट्रलला उतरल्यानंतर हे दोन्ही पर्याय उपलब्ध होऊ शकतील. वांद्रे-कुर्ला संकुलात मेट्रो-२ व मेट्रो-३ एकमेकांशी जोडले जावे यादृष्टीने प्रवेशद्वारांची व्यवस्था करण्याबाबत अभ्यास सुरू आहे. उपनगरीय रेल्वेच्या विविध स्थानकांशी मेट्रो जोडली जाणार आहे.

गेली अनेक वर्षे सामायिक तिकीट (कॉमन मोबिलीटी कार्ड) या संकल्पनेवर विचार सुरू आहे. सामायिक तिकीट संकल्पनेमुळे एकाच ठिकाणी पैसे गोळा होतील आणि नंतर विविध यंत्रणांना देण्यासाठी ते वेगळे करणे शक्य आहे. केवळ मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला सामायिक तिकिटाचा फायदा होणार नाही. पण मेट्रो, उपनगरीय रेल्वे आणि बेस्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा फायदेशीर ठरू शकेल. त्यासाठी सर्व यंत्रणांना परस्परांमधील भेदभाव बाजूला सारून प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी एकत्र यावेच लागेल. प्रत्येक यंत्रणेचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यामुळे स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याऐवजी या सर्व यंत्रणांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याची गरज आहे. यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रवाशांना कशी सुविधा देता येईल याचाही विचार करणे गरजेचे आहे.

सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करणाऱ्या सर्व यंत्रणांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये सुसंवाद घडविण्याची गरज असून त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी लागेल. या सर्व यंत्रणा एकमेकांना पूरक काम कसे करू शकतील याचा विचार करण्यासाठी एका व्यासपीठाची गरज असून यासाठी ‘युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी’ अस्तित्वात आली आहे. मात्र हे प्राधिकरणाला सक्षम करण्याची आणि कायद्याच्या चौकटीत आणून त्याला बळकटी देण्याची गरज आहे.

एकात्मिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रो, उपनगरीय रेल्वे, बेस्टबरोबरच खासगी टॅक्सी, रिक्षा, ओला, उबर आदींचाही विचार करणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार केला गेला, तरच एकात्मिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणे शक्य होईल.

First Published on March 11, 2018 2:15 am

Web Title: mumbai metro rail corporation ashwini bhide in loksatta badalta maharashtra