22 February 2020

News Flash

हवामान बदलाचे पाऊसपरिणाम..

२००५ साली मुंबईत १८ तासांत ९४० मिमी पावसाने १२०० हून अधिक बळी घेतले होते.

|| डॉ. संजय मंगला गोपाळ

२००५ चा मुंबईतील पूर, २०१३ चा उत्तराखंडमधील महापूर, त्याच्या पुढच्याच वर्षी जम्मू-काश्मीरला महापुराचा बसलेला फटका, २०१५ च्या अखेरीस तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील महापूर, २०१६ मधील बंगळूरुमधील पावसाचे थैमान, गतवर्षीची केरळमधील अतिवृष्टी.. ही गेल्या काही वर्षांतील अति पर्जन्यमान आणि त्यामुळे आलेल्या पूरपरिस्थितीची काही ठळक उदाहरणे. यंदा पश्चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूरस्थितीकडे पाहताना, हा इतिहासही जमेस धरावा लागेल. तो ध्यानात घेऊन, हवामान शास्त्रज्ञांनी केलेला अभ्यास काय सांगतो आहे?

२००५ साली मुंबईत १८ तासांत ९४० मिमी पावसाने १२०० हून अधिक बळी घेतले होते. २०१३ मध्ये उत्तराखंड राज्यात आलेल्या महापुराने घेतले होते सुमारे सहा हजार बळी. सप्टेंबर, २०१४ मध्ये भारत आणि पाकिस्तानात आलेल्या महापुरामुळे जम्मू-काश्मीर राज्याला बसलेला फटका आणि दोन्ही देशांत अनुक्रमे २७७ आणि २८० नागरिकांचे बळी घेतले गेले होते. २०१५ च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांत महापुराने सुमारे ४० लाख लोक प्रभावित झाले होते. २०१६ च्या जुल महिन्यात कर्नाटक राज्याची राजधानी बंगळूरु येथे पावसाने थमान घातले होते आणि त्यामुळे प्रचंड जीवितहानी होऊन दळणवळणही ठप्प झाले होते. २०१७ साली मुंबईत २४ तासांत ३३० मिमी पावसाची नोंद झाल्याने दळणवळण ठप्प झाले होते. केरळमध्ये मागील वर्षी, म्हणजे २०१८ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ४४० लोक बळी गेले होते. गेल्या १०-१५ वर्षांतली ही आहेत अति पर्जन्यमान आणि त्यामुळे दीर्घकाळ टिकलेली पूरपरिस्थिती यांची काही ठळक उदाहरणे. यंदा देशाच्या अनेक भागांत आणि विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात उद्भवलेले अति टोकाचे पर्जन्यमान आणि पूरपरिस्थितीमुळे उडालेला हाहाकार याचे विश्लेषण करताना अलीकडील काळातला वरील इतिहास जमेस धरूनच पुढे जावे लागेल.

देशाचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकतेच पुण्यात असताना म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे की, ‘अलीकडच्या काळात पश्चिम महाराष्ट्र आणि देशाच्या अन्य काही भागांत जी महापुराची थमाने आपण अनुभवली, ती केवळ एक नसर्गिक आपत्ती होती.’ ते पुढे असेही म्हणाले की, ‘जगभर हवामान आणि वातावरण बदल घडून येत आहेत; मात्र आत्ताच्या पूरपरिस्थितीला हवामान बदल (क्लायमेट चेंज) कारणीभूत आहे असे म्हणणे अशास्त्रीय आणि चुकीचे ठरेल!’ यासाठी त्यांच्याकडील शास्त्रीय आधार त्यांनी सांगितल्याचे बातमीत नाही. मात्र, वरील बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरच्या पुढल्याच आठवडय़ात ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ने दिलेल्या बातमीनुसार, अमेरिकी हवामानशास्त्र सोसायटीच्या बुलेटिनचा २०१७ च्या डिसेंबरचा अंक हा अति टोकाच्या नसर्गिक आपत्ती घटना हवामान बदलाच्या दृष्टिकोनातून अभ्यासणारा विशेषांक म्हणून प्रसिद्ध झाला आहे. या अंकात प्रसिद्ध झालेल्या २७ पकी २१ अभ्यासांत, अति टोकाच्या वातावरणीय घटना आणि मानवनिर्मित विकास प्रक्रियेमुळे होणारे हवामान बदल यांचा घनिष्ठ संबंध असल्याचे सप्रमाण दाखवून देण्यात आलेले आहे. भारत सरकारच्याच जल संसाधन, पर्यावरण व वन आणि पृथ्वीविज्ञान मंत्रालयांनी प्रायोजित केलेल्या व गुजरातमधील गांधीनगर आयआयटी आणि अमेरिकेतील बर्कले येथील संगणकीय संशोधन संस्थेने संयुक्तरीत्या केलेल्या संशोधनातून, गेल्या वर्ष-दीड वर्षांत समोर आलेले काही ठळक निष्कर्षही असेच उलटे आहेत. ‘एल्सवियर’ या जागतिक प्रतिष्ठेच्या प्रकाशन संस्थेच्या अति टोकाचे हवामान अर्थात ‘वेदर अ‍ॅण्ड क्लायमेट एक्स्ट्रीम्स’ या नियतकालिकात हे अलीकडेच प्रसिद्ध झालेले आहेत. साधारणत: १९५९ ते २०१५ या काळात हवामानशास्त्र विभागाने देशभरातील त्यांच्या ६९९५ केंद्रांवर नोंदवलेल्या पर्जन्यमान आणि तापमान यांच्या निरीक्षणांची आकडेवारी आणि संगणकीय सिम्युलेशन पद्धतीनुसार मिळणारी अनुमाने यांच्या आधारे हे निष्कर्ष नोंदविण्यात आलेले आहेत.

१९७९ ते २०१५ या काळात वार्षिक कमाल पर्जन्यमान हे गंगा नदी पात्र, ईशान्य भारत आणि जम्मू-काश्मीर हे प्रदेश वगळता भारतातील बहुतेक प्रदेशांत वाढलेले आहे. हे कमाल पर्जन्यमान ८० टक्के वेळा मान्सून काळातच घडून आलेले आहे. टोकाचे अति पर्जन्यमान (एक्स्ट्रीम रेनफॉल) होण्याची वारंवारिता आणि तीव्रता या दोन्हींमध्ये गेल्या काही दशकांत भारतात वाढ होत गेलेली आहे. या वाढीचे वाढत्या तापमानाशी सरळ सरळ आणि घट्ट नाते दिसून आलेले आहे. कारण त्याच काळात सरासरी वार्षिक दैनंदिन दंविबदू तापमानातही त्याच प्रमाणात वाढ नोंदवली गेली आहे. दक्षिण भारतातील बहुतांश प्रदेशांसाठी हे नाते प्रति डिग्री सेल्सिअस तापमानवाढीपेक्षा सात टक्क्यांहून अधिक प्रमाणात पर्जन्यमानात वाढ असे दिसून आले आहे. दक्षिण मध्य भारतात हेच प्रमाण प्रति डिग्री सेल्सिअस तापमानवाढीपेक्षा दहा टक्क्यांहून अधिक आणि उत्तर भारतात मात्र साधारणत: साडेतीन टक्के इतक्याच प्रमाणात दिसून आले आहे. वाढत्या पर्जन्यमानामुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोकाही याच पद्धतीने अभ्यासण्यात आलेला आहे. एका दिवसापुरता पूर किंवा महापूर या स्थितीपेक्षा अनेक दिवस टिकून राहणाऱ्या पूरपरिस्थितीचे प्रमाणही याच कालावधीत वाढत गेलेले दिसते.  वाढत जाणारी ही तापमानवाढ मानवनिर्मित असून त्याचा निसर्गाच्या लहरीपणाशी फारसा संबंध नाही, हे संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत काम करणाऱ्या हवामान बदलासंदर्भातील आंतरसरकारी पॅनल (आयपीसीसी)च्या शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडलेल्या अनेकानेक अहवालांत आणि अन्य अनेक संशोधनांमधून दाखवून देण्यात आलेले आहे!

या पर्जन्यमानाचा आणि जागतिक तापमानवाढी (ग्लोबल वॉर्मिग)चा परस्परसंबंध आहे का, हे तपासताना संशोधकांना हेही आढळून आले, की कमाल पर्जन्यमान आणि सर्वसाधारण तापमापकाने मोजता येते ते वातावरणाच्या पृष्ठभागाचे तापमान, यांचा थेट संबंध आढळून येत नाही. यामुळे काही संशोधक वाढलेले पर्जन्यमान आणि वातावरण वा हवामान बदल यांचा एकमेकांशी संबंध नसल्याचे सांगतात. मात्र, उपरोल्लेखित संशोधनात, संशोधकांनी हे दाखवून दिलेले आहे की, मान्सूनच्या काळात आणि विशेषत: मुसळधार पर्जन्यमान होत असताना निर्माण होणाऱ्या स्थानिक गारव्या (लोकल कूलिंग इफेक्ट)मुळे वातावरणाच्या पृष्ठभागाचे तापमान हे कमीच नोंदवले जाणार. वातावरणातील तप्तता नेमकी जोखायची झाली तर पृष्ठभागाच्या तापमानापेक्षा वातावरणाचे दंविबदू तापमान मोजायला हवे. कारण वातावरणाचे दंविबदू तापमान हे वातावरणाच्या आद्र्रतेशी जोडलेले असते. जागतिक तापमानवाढीच्या वाढत्या आक्रमणामुळे वातावरणाची ओलावा टिकवण्याची क्षमता वाढत असते. त्यामुळे वाढलेले दंविबदू तापमान हे वाढत्या जागतिक तापमानवाढीचे थेट निदर्शक असते.

गेल्या ७० वर्षांपकी सुमारे ६६ वर्षांच्या, हवामान खात्याने नोंदलेल्या आकडेवारीवरून आणि त्याला संगणकीय सिम्युलेशन प्रणालीची जोड देत या अभ्यासाअखेरीस संशोधकांनी- ‘भविष्यात वर्तमान विकास पद्धती अशीच चालू ठेवली तर हा कल असाच दिसत राहणार,’ असा धोक्याचा इशाराही देऊन ठेवला आहे. त्यासाठी शास्त्रज्ञांनी बहिर्वेशन (एक्स्ट्रॉपोलेशन) या गणितीय पद्धतीचा वापर केला आहे. बहिर्वेशन म्हणजे आत्तापर्यंतचा वातावरणीय तापमान बदल आणि पर्जन्यमान- पूरपरिस्थिती यांचा सिद्ध झालेला संबंध आधारभूत घेऊन, भविष्यात वातावरण बदलाची जी शक्यता दिसते आहे, त्याच्याशी संबंधित पर्जन्यमान आणि पूरपरिस्थिती याचे भाकीत वर्तविणे. विशेषत: दक्षिण भारतात हा धोका अधिक गडद असेल आणि २१ व्या शतकाच्या अखेरीअखेरीस याचे प्रमाण अधिक आक्रमक व धोकादायक ठरू शकते, असे शास्त्रज्ञांचे भाकीत आहे! औद्योगिकीकरण सुरूहोण्याआधीच्या सरासरी जागतिक तापमानात सरासरी १.५ डिग्री सेल्सिअसइतकी वाढ झाली, तर दक्षिण आशियात पूरपरिस्थितीने जीवितहानी होण्याच्या धोक्याचे प्रमाण सुमारे ७० ते ८० टक्क्यांनी वाढू शकते. अति टोकाचे पर्जन्यमान आणि त्यामुळे निर्माण होणारी एकाच वेळी अनेक दिवस टिकणारी पूरस्थिती यामुळे शेती, जलसंसाधन आणि पायाभूत सुविधा यांचे वारंवार नुकसान संभवते. याशिवाय मानवी हस्तक्षेपामुळे बदलले जाणारे जमिनीच्या वापराचे प्रकार, कमी होत चाललेली जंगले, मोठी धरणे व त्यामुळे निर्माण होणारे जलाशय यांचा कारभार आदी कारणांनी ही संकटसंभाव्यता अधिकच गडद होऊ शकते. अर्थात, भविष्यात हवामान बदल संकटाचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने जर विशेष प्रयत्न केले गेले तर ही शक्यता मोठय़ा प्रमाणात कमी होऊ शकेल, असेही शेवटी नमूद करण्यास संशोधक विसरलेले नाहीत.

sansahil@gmail.com

First Published on August 25, 2019 1:53 am

Web Title: pollution global warming mpg 94
Next Stories
1 हवामान खात्याच्या नाकत्रेपणाचा ‘महापूर’!
2 आता लोकसंख्या नियंत्रण कराच!
3 ठेवणीतला संगीत-खजिना!