दरवर्षी डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा विशेषत: संवेदनशील भारतीयांसाठी एका विचित्र मानसिक अवस्थेत जातो. कारण १९८४ साली याच आठवडय़ाच्या सुरुवातीला २ डिसेंबरच्या मध्यरात्रीला मानवी हलगर्जीपणामुळे भोपाळ येथे विषारी वायूची गळती झाल्यामुळे हवा प्रचंड प्रमाणात प्रदूषित होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले आणि ३६ वर्षांनंतरही त्याचे दुष्परिणाम तेथील जनता, जन्माला येणारी मुले भोगत आहेत. या घटनेच्या दु:खद स्मृतींना उजाळा देत असताना सर्वसामान्य नागरिकांना प्रदूषणाच्या समस्येच्या गांभीर्याची जाणीव करून देण्यासाठी, तसेच अशा आपत्तीप्रसंगी काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात व्यापक जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी २ डिसेंबर हा ‘राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस’ म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्ताने, पृथ्वीवर मनुष्य प्रजातीचा उदय आणि विकास होत असताना मानवाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरण प्रदूषित होण्यास नेमकी कधी व कशी सुरुवात झाली यासाठी इतिहासात डोकावून थोडक्यात घेतलेला हा आढावा..

काही अभ्यासकांच्या मते, मानवाने १२ हजार वर्षांपूर्वी शेतीला सुरुवात केली, तेव्हापासूनच पर्यावरण प्रदूषण आणि विशेषत: हवामान बदलाची सुरुवात झाली असावी. परंतु दक्षिण अमेरिकेतल्या पेरू देशातील क्वेन्मारी या हिमनगाच्या खोल अंतरंगातील बर्फाचे नमुने तपासले असता, शास्त्रज्ञांना त्यात बिस्मथ आणि शिसे यांचे कण मोठय़ा प्रमाणात आढळले. हे नमुने साधारण १४ व्या शतकातील असल्याचे सिद्ध झाले. त्या काळात तिथे इन्का साम्राज्य होते आणि त्यांनी खनिकर्म उद्योग सुरू केला होता. पुढे हे साम्राज्य स्पेनच्या राजाने ताब्यात घेतले आणि या खाणींमधून चांदी व इतर धातू मिळवायला सुरुवात केली. त्यामुळे खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे प्रदूषण होण्यास तेव्हापासून सुरुवात झाली असे मानले जाते.

पुढे १८ व्या शतकात झालेले औद्योगिकीकरण, त्या अनुषंगाने वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि अफाट वेगाने होणारे शहरीकरण हे घटक प्रदूषणाची समस्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. गेल्या दोन शतकांमध्ये रासायनिक उत्पादने करणारे कारखाने प्रचंड प्रमाणात विकसित झाले आणि उत्पादन प्रक्रियेदरम्यान निर्माण होत असलेले विविध प्रकारचे विषारी वायू, रसायने व अपघटके कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता हवेत अथवा स्थानिक जलप्रवाहात सोडली जाऊ लागली. तेव्हापासून हवेच्या, पाण्याच्या आणि मातीच्या प्रदूषणात निरंतरपणे वाढ होत राहिली आहे. एकूणच जगातील प्रदूषणाबरोबरच सर्व प्रकारच्या पर्यावरणीय समस्या औद्योगिक क्रांतीपासून सुरू झाल्या आणि कालांतराने प्रमाणाबाहेर वाढल्या.

– डॉ. नीलिमा कुलकर्णी
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org