News Flash

नाविन्याचा ध्यास असलेले तरुणच देशाचे नायक!

भारतातही प्रतिभावान तरुणांची व संशोधकांची कमतरता नाही.

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचे गौरवोद्गार      

मुंबई : नाविन्यपूर्ण कल्पना सुचल्यावर त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रतिभेबरोबरच अखंड प्रयत्नांची, परिश्रमांची गरज असते. नाविन्याची कास धरत समाजाला पुढे नेणारे तरुणच देशाचे खरे नायक आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी येथे काढले.

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमाच्या तिसऱ्या वर्षीचे पुरस्कार केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे डॉ. पी. अनबलगन, सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे अभिजित प्रभू, वल्र्ड वेब सोल्यूशन्सच्या उषा काकडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संजय भुस्कुटे, एम. के. घारे ज्वेलर्सच्या शुभा घारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. करोना नियमावलीचे काटेकोर पालन करत हा कार्यक्रम पार पडला. वेगळ्या संकल्पना राबविणाऱ्या तरुणांचे माहिती व प्रसारणमंत्री जावडेकर यांनी कौतुक केले. ‘लोकसत्ता’कडून अशा संकल्पना राबविणाऱ्यांचा या पुरस्काराच्या माध्यमातून गौरव करण्यात येत असल्याबद्दल जावडेकर यांनी कौतुक केले.

अमेरिकेसारख्या जगातील महासत्तेने बौद्धिक संपदेला, संशोधनाला सन्मान दिला; शिष्यवृत्ती आणि संशोधनासाठी निधी दिला. त्याचा अमेरिकेच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा आहे. तैवानसारख्या छोट्याशा देशानेही जगभरात इलेक्ट्रॉनिक ‘चिप’ पुरवून प्रगती साधली. भारतातही प्रतिभावान तरुणांची व संशोधकांची कमतरता नाही. मात्र त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर परदेशात होतो आहे. हेच ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांच्या बुद्धिमत्तेचा वापर भारतासाठी व्हावा यासाठी ‘मेक इन इंडिया’ आणि अन्य योजनांच्या माध्यमातून वेगळ्या संकल्पनांना वाव देण्याचे धोरण राबवले आहे, असे जावडेकर यांनी नमूद केले.

केंद्र सरकारने १०० रुपये दिल्यावर त्यातील १५ रुपयेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात, असे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी म्हटले होते; पण तंत्रज्ञान आणि राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर १२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये केंद्र सरकारकडून नियमितपणे जमा होतात. आम्ही विद्यापीठे, राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि उद्योगांची सांगड घातली आणि संशोधनाला उत्तेजन दिले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ‘हॅकेथॉन’च्या माध्यमातून नावीन्यपूर्ण संकल्पनांसाठी व संशोधनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले, आवश्यक निधी दिला.

इस्रोपासून अनेकांनी या माध्यमातून पुढे आलेल्या शोधांना वाव दिला. ‘दीक्षा’ व्यासपीठाच्या माध्यमातून उत्तम शिक्षकांची लाखो व्याख्याने उपलब्ध झाली असून विद्यार्थ्यांना त्याचा मोठा उपयोग होत आहे. तंत्रज्ञान आज मोलमजुरी करणाऱ्यांपासून ते उच्चभ्रूंपर्यंत सर्वांनाच साहाय्यभूत ठरत असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

यंदाचे विजेते

विज्ञान आणि तंत्रज्ञान : संशोधिका डॉ. रुपाली सुरासे-कुहिरे, संशोधक : डॉ. तुषार जावरे, राजकारण आणि सुशासन : मोहपाडा गावच्या सरपंच ताई पवार, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, नवउद्यमी : स्नोवेल ऑडिया बुक्सचे समीर धामणगावकर, नवउद्यमी रितू मल्होत्रा, उद्योजक नीरज बोराटे, व्यवसाय : शालीन कंपोझिट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे पराग पाटील, उद्योजक शेतकरी : श्रीपाद जगताप, सामाजिक विभाग : गे ब्रँड अम्बॅसिडर नक्षत्र बागवे, पाणवठा संस्थेचे गणराज जैन, स्नेहालयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल गावडे, क्रीडा क्षेत्र : बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी, नेमबाज तेजस्विनी सावंत, कला आणि मनोरंजन : चित्रकार पराग बोरसे, बांबूपासून वस्तुनिर्मिती करणाऱ्या मीनाक्षी वाळके, अभिनेत्री, दिग्दर्शिका रसिका आगाशे, लेखक प्राजक्त देशमुख, लेखक क्षितिज पटवर्धन, अभिनेता सिद्धार्थ जाधव.

आपले आयुष्य ही अखंड शोधयात्रा आहे. रोजच्या व्यवहारापासून आपल्या जीवनात सुलभता आणण्यासाठी संशोधन करीत नवीन वस्तूंचा शोध लावला जातो. परिघाबाहेरच्या संकल्पनांचा शोध घेणारी संशोधकांची दृष्टी समाजाला व देशाला पुढे नेत असते.    – प्रकाश जावडेकर, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2021 2:45 am

Web Title: praise of union minister for information and broadcasting prakash javadekar akp 94
Next Stories
1 प्रज्ञावंतांचा सन्मान सोहळा दिमाखात…
2 सावनी वझे आणि वैभव मांगले यांनी मने जिंकली
3 तेजांकितांचा आनंद क्षण. . .
Just Now!
X