कला वक्तृत्वाची – प्रा. शिवाजीराव भोसले

तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान विषयांचे अध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, संपूर्ण महाराष्ट्रभर विविध  विषयांवर अनेक व्याख्याने देणारे लोकप्रिय व फर्डे वक्ते प्रा. शिवाजीराव भोसले यांचे ‘वक्तृत्व स्पर्धा’ आणि ‘भाषणे’ याविषयीचे विचार.

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
future of ai self awareness
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता स्वजाणिवेचे भवितव्य काय?
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”

वक्तृत्व ही एक साधना आहे. तिचा  संबंध अभ्यास, अभिव्यक्ती, विचार, भाषा, व्यक्तिमत्त्व अशा अनेक घटकांशी असतो. या सर्वाचे वारंवार प्रत्यक्ष प्रकटीकरण होत गेले, तर त्यांचे सहज संवर्धन घडते. ते घडावे या हेतूने वक्तृत्व सोहळ्यांचे नियोजन व्हावयास हवे. प्रतिवर्षी काही संगीत महोत्सव साजरे होतात तसे युवकांसाठी वक्तृत्व महोत्सव साजरे करता आले तर किती बरे होईल. ज्यांना बोलणे आवडत असेल, बोलणे या प्रकारात  रस असेल, आपल्या शब्दसामर्थ्यांचे व विचारशक्तीचे कोठेतरी मुक्त आविष्करण व प्रकटीकरण घडावे, असे वाटत असेल. अशा मुला-मुलींचा एखादा आनंदमेळावा अगदी आवर्जून भरवावा आणि त्यांना बोलते करावे.

जर आपले वक्तृत्वकलेवर प्रेम असेल व नव्या पिढीविषयी  मनात कौतुकाची भावना असेल तर आपण असे वातावरण निर्माण करावे की मुलांनी मनोभावे बोलत राहावे.  त्यांच्या मनावर कसलेही दडपण येऊ देऊ नये. ज्यांना प्रभावी वक्तृत्व नावाची शक्ती प्रसन्न करून घ्यावी, असे वाटत असेल तर त्यांनी आपल्या मनातले विचार आपल्या भाषेत मनापासून मांडण्याचा प्रयत्न  करावा.

बोलणे आनंदाने व उत्स्फूर्तपणे करावे. पारितोषिक हे वक्तृत्वचे फळ किंवा गमक मानू नये. मागच्या पिढीशी तुलना करता आजकालची अनेक मुले उत्तम भाषण करतात. मराठी, हिंदूी, इंग्लिश या भाषांतून प्रकट होणारे हे रसवंतीचे झरे आटू नयेत, याची सर्वानी काळजी घेतली पाहिजे. स्पर्धेपेक्षा वत्कृत्वाला आणि संयोजक व परीक्षक यापेक्षा वक्त्यांना महत्त्व मिळाले पाहिजे. मनापासून बोलणाऱ्याला मानसिक आनंद मिळतो.

भाषणे हा प्रकार केव्हा अस्तित्वात आला आणि कसा रूढ झाला हे सांगणे अवघड आहे. माणसांचे प्रारंभीचे बोलणे परस्परांशी व संवादरूप होते. या  बोलण्यामुळे मने कळत होती, कामे होत होती. पुढे पुढे कळणे आणि बोलणे वाढतच गेले. सगळ्याच गोष्टी बदलत, सुधारत, संस्कारित, संवर्धित होत राहिल्या. जीवन हा एक परिवर्तनप्रवाह आहे. नित्यनूतनता हा त्याचा भाव आहे. बोलण्याच्या पद्धती यासुद्धा अशाच बदलल्या.

टिकून राहणारी भाषणे कशामुळे टिकली याचाही शोध घ्यावा लागेल. एका भाषणासाठी अरतीपरतीचा अनेक तासांचा प्रवास हा एक सायास असतो. भाषण हे उभ्यानेच करावे लागते. तोही एक ताण असतो. मनापासून बोलणाऱ्याला एक मानसिक आनंद मिळतो, हे खरे आहे. लोकांच्या सद्भावना व सदिच्छा ही एक अमूर्त आणि अनामिक शक्ती वक्त्याच्या कायेत प्रवेश करते. ही यंत्रशक्ती नसते, ती मन:शक्ती असते.

उत्तम भाषणातही एक प्रकारची अपूर्णता राहू शकते. लिहिताना एखादी चूक घडली तर खाडाखोड करता येते. लिहिलेले वाक्य बदलून पुन्हा लिहिता येते. समर्पक शब्द सुचेपर्यंत थांबता येते. भाषणात ही संधी मिळत नाही. मागे वळून पाहता येत नाही. मध्येच थांबता येत नाही. फक्त एवढेच की नित्य उपाययोजनांमुळे मनाच्या काही शक्ती वाढीस लागतात. वक्ता हाच स्वत:चा श्रोता होतो. साक्षित्वाने स्वत:चे बोलणे ऐकत, त्यात रस घेत, जरूर तेथे थोडा बदल करीत  तो बोलू शकतो. वाट पाहत  पावले टाकणे, हा सराईत पांथस्थाचा गुण बोलणाऱ्याच्या अंगी उतरतो. त्याच सहजतेने तो सभासंचार करतो.

येथून पुढे भाषणांना बहर येईल काय? अर्थपूर्ण, रसपूर्ण, भावपूर्ण भाषणे केली जातील काय? लोकांना भाषणांचे आकर्षण राहील काय? सभा भरतील काय? एकूण परिस्थिती निराशाजनक नसली तरी फारशी आशादायकही नाही. लोकांच्या आवडी बदलत चालल्या आहेत. सिनेसंवाद आणि गीते यांनी अलंकृत झालेली वाणी रसवंतीच्या राज्यात रमणार नाही असे वाटते. या पिढीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अतिशय प्रगल्भ आहेत. पण बिकट जीवनकलहामुळे आलेली व्यग्रता त्यांना शब्दांची आणि विचारांची हौसमौज करण्याची संधी देत नाही. जगण्याची दिशा आणि ओघ यात सतत आणि अकल्पित बदल होत आहेत.

साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान यांचा मूलगामी विचार मागे पडत चालला आहे. व्यायामशाळा आणि ग्रंथालये कमी होत चालली आहेत. दवाखाने, औषधांची दुकाने यांची संख्या वाढते आहे. भेळपुरीची दुकाने आणि गाडे रात्रभर चालत आहेत. अशा स्थितीत संस्कृतीच्या आकाशात शब्दांची इंद्रधनुष्ये दिसतील काय? विचारांची नक्षत्रे आढळतील काय?  तंत्रविद्येमुळे पंचमहाभूते शरणागती पत्करून आपल्या सेवेत सतत राहतील, पण तुकोबांची अभंगवाणी, ज्ञानदेवांची अमृतवाणी, मुक्तेश्वराची विवेकवाणी श्रवणी पडेल काय? विवेकानदांची भाषणे, सावरकरांची व्याख्याने ही वाग्देवतेची रूपे पुन्हा पाहावयास मिळतील काय?

(प्रा. शिवाजीराव भोसले लिखित आणि अक्षरब्रह्म प्रकाशन प्रकाशित ‘एक विचार मांडव जागर खंड १ व २’ या पुस्तकांवरून साभार)

 

प्रायोजक : ‘लोकसत्ता’ आयोजित आणि ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘द विश्वेश्वर को-ऑ. बँक लिमिटेड’ पुणे, ‘आयसीडी’ औरंगाबाद (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट), ‘एमआयटी’ औरंगाबाद.

संकलन – शेखर जोशी