News Flash

गुडमॉर्निग नागपूर..’- मल्लिका जादुई आवाजाच्या..

एक काळ असा होता जेव्हा आकाशवाणीच्या निवेदिकांनी रसिकश्रोत्यांवर मोहिनी घातली होती. त्यांचा सच्चेपणा, त्यांचा साधेपणा साऱ्यांना भावला.

| March 6, 2015 01:01 am

एक काळ असा होता जेव्हा आकाशवाणीच्या निवेदिकांनी रसिकश्रोत्यांवर मोहिनी घातली होती. त्यांचा सच्चेपणा, त्यांचा साधेपणा साऱ्यांना भावला. काळानुरूप परिस्थिती बदलत गेली आणि आकाशवाणी ऐकण्यासाठी आतूर असणाऱ्या कानांनी रेडिओ मिर्ची, रेड एफएम, माय एफएम यासारख्या रेडिओ वाहिन्यांना स्वीकारले. आकाशवाणीच्या निवेदिकांची जागा ‘आरजे’नी घेतली. रसिकश्रोत्यांनी त्यांनाही उचलून धरले. जुन्या पण नवे लेणे पांघरलेल्या या माध्यमाशी केवळ तरुण श्रोताच जुळला नाही तर ज्येष्ठांचीसुद्धा तेवढीच दाद या तरुण आरजेंना मिळाली. अभिनेत्री विद्या बालनने ‘गुडमॉर्निग मुंबई..’ असे म्हणत मुंबईकरांना साद घातली होती. आता ‘गुडमॉर्निग नागपूर..’ म्हणत नागपुरातील या तरुण आरजेंनी नागपूरकरांना साद घातली आहे. महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर या जादुई आवाजांशी मारलेल्या गप्पांचा हा गोषवारा.

* ऐसा कोई तार छेडो, जो सबको कनेक्ट करे
* माईक पे रहना है, तो खुश रहना ही है
* रेडिओ जैसे ‘टू मिनिट मॅगी’
* अरे यार. यह तो रोज का पका है
* भला बनने से अच्छा, सबसे अलग बनो

संवाद श्रोत्यांशी
     nag02 श्रोत्यांवर आवाजाची मोहिनी घालणे हा आमच्या कामाचाच एक भाग! यातून कधी चांगल्या तर कधी वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. श्रोत्यांवर आवाजाची भूरळ पडल्यानंतर कित्येकदा त्यांना आम्हाला भेटण्याचा मोह आवरत नाही आणि आम्हीही त्यांना आम्हाला भेटण्याची संधी देतो. मात्र, काही श्रोते या संधीचा गैरफायदा घेतात आणि त्यांचे कायमचे तुणतुणे मागे लागते. मग हा पिच्छा सोडवताना आमच्याही नाकी नऊ येतात. त्याचवेळी कित्येक चांगले अनुभवसुद्धा येतात.
‘आज ना र्ती पोहा खायची इच्छा होत आहे यार!’ असे म्हणण्याची देरी नाही की, अवघ्या १५ मिनिआत स्टुडिओत नि:स्वार्थपणे र्ती पोहा घेऊन येणारे श्रोते आहेत. रोजच्या बोलण्यात थोडा जरी बदल झाला, तर ‘मॅडम, आज बरे नाही का?’असे विचारणारेही श्रोते आहेत. सामान्यांसारखेच आमचेही आयुष्य त्यामुळे दैनंदिन आयुष्यातील घटनांना आम्हालाही सामोरे जावे लागते. अशाच एका जिवावर बेतलेल्या अपघातातून दोन महिन्याने पुन्हा कामावर सुखरुप परतल्यानंतर ‘तुम्ही ठीक तर आहात ना!’ अशी श्रोत्यांकडून आपुलकीने झालेली विचारणा  कामाला पुन्हा नव्याने उभारी देते.गाणे सुरु झाल्यानंतर श्रोत्यांशी आमचा संवाद सुरु असतो, अशावेळी पलीकडच्या श्रोत्यांकडून कित्येकदा वाईट, घाणेरडय़ा, चीड आणणाऱ्या शब्दांनाही सामोरे जावे लागते. त्यांना पलटून उत्तर देता येत नाही, पण अशावेळी या संवादला कात्री लावण्याचा मार्ग आम्हाला अवलंबावा लागतो.

आरजे जिया  – रेडिओ मिर्ची
nag03व्यावसायिक पाश्र्वभूमी असलेल्या कुटुंबातील जिया, आरजेच्या जगात वळली ती अपघाताने आणि ठरवून असे म्हटले तरी चालेल. कुटुंबात कधी कुणी नोकरी केली नाही, पण जियाने नोकरीची वाट धरली तेव्हा कुटुंबाचे सहकार्य मिळाले. शैक्षणिक आयुष्यात गणिताशी कायम ३६चा आकडा असताना मानसशास्त्राशी तिची मैत्री झाली. त्यात तिने पदविका मिळवली. गुन्हेगारी आणि मानसशास्त्राचे नाते उलगडताना वडिलांनी इंग्लंडला जाण्याचा सल्ला दिला, पण तिने मुंबईकडे वाट वळवली. ‘टाइम्स नाऊ’ या वाहिनीवर ‘क्राईम रिपोर्टर’ म्हणूान काम करताना अनेक प्रसंग अंगावर झेलले. २६/११च्या घटनेत एका पत्रकाराच्या अतिउत्साहामुळे कुणा निरपराधाचा जीव गेला आणि या क्षेत्राला तिने कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेतला. नागपुरात ती परतली आणि दरम्यान ऑक्टोबर २०११मध्ये ‘रेडिओ मिर्ची’च्या माध्यमातून ती आरजेच्या भूमिकेत शिरली.

आरजे माही  -रेड एफएम
nag04प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न आपल्या मुलामुलीने डॉक्टर, इंजिनिअर व्हावे असे असते. माहीच्या बाबतीत नवीन काही नाही तर हेच घडले. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करायचा असल्याने विज्ञान शाखेकडे ती वळली. या शाखेतली पदवीही मिळवली, पण वैद्यकीय क्षेत्राऐवजी वाट भलतीकडेच वळली. आकाशवाणी ऐकत मोठे होत असताना करिअर या क्षेत्रातही करता येईल, याची जाण तिला नव्हती. जनसंवादला सहज प्रवेश घेतला. दिल्लीला अभ्यास दौऱ्यादरम्यान प्रवासात पहिल्यांदा एफएम हा प्रकार ऐकला आणि यात काहीतरी वेगळे आहे याची चाहूल तिला झाली. जनसंवादनंतर सुरुवातीला आकाशवाणीला आवाज दिला, पण करिअर म्हणून हे क्षेत्र निवडायला वडिलांचा थोडा विरोध झाला. एफएमने मोहिनी घातल्याने तिने एकटीने मुंबईची वाट धरली, परतल्यानंतर नागपुरातही एफएमचे लोन पसरले होतेच. नागपुरातील पहिली महिला आरजे म्हणून ती समोर आली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आरजे श्रुती -माय एफएम
nag05लहान असताना ‘तुला काय बनायचंय’ असा कुणी प्रश्न विचारला तर निरागसपणे डॉक्टर, इंजिनिअर अशी उत्तरे मिळतात. वयोमानापरत्वे या उत्तरांमध्ये बदल होत जातो. श्रुतीच्या बाबतीत मात्र विपरीत घडले. लहानपणी या प्रश्नाचे जे उत्तर होते, तेच उत्तर समज आल्यानंतरही कायम होते. त्यामुळे आरजे होण्याची खुणगाठ मनाशी पक्की केल्याने इकडेतिकडे वळण्याचा पर्यायच तिने बाकी ठेवला नाही. दहावीच्या उंबरठय़ावर असताना नागपुरात आरजेची ऑडिशन्स सुरू होती आणि तिथे ही जाऊन धडकली. गुणवत्ता होती, पण वय कमी पडत होते त्यामुळे साहाजिकच तो नकार घेऊन तिला परतावे लागले. त्यावेळी आईवडीलांनी तिचे आरजेचे भूत उतरवण्याकरिता ‘आयुष्यात तु काहीच करू शकणार नाहीस’ असा डोस दिला. त्याला न जुमानता तिने या क्षेत्रात हातपाय मारणे सुरूच ठेवले आणि घरच्यांचा नकार होकारात बदलवण्यात ती यशस्वी ठरली. बारावीनंतर तिच्या प्रयत्नांना यश आले आणि आज नागपुरातील ती सर्वात कमी वयाची आरजे ठरली.

आरजे नेहा -रेड एफएम
nag06इंग्रजीत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या नेहाला प्राध्यापक व्हायचे होते आणि बारावीत ८२ टक्के गुण मिळवूनही ती ठरवून कला शाखेकडे वळली होती. आठ वर्षांंपूर्वी मित्रांनी सांगितले, ‘एफएम आ रहा है’. एकाच वेळी चार वेगवेगळी चॅनेल्स नागपुरात येणार होती अन् ते चांगल्या आरजेंच्या शोधात होती. नेहाची अनपेक्षित निवड झाली आणि ती अचानक ‘आरजे नेहा’ झाली. सुरुवातीपासून आरजे म्हणून काम केल्यावर ती आता निर्माती म्हणूनही काम करू लागली आहे. ‘बोलणे हेच माझे रोजचे काम आहे पण प्रत्यक्ष जीवनात मी अबोल आहे. कदाचित मी एकदम जाऊन कुणाशी बोलणारही नाही. माहेर आणि सासर दोन्हीकडून मला नेहमीच पाठिंबा मिळालाय जो फार महत्वाचा असतो आणि माझा नवरा तर ‘सुपर सपोर्टिव्ह’ आहे असे नेहा म्हणते.

आरजे प्रियंका -रेड एफएम
nag07पितृछत्र हरवल्यानंतर त्याही परिस्थितीत कुटुंबाला सांभाळणे आणि फक्त सांभाळणेच नाही तर जबाबदारी स्वीकारुन ते समर्थपणे पेलणे हे प्रियंकाकडून शिकण्यासारखे आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आई आणि बहिणीचे पालकत्त्व तिने स्वीकारले. त्यातही असाध्य आणि बऱ्या न होणाऱ्या आजाराने बहिण ग्रासलेली असतानाही न डगमगता तिला सांभाळले. खरं जर एवढय़ा गंभीर परिस्थितीत त्या परिस्थितीच्या विरुद्ध असलेल्या क्षेत्राची निवड करणे कठीण तरीही प्रियंकाने ते निवडले. एक, दोन नव्हे तर चारवेळा तिने रेड एफएमच्या पायऱ्या चढल्या, पण अपयश हाती आले. न डगमगता पाचव्यांदा तिच्यापुढे रेड एफएमला तिच्या या साहसापुढे नमावे लागले आणि जबलपूरसाठी तिची निवड झाली. एक वर्ष जबलपूरला घालवल्यानंतर ती नागपुरात परतली आणि तरुणाईला तिच्या कार्यक्रमाने मोहिनी घातली. कौटुंबिक डोलारा सांभाळून ती हा गड समर्थपणे पेलत आहे.

आरजे प्रीती -माय एफएम
nag08वेळेनुसार आवड बदलत जाते असे म्हणतात ते ‘टॉमबॉय’ अशी प्रतिमा असलेल्या प्रितीच्या बाबतीत झाले. पोलिस, सैन्यदलाचे प्रचंड आकर्षण असल्यामुळे साहाजिकच एनसीसीची निवड केली. शिबिरात राहण्याची वेळ आली आणि हे आपल्याला जमायचे नाही, याची जाणीव झाली. नंतर प्रसार माध्यमे खुणावू लागली. वाणिज्य शाखेतून जनसंवाद आणि नंतर फॅशन डिजायनिंग असा प्रवास प्रितीने केला. इंग्रजी वृत्तपत्रात पत्ता आजमावून पाहिला, पण येथेही डाळ शिजली नाही. नाटकांचा प्रवास सुरु असताना प्रितीच्या मित्रांनी ‘आरजे हन्ट’ची माहिती दिली. पुन्हा एकदा सहज आजमावून पहावे म्हणून तिकडे मोर्चा वळवला. तीन महिने त्यांनी प्रितीला आजमावून बघितले, पण नियमित केले नाही. दरम्यान, मुक्त पत्रकारितेत पुन्हा एकदा हात मारुन बघितला आणि अचानक एक दिवस नागपुरातील एका एफएम रेडिओवरुन आरजेसाठी बोलावणे आले. गुजराती कुटुंब असल्याने पूर्णपणे व्यावसायिक, पण आरजेसाठी प्रितीला त्यांनी पूर्ण सहकार्य केले.

शो मस्ट गो ऑन
‘आरजे’ची मनस्थिती असो वा नसो, त्याला हसतमुखाने श्रोत्यांना अभिवादन करून कार्यक्रम सादर करावा लागतो, नव्हे ती आरजे बनण्यासाठी पहिली आणि महत्त्वाची अट आहे. कित्येकदा कौटुंबिक परिस्थिती आणि श्रोत्यांचा प्रतिसाद यामुळे मानसिक स्थिती कार्यक्रम सादरीकरणाची नसते. तरीही मुखवटा पांघरुण ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत कामाची सुरुवात करावीच लागते. माइक समोर आल्यानंतर काही मिनिटातच परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येणे शक्यता होते. गोडगोड बोलणे आणि श्रोत्यांचे मनोरंजन करणे हा कामाचा अविभाज्य भाग असल्यामुळे ते करावेच लागते. कित्येकदा कामाचा ताण घरच्यांवर निघतो आणि घरच्या तणावाचा थोडासा परिणाम कामावरही दिसून येतो. सकाळचा कार्यक्रम असेल तर परिस्थिती आणखीच गंभीर. बरे असो वा नसो, सकाळच्या ऐनवेळी कुणी दुसरा आरजे त्वरीत उपलब्ध होऊ शकत नाही, मग ते आजारपण अंगावर घेऊन श्रोत्यांचे मनोरंजन करावेच लागते. कित्येकदा कुटुंबाला वेळ देता येत नाही म्हणून मन स्वत:लाच खायला उठते. अपराधिक भावना मनात निर्माण होते. झोपण्याच्या वेळा, खाण्यापिण्याच्या वेळा, सणसमारंभादरम्यान कौटुंबिक हजेरी हे सारे काही दूर सारावेच लागते. कौटुंबिक पाठींबा मिळतो, पण कधीतरी त्यांनाही थोडेफार हे सलतच असेल ना! अशी भावनाही मनात येते.

तरुणाईला संदेश
तरुणाईला आकर्षित करणाऱ्या या क्षेत्राकडे वळणाऱ्यांची संख्या आता वाढत चालली आहे. कधीकाधी युवांनी हे क्षेत्र काबिज केले, पण तरुणींनी यात उसळी घेतली आहे. रसिकश्रोत्यांना वाटत असले तरी वाटते तेवढे सोपे हे काम नाही. मुखवटे पांघरुण रसिकश्रोत्यांचे मनोरंजन करण्याचे कसब आतूनच असावे लागते, त्यासाठी रट्टा मारावा लागत नाही. यंगीस्तानला जोडणे इतके सोपेही नाही. कित्येकदा ‘आम्हाला आरजे बनायचे आहे, काय करावे लागेल?’ अशी विचारणा करणारी तरुणाई आम्हाला भेटते. आधी आमच्या कामांची तारीफ केली जाते आणि मग हळूच आपला हेतू साध्य करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र, प्रत्येकाला ते तात्काळ हवे असते. मेहनतीची तयारी फार कमी असते. एक महिला आरजे म्हणून काम करताना तर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून हे आव्हान पेलावे लागते. संयम, कष्ट, परिस्थिती सांभाळण्याची कला असेल तरच तुम्ही या क्षेत्रात शिरकाव करु शकता आणि यश प्राप्त करु शकता, असा सल्ला या तरुण आरजेंनी या क्षेत्रात शिरकाव करु पाहणाऱ्या तरुणाईला दिला.

मर्यादा वेळेची
उच्चारलेला शब्द परत येत नाही याचे भान शब्द आणि आवाज हेच धन असणाऱ्या आरजेंना कायमच ठेवावे लागते. आरजे जे बोलेल ते हजारो कानांनी ऐकले जाते. हे ऐकणे रंजक व्हावे यासाठी रेडिओ जॉकींना पूर्वतयारी आणि प्रसंगावधान यांचा तोल साधावा लागतो. आणि हे दररोज, प्रत्येक मिनीटाला करावे लागते. आरजे नेहाच्या म्हणण्यानुसार, मिळेल त्या माध्यमातून ताज्या घडामोंडींची माहिती ठेवावी लागते. लोकांना वाटतं आम्ही खूप बोलतो. पण खरं तर एका तासाच्या कार्यक्रमात आम्ही फक्त चार मिनीटे बोलतो. इतक्या कमी वेळात कमी शब्दात लोकांना आवडेल आणि अर्थपूर्ण असेल, असेच बोलावे लागते. कुणी एखादा श्रोता दु:खी मनस्थितीत कॉल करतो आणि तेच बोलत बसतो. कधी कुणाला विशिष्टच गाणे ऐकायचे असते. अशा वेळी त्याला पटेल असे स्पष्टीकरण देत ठरलेल्या कार्यक्रमानुसारच गाणे वाजवलें जाईल, याची दक्षता घ्यावी लागते. बरेचदा तुमच्या निरीक्षणातून काही गोष्टी स्मरणात राहतात आणि ऐनवेळी बोलताना त्यांचा वापर करावा लागतो. कंपनीची ठरलेली धोरणे असतात, तीही लक्षात ठेवावी लागते. हजार प्रकारचे लोक अन् प्रत्येकाची वेगळी तऱ्हा..अशावेळी प्रसंगावधान कामी येतं. एखादा विषय फुलवून, रंजक करून अभिनव पध्दतीने मांडता यायला हवा. बोलण्याच्या ओघात कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याचे भान तर फारच आवश्यक आहे. त्यामुळे होता होईल तितके राजकारण आणि धर्म यांनी मेंदू व माईक यापासून दूरच ठेवतो.

अनुभवाची पोतडी
आरजे आणि ती महिला आरजे असेल तर श्रोत्यांशी जरा अधिकच सामना करावा लागतो. श्रोत्यांनी भेटायची इच्छा प्रदर्शित केली म्हणून स्टुडिओत बोलावले तर पहिले तो रसिकश्रोता, नंतर त्या रसिकश्रोत्याचे मित्र अशी रोजची मैफलच सुरु झाली. शेवटी स्टुडिओत त्याला प्रवेश नाकारावा लागला. तिथे नाही तर पार्किंगमध्ये भेटण्याचा प्रयत्न झाला. तेथूनही हटकले तर परिक्षेतल्या अपयशाचे खापर त्या रसिकश्रोत्या विद्यार्थ्यांने आरजेवर फोडल्याचे किस्से आहेत. आरजेही शेवटी सर्वसामान्य माणूसच असतो. श्रोत्यांचे मनोरंजन करताना त्यांच्याही भावना असतात. त्यांचाही कुणावर तरी जीव जडू शकतो आणि प्रेमभंगाला त्यांनाही सामोरे जावे लागू शकते. समोरच्याने दगा दिला आणि दुसऱ्या मुलीशी लग्न केले आणि त्याचा थांगपत्ताही तिला लागला नाही. फेसबुकवर त्याच्या बायकोची मैत्रीसाठी विनंती आली. कार्यक्रम सादर करत असतानाच गाण्यांनी साथ दिली आणि दरम्यानच्या वेळात अश्रुंना वाट मोकळी करायची जागा मिळाली. पुन्हा एकदा श्रोत्यांशी संवाद साधण्याची वेळ आली तरी अश्रू थांबायला तयार नाही, पण एका क्षणात स्वत:ला सावरले आणि गेलेली लिंक परत लागली.सहकाऱ्याच्या अनुपस्थितीत त्याचे काम करायची वेळ आली आणि तो सुद्धा यश चोप्रा यांच्यासारख््या मोठय़ा दिग्दर्शकाचा कार्यक्रम मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि आजी मरण पावल्याचा निरोप आला. सहकाऱ्याची जबाबदारी अंगावर घेतल्याने ते निभावणे होतेच, तरीही वरिष्ठांनी कार्यक्रम सोडून जाण्याची परवानगी दिली. मात्र, आरजेच्या भुमिकेत वावरताना भावना बाजूला ठेवूनच काम करावे लागते हे आठवले आणि आधी कार्यक्रम पूर्ण केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2015 1:01 am

Web Title: radio jockey chat on occasion of womens day
टॅग : Womens Day
Next Stories
1 राज्य ‘गुंतवणूकस्नेही’ बनणार
2 २० लाख नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट
3 ‘नवरत्न’ पुरस्काराने आरसीएफच्या प्रगतीला प्रोत्साहन मिळेल
Just Now!
X