23 January 2018

News Flash

जगण्याचा वेग कमी करावा..

गेल्या आठवडय़ात  चेंगराचेंगरी झाली ती एल्फिन्स्टन पुलावर. २३ प्रवाशांचा यात मृत्यू झाला

हरीश शेट्टी, | Updated: October 8, 2017 4:32 AM

गेल्या आठवडय़ात  चेंगराचेंगरी झाली ती एल्फिन्स्टन पुलावर. २३ प्रवाशांचा यात मृत्यू झाला

मुंबईच्या दादर, ठाणे, कुर्ला, बोरिवली यांसारख्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची कायम गर्दी असते. त्यात स्थानकांतील पुलांवर फेरीवाल्यांनी ठाण मांडल्यामुळे  या स्थानकांत कधीही चेंगराचेंगरी होईल अशी परिस्थिती असते. गेल्या आठवडय़ात  चेंगराचेंगरी झाली ती एल्फिन्स्टन पुलावर. २३ प्रवाशांचा यात मृत्यू झाला. आता रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्या पूर्ण होण्यास काही अवधी लागणारच. पण तोपर्यंत प्रशासन आणि जनतेनेही गर्दीच्या ठिकाणी कोणती दक्षता घ्यावी यावर हे विचारमंथन..

आपण १० वर्षांत १०० वर्षांचे जगण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे फीअर ऑफ फीअर ही भावना वाढली आहे. आता जर कुणी कांद्याचे भाव वाढले असे म्हटले तर एखादी स्थितप्रज्ञ व्यक्ती आठवडाभर कांदा खाणार नाही. बाकीचे जास्त पैसे देऊन कांदा विकत घ्यायला धावतील. ही धावण्याची क्रिया जिवाच्या तगमगीतून, घालमेलीतून होते. ती जेव्हा खूप वाढते तेव्हा एल्फिन्स्टनवरील चेंगराचेंगरीसारख्या घटना घडतात.

जिवाची ही तगमग जागतिकीकरणाचा एक साइड इफेक्ट आहे. नोकरी टिकणार की नाही माहीत नाही. जीवनशैली बदलली आहे. जगण्यावरचा खर्च वाढला आहे. त्यात आपली व्यवस्था वाईट आहे. म्हणजे लोकलमध्ये चढायला हवे तर वेगळे प्रशिक्षणच घ्यायला हवे. अशा व्यवस्थेमध्ये तगमग, घालमेल आणखी वाढते. मग लोकल, बस, विमान अशा कुठेही जागा पकडण्यासाठी पळापळी करतो. याशिवाय रांगेत उभे राहणे आपल्याला माहीत नाही. रांगेत उभे राहण्याची वृत्ती मनाच्या शांततेतून येते. ती शांतता येण्याकरिता काहीतरी उपक्रम किंवा उपाय करणे आवश्यक आहे.

यापैकी पहिला म्हणजे स्लोइंग डाउन. रोज हळू जेवणाचा सराव केला तरी त्यातून बरेच काही घडते. कोणतेही इतर काम न करता पाचही इंद्रियांचा वापर करून अन्नाचा आस्वाद घेऊन जेवलो तरी स्वस्थता लाभते. आपल्या संस्कृतीत स्वस्थपणे जेवणे अंतर्भूत आहे. दुसरे म्हणजे दिवसाच्या कोणत्याही वेळेस मायक्रो प्राणायाम करणे. पाच मिनिटांचा हा प्राणायाम रेल्वेमध्ये वा बसमध्ये उभे राहूनही आपल्याला करता येतो. स्लोइंग डाउन हे त्यातूनही होते. यामुळे वेळ वाया जात नाही. आपले काम त्यामुळे थांबणार नसते. उलट आपण अधिक कार्यक्षम व परिणामकारकपणे काम करू शकतो.

अशा अवस्थेत आपला मेंदू कार्यरत असतो. मेंदूचे साधारणपणे दोन भाग असतात. त्यापैकी एक भाग हा बचावात्मक असतो. म्हणजे धोका किंवा समस्या उद्भवणार असते, तेव्हा तो आपल्या संवेदना जाग्या करतो. त्यातून पळण्याची कृती घडते. अश्मयुगात या मेंदूचा सर्वाधिक वापर होत असे. तर दुसरा असतो, सारासार विचार करणारा. अश्मयुगानंतर माणूस शेती करायला लागला. औद्योगिकीकरण आले. त्या वेळी माणसाचा हा दुसरा मेंदू अधिक कार्यरत होऊ  लागला. जेव्हा कुणी बॉम्ब आहे असे म्हटले तर पहिला मेंदू धोक्याची जाणीव करून देतो. पण त्याला दुसऱ्या मेंदूने साथ नाही दिली तर तो अश्मयुगात असल्याप्रमाणे वागतो. म्हणजे एखाद्या ठिकाणाहून धूर येतो आहे म्हणजे तिथे बॉम्ब आहेच असे नाही, ही जाणीव दुसरा विवेकबुद्धीवाला मेंदू करून देतो. जेव्हा तगमग वाढते तेव्हा हा मेंदू काम करेनासा होतो. हा मेंदू कार्यरत राहण्याकरिता स्लोइंग डाउन आवश्यक असते. ते प्राणायाममुळे होते. आपण भारतीय कायमच आपत्कालीन परिस्थितीत जगत असतो. इमारत कोसळते, पूर येतो, बॉम्बस्फोट होतो. अशा वेळी आपली भीती व्यक्त करावी, जगण्याचा वेग कमी करावा आणि हसत हसत प्रवास करावा. आपण हसतो तेव्हा आपली विवेकबुद्धी जागृत राहते. रेल्वे एक मोहल्ला आहे, बस एक नुक्कड आहे, असे मानून प्रवास करावा. अशा वेळी अमेरिकेतील आपल्या मित्राशी चॅट करण्याऐवजी बाजूला बसलेल्या प्रवाशाशी हास्यविनोद केला तर काही बिघडत नाही.

– हरीश शेट्टी, मानसोपचारतज्ज्ञ

गर्दी आणि आपण

कार्यक्रमास जाताना..

एखाद्या बडय़ा संगीत मैफलीला, खेळाच्या सामन्याला जाताना आपल्या तिकिटाची एक प्रत आणि इतर माहिती घरातील एखाद्या व्यक्तीस द्या. त्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यास आपल्याला शोधणे  शक्य होईल.

तात्काळ ओळखता येतील असे चकचकीत (भडक म्हणता येईल असे) काही तरी परिधान करा. त्यामुळे तुमच्या मित्रांचे आणि कुटुंबाचे लक्ष तुमच्याकडे लगेच जाईल. टोकदार वस्तू, मोठय़ा लांबीचे दानिगे आणि पर्स शक्यतो घरीच ठेवा. दुर्घटनेच्या वेळी त्यामुळे गुंतागुंत होऊन आपण जखमी होऊ शकता. पादत्राणे गमावली तर त्यासाठी मध्येच थांबू नका.

गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही स्थळी गेल्यानंतर, समजा तेथे चेंगराचेंगरी झालीच, तर नेमक्या कोणत्या ठिकाणाहून सहीसलामत बाहेर पडू शकू अशा स्थानांचे निरीक्षण करून ठेवा. चेंगराचेंगरीदरम्यान बाहेर पडण्यासाठी आपल्या सर्वात जवळचे बाहेर पडण्याचे ठिकाण योग्य असू शकत नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळे इतर पर्याय शोधून ठेवा. आपण कशावर उभे आहोत हे पाहा. जर आपण ओल्या, चिखलाचा, ओबडधोबड वा निसरडय़ा पृष्ठभागावर उभे असू तर ते घातक ठरू शकते.  पायऱ्या, सरकते जीने येथून खाली उतरताना अतिशय काळजीपूवर्क चालत राहा.

गर्दीतून जाताना

गर्दीत चेंगराचेंगरी सुरू झाली, की तेथे मोठय़ा प्रमाणावर ऊर्जेची निर्मिती होते. एखाद्या वेगात चाललेल्या वाहनाप्रमाणे असते ते. तो वेग थांबविणे अतिशय कठीण असते. अशी वेळी तुम्ही गर्दीच्या मध्यभागी असाल, तर एकाच ठिकाणी उभे राहू नका वा खाली बसू नका. गर्दी ज्या वेगाने पुढे जात आहे, त्याच वेगाने गर्दी जाईल त्या दिशेने सतत चालत राहा. मध्येच पडलात, तर ताबडतोब उठण्याचा प्रयत्न करा. उठू शकत नसाल, तर गुढघ्यावर रांगत गर्दीच्या दिशेने पुढे जात राहा. हेही शक्य नसेल, तर शेवटचा प्रयत्न म्हणून हात डोक्यावर घेऊन डोक्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न करा.

गर्दीत अडकल्यास हे करा

* बाहेर पडण्याचा

मार्ग मनात तयार करा.

* कडेला उभे राहा.बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

* खाली बसू नका. इतर लोकांप्रमाणे वागू नका.

* एकमेकांना पुढे ढकलू नका.

संकलन – चंद्रकांत दडस

महाराष्ट्रातील दुर्घटना..

देशात विविध भागांमध्ये दरवर्षी शंभराहून अधिक चेंगराचेंगरीच्या घटना घडतात. २००१ ते २०१५ या पंधरा वर्षांत चेंगराचेंगरीमध्ये झारखंड या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. झारखंडमध्ये या १५ वर्षांत चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांचा आकडा ४४१ एवढा आहे. आंध्र प्रदेश (३८९ मृत्यू) दुसऱ्या क्रमांकावर, तर महाराष्ट्र (३६८) तिसऱ्या क्रमांकावर आहे. २००१ ते २०१४ या कालावधीत चेंगराचेंगरातील मृतांचा आकडा महाराष्ट्रातील अधिक आहे. महाराष्ट्रात झालेल्या चेंगराचेंगरीच्या काही महत्त्वाच्या घटना

१ गोवारी दुर्घटना (२३ नोव्हेंबर १९९४) – २३ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी समाजाकडून नागपूर विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला होता. सरकारकडून मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी कोणीही न आल्याने उपस्थितांमध्ये गोंधळ सुरू झाला. त्याचवेळी एक लाल दिव्याची गाडी आल्यानंतर कोणी मंत्री चर्चा करण्यासाठी आला असल्याचा समज मोर्चेकरांचा झाला आणि धावपळ सुरू झाली. याचवेळी पोलिसांनी लाठीमार सुरू केल्याने पळापळ सुरू होऊन चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ११४ जणांना प्राण गमवावे लागले, तर ५०० जण जखमी झाले.

२ मांढरदेवी मंदिर (२५ जानेवारी २००५) – वाईनजीक मांढरदेव टेकडीवर मांढरदेवी काळूबाईचे मंदिर आहे. त्या दिवशी यात्रेला जवळपास तीन लाख भाविक उपस्थित होते. देवीला फोडले जाणाऱ्या नारळाचे पाणी पायऱ्यांवर सांडल्याने काही पायऱ्या ओलसर झाल्या होत्या. या ओलसर पायऱ्यांवरून घसरून काही भाविक पडल्यामुळे या ठिकाणी गोंधळ उडाला. त्याचवेळी जवळच्याच एका दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे उपस्थित भाविकांची पळापळ सुरू झाली. या दुर्घटनेत २९१ भाविकांचा मृत्यू झाला.

३ मलबार हिल (१८ जानेवारी २०१४) – दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू डॉ. सय्यदना मोहम्मद बुऱ्हानुद्दिन यांच्या अंत्यदर्शनासाठी मलबार हिलमधील सैफी महल या त्यांच्या निवासस्थान परिसरात जवळपास ६० हजार लोक जमले होते. प्रचंड गर्दीमुळे मध्यरात्री दीड वाजता डॉ. सय्यदना यांचा मृतदेह ठेवलेल्या खोलीचे दरवाजे बंद करण्यात आले. यावेळी उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला, तर ५६ जण जखमी झाले होते.

संकलन – उमेश जाधव      

First Published on October 8, 2017 4:32 am

Web Title: railway administration start steps to avoid stampede incident
  1. M
    manus
    Oct 11, 2017 at 3:40 am
    लेकरं जन्माला घालायची गरज आहे काय ?
    Reply