News Flash

सांगलीच्या हळदीला सोन्याची झळाळी!

सांगली हे हळदीचे आशिया खंडातील सर्वांत मोठे व्यापारी केंद्र वा बाजारपेठ आहे

(संग्रहित छायाचित्र)

दिगंबर शिंदे

सांगली बाजारात हळदीला यंदा विक्रमी दर मिळाला आहे. हा दर कायम मिळायला हवा असेल, तर त्याच गुणवत्तेची हळद उत्पादित करता आली पाहिजे. सांगलीच्या हळद उत्पादन आणि बाजारावर एक दृष्टिक्षेप.

आजीबाईचा बटवा असो वा स्वयंपाक घरातील मसाले. मसाल्याच्या पदार्थातील अग्रस्थानी असलेल्या हळदीला करोनासारख्या महामारीत सोन्याची झळाळी आली आहे. जागतिक पातळीवर हळदीचा दर निश्चिात करणाऱ्या सांगली बाजारात गेल्या आठवड्यात हळदीला ३१ हजारांचा दर मिळाला. यामुळे हळद उत्पादकांना जसा लाभ होणार आहे तसाच लाभ हळद उद्योगाला होणार आहे. चांगल्या प्रतीची हळद तयार झाली, तर निश्चिातच कृष्णाकाठच्या भौगोलिक मानांकन प्राप्त हळदीला यापेक्षा चांगले दिवस येण्याची आशा निर्माण झाली आहे.

‘टर्मरिक सिटी’ अशी सांगली जिल्ह्याची ओळख असणाऱ्या हळदीला ‘जी.आय.’ (भौगोलिक चिन्हांकन) मानांकन मिळावे म्हणून खूप वर्षांपासून लढा सुरू होता. सांगलीच्या हळदीला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळावे म्हणून सांगली जिल्ह्यातील ‘शिवराज्य’ स्वयंसहायता हळद उत्पादक गटाच्या प्रतिनिधी मिरज तालुक्यातील मालगावच्या संयोगिता चव्हाण या तरुणीने सांगलीच्या हळदीच्या अस्तित्वाची लढाई जिंकून सांगलीच्या इतिहासात शेतकऱ्यांचा लढा सुवर्णअक्षरांनी कोरला आहे.

निसर्गाने दिलेल्या माती, पाणी, वातावरणाचा वापर करून आपल्या बुद्धिकौशल्याने विशेष पीक वर्षानुवर्षे घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या समूहाला सामूहिक पेटंट अथवा भौगोलिक चिन्हांकनाचे मानांकन देण्यात येते. ‘जी.आय.’ मिळवण्यासाठी या विशेष पदार्थाचा रंग, गंध आणि चव याचबरोबर मानवी शरीराला आवश्यक असलेली मूल्य या गोष्टी विचारात घेतल्या जातात. या सर्व बाबींचा विचार करून आंतरराष्ट्रीय पातळीवर सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.

सांगली हे हळदीचे आशिया खंडातील सर्वांत मोठे व्यापारी केंद्र वा बाजारपेठ आहे. सांगलीतील हळद व्यापाराला शतकाचा इतिहास आहे. तो येथील दर्जा आणि गुणवत्ता पाहूनच. येथे हळदीची साठवूणक करण्यासाठी विशिष्ट पद्धती पूर्वीच्या काळी अस्तित्वात होती. सांगलीवाडी, हरिपूर येथील कृष्णाकाठची गाळयुक्त जमिनीत असलेली पेवे या इतिहासाचीच साक्षीदार आहेत. जमिनीखाली असणारे पेवे, पेवांमध्ये असणारे मातीचे थर, पेवांची संरचना. पेवांमध्ये हळद साठवणूक केल्यामुळे हळदीचे वजन वाढते आणि रंगही चांगला येऊन ‘करक्युमिन’चे प्रमाण वाढते.

कृष्णाकाठ हा दख्खन पठार भौगोलिक प्रदेशात येतो. सांगलीचे हवामान, इथे पडणारा पाऊस हळदीसाठी पोषक आहे. यामुळे हळदीमध्ये येणारे नैर्सिगक गुणधर्म इथल्या उत्पादनात प्राप्त होतात. येथील हळद जाडीला ठसठशीत, पातळ सालीची, मोठ्ठे कंद असेलली, केशरी रंग, सुरकुत्या कमी,चवीला थोडी कडवट तिखट अशी आहे. राजापुरी हळद ही सुरुवातीपासून लोकप्रिय हळद वाण होते. नंतर कृष्णा, सेलम, निजामाबादी, टेकूरपेठा अशा अनेक जातींची लागवड होते. यामध्येही सांगली, मिरज, पलूस, आष्टा, कडेगांव, तासगांव, खानापूर, विटा, चिंचणी परिसरात हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

सांगलीच्या हळदीला जागतिक पातळीवर चांगला दर मिळतो ते त्यामध्ये असलेल्या ‘करक्युमिन’ या रासायनिक घटकामुळे. ‘करक्युमिन’ हा घटक मानवी शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जसा सहायभूत ठरतो, तसाच त्याचा जंतूनाशक म्हणूनही उपयोग होतो. यामुळे औषधी मूलद्रव्यामध्ये हळदीला महत्त्वाचे स्थान आहे. आयुर्वेदामध्ये तर हळदीला महत्त्वाचे स्थान आहेच, पण युनानी औषधोपचारमध्येही हळदीचा वापर केला जातो. तसेच आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये हळदीचा वापर होतो. कर्करोग, हृदयरोग, मधुमेह या आजारावर हळदीचे सेवन उपयुक्त ठरते. श्वासन विकारावरही हळदीचा उपयोग केला जातो.

हळदीचे अनेक उपयोग आहेत. हळदीपासून हळद पावडर, ‘करक्युमिन’, सौंदर्य प्रसाधने, कुंकू, रंगर्नीिमती सुगंधी तेल तयार करतात. हळदीमध्ये ‘करक्युमिन’सोबतच टरमेरॉन, अ‍ॅटलांटोन व झिंगीवेरण या औषधी मूलद्रव्याचा समावेश असतो. अनेक औषधी गुणधर्मांनी सिद्ध असल्याने हळदीला परदेशातही चांगली मागणी आहे.

हळद लागवड प्रामुख्याने मे महिन्यात केली जाते. लागवड करण्यापूर्वी जमिनीची उभी, आडवी नांगरट करून उसाप्रमाणे सरी सोडली जाते. सरीतील उंचवट्यावर हळदीचे जेठे कंद पुरले जाते. हळदीच्या पिकामध्ये काही वेळेस अन्य पिकांचीही लागवड केली जाते. हळदीचे कंद सुटण्याची वेळ येईपर्यंत तीन महिन्यांचे पीक असलेले मका, सोयाबीन ही पिके काढता येतात. आता काही द्राक्ष बागायतदार दोन वेलीमध्ये असलेल्या खुल्या जागेत हळदीची लागवड करू  लागले आहेत. नऊ ते दहा महिन्यांत हळद काढणीला येते. काढणीनंतर मिळालेले हळदीचे कंद अगोदर काहिलीत शिजवावे लागतात. शिजविल्यानंतर घोळणे, वाळविणे ही कामे अधिक मानवी श्रमांची असल्याने या पिकाकडील ओढा गेल्या काही वर्षांपासून कमी झाला असला, तरी वाढलेला दर पाहता अन्य पिकांपेक्षा हमखास चार पैसे जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून हळदीची लागवड करता येऊ शकते. तसेच पीकबदलासाठी हळदीचा चांगला उपयोग होऊ शकतो.

दर्जा राखणे आवश्यक

सांगली बाजारात हळदीला पहिल्यांदाच विक्रमी दर मिळाला आहे. हा दर कायम मिळायला हवा असेल तर त्याच गुणवत्तेची हळद उत्पादित करता आली पाहिजे. कर्नाटकमधील शेतकऱ्यांच्या हळदीला हा दर मिळाला असल्याने उत्पादक उच्च दर्जाची हळद तयार करण्यासाठी कोणती खते वापरतो, जमीन कशा प्रकाराची आहे याचा अभ्यास बाजार समिती करणार असून त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

– दिनकर पाटील, सभापती, सांगली बाजार समिती

सांगली बाजार हा हळदीचा खात्रीलायक बाजार आहे. वर्षाला एक हजार कोटींची उलाढाल केवळ हळदीच्या बाजारात होते. हा बाजार अधिक विकसित करण्याबरोबरच हळदीपासून उपपदार्थ तयार करणारे उद्योग विकसित होणे गरजेचे आहे. यामुळे हळदीला सध्या असलेली सुवर्ण झळाळी कायम राहील.

– महेश चव्हाण, सचिव बाजार समिती, सांगली

हळद लागवड करण्यासाठी शेतकरी तयार असतात. मात्र काढणीनंतर शिजवणे, घोळणे यामध्ये जर यांत्रिकीकरण झाले तर अधिक शेतकरी या पिकाकडे वळू शकतात. स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध असल्याने याचा निश्चिातच फायदा जिल्ह््यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

– नंदुकमार मोरे, हळद उत्पादक मिरज.

digambar.shinde@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2021 12:13 am

Web Title: record price of turmeric in sangli market this year abn 97
Next Stories
1 उन्हाळी हंगामातील सोयाबीनचा प्रयोग
2 नाविन्याचा ध्यास असलेले तरुणच देशाचे नायक!
3 प्रज्ञावंतांचा सन्मान सोहळा दिमाखात…
Just Now!
X