20 November 2017

News Flash

राज्यातील प्रभावशाली धर्मनेते . . . 

बीडमध्ये प्रत्येक जाती समूहांचे वेगवेगळे गड. त्यांचे वेगवेगळे महाराज

संतोष प्रधान, हृषीकेश देशपांडे, सतीश कामत, सुहास सरदेशमुख, वसंत मुंडे, दिगंबर शिंदे | Updated: September 3, 2017 4:00 AM

नामदेवशास्त्री

नामदेवशास्त्री

बीडमध्ये प्रत्येक जाती समूहांचे वेगवेगळे गड. त्यांचे वेगवेगळे महाराज. युतीच्या काळात भगवानगडाला राजकीय महत्त्व आले. तो सत्ताकाळ संपल्यानंतर भगवानगडावरील महाराजांच्या गादीचे नवे वारस नेमण्याचा प्रसंग आला. भीमसिंह महाराजांचा मृत्यू झाला होता. नामदेवशास्त्री हे उच्चशिक्षित. नामदेवशास्त्री सानप यांचा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी संपर्क आला आणि भगवानगडाच्या ब्रह्मचारी गादीवर त्यांना बसविण्यात आले. इंग्रजीवर चांगले प्रभुत्व. विदेशात राहिलेले असल्याने नामदेवशास्त्री यांच्यामुळे भगवानगडाच्या भौतिक आणि आध्यात्मिक दर्जामध्ये गुणात्मक वाढ झाली, असा दावा त्यांचे समर्थक करतात. ऊसतोडीला जाणाऱ्यांमध्ये वंजारी, लमाण आणि पारधी समाजातील व्यक्तींची संख्या अधिक. आर्थिकदृष्टय़ा पिचलेल्या या वर्गातील व्यक्तींना जगण्याचे भय वाटणे स्वाभाविक. त्यामुळेच कोणत्या तरी महाराज किंवा गडावर अपार श्रद्धा असणाऱ्यांची संख्याही खूप. खरे तर बीड जिल्हय़ातील मूळ गड नारायणगड. तेथून बाहेर पडल्यावर भगवानबाबांनी नवा गड उभारला.  नगरचे बबनराव ढाकणे बीड जिल्हय़ातून निवडून आलेले. त्यांचे या गडावर येणे-जाणे होते. पण, या गडावर येणारी भक्तमंडळी वंजारा समाजातील अधिक असल्याचे कळल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी तेथे वावर वाढविला. फुलचंद कराड यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भगवान सेना स्थापन केली. गोपीनाथरावांनी भगवानगडावरून भाषणांना सुरुवात करण्याची परंपरा एव्हाना विकसित झाली होती. नामदेवशास्त्रींनी त्यांना कधी राजकीय भाषणे करण्यापासून रोखले नाही. गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले आणि हा गड राजकारणापासून मुक्त ठेवायचा आहे, असे म्हणत नामदेवशास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना गडावरून भाषण करण्यास मज्जाव केला. त्यानंतर बरेच रणकंदन झाले. तत्पूर्वी गोपीनाथगडाची स्थापना झाली होती.  कोणत्या नेत्यांशी महाराजांची ऊठबस आहे, हे पाहणाऱ्यांना मिळणारे राजकीय संदेश अलीकडे स्पष्ट आहेत. गडाचे कामकाज राजकीयदृष्टय़ा कितीही गढूळ असले तरी त्यांना मिळणारा निधी कमी पडत नाही. ऊसतोड करून जगणारा माणूस स्वत:च्या कमाईला  हिस्सा देतो. येत्या काळातही या गडावरील महाराज कोणाच्या बरोबर यावर बरीच राजकीय गणिते ठरणार आहेत. नामदेवशास्त्री यांनी कोणाचाही प्रचार केला नाही तरी त्यांचा संदेश मतदार ऐकतील, या भीतीपोटी शास्त्रींना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न राजकारणी करतात. त्यात प्रामुख्याने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आघाडीवर. त्यासाठी त्यांच्यात रस्सीखेच सुरू असते. त्यातून कार्यकर्ते एकमेकांमध्ये अगदी भिडतातसुद्धा. येणारा दसरा मेळावा आणि गड या विषयाभोवती पुन्हा कार्यकर्ते समाजमाध्यमावरही बाहय़ा सारून आहेत.

शांतिगिरी महाराज

आठ हजार भजनी मंडळी, १७० तास अखंड कीर्तन, दहा लाख भाविकांना पंगत वाढण्यासाठी दहा हजार स्वयंसेवक, २० लाख भाविकांची हजेरी आणि महाराजांना आणण्यासाठी खास हेलिकॉप्टर. अशा सोहळ्यात भाविकांशी सुसंवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच औरंगाबाद जिल्हय़ात येऊन गेले.  सरलाबेट येथील गंगागिरी महाराजांच्या उपस्थितीमधील हा सोहळा  आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघात झालेला. त्यामुळे आर्थिक नियोजनात त्यांचा वाटा मोठा. औरंगाबाद जिल्हय़ातील मानसिकता नक्की कशी, हे या उदाहरणावरून दिसून येते. जिल्हय़ाचे खासदार चंद्रकांत खरे वेगवेगळ्या महाराजांचे दर्शन घेत असल्याची छायाचित्रे त्यांचे समर्थक नेहमीच समाजमाध्यमातून पुढे ढकलत राहतात. त्यांच्या गळ्यातील गंडेदोरे, मनगटी असलेले अनेक आध्यात्मिक धागे पाहिले, की सर्वसाधारण माणूस थक्क होऊन जातो. या वातावरणामध्ये एखाद्या महाराजाला राजकीय सत्ता मिळवावी वाटणे स्वाभाविक आहे. राजकीय आखाडय़ामध्ये उतरणारे शांतिगिरी हे या मानसिकतेचे नेते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शांतिगिरी महाराजांना एक लाख ४७ हजारांहून अधिक मते मिळाली. एवढी मते घेणारा महाराज म्हणून २०१४ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे प्रभारी मोहनप्रकाश यांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली.  शांतिगिरी महाराजांची ओळख ‘मौनीगिरी’ अशीही आहे. ते बऱ्याचदा मौनात असतात. गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांत त्यांचा चांगला प्रभाव असल्याने आमदार, खासदारांचा चांगला वावर असतो.  एके काळी खासदार खरे यांच्याविरोधात निवडणुकीमध्ये उभे असणारे महाराज आता सेनेच्या बाजूने झुकले असल्याची चर्चा पंचक्रोशीमध्ये उघडपणे आहे. भंडाऱ्याच्या कार्यक्रमांना स्वस्त धान्य दुकानातून माल दिला जावा, असा त्यांचा आग्रह असतो. त्यातून महाराज आणि नेता यांचे एक अतूट नाते तयार होते. दर  साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला एखाद्या महाराजाला बोलावले नाही तर त्याचा मतदानावर परिणाम होईल या भीतीपोटी महाराजांचे महत्त्व वाढवले जाते. आता महाराजांचे ट्रस्ट आणि त्यांचे अर्थकारण कोटय़वधीची उड्डाणे घेत आहे.

‘राम रहीम’चा माणदेशी वावर

कायम दुष्काळी प्रदेश म्हणून गणल्या गेलेल्या माण आणि बाणगंगेच्या खोऱ्यात आपला पंथ वाढविण्याचे मनसुबे बलात्कारित गुरुप्रीत राम रहीम याने २० वर्षांपूर्वी रचले.  पण बाबा राम रहीम पंथाचा पाया विस्तारण्यात मात्र अयशस्वी ठरला.   सातारा जिल्ह्य़ातील माण, खटाव आणि सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला या तालुक्यातील बहुसंख्य लोक जगण्यासाठी गावातून बाहेर पडले. अगदी दक्षिणेतील कोईमतूरपासून उत्तरेतील पंजाब, हरयाणातील अमृतसर, हिस्सार, सिरसा आदी शहरांत सोने गलाईच्या व्यवसायात स्थिरस्थावर झाले.

अशाच या भागातील एका व्यावसायिकाचा बाबा राम रहीम याच्याशी संपर्क आला. या पंथाचा आपल्याकडेही प्रसार होऊ शकतो हे ओळखून त्याने राम रहीमला आपल्या भागातील माहिती दिली. बाबानेही सुवर्ण व्यावसायिक आहेत म्हटल्यावर आíथक स्थिती उत्तम असेल अशी समजूत करीत या भागात डेरा टाकण्याचा विचार केला असावा. तसेच या भागातील भौगोलिक स्थितीही पोषक असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने आटपाडीपासून ५ किलोमीटर अंतरावर दिघंची रोडवर शेरेवाडी या गावी ६५ एकर जमीन खरेदी केली.

आटपाडीचा आश्रम दुष्काळामुळे सुफळ होत नसल्याचे लक्षात आल्यावर राम रहीमने आश्रमाचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे स्थलांतर लगतच असावे असे ठरवून फलटणपासून ११ किलोमीटरवरील नातेपुते रोडवर पिप्रद या गावाची निवड करण्यात आली. आश्रमात सामान्य लोकांना एका मर्यादेपर्यंतच प्रवेश दिला जात होता. मात्र गावातील सरपंच, जिल्हा परिषद सदस्य अथवा वरिष्ठ सनदी अधिकारी यांना थेट बाबापर्यंत सुलभ प्रवेश दिला जायचा. या बदल्यात शासकीय परवानगी वा मदतीची कामे तत्काळ पूर्ण करून घेतली जायची. या आश्रमात सेवादार एकमेकासमोर आले, की ‘धन धन सत्गुरू, तेराही आसरा’ असे म्हणायचे. मात्र इथे ‘राम रहीम’च्या अस्तित्वाचा येथील लोकांवर फारसा प्रभाव पडला नाही. पण या भल्यामोठय़ा आश्रमाची उभारणी करूनही त्याची नाळ कधीही इथल्या समाजाशी जुळली नाही आणि त्यामुळे ‘राम रहीम’नेही माणदेशीचा आपला वावर हळूहळू कमी केला. रामरहीमला शिक्षा झाल्याने चौकशीच्या भीतीने कालपर्यंत तुरळक भक्तांवर चालणारे हे आडमाडी, पिंप्रदमधील आश्रम आता मात्र पूर्णपणे ओकेबोके झाले आहेत.

नरेंद्र महाराज

कोकणातील रत्नागिरी तालुक्यामध्ये असलेलं नाणीज हे गाव नरेंद्र महाराज या असामीमुळे गेली सुमारे दोन दशकं वेळोवेळी चर्चेत राहिलं आहे. अलीकडे ‘महाराजां’च्या पन्नाशीनिमित्त जंगी कार्यक्रम झाला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजसत्तेला धर्मसत्तेपुढे झुकावंच लागतं, अशा आशयाचं वक्तव्य करून टीकेचे धनी झाले होते. स्वत:ला जगद्गुरू म्हणवणाऱ्या या महाराजांना विमानात ‘दंड’ नेऊ  दिला नाही, म्हणून काही वर्षांपूर्वी त्यांच्या अनुयायांनी विमानतळावर गोंधळ घातला होता.

१९९२-९३ पर्यंत सरकारी नोकरीत असताना केलेल्या वादग्रस्त कामातून  स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी नरेंद्र बाबूराव सुर्वे या संगमेश्वर तालुक्यातील ग्रामसेवकभाऊंनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर अवघ्या तीन-चार वर्षांत त्यांचे ‘नरेंद्र महाराज’ झाले. या ‘महाराजां’ना अशा काही सिद्धी प्राप्त होत्या, की त्याबाबतच्या कहाण्यांचं ‘लीला चरित्र’ प्रसिद्ध झालं. त्यामुळे दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं. त्यांनी ते स्वीकारलं. नाणीजला त्यांच्या मठातच  हा कार्यक्रम झाला. त्याचं ध्वनिचित्रमुद्रणही केलं गेलं. उडवाउडवीची उत्तरं देत महाराजांनी हा फार्स पार पाडला आणि आपलाच ‘विजय’ झाल्याची आरोळीही ठोकली.

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यापासून सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत सर्वपक्षीयांची त्यांच्या दरबारात हजेरी लागलेली आहे.  पण कोणत्याही राजकीय वादांपासून महाराजांनी स्वत:ला कौशल्यपूर्वक दूर ठेवलं आहे. शिवाय, आपल्या धार्मिक-आध्यात्मिक प्रसाराला सामाजिक उपक्रमांची जोड देण्याचं ‘पुण्यकर्म’ही ते नित्यनेमाने करत आले आहेत. व्यसनमुक्तीपासून सुरू झालेले हे उपक्रम रुग्णवाहिका आणि रक्तदान, देहदान, अवयवदानापर्यंत पोहोचले आहेत.

मराठवाडा-विदर्भामध्ये महाराजांचा भक्त संप्रदाय मोठय़ा प्रमाणात पसरलेला आहे.  पण प्रत्यक्ष कार्यक्षेत्र असलेल्या कोकणातील जिल्ह्य़ांमध्ये मात्र त्यांचा फारसा प्रभाव नाही, हेही नोंद घेण्यासारखंच! एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेले त्यांचे चिरंजीव कानिफनाथ महाराज आता ही गादी पुढे चालवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

संकलन : संतोष प्रधान, हृषीकेश देशपांडे, सतीश कामत, सुहास सरदेशमुख, वसंत मुंडे, दिगंबर शिंदे

 

First Published on September 3, 2017 4:00 am

Web Title: religion and politics in maharashtra