|| एस. आर. तांबे

अपघात रोखण्यासाठी ‘प्रथम आपण’ संस्कृतीची गरज!

या देशात प्रत्येक तासाला ५५ अपघात होतात आणि १७ जण मृत्युमुखी पडतात. २०१६ मध्ये अपघातांचे प्रमाण घटले, पण मृत्यूंची संख्या वाढली. सन २०१६ मधील एका अहवालानुसार, त्या वर्षी महाराष्ट्रातील अपघातांचे प्रमाण जवळपास ४० टक्क्यांनी कमी झाले, पण त्या तुलनेत मृतांची संख्या कमी झाली नाही. म्हणून, अपघातांचे प्रमाण कमी झाल्याबद्दल पाठ थोपटून घेण्याचे काहीच कारण नाही, याची जाणीव तो अहवाल प्रकाशित करताना केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना झाली. येत्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे, पण ते गाठता येईल अशी परिस्थिती दिसत नाही.  रस्त्यांची अवस्था लक्षात न घेता बेफाम वाहने चालविण्याच्या बेदरकार वृत्तीमुळे अपघात होतात, असे सरकार म्हणते. महाराष्ट्रातील रस्त्यांची स्थिती काहीशी सुधारत असली, तरी विश्वासाने वाहने चालवावीत अशी परिस्थिती नाही, हाच याचा अर्थ! म्हणूनच, कुणी गाडी दरीत कोसळून मरण पावतात, तर कुणाचे रस्त्यातील खड्डय़ामुळे मरण ओढवते.. हे दुष्टचक्र संपणार कधी? अमूल्य असे जगणे एखाद्या बेसावध क्षणी मातीमोल होऊन जावे, हे भयंकर नाही का? रस्ते अपघातांनी माणसाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे आणि अपघाती मृत्यू ही सर्वात भीषण समस्या बनली आहे..

वास्तव नेमके काय आहे?

गेल्याच आठवडय़ात रायगड जिल्ह्य़ात आंबेनळी घाटात बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघाताची घटना मन विषण्ण करणारी होती. राज्यातील रस्ते अपघात कमी व्हावेत, लोकांचे जीव वाचावेत यासाठी गेल्या २० वर्षांत प्रकर्षांने विविध स्तरांवरून प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील रस्त्यांच्या दर्जात झालेला बदल, अपघातप्रवण क्षेत्राच्या परिसरात झालेल्या सुधारणा, वाहनांच्या तंत्रज्ञानात झालेला बदल आणि अपघाताच्या भीषण परिणामांबद्दल लोकांमध्ये काही प्रमाणात आलेली जागरूकता तसेच रस्ते अपघाताबाबत सुरू असलेली जनजागृती पाहिल्यानंतरही देश आणि राज्य पातळीवर होणाऱ्या अपघातांची संख्या तितक्या परिणामकारकरीत्या कमी झालेली दिसत नाही. जगभरात वर्षांला बळी जाणाऱ्या लोकांमध्ये अपघात हे तिसरे प्रमुख कारण सांगितले जाते. देश आणि राज्याचा विचार करतानाही देशातील एकूण अपघात आणि त्यात बळी जाणाऱ्या प्रवाशांचा विचार करता आजही किमान १० टक्के वाटा राज्याचा आहे. गेल्या वर्षभरात राज्यात ३५ हजार अपघातांत १२ हजार लोकांना आपला प्राण गमवावा लागला असून २० हजार लोक गंभीर जखमी झालेत. यातही काळजीत भर घालणारी बाब म्हणजे रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांमध्ये राज्याच्या विकासात भरीव योगदान देऊ  शकणाऱ्या अशा १५ ते ४४ वयोगटातील लोकांचेच प्रमाण अधिक असते. नियोजन आयोगाच्या एका अभ्यासगटाच्या अंदाजानुसार केवळ अपघातांमुळेच देशाचे दरवर्षी ५५ ते ६० हजार कोटींचे नुकसान होते. एवढेच नव्हे तर अपघातग्रस्त कुटुंबावर होणारा मानसिक आघात हे कधीही न भरून येणारे आणि पैशात न मोजता येणारे नुकसान असते.

राज्य किंवा देशातील रस्ते अपघातांची कारणमीमांसा करायची झाल्यास जवळपास ८० टक्के रस्ते अपघात हे चालकाच्या चुकीमुळे किंवा बेफिकिरीमुळे होतात, तर १५ टक्के अपघात हे नादुरुस्त रस्ते किंवा गाडीच्या देखभाल दुरुस्तीकडे होणाऱ्या दुर्लक्षातून (मेकॅनिकल) होतात, तर काही टक्के अपघातास आजूबाजूची परिस्थितीही कारणीभूत असते. राज्यातील अपघातांची संख्या ही केवळ सरकारसाठीच नव्हे, तर समाजासाठीही चिंतेची बाब आहे. कोणत्याही रस्ते अपघाताचे खापर अनेकदा अपघातग्रस्त मंडळी रस्ता किंवा वाहनावर फोडतात, तर पोलीस चालकालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना दिसतात. एक मात्र खरे की, जवळपास ८० टक्के अपघात हे चालकांच्या चुकीमुळे होतात हे सत्य नाकारता येत नाही. चालकाचा अति आत्मविश्वास, परिस्थितीचे भान नसणे, गाडी चालविण्याच्या शिक्षण-प्रशिक्षणाचा अभाव आणि सर्वात म्हणजे मला पुढे जायचे आहे, ही मनोवृत्ती यातूनच अनेक अपघातांचे प्रसंग घडतात. अपघात जसे चालकाच्या चुकीमुळे घडतात, तसेच काही वेळा त्याला अन्य परिस्थितीही कारणीभूत असते. यामध्ये अनेकदा रस्त्यांची दुर्दशा किंवा नागमोडी वळणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुरक्षित कठडय़ांचा अभाव, रस्त्याला लागूनच असलेले डोंगराचे कठडे तसेच गाडीच्या देखभाल दुरुस्तीचा अभाव ही कारणेही अपघातास निमंत्रण देणारी ठरतात. पर्यावरणाचा विचार करता वृक्षसंवर्धन महत्त्वाचे असले तरी रस्त्याला खेटून असलेली झाडेच अपघातास कारणीभूत ठरतात. कोणताही सारासार विचार न करता रस्त्याला खेटूनच झाडे लावली जातात. रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे तोडणे गरजेची असली तरी पर्यावरणप्रेमाच्या नावाखाली ही झाडे तोडू दिली जात नाहीत. इतकेच काय, त्याच्या रस्त्यांवर आलेल्या फांद्याही छाटू दिल्या जात नाहीत. त्यामुळे वाहने झाडावर आदळून होणाऱ्या अपघातात हजारो लोकांचे बळी गेले आहेत आणि जात आहेत. विदर्भात काम करीत असतानाचा एक किस्सा मोठा गमतीशीर आहे. जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून अकोला-वाशिम रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले होते. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडेच झाडे होती. विदेशात कोणत्याही रस्त्याला लागून झाडे नसतात. या कामाची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या जागतिक बँकेच्या अधिकाऱ्याने दोन-तीन वेळा ही झाडे हटविण्याची सूचना केली; पण परिसरातील लोकांचा विरोध होता. शेवटी याच्या खोलात गेलो तेव्हा कळले की, ही सर्व झाडे आमच्याच वडिलांनी साहाय्यक अभियंता असताना लावली होती. शेवटी बँकेच्या अधिकाऱ्याने ‘तुम्हाला माणसं वाचवायची आहेत की झाडं’ याचा निर्णय घ्या, नाही तर निधीच रोखण्याचा दम भरल्यावर हे काम मार्गी लागले. थोडक्यात काय, तर वाहनांची वाढती वर्दळ लक्षात घेता आज छोटे दिसणाऱ्या रस्त्यांचेही उद्या महामार्गात रूपांतर होऊ  शकते. त्यामुळे रस्त्यांच्या कडेला झाडे लावण्याचा मोह सर्वानीच रोखायला हवा. दुसरे म्हणजे रस्ते, अगदी महामार्गही गावागावांतून जातात. मात्र त्याच्या दोन्ही बाजूंना कोणतीच सुरक्षितता नसते. त्यामुळे रस्तेक्रॉसवर किंवा रस्त्याच्या कडेला घडणाऱ्या अपघातांची संख्याही मोठी आहे. प्रामुख्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांबरोबरच विजेचे, टेलिफोनचे खांब, रस्त्याच्या काठालाच असणाऱ्या उघडय़ा विहिरी, अर्धवट कठडे, पाण्याचे पाइप, बैलगाडय़ा, भंगारात जाणाऱ्या बंद गाडय़ा, शिवाय रस्त्याच्या कडेलाच ठेवण्यात आलेली रेती, दगड यामुळेही होणारे अपघात आणि त्यात बळी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असून आमच्या समितीने २० वर्षांपूर्वी केलेल्या या सूचनांची आजही परिणामकारक अंमलबजावणी होताना दिसत नाही. अर्थात राज्यातील रस्त्यांची आजची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत सुधारली असली तरी या छोटय़ा छोटय़ा गोष्टींकडे लक्ष दिल्यासही अपघाताच्या घटनांवर नियंत्रण येऊ  शकते.

केवळ वाहनचालकाने दक्षता बाळगल्यास किंवा आपल्या हातात आपल्यासह अनेक कुटुंबांचे भवितव्य आहे याचे भान ठेवल्यास अनेक अपघाताच्या घटना टळू शकतात. पाश्चिमात्य देशात प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य असते. तेथे रस्त्यांच्या देखरेखीबरोबरच वाहनचालकांसाठीही काटेकोर नियम आहेत. तेथे कोणत्याही चौकात किंवा रस्त्यावरही वाहनचालकाने पुढचा लाइट लावून सिग्नल दिला, याचा अर्थ ‘मी थांबतोय, तुम्ही पुढे जा’ असा असतो. आपल्याकडे पाहुणचारात नेहमीच ‘प्रथम आपण..’ची भूमिका असली तरी रस्ते प्रवासात मात्र नेमकी याच्या उलट मानसिकता असते. समोरच्याला लाइट देणारा प्रथम मला जायचे आहे, असा संदेश देतो आणि त्याची वाट न बघता पुढे घुसतोही. त्यामुळे किमान चालकांनी तरी ‘प्रथम आपण’ची संस्कृती आत्मसात केली आणि दुसऱ्याला पुढे जाऊ  दिले तरी निम्मे अपघात घटू शकतील. अपघात झाला तरी त्यात कमीत कमी नुकसान आणि जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचणे महत्त्वाचे असते. एखाद्या अपघातानंतर किती जखमी लोक मरतात याबाबतचे प्रमाण दर्शविणारा निर्देशांक अर्थात फॅटिलिटी इंडेक्समध्ये डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, जपानसारख्या देशांत हे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे, तर आपल्या देशाचा फॅटिलिटी इंडेक्स १९ टक्के आहे. देशाचा विचार करता हाच निर्देशांक केरळचा सर्वात कमी ५ टक्के असून आपल्या राज्यात हेच प्रमाण २० टक्के असून सर्वाधिक ४१ टक्के फॅटिलिटी इंडेक्स हा पंजाबचा आहे. वाहनचालकांना परिस्थितीचे आकलन नसणे हेही अपघाताचे आणखी एक महत्त्वाचे कारण असून देशरक्षणासाठी निघाल्याच्या आविर्भावात जिवावर उदार होऊन सुसाट वाहन चालविण्याचा मोहही आवरण्याची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे परदेशात वाहनचालकाचा परवाना मिळविताना अनेक कठीण परीक्षा आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागते. आपल्याकडे मात्र हा परवाना सहज मिळत असल्याने त्यातूनही अपघातांना निमंत्रण मिळते. त्यामुळे वाहनचालकाचे सातत्याने शिक्षण- प्रबोधन होण्याची आवश्यकता असून रस्त्यांबाबतच्या नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करून अपघात झाला तरी त्याचा परिणाम करीत कमी कसा जाणवेल याच्या उपाययोजना केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते.

शब्दांकन : संजय बापट

(लेखक सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव आणि राज्य अपघात निवारण समितीचे माजी अध्यक्ष आहेत.)