मोहन अटाळकर

आधी शिक्षणाचा मूळ उद्देश साक्षरता हा होता, नंतर शिक्षणातून सामाजिक बदलांची प्रक्रिया सुरू झाली; आता त्याच्या पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. शिक्षणातून चांगला माणूस घडविण्याचे ध्येय समोर ठेवून ‘शाश्वत कन्सेप्ट स्कूल’ ही अनोखी शाळा काही वर्षांपूर्वी अमरावतीत सुरू करण्यात आली.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!

शाश्वत जीवनमूल्यांचे धडे देणारा हा प्रयोग विद्यार्थ्यांना नवदृष्टी देणारा आहे..

स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिक पद्धतीचे शिक्षण हवे. मात्र, विद्यार्थ्यांना केवळ यंत्र बनवून चालणार नाही, त्यांच्यातील माणूस घडला पाहिजे, त्यातून चांगला समाज घडण्यास मदत होईल, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून अमरावती शहराजवळ ‘शाश्वत कन्सेप्ट स्कूल’ ही आगळीवेगळी शाळा काही वर्षांपूर्वी सुरू झाली. पारंपरिक शिक्षण पद्धतीतील दोष बाजूला सारून पुस्तकी ज्ञानासोबत मुलांना बाह्य जगाचेही शिक्षण देणारी एक ‘शाश्वत’ व्यवस्था या शाळेने उभी केली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, त्यासोबत लोकशाहीची मूल्ये, कर्तव्ये, अधिकार आणि जबाबदारीचीही जाणीव करून देणे या व्यापक भूमिकेतून चालवल्या जाणाऱ्या या शाळेने आता आणखी एक उपक्रम हाती घेतला आहे. ‘जैवविविधतेचा जीवनमूल्यांशी संबंध’ या व्यापक विषयावर लेखी परीक्षा आणि मुलाखतीतून निवड झालेल्या शंभर विद्यार्थ्यांना दरवर्षी ‘शाश्वत इंडिया फेलोशिप’ देण्यात येणार आहे. फेलोशिप मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्युत्तर शिक्षणापर्यंत लागणाऱ्या पुस्तकांचा खर्च देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा पाया मजबूत करतानाच त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणाऱ्या या उपक्रमाचा विस्तार पुढील शैक्षणिक वर्षांपासून संपूर्ण राज्यभर करण्यात येणार आहे.

‘शाश्वत कन्सेप्ट स्कूल’मध्ये पहिली ते दहावीपर्यंतचा ठरावीक अभ्यासक्रम शिकवला जात नाही. गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी, हिंदी हे सर्व विषय विद्यार्थी प्रयोग आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिकतात. शाळेने ‘आयजीसीएससी’ हे केम्ब्रिजचे बोर्ड स्वीकारले आहे. त्याचे शुल्क न परवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ओपन स्कूल’चा पर्याय शाळेने खुला ठेवला आहे. राज्य शिष्यवृत्ती परीक्षा असो किंवा होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा, यात उत्तीर्णतेचे शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रमाण ३० ते ५० टक्के आहे. शनिवार वगळता शाळेत गणवेशाची सक्ती नाही. शाळेत नियमित तासिका नाहीत, वेळापत्रक नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या वेळेत नियोजन करायचे असते. शिस्तीचा बडगा नसला, तरी या अनौपचारिक शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या अंगी स्वयंप्रेरणेने शिस्त भिनलेली दिसते. या शाळेत एकत्रित सहल नेली जात नाही. शाळेकडून चार ते पाच विद्यार्थ्यांच्या गटाला देशाच्या विविध भागांत फिरण्यासाठी पाठविले जाते. स्वत: प्रवासाची तिकिटे काढण्यापासून ते खर्चाचे नियोजन करण्याची जबाबदारी त्यांचीच असते. अनुभवातून त्यांना बरेच काही शिकायला मिळत असते. स्नेहसंमेलनाऐवजी ‘शाश्वत टॉक’ या उपक्रमातून विचारवंतांच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाते. विज्ञान विषय निरीक्षणाच्या आधारे सहजपणे शिकवला जातो. प्रयोगशाळेची सूत्रे विद्यार्थ्यांकडे आहेत. मोठय़ा विद्यार्थ्यांनी कनिष्ठ वर्गातील मुलांना शिकवायचे असे त्याचे स्वरूप आहे. विद्यार्थ्यांमध्ये सर्वधर्मीय आदर आणि चिकित्सा करण्याचा दृष्टिकोन कसा विकसित होईल, याकडे लक्ष दिले जाते.

विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांवर मंथन व्हावे, यावर व्यवस्थापनाचा भर आहे. शाळेच्या सर्वोच्च मंडळाचे नावही ‘मंथन’ असे आहे. अनेक निर्णय आणि त्याची अंमलबजावणी या मंथनातूनच होत असते. शाळेतील एखाद्या विद्यार्थ्यांच्या कर्त्यां पालकाचे निधन झाले, तर त्याच्या शिक्षणाचा खर्च सर्वानी विभागून घ्यायचा, हाही निर्णय विद्यार्थ्यांनीच घेतला. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी ‘मंथन’च्या प्रश्नावलीचा टप्पा पालकांना पार करावा लागतो. ही मुलेच या पालकांना ही शाळा कशी आहे, हे समजावून सांगतात.

सध्या या शाळेत सुमारे पाचशे विद्यार्थी आहेत. २०२१ पासून दप्तरविरहित शाळा करण्याचा मानस शाळेचे संचालक अतुल गायगोले आणि त्यांच्या पत्नी अमृता यांनी व्यक्त केला आहे. २० विद्यार्थ्यांचा एक वर्ग आणि कमीत कमी शिक्षक असे या शाळेचे स्वरूप आहे. बहुतांश विद्यार्थी संगणकावर स्वत:च शिकतात. शाळेतील शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी गायगोले यांनी ‘दर तीन महिन्यांनी एक महिन्याची सुट्टी’ ही संकल्पना राबवणे सुरू केले आहे. प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि गरीब विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्याचे त्यांचे धोरण आहे. शाळेच्या विस्तारातील मर्यादा त्यांना ठाऊक आहेत. शिक्षण हा नफा कमविण्याचा व्यवसाय नाही, हे मनोमन ठरवून त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाची दिशा आधीच ठरवून टाकली आहे.

‘शाश्वत इंडिया फेलोशिप’मध्ये ‘नागरिकशास्त्र’ या विषयाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. लोकशाहीची मूल्ये, सहिष्णुता, माध्यमांच्या स्रोतांची निवड, निवडणुकीतील मतदान प्रक्रिया, मानवी हक्क अशा १५ अभ्यास विषयांचा समावेश त्यात राहणार आहे. आज पाण्याच्या टंचाईबद्दल अनेक जण बोलतात, पण त्यावर मात करण्याच्या दृष्टीने कोणतीही ठोस उपाययोजना दृष्टिपथात नाही. असे विविध प्रश्न या माध्यमातून हाताळले गेले पाहिजेत. आधी शिक्षणाचा मूळ उद्देश साक्षरता हा होता, नंतर शिक्षणातून सामाजिक बदलांची प्रक्रिया सुरू झाली; आता शिक्षणातून चांगला माणूस घडविण्याचे ध्येय समोर असले पाहिजे. त्यासाठी मुळात विद्यार्थ्यांनी नागरिकशास्त्र हा विषय समजून घेतला पाहिजे, उत्तरदायित्व स्वीकारणारा नागरिक त्यातून घडला पाहिजे, असे अतुल गायगोले यांनी सांगितले.

इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना या फेलोशिपसाठी अर्ज करता येणार आहे. सुरुवातीला इच्छुक विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यातून दोनशे विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून, तिसऱ्या टप्प्यात त्यांना मुलाखतीच्या स्वरूपात परीक्षा द्यावी लागणार आहे. यासोबतच विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपाययोजना, परीक्षार्थ्यांना सूचना, शिफारशींच्या माध्यमातून सुचवाव्या लागणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी शिबिरांचे आयोजनही करण्यात येणार आहे. यातून शंभर विद्यार्थ्यांची निवड फेलोशिपसाठी केली जाणार आहे. फेलोशिपसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड विविध विषयतज्ज्ञ आणि विचारवंतांचा चमू करणार आहे. या फेलोशिपमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार शिक्षणासाठी लागणाऱ्या एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या पुस्तकांचा खर्च दरवर्षी दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांला पदव्युत्तर शिक्षणापर्यंत लागणारी पुस्तके यातून खरेदी करता येऊ शकतील. विद्यार्थ्यांमध्ये मुळात चिकित्सक वृत्ती असते. त्यांच्यातील अंगभूत कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी एक व्यासपीठ आवश्यक असते. विद्यार्थ्यांमध्ये चौकस वृत्ती निर्माण करतानाच त्यांना आत्मशोधाकडून समाजबदलाकडे नेण्याचा उद्देश या फेलोशिपमागे आहे. अतुल आणि अमृता गायगोले यांनी शाळेलाच आपली प्रयोगशाळा मानले. संशोधकांसोबतच शाळेतील विद्यार्थ्यांनीही त्यांना त्यांच्या शहरात दिसणारे बदल नोंदवले पाहिजेत. त्यावर चर्चा, वादविवाद झाले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी शहराच्या अभ्यासात सहभागी झाले पाहिजे, असे दोघांचेही म्हणणे होते. यातूनच एक व्यासपीठ आकार घेऊ लागले होते. विद्यार्थ्यांना भोवतालाचे भान देणारा आणि आसपासचे बदल टिपण्यास प्रवृत्त करणारा विचार त्यांना रुजवायचा होता. विद्यार्थी जेव्हा सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास करतील, आपले प्रश्न समजून घेतील, त्यातून त्यांना पडणाऱ्या नव्या प्रश्नांची उत्तरे शोधू लागतील, तेव्हा बदलाची प्रक्रिया सुरू होऊ शकेल, असे गायगोले म्हणतात. त्यासाठीच ‘शाश्वत इंडिया फेलोशिप’ या उपक्रमाचा जन्म झाला. या फेलोशिपसाठी फारशा अटीही नाहीत. केवळ आपल्या भोवतालाकडे पूर्वग्रह बाजूला ठेवून नव्या दृष्टीने बघण्याची तयारी आणि उत्साह हवा, असे त्यांचे म्हणणे आहे.

प्रश्न पडू द्या, उत्तरेही शोधा..

शाश्वत शाळेत सुरुवातीचे काही दिवस मुले आसपास घडणाऱ्या गोष्टी पाहतात, ऐकतात. पण त्यांना लवकरच मैदानात उतरावे लागते. स्वत: विचार करावा लागतो. तो इतरांसमोर मांडावा लागतो. तो तपासून पाहावा लागतो. इतरांची मते विचारात घ्यावी लागतात. यातून मुलामुलींचा विचारांचा परीघ वाढतो. समज खोल होते. मते बनू लागतात. विद्यार्थी जेव्हा सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास करतात, तेव्हा पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची प्रेरणाही त्यांना मिळते. ‘शाश्वत कन्सेप्ट स्कूल’मध्ये यावर भर दिला जातो.

‘शाश्वत इंडिया फेलोशिप’

अतुल गायगोले यांनी ‘शाश्वत इंडिया फेलोशिप’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘शाश्वत कन्सेप्ट स्कूल’ची स्थापना ज्या मूल्यांवर झाली, त्यातच या फेलोशिपचे अंतरंग दडले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, त्यांना संविधानातील तरतुदी, घटनात्मक अधिकार, कर्तव्याच्या जाणिवांसोबतच जैवविविधतेतील परस्परपूरक संबंधांचे भान जपणे हा व्यापक उद्देश त्यामागे आहे. पहिल्या वर्षी अमरावती जिल्ह्यासाठी ही फेलोशिप असून पुढील वर्षांपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

‘शाश्वत कन्सेप्ट स्कूल’ (Shashvat Concept School)

शाळेची इमारत अमरावतीपासून सहा किलोमीटर अंतरावर रहाटगाव मार्गावरील रामगाव येथे आहे.

जयहिंदू एज्युकेशन फाऊंडेशन

(Jaihind  Education  Foundation)

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्यासोबत देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.

धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय       

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

औरंगाबाद कार्यालय       

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी,  औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

नगर कार्यालय       

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१.

०११-२०६६५१५००