News Flash

शागीर्दाच्या सुरांनी ठाणे जिंकले

जुलै सरतासरता जुळून आलेले बरसातीचे सूर, वातावरणात पसरलेला गारव्याचा गंध आणि तशात मन चिंब करणारा शास्त्रीय सुरांचा वर्षांव..

| July 26, 2015 04:55 am

जुलै सरतासरता जुळून आलेले बरसातीचे सूर, वातावरणात पसरलेला गारव्याचा गंध आणि तशात मन चिंब करणारा शास्त्रीय सुरांचा वर्षांव.. शनिवारी सायंकाळी ठाण्यात शेकडो रसिकांनी हे सुख भरभरून अनुभवले. ‘पृथ्वी एडिफिस, पुणे’ प्रस्तुत ‘लोकसत्ता – शागीर्द’ या स्वरयोगाचे दुसरे पुष्प येथील टिप-टॉप प्लाझा सभागृहात कमालीचे रंगले. या स्वरमैफलीत प्रवेश मिळावा म्हणून रसिकांनी एक तास आधीच सभागृहाबाहेर रांगा लावल्या होत्या. रसिकांनी तुडुंब भरलेल्या त्या सभागृहाने शास्त्रीय संगीत मैफलींना लोकाश्रय कमी झाल्याचा समज गैरच असल्याचे अधोरेखित करीत तेजश्री आमोणकर यांच्या गायनाला तसेच ताकाहिरो अराई यांच्या संतूर वादनाला भरभरून दाद दिली.
पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य ताकाहिरो अराई यांनी संतूरवर राग यमन सादर करताना रसिकांच्या मनाच्या तारा छेडल्या. सुरुवातीला आलाप सादर केल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ तबला वादक योगेश सम्सी यांचे शिष्य शेखर गांधी यांच्या साथीने विलंबित लयीतील रूपक तालावर यमनरंगाची उधळण केली. त्यानंतर द्रूत लयीतील त्रितालासह यमन रागाचे ‘हजारी कारंजे’ रसिकांसाठी उभे केले. संतूर आणि तबल्याच्या जुगलबंदीने रसिकांनी साक्षात नादब्रह्म अनुभवले. रसिकांनी मनसोक्त टाळ्यांची बरसात करून या दोन्ही कलावंतांचे भरभरून कौतुक केले. साऱ्या सभागृहाने उभे राहून त्यांना मानवंदना दिली.
मध्यंतरानंतरच्या सत्रात जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या शिष्या तेजश्री आमोणकर यांनी सुरुवातीला खोकर रागातील ‘आज आनंद मुखचंद्र’ ही बंदिश सादर केली. जयपूर-अत्रौली घराण्याचे आद्य गायक उस्ताद अल्लादियां खाँ यांनी तयार केलेल्या रागातील या बंदिशीने रसिकांच्या मनावर गारूड केले. त्यानंतर याच रागातील ‘मनवा मोरा ललचाए’ ही बंदिश एका वेगळ्याच ढंगात सादर करत तेजश्री यांनी रसिकांची वाहवा मिळवली. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांनी खास या कार्यक्रमासाठी ही बंदिश तयार केल्याचेही तेजश्री यांनी आवर्जून सांगितल्यावर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सूर मल्हार रागातील ‘बदरवा बरसत आए’ या बंदिशीने जणू पावसाला साद घालत तेजश्री यांनी मैफिलीचा शेवट केला. तेजश्री यांना तबल्यावर प्रदीप दीक्षित, संवादिनीवर सिद्धेश बिचोलकर आणि तानपुऱ्यावर अर्पिता पर्वतकर यांनी साथसंगत केली.
‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविक तर ‘पृथ्वी एडिफिस-पुणे’चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अभय केळे यांनी कलावंतांचा सत्कार केला.

कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने आलेले रसिक पाहून शास्त्रीय संगीताचे भवितव्य सुरक्षित आणि उज्जवल आहे, याची खात्री पटली. ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या या उपक्रमाला मी मनपूर्वक धन्यवाद देतो.
पंडित शिवकुमार शर्मा

शिष्य परंपरा ही गुरूपंरपरेला मान दिल्या खेरीज पुढे जात नाही. या परंपरेतील आम्ही सारे कलाकार प्रेमबंधाने बांधले गेलो आहोत. भारतीय संगीताच्या या परंपरेला पुढे आणण्यासाठी लोकसत्ताचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. याबद्दल मी लोकसत्ताचे अभिनंदन करते.
गानसरस्वती किशोरीताई आमोणकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2015 4:55 am

Web Title: shagird like thane peoples
टॅग : Thane
Next Stories
1 संसदीय संस्कृतीतील मुत्सद्दी नेता
2 अमेरिकेतील झेंडय़ाचा वाद
3 वीज प्रश्न : आभास आणि वास्तव
Just Now!
X