10 April 2020

News Flash

ढासळणाऱ्या तीरावरचे तटस्थ विदाभान

नकारात्मक प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे विचारकूपं (एको चेंबर्स) निर्माण होतात.

|| संहिता जोशी

आम्ही कुठल्याही एका पक्षाचे नाही, डाव्या/उजव्या विचारधारेचे नाही, असं म्हणणारे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांवरही असतात.. पण असं तटस्थ असण्यासाठी तथ्यांचा, वस्तुस्थिती माहीत असण्याचा आधार लागतो, तो समाजमाध्यमांवर नेहमी मिळतो का?

नकारात्मक प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे विचारकूपं (एको चेंबर्स) निर्माण होतात. त्यासाठी गेल्या भागात एक समांतर उदाहरण दिलं, ते विदाविज्ञानाचा एक भाग ‘रीइन्फोर्समेंट लìनग’ याचं – यात आधीच्या निकालांतून यापुढे कसं वागायचं, खेळायचं याचं धोरण ठरवलं जातं. असं म्हटलं जातं की, चांगल्या समीक्षेच्या अभावी चांगलं साहित्य निर्माण होत नाही. टीका जोवर व्यक्तीवर होत नाही, विचार-अभिव्यक्तीची समीक्षा होते, निर्णयांची चिकित्सा होते तोवर त्यातून अभिव्यक्ती, निर्णय आणि पर्यायानं व्यक्तीमध्येही सुधारणा होण्यासाठी मदत होते.

गेल्या लेखात विचारकूपं कशी तयार होतात ते बघितलं. लिंक्डइन आणि इन्स्टाग्रामवर सगळं छान छान असतं; तिथल्या गप्पा चर्चा म्हणण्याइतक्या भरीव दिसत नाहीत. ट्विटर आणि फेसबुकवर चर्चा चालतात; अनेकदा त्यांची पातळी चर्चा म्हणण्यापेक्षा राळ उडवणं या पातळीवर जाते. तरीही याला विचारकूपं तयार होणं, त्यांत अडकणं म्हणणार का? ‘आमच्या यादीत विरोधी विचार करणारे तीन लोक आहेत; ते नियमितपणे आमच्या भिंतीवर लिहितात. म्हणजे आम्ही विचारकूपांत अडकलेले नाही,’ असा विचार सहज करता येईल.

रस्त्यावरून जाणारा माणूस एखाद्या पोराला रागावला आणि त्या पोराचे आई-वडील त्याला रागावले; कोणाच्या ओरडय़ाचा, म्हणजे नकारात्मक प्रतिक्रियेचा, त्या मुलावर अधिक परिणाम होईल? आपल्याला ज्या व्यक्तींबद्दल अजिबात आदर नाही, अशांनी आपल्यावर टीका केली तर त्या टीकेचं काय होतं? बहुतेकदा ती थट्टेवारी नेली जाते; जेव्हा विषय हमरीतुमरीवर जातात तेव्हा ती टीका बिरुदासारखी मिरवली जाते. ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्यासाठी फाशी गेलेला भगतसिंग हुतात्मा ठरला; पण ब्रिटिश परकेच होते. समाजमाध्यमांवर आपण ज्यांना नावं ठेवतो ते आपले आहेत की परके? परके म्हणजे नक्की कोण, असा प्रश्न पुलवामा प्रकारानंतर पुन्हा एकदा पडला. भारतीय सनिक हकनाक मेले; काश्मिरातला दहशतवाद संपावा, असं वाटणारे सगळे आपले असले पाहिजेत, नाही का!

प्रत्यक्षात मात्र तसं दिसत नाही. उजव्या- डाव्या- मधल्या सगळ्या विचारकूपांमधल्या लोकांना वाटत असेल की, काश्मिरातला दहशतवाद संपावा. तरीही फेसबुक- ट्विटरवरच्या चर्चा बघितल्यास काय दिसतं, दोन टोकांच्या विचारसरणींचे लोक एकमेकांना नावं ठेवत असतात. सध्याची शेलकी विशेषणं : अर्बन-नक्षल, देशद्रोही, भक्त, भक्ताड, इत्यादी. अशी हिणकस लेबलं एकमेकांना लावल्यामुळे आपण दुसऱ्या गोटातल्या लोकांचं मनुष्य असणं नाकारतो. दुसऱ्या गटांमधली माणसंसुद्धा आपल्यासारखीच आहेत, मत व्यक्त करण्याचा जेवढा अधिकार आपल्याला आहे तेवढाच इतरांनाही आहे हे नाकारलं जातं.

यात एक भाग असतो तो आभासी किंवा आंतरजालीय (इंटरनेटवरच्या) आयुष्याचा आणि दुसरा भाग असतो तो प्रत्यक्ष आयुष्याचा. जेव्हा व्यक्ती समोर दिसत नाही, तेव्हा वर्तन बदलतं. ओंजळभर चॉकलेटं घेऊन लहान पोराला दाखवा, ‘हवी तेवढी घे’ म्हणा आणि मग तीच चॉकलेटं वाडग्यात घालून ठेवून द्या; आणि मग पोराला सांगा, ‘त्या खोलीत जाऊन हवी तेवढी चॉकलेटं घे.’ जेव्हा कोणी बघत नसतं, तेव्हा पोरं जास्त चॉकलेटं घेतात. वैज्ञानिकांनी अशा प्रकारचे प्रयोग मोठय़ा माणसांवरही अनेकदा केले आणि त्यांच्या लक्षात आलं की, समोर मनुष्य असेल तर त्यांचा थोडा धाक वाटतो. फेसबुक- ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर आपण इतरांबद्दल लिहितो तेव्हा या व्यक्ती समोर नसतात. या व्यक्ती आपल्याला अजिबात आवडणार नाही असं बोलतात, तेव्हा मनातून आपण त्यांचा सन्मानानं जगण्याचा अधिकार डावलतो.

याचं हिंस्र रूप म्हणजे बरखा दत्त किंवा सागरिका घोष यांच्यासारख्या पत्रकारांना जिवे मारण्याच्या किंवा बलात्काराच्या धमक्या येणं. लक्षात घ्या, या फक्त पत्रकार नाहीत, स्त्रियासुद्धा आहेत. स्त्रियांना दुय्यम दर्जाची व्यक्ती समजण्याची परंपरा सर्व समाजांमध्ये आहे. टीका करणाऱ्या पत्रकार स्त्रियांना हिंसेच्या धमक्या येणं ही गोष्ट फक्त मराठी वा भारतीय समाजापुरती मर्यादितही नाही.

विचारकूपांमधून एकेक व्यक्ती एकत्र येतात आणि मनुष्यांच्या झुंडी तयार होताना दिसतात. त्यातून पत्रकारांना, विरोधी विचारांच्या व्यक्तींना धमक्या देणं, शिवीगाळ होणं, नावडत्या लोकांचे फोन नंबर जाहीर करून त्यांना त्रास देण्याची आवाहनं करणं, असे हिंसक, बेकायदा आणि अनतिक कार्यक्रम चालवले जातात.

अशा प्रकारच्या धमक्या येतात तेव्हा आभासी जगाची मर्यादा ओलांडून आपण प्रत्यक्ष आयुष्यात शिरतो. या धमक्या कदाचित पोकळ असतीलही; पण त्यांचा होणारा मानसिक त्रास खराच असतो. कोणत्याही बाजूचे असले तरी कट्टर लोक आपापली मतं बदलण्याची शक्यता फारच कमी; पण खोटय़ा बातम्या पसरवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. आपल्या नावडत्या नेत्याविरोधात काही खोटी बातमी आली तर तिची शहानिशा न करता ती फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप किंवा ट्विटरवर पसरवण्याचं काम कट्टर लोक सहज करतात; दुसऱ्या बाजूनं प्रतिपक्षाला हीन लेखण्याचं कार्य सुरू असतंच.

कट्टर लोकांच्या जोडीला मोठय़ा प्रमाणावर तटस्थ वर्ग असतो. त्यांचा एक ठरावीक पक्ष वगरे नसतो; विकास, पायाभूत सुविधा, नोकऱ्या, वगरे गोष्टींची चिंता या वर्गाला असते. मात्र कट्टर लोकांनी पसरवल्यामुळे शहानिशा न केलेल्या खोटय़ा बातम्या आणि एकमेकांविरोधात उडवलेली राळ या लोकांपर्यंत पोहोचते. खोटय़ा बातम्या आणि हिणकस नावं ठेवणं यांतूनही काही तटस्थ लोकांचा मतदानातला मतबदल होऊ शकतो. थोडय़ा मताधिक्यानं जिंकलेल्या निवडणुकांमध्ये या थोडक्या मतदारांचा, पर्यायानं खोटय़ा बातम्या आणि झुंडीच्या आक्रमकतेचा मोठा फरक पडतो.

२०१६ सालचं ‘ब्रेग्झिट’चं मतदान आणि अमेरिकी अध्यक्षीय निवडणुका या दोन्हींमध्ये ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ या कंपनीनं अशा प्रकारच्या ध्रुवीकरणाचा फायदा उठवला, त्याची थोडक्यात गोष्ट अशी. आपल्या ३० ते १०० फेसबुक/ ट्विटर पोस्ट्स बघून आपला राजकीय कल काय आहे ते ओळखायचं. ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’नं ब्रिटिश आणि अमेरिकी मतदारांच्या समाजमाध्यमांवरच्या पोस्ट्सचा अभ्यास करून कोणाला कोणत्या प्रकारच्या बातम्या दाखवल्या तर मतदाराच्या विचारांत फरक पडेल याचा अभ्यास केला. फेसबुक मेसेंजरमधून, लोकांनी परवानगी दिलेली नव्हती तरीही, कोण कोणाशी जोडलेले आहेत याची माहिती काढली. तटस्थ, कुंपणावरच्या लोकांच्या मत्रयादीत कट्टर लोकांचा काही अंशी भरणा असेल तर त्यांच्यासमोर खोटय़ा बातम्या येतील याची सोय केली. २०१६ सालच्या अमेरिकी निवडणुकांत रशियन बॉट्सनी खोटय़ा बातम्या तयार केल्या. त्या कट्टर लोकांनी उचलून धरल्या, त्यामुळे खोटय़ा असूनही या बातम्या लोकांच्या मनात अडकून राहिल्या. निवडणुकांचे निकाल काय लागले, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ब्रेग्झिट, अमेरिका दोन्ही देशांत ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ला कंत्राट देणाऱ्या बाजू जिंकल्या. या गोष्टी उघड झाल्यावर ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ बंद पडली तरीही अशा गोष्टी करता येतात, याची माहिती सगळ्या जगासमोर उघड झाली आहे.

समाजमाध्यमांमुळे माध्यमांचं लोकशाहीकरण झालं. आपल्याला जे काही चारचौघांसमोर मांडायचं आहे ते संपादक, प्रकाशकांच्या आडकाठी/ कात्रीशिवाय मांडता येणं शक्य झालं आहे. प्रस्थापित माध्यमांची एकाधिकारशाही कमी होत आहे; ही बाजू साजरी आहे. मात्र प्रस्थापित माध्यमांमध्ये बातम्या येतात त्या खऱ्याखोटय़ाची शहानिशा करून येतात; किमान सभ्यपणाची मर्यादा पाळली जाते; निदान तशी अपेक्षा असते. आपण अजूनही समाजमाध्यमांमध्ये ज्या बातम्या दिसतात, त्या सगळ्या खऱ्याच आहेत असं धरून वर्तन करत आहोत. काश्मिरातला दहशतवाद संपावा, हे उद्दिष्ट ठेवण्यापेक्षा ‘त्या अमक्या पक्षाचा खातमा व्हावा’ असं मनात धरून बसलो आहोत.

314aditi@gmail.com

(लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2019 12:05 am

Web Title: social media in india 2
Next Stories
1 ‘पाकिस्तानची सरशी’ टाळणे महत्त्वाचे..
2 वाट चुकलेल्या दोघी
3 कृत्रिम प्रज्ञेच्या शाखा
Just Now!
X