१९६९ पासून दरवर्षी श्रावण शुद्ध पौर्णिमेचा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा दिवस हा ‘संस्कृत दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती’ म्हणून जिचा गौरव केला जातो, त्या संस्कृत भाषेचे महत्त्व विषद करणारा लेख..

संस्कृत हा शब्द ‘सम्+कृ’ (परिशुद्ध करणे) या धातूपासून तयार झाला आहे. संस्कृत म्हणजे व्याकरणाच्या संस्कारांनी परिशुद्धा केलेली भाषा. सम् या उपसर्गाचा अर्थ एकत्र करणे असाही होतो. संस्कृती आणि संस्कार या ‘सम्+कृ’ धातूपासून तयार झालेल्या शब्दात समूहाचे एकत्र येणे, काही कार्य करणे हा अर्थ व्यक्त होतो. संस्कृत ही अनेक भारतीय भाषांची जननी आहे व इतर /भारोपीय भाषांशी तिचे कमालीचे साम्य दिसून येते. भाषिक वैशिष्टय़े, परिपूर्ण व्याकरण व अगाध ज्ञान या गोष्टी संस्कृतला सर्व भाषांच्या मूर्धन्यस्थानी ठेवतात. संस्कृत शिकण्याने त्या भाषेची गुणवैशिष्टय़े शिकणाऱ्यामध्ये संक्रमित होतात. संस्कृत शिकल्याने इतर भारतीय भाषा शिकणे सोपे जातेच, शिवाय परदेशी भाषांचा अभ्यासही सुकर होतो.
संस्कृत ही मृतभाषा आहे असा आरोप नेहमीच संस्कृतवर केला जातो. संस्कृतमध्ये आजही मोठय़ा प्रमाणात वाङ्मयनिर्मिती होताना दिसते. ‘सुधर्मा’ हे दैनंदिन संस्कृत वार्तापत्र हे त्याचे ठळक उदाहरण आहे. काही प्रदेशांनी तर माध्यमभाषा म्हणून संस्कृतचा स्वीकार केला आहे. कर्नाटकातील मत्तुर, मध्य प्रदेशातील मोहाड व झिरी, राजस्थानमधील खाडा, कपेरा, गानोडा, उत्तर प्रदेशातील बावली, ओदिशामधील श्यामसुन्दरपुर यांना संस्कृत गावांचा दर्जा मिळालेला आहे. उत्तराखण्ड राज्याची संस्कृत ही कार्यालयीन कामकाजाची द्वितीय भाषा आहे. हजारो वर्षांपासून आजपर्यंत टिकून राहिलेल्या ‘अमृत’ भाषेला मृत म्हणणे कितपत सयुक्तिक ठरते? शिवाय भाषेच्या सर्वेक्षणानुसार जी भाषा किमान १०,००० लोक बोलतात ती मृत म्हणता येत नाही. आजमितीस भारतात संस्कृत बोलणाऱ्या लोकांची संख्या एक लाखाहून अधिक आहे.
संस्कृत भाषेची शास्त्रशुद्ध वर्णमाला हे संस्कृतचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. प्रत्येक वर्णाची उच्चारणस्थाने ठरलेली आहेत. जसे ‘क’चे कण्ठ, ‘व’चे दन्तोष्ठ इ. संस्कृतचे पाणिनिकृत व्याकरण हे संपूर्ण जगात परिपूर्ण व्याकरण म्हणून ओळखले जाते. ‘अष्टाध्यायी’ ग्रंथाची संरचना, स्वरूप, शैली पाहिल्यावर जगातील व्याकरणकार व भाषाशास्त्रज्ञ स्तिमित होतात. पाणिनीय व्याकरणावर आधारित अन्य भाषांची व्याकरणे तयार करण्याचे प्रयत्न सध्या ‘संगणकीय भाषाशास्त्र’ या नवोदित शाखेच्या अंतर्गत चालू आहेत. याद्वारे संगणकीय अनुवाद सहजशक्य होतो. संस्कृत ही अत्यंत लवचीक भाषा आहे. नवनवीन शब्दांची निर्मिती ही व्याकरणाच्याच साहाय्याने करता येते. आधुनिक काळातील शब्ददेखील संस्कृत भाषेत तयार करता येतात. कोणत्याही शास्त्रातील पारिभाषिक संज्ञा करताना प्रकृतिप्रत्ययाने सुघटित अशी संस्कृत भाषाच वापरली जाते. त्यामुळे इतर भाषांमधून शब्दांची उसनवारी करण्याची गरज संस्कृतला भासत नाही. उदा. पासपोर्ट- पारपत्रम् । सायकल-द्विचक्रिका ।
संस्कृत भाषेमध्ये असलेल्या विशाल वाङ्मयाची व्याप्ती लक्षात घेतली असता मन थक्क होते. वेदापासून ते आधुनिक कालापर्यंतचे हे साहित्य अनेकविध विषयांचा परामर्श घेणारे आहे. ‘संस्कृतोच्छिष्टं जगत्सर्वम्।’ असे म्हटल्यास काहीही वावगे ठरणार नाही. इतिहास, तत्त्वज्ञान, साहित्यशास्त्र, पुराकथा, गणित, भौतिकविज्ञान, रसायन, वनस्पतिशास्त्र या सर्वाविषयी विपुल ग्रंथसंपदा संस्कृत भाषेमध्ये आहे. त्यामुळेच ज्ञानभाषा म्हणून तिचा गौरव केला जातो.
सर्व ज्ञानशाखांचे उगमस्थान म्हणून ओळखले जाणारे ‘वेद’ हे संस्कृतमधील आद्यवाङ्मय म्हणून ओळखले जातात. साहित्य, विज्ञान, व्याकरण, भाषाशास्त्र, तत्त्वज्ञान, दैवतशास्त्र या सगळ्यांचाच उगम आपल्याला वेदांमध्ये पाहायला मिळतो. संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद् यांनी युक्त अशी वेदराशी म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानराशी होत.
भारतीय तत्त्वज्ञान हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ गणले जाते. न्याय-वैशेषिक, सांख्य-योग, पूर्वमीमांसा-उत्तरमीमांसा या षड्दर्शनांचे विश्वासंबंधीचे दृष्टिकोन हे संस्कृत ग्रंथामध्येच वाचायला मिळतात. ताíकक चर्चाच्या पलीकडे जाऊन अनुभूतीला जाऊन भिडणारे हे तत्त्वज्ञान अभ्यासायचे असेल तर ‘वेदान्ता’च्या अभ्यासाला पर्याय नाही. अनेक आचार्याची भक्तिपर स्तोत्रे, शंकराचार्याच्या बुद्धीला आव्हान देणारे खण्डनमण्डनात्मक भाष्य व त्याचबरोबर अंतिम तत्त्वाची विलक्षण अनुभूती देणारे विचार संस्कृतमध्येच ग्रथित आहेत.
हस्तलिखितशास्त्र ही एक दुर्लक्षित ज्ञानशाखा आहे. आजही संपूर्ण भारतात हजारो पोथ्या, बाडे मठामंदिरांत, ग्रंथालयांत पडून आहेत व त्यातील ज्ञान उजेडात आलेले नाही. या विषयाचा अभ्यास केल्याने नवनवीन संशोधनास नक्कीच वाव मिळू शकेल. हस्तलिखितांचे जतन, संवर्धन व त्यानंतर त्यात दडलेले हजारो वर्षांपूर्वीचे ज्ञान प्रकाशित करणे अशी अनेक कामे या ज्ञानशाखेशी संबंधित आहेत.
रामायण, महाभारत ही आर्षमहाकाव्ये, अष्टादश पुराणे व भास, कालिदास, भवभूति, बाण या कवींची ललितकाव्ये केवळ संस्कृत साहित्याचाच नव्हे तर भारतीय संस्कृतीचाही अनमोल ठेवा आहेत. अभिजात साहित्य तसेच पतंजली, शंकराचार्य, शबरस्वामी इत्यादिकांचे विचारप्रवर्तक भाष्यग्रंथ असे विपुल साहित्य शिकण्यामुळे मानवी जीवन सुसंपन्न होते. साहित्यशास्त्र हे सौंदर्यदृष्टी प्रदान करणारे शास्त्र आहे. भरतमुनींचे नाटय़शास्त्र हा साहित्यशास्त्रावरील आद्य ग्रंथ म्हणून
ओळखला जातो. नृत्य, संगीत, साहित्य यांचे जाणकार त्याचप्रमाणे विविध कलाकारांनी व कलेचा खऱ्या अर्थाने ज्यांना आस्वाद घ्यायचा आहे, अशा रसिकांनीदेखील संस्कृत काव्यशास्त्राची परंपरा निश्चितच
अभ्यासावी.
‘तौलनिक पुराकथाशास्त्र’ हा अत्यंत रंजक विषय आहे. विविध संस्कृतींतील मिथकांचा शास्त्रशुद्ध अभ्यास या विषयांतर्गत केला जातो. सर्जनकथा, प्रलयकथा या जवळजवळ सर्वच संस्कृतींचा अविभाज्य भाग असल्याचे दिसून येते. त्यातील साम्यस्थळे पाहून आपण अचंबित तर होतोच, शिवाय अशा मिथकांकडे पाहण्याचे ज्ञानचक्षूच या शाखेच्या अध्ययनाने प्राप्त होतात.

(लेखिका मुंबई विद्यापीठात संस्कृत विभागाच्या प्रमुख आहेत.)