चायना! चायना!! चायना!!! अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री पॅट्रिक शानान यांनी पदभार स्वीकारताच पेंटागॉनमधील कर्मचाऱ्यांना दिलेला हा संरक्षणमंत्र. त्याच्या दुसऱ्याच दिवशी – ३ जानेवारीला चीनने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात मैलाचा दगड रोवला. चीनचे चांग ई४ चांद्रयान चंद्राच्या पृथ्वीपासून दूरच्या म्हणजे आपल्याला न दिसणाऱ्या भागावर उतरले. चीनने अशी चांद्रभूमी काबीज केली आहे, जिथे पाऊल टाकण्याचे स्वप्न अमेरिकेने स्वप्नातही पाहिले नव्हते.

अमेरिका-ब्रिटनमधल्या बहुतेक वर्तमानपत्री विश्लेषणांनी चीनच्या चांद्रमोहिमेला ‘स्पेस वॉर’ संबोधून चिंताराग आळवला आहे. भाकितांमधून भीती व्यक्त केली आहे, तर अंदाजांतून आडाखे बांधण्याचा प्रयत्नही केला आहे. असे करताना तज्ज्ञांचे हवाले देऊन आपली बाजू सुरक्षित केली आहे. जे आपल्याला वाटते ते इतरांकडून वदवून घेण्याचा किंवा बातमीची दुसरी बाजू विश्लेषणातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

चीनची महासत्तेची महत्त्वाकांक्षा हा जगाच्या चिंतनाचा तर अमेरिकेच्या चिंतेचा विषय. म्हणून तिथल्या वर्तमानपत्रांनी चीनच्या चांद्रमोहीमेकडे कसे पाहिले? चीनची इतरांना मागे टाकण्याची महत्त्वाकांक्षा अधोरेखित झाली आहे, अशी टिप्पणी ‘न्यू यॉर्क टाइम्स’ची बातमी करते. पण मूळ घटना सांगितल्यानंतर, या वृत्तात, चीनने अमेरिका आणि रशियालाही मागे टाकले, असे चुचकारलेही आहे. शिवाय, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग आणि इतर क्षेत्रांमधील अमेरिकेच्या वर्चस्वाला चीन आव्हान देऊ  शकतो, असे भाकीतही वर्तवले आहे. त्याच्या पुष्टय़र्थ चीनच्या अंतराळ कार्यक्रमाशी निगडित मकाऊ  विज्ञान-तंत्रज्ञान विद्यापीठातील प्रा. झू मेंघुआ यांचे, ‘‘आम्ही जे केले आहे ते करण्याची हिंमत अमेरिकेनेही दाखवली नाही,’’ हे अवतरणही उद्धृत केले आहे.

चीनच्या या चांद्रशोध अध्यायामुळे विश्वव्युत्पत्ती आणि सूर्यमालेच्या प्रारंभिक टप्प्याचा शोध घेणे शक्य आहे, असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ची बातमी म्हणते, पण ती पुढे मात्र, ‘‘चीनच्या जागतिक शक्ती बनण्याच्या मनसुब्यांवर प्रकाश पडला,’’ असे मतही मांडते. पोस्ट..मधल्या ‘न्यू स्पेस पॉवर इज बॉर्न’ किंवा ‘द न्यू स्पेस रेस पिट्स द यूएस अगेन्स्ट चायना’ या विश्लेषणात्मक लेखांच्या मथळ्यांवरूनही ही चांद्रस्वारी किती गंभीरपणे घेतली जात आहे, याची कल्पना येते.

‘वॉशिंग्टन टाइम्स’ने चीनच्या चांद्रउडीचे विश्लेषण करण्यासाठी अमेरिकेचे माजी संरक्षण उपमंत्री जेड बॅबीन यांचा लेख प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेची लष्करी मदार उपग्रह यंत्रणेवर अवलंबून असल्याकडे लक्ष वेधत चीनच्या अवकाश मोहिमेमुळे अमेरिकेच्या उपग्रहाधारित लष्करी दळणवळण यंत्रणेला धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

ब्रिटनच्या ‘टेलिग्राफ’ने २०३० पर्यंत अवकाशातील महाशक्ती होण्याचे चीनचे ध्येय आहे, असे निरीक्षण नोंदवले आहे. चीनच्या महासत्तेच्या हव्यासातून ब्रिटनसह जगालाही धोका निर्माण होत आहे, अशी भीतीही आणखी एका वृत्तात व्यक्त केली आहे. ‘संडे एक्स्प्रेस’ने चीनच्या या मोहिमेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न प्रसिद्ध संरक्षणतज्ज्ञ डॉ. माल्कम डेव्हिस यांच्या विश्लेषणात्मक लेखातून केला आहे. त्यांनी ‘चीन अ‍ॅण्ड यूएस अ‍ॅट वॉर’ असे निरीक्षण नोंदवले आहे. ते म्हणतात, ‘‘चीन ही एक उगवती महासत्ता आहे आणि ती स्पष्टपणे अमेरिकेला आव्हान देत आहे.’’

‘‘लॅण्डिंग ऑफ फारसाईड ऑफ मून मार्क्‍स स्टार्ट ऑफ चायनाज स्पेस रेस विथ यूएस’ असे दर्पोक्तीयुक्त वृत्त ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ने दिले आहे. तर ‘पीपल्स डेली’ या चीनच्या मुखपत्राने चंद्राच्या शोधमोहिमेतील नवा अध्याय खुला झाल्याचे म्हटले आहे.

चांग ई ४ने पाठवलेले चंद्राच्या त्या भागाचे पहिले छायाचित्र जगभरातल्या वर्तमानपत्रांमध्ये झळकले, पण ‘पीपल्स डेली’च्या पहिल्या पानावरचे मोठे छायाचित्र होते, बीजिंग एरोस्पेस कंट्रोल सेंटरमधल्या संशोधकांच्या जल्लोषाचे.. आणि चौकटीत होता चंद्राचा तांबूस, खडबडीत पृष्ठभाग. चंद्र छोटा झाला होता. पृथ्वीवरून दिसतो तेवढा. काय अर्थ असावा या दोन छायाचित्रांचा? ‘‘चंद्र आमच्यासाठी लहानशी गोष्ट आहे, आता सारे अंतराळ आमचे आहे..’’ या क्षेत्रातली चीनची काही वर्षांतील भरारी पाहिली आणि पुढील अंतराळ कार्यक्रमावर कटाक्ष टाकला तर याची प्रचीती येते.

‘‘शत्रूला गोंधळात टाका, त्याची दिशाभूल करा आणि आश्चर्याचा धक्का द्या,’’ सून झू या चिनी योद्धय़ाने सहाव्या शतकात सांगितलेलं युद्धकलेतलं हे वचन. पण चीनने अमेरिकेला खरोखर गोंधळात टाकलं आहे की थेट आव्हानच दिलं आहे?

संकलन : सिद्धार्थ ताराबाई