या इरफान खानचं काहीतरी करायला हवं. टीव्हीवरच्या सर्व्हिस टॅक्सची जाहिरात इतकी क्लासी करू शकणारा फक्त तोच असू शकतो. आवाज, डोळे आणि चेहऱ्यावरची प्रत्येक रेषा हे त्याच्या अभिनयाचं भांडवल. तो नवाझउद्दीन सिद्दीकी त्यातलाच. भूमिकेसाठीची तयारी, कष्ट असं काही करावं लागतच नसावं त्याला. घरातल्यासारखा दिसतो आणि वागतोही तसाच. निम्रत कौरचं कॅडबरीच्या जाहिरातीतलं नुसतं स्मितही लक्षात राहणारं. इथं तर ती पडदाभर वावरणारी. नुसत्या आवाजी अभिनयानंही एक सुरेख व्यक्तिरेखा साकारता येते, यावर विश्वास ठेवायला लावणारी भारती आचरेकर. हे सगळं अकल्पित, हळुवार आणि मऊमुलायम असं वाटायला सुरुवात होते, तो क्षण ‘लंचबॉक्स’ पडद्यावर साकारायला लागतो, तेव्हाचा.
डब्यातून चिठ्ठी येणार याची खात्री असतानाही, ती काढून ठेवायचं लक्षात न आल्यानं निवृत्तीच्या वयातली तारांबळ किती तरल असू शकते! घडलं आहे, ते सहजपणे, कुणाच्याही बाबतीत घडेल असं. म्हणजे नवऱ्यासाठी पाठवलेला डबा भलत्याच माणसाच्या हाती पडतो. पत्नीचं निधन झाल्यानंतर तरकटलेल्या स्वभावाच्या एका अतिशय नेक काम करणाऱ्या टिपिकल हेड अकौन्टन्टच्या हाती तो पडतो आणि चित्रपट सुरू होतो. मुंबईतल्या डबेवाल्यांची तारांबळ आणि त्यातून घडलेली एक अतिशय तरल अशी साधीसुधी प्रेमकथा. मुलगी शाळेत गेली की डबा बनवण्यासाठीची धावपळ करणारी इला आणि अचानकपणे आलेल्या डब्यामुळे जिभेवर जन्माला आलेल्या चवीनं आयुष्यात काही घडण्याची नव्यानं शक्यता निर्माण झालेला साजन फर्नाडिस यांच्यातील हे बंध किती संवेदनशील बनू शकतात! म्हणजे चिठ्ठय़ांची बरीच पाठवापाठवी झाल्यानंतर जेव्हा भेटायलाच हवं, अशी असोशी वाटायला लागते, तेव्हाही ती भेट प्रत्यक्ष टाळून इलाला दुरून पाहून समाधानी वाटणारा हा साजन आपल्या चित्रपटातला हीरो असूच शकत नाही.
इलाचा नवरा मुंबईतल्या कोणत्या तरी ऑफिसमध्ये काम करतोय. कामाच्या ताणानं दबल्यामुळे बायकोकडे लक्ष देण्याचीही इच्छा नसणारा.. (इलाला मात्र तो बाहेर कुठेतरी गुंतल्याचा उगीचच संशय आहे) पुरुषाच्या पोटातूनच त्याला जिंकता येतं, यावर ठाम विश्वास असणाऱ्या इलाला वरच्या मजल्यावरच्या काकू डबा चवदार करण्यासाठी तिला स्वैंपाकात मदत करत राहतात. मोठय़ा प्रेमानं केलेला डबा भलत्याच माणसाकडे पोहोचल्याचं लक्षात आल्यावर कोणत्याही सामान्य गृहिणीनं तक्रार करून तो नवऱ्यापर्यंत पोचण्यासाठी कष्ट केले असते. इलाला तसं करावंसं वाटूनही ती काही करत नाही. मनात काहीतरी घडू लागलंय, पण कळत नाहीये तिला. डबा घरी आल्यावर तो सगळा संपवलाय का, याचाच घोर असणाऱ्या इलाला त्यात चिठ्ठी मिळते आणि लक्षात येतं, काय घोळ झालाय तो. मग तीही चिठ्ठी पाठवायला लागते. खाणारा कोण आहे, हे माहीत नसतानाही. चिठ्ठी तशी साधीसुधीच. म्हणजे अनपेक्षित वगैरे काही नाही. मनातली उबळ व्यक्त करण्यासाठीचा प्लॅटफॉर्मच तो. मग कधी नवऱ्याच्या लफडय़ाचा किंचितसा उल्लेख, कधी दीर्घ आजारानं अंथरुणाला खिळलेल्या वडिलांची आणि त्यामुळे अस्वस्थ असलेल्या आईची गोष्ट त्यातून पोहोचते, तर कधीतरी साजनही त्याच प्लॅटफॉर्मवर आपल्या पत्नीच्या हळव्या आठवणीनं व्याकूळ करणाऱ्या शब्दांना कुरवाळत बसलेला.
कोण कुठले दोन जीव असे अवचित केवळ शब्दांतून व्यक्त होत एकमेकांना असोशीने भेटत राहतात. पोळीच्या बरोबर चिठ्ठी असते, हे तर आता ठरलेलंच. एरवी कामात व्यग्र असतानाही डब्यातल्या सुग्रास पदार्थाचा गंध आणि त्याहीपेक्षा बरोबर येणारी चिठ्ठी यानं साजन फर्नाडिस अक्षरश: मोहरून गेलेला. डबा खायच्या वेळी बरोब्बर टपकणारा शेखही आता डब्याचा वाटेकरी झालेला. तो येणार हे माहीत असतानाही, चिठ्ठी काढून घेण्याचं विसरलेला साजन त्या शेखच्या नजरेत असा काही जेरबंद होतो की, त्यानं उडालेली तारांबळ लपवणंच अशक्य व्हावं. घरासमोर खेळणाऱ्या लहान मुलांना दरडावणारा साजन मग हळूचकन त्या मुलांशी गोड बोलायला लागतो.. माणूसघाणा म्हणून असलेली ओळख पुसत मग वटवटय़ा शेखचं आयुष्य त्याच्या घरी जाऊन पाहायचं ठरवतो. हा सारा बदल करपलेल्या साजनसाठी नवा तर असतोच, पण हवाहवासाही असतो. गृहिणी असलेल्या इलाला हे सगळं न पेलणारं असं. म्हणजे नवऱ्याला पाठवलेला डबा दुसराच कोणी खातोय आणि वर आपली मनापासून तारीफही करतोय, एवढय़ानं हुरळून जाण्याएवढा अल्लडपणाही जड व्हावा असं.
आपल्याला काही सांगायचंय आणि ते कुणीतरी ऐकतोय, याचंच समाधान अधिक वाटणारी इला आणि साजन यांची भेट हाच खरंतर कथेचा क्लायमॅक्स. साजन तर दोनदोनदा दाढी करून, ठेवणीतला कोट घालून, ठरलेल्या हॉटेलमध्ये पोचलेलाही आहे. इला तर आधीपासूनच त्याची वाट पाहत पाण्याचे ग्लास रिचवत बसलेली आहे. आता भेट होणार आहे. गेले अनेक दिवस चिठ्ठय़ांमधून एकमेकांना, त्यांच्या स्वभावांना, आवडीनिवडींना, राग-लोभाच्या गोष्टींना समजावून घेतल्यामुळे ही भेट म्हणजे एक सोपस्कारच असणार आहे. साजनला ती दिसतेय. ती मात्र त्याला ओळखू शकलेली नाही. केवढं तरी धैर्य एकवटून एखाद्याला भेटण्यासाठी एकटीनं इराण्याच्या हॉटेलात जाण्याएवढी ती धीट नक्कीच नाही. म्हणजे नवऱ्याला सहजपणे हनीमूनची आठवण करून देत कुठंतरी जायचं का, असं सुचवतानाही केवढी शर्मिदगी. तो तिला पाहूनही भेटत नाही. न भेटणं हाच या कथेचा उत्कर्षिबदू. इलाला न भेटता गाव सोडून नाशिकला जाण्याचा निर्णय घेणारा साजन आणि इकडे त्याला भेटण्यासाठी धडपणारी इला यांची ही प्रेमकथा सुफळसंपूर्ण होत नाही. तसं काही होण्याची गरजही नाही. ज्या जेवणाच्या डब्यानं दोन आयुष्यात तरंग उमटवले, तो डबा हाच खरा हीरो. त्याला मदत करायला मग आहेत हे तिघेजण. प्रत्येकाची स्वतंत्र अशी कहाणी. तिला नानाविध भावनांचे पदर. एकमेकांत गुंतू न शकणाऱ्या या पापुद्रय़ांची सरमिसळ इतक्या बेमालूमपणे होते आहे की हे तिघेजण वेगळे असून एकाच त्रिकोणाचे तीन कोन आहेत, असं वाटत राहावं. एरवी रसहीन वाटणारा साजन चवीनं बदलतोय आणि नव्या नवरीला सांभाळण्यासाठी अस्लमला नोकरी टिकवण्यासाठी वाटेल ते करावं लागतंय. नवरा आणि मुलगी एवढा संसारही कितीतरी जड वाटावा, अशा अवस्थेतल्या इलाला मनात चलबिचल होत असल्याचा भास होतोय.
पडदा भरून उरलेली ही गोष्ट कशी संपते कळत नाही. हवेत अलगदपणे उडणारा म्हातारीचा कापूस मनभर विखरतो. म्हणालात तर प्रेम, म्हणालात तर भावनांचा आवेग. काही म्हणायला हवंच असंही नाही, अशी काहीशी गोची, रितेश बात्रा नावाच्या एका तरुणानं केलेली. सिनेमा दाखवायचा असतो, तेवढाच तो लिहायचाही असतो, याची जाणीव करून देणारी. प्रत्येक चौकट अर्थगर्भ आणि सहजपणे उभारलेली. शब्दांची गरज अगदी स्वैंपाकातल्या मिठाएवढीच. बहुतेक सगळं तरल आणि शब्दाविनाच समजणारं. चित्रपट नावाच्या गोष्टीशी लगडलेल्या परंपरागत प्रतिमेशी फारकत घेत एक सुंदर अनुभव साकारणारा हा पडदा कवितामय होऊन जाणारा. केवळ नजरेत सामावणारी अंतर्मनातली खळबळ आणि छोटय़ाशा गोष्टीही अर्थगर्भ करणारी ही ‘लंचबॉक्स’ खायची गोष्ट नाही!