भारताच्या ‘आत्मसंतुष्ट’ करोना-हाताळणीवर टीका करणाऱ्या टाइम, बीबीसी, न्यू यॉर्क टाइम्स आदी प्रसारमाध्यमांना ‘भारतविरोधी’ ठरविण्याची घाई कुणी न करणेच इष्ट; कारण या अथवा अन्य माध्यमांनी वाढत्या करोनाचे वार्तांकन करताना, आपापल्या वा अन्य देशांतील नेत्यांचीही गय केली नव्हती! करोनाच्या पहिल्या तडाख्याने जागतिक नेते आणि त्यांचे प्रशासन, युरोपातील अत्याधुनिक, अद्ययावत आरोग्य यंत्रणा लुळ्या पडल्याच; पण दुसऱ्या लाटेआधी जबाबदार वर्तनाची अपेक्षा असलेले काही राष्ट्रप्रमुख बेजबाबदार आणि बेताल वागले. शास्त्रज्ञांच्या इशाऱ्यांना धुडकावून प्रशासकीय हुजऱ्यांचे सल्ले शिरसावंद्य मानले गेले. काही आत्ममग्न राहिले, तर काही आत्मसंतुष्टतेत रमले. परिणामी अमेरिका, युरोप व आता भारतही दुसऱ्या भयावह लाटेच्या तडाख्यात सापडला. त्या-त्या वेळी, जागतिक माध्यमे जागरूक होती…

‘नाताळच्या मेजवान्यांची किंमत आपल्याला जानेवारी आणि फेब्रुवारीत मोजावी लागेल. वर्तणुकीत मोठ्या प्रमाणावर बदल केला नाही, तर दोन महिन्यांनी टाळेबंदी अटळ आहे. कारण विषाणूला नाताळची पर्वा नसते’ – ब्रिटनमधील एडिंबरो युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलच्या प्रा. देवी श्रीधर यांनी डिसेंबर- २०२०च्या पहिल्या आठवड्यात ‘न्यू यॉर्क टाइम्स’शी बोलताना ही इशारावजा टिप्पणी केली होती. युरोपातल्या दुसऱ्या लाटेचे विश्लेषण करणारा वृत्तान्त ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केला होता. अमेरिकेत रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना युरोपातील आरोग्य यंत्रणा कठोर टाळेबंदीमुळे पहिल्या लाटेतून सावरू लागली होती. परंतु युरोपातले वातावरण उबदार होऊ  लागले होते. युरोपीय महासंघ सीमा खुल्या करण्यासाठी व नागरिक टाळेबंदीतून सूट मिळवण्यासाठी उतावीळ झाले होते. परंतु त्याची किंमत त्यांना मोजावी लागली, अशी खंत या वृत्तलेखात व्यक्त करण्यात आली होती. सर्व काही खुले केले तर अर्थव्यवस्था वेगाने सावरेल, अशा भ्रमात राहून अनेक देशांनी धोरणे आखली आणि ती त्यांना महागात पडली, असे भाष्यही या लेखात केले आहे.

युरोपला दुसरी लाट टाळता आली असती, परंतु तेथील सरकारे बेफिकीर झाली आणि ती आत्मसंतुष्टतेत अडकली, असे निरीक्षण ‘फोब्र्स’ नियतकालिकाचे आरोग्य विश्लेषक जोशुआ कोहेन यांनी नोंदवले होते. उन्हाळ्यात आणि शरद ऋतूच्या सुरुवातीस निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले. सप्टेंबरमध्ये हवामान थंड होताच, जेथे विषाणूचा फैलाव सहजतेने होऊ शकेल अशा ठिकाणी- म्हणजेमद्यालये, रेस्तराँ, कार्यालयांमध्ये लोक जाऊ लागले. परिणामी दुसऱ्या लाटेने कहर माजवला, असे कोहेन यांनी म्हटले होते.

तुर्की सरकारचे ‘प्रसिद्धीयंत्र’ अशी ओळख असलेल्या ‘अनादोलू एजन्सी’ या वृत्तसंकेतस्थळाने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या करोना गैरव्यवस्थापनावर बोट ठेवणारा एनेस गुझेल या ‘वर्ल्ड रिसर्च सेंटर’च्या संशोधकाचा लेख प्रसिद्ध केला होता. त्याचा रोख प्रामुख्याने अस्पष्ट रणनीती आणि कृतीतील विलंब यांवर होता. कोणत्याही सरकारप्रमाणे ब्रिटिश सरकारही साथीचा सामना करण्यासाठी सज्ज नव्हते. जॉन्सन यांच्या दृष्टिकोनामध्येच दोष होता, अशी टीका या लेखात होती. मात्र ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांनीही- ‘‘पहिल्या काही महिन्यांत सरकारला करोना संकटाचे आकलन झाले नाही,’’ असे ‘बीबीसी’कडे मान्य केले होते. ‘‘आम्ही वेगळ्या प्रकारे काही करू शकलो असतो,’’ अशी कबुलीही त्यांनी ‘बीबीसी’च्या राजकीय संपादक लॉरा क्यीन्सबर्ग यांच्याशी बोलताना दिली होती. त्याचा अर्थ लावताना लॉरा यांनी- ‘साथीच्या काळातील अनुभवांचा उपयोग जॉन्सन यांना आपल्या राजकीय कार्यक्रमाचा वेग वाढवण्यासाठी करायचा आहे. प्रामुख्याने हुजूर पक्षाला प्रथमच भरभरून मते देणाऱ्या मतदारांच्या जीवनात बदल घडवण्याचा त्यांचा मानस दिसतो,’ अशी टिप्पणी केली होती!

‘‘मृत्युदर उच्चांकी पातळीवर असताना ब्राझीलचे अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांची बेफिकिरी कायम होती, असे ‘अमेरिकाज्’ त्रैमासिकाने मार्च अंकातील लेखात म्हटले आहे. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे केवळ ब्राझीललाच नव्हे, तर जगाला धोका आहे. त्यामुळे जो बायडेन यांच्यासह अन्य जागतिक नेत्यांनी त्यांच्यावर दबाव आणून प्रभावी धोरणे राबवण्यास भाग पाडावे, अशी सूचनाही या लेखात होती. ब्रिटनच्या ‘द कॉन्व्हर्सेशन’ या वृत्त संकेतस्थळानेही ब्राझीलमधील एका करोना रुग्ण कक्षाच्या छायाचित्रासह प्रसिद्ध केलेल्या वृत्तलेखात, ‘‘अध्यक्ष बोल्सोनारो यांच्यामुळे त्या देशात एक शोकांतिका निर्माण होऊन त्याचे जागतिक दुष्परिणाम संभवतात,’’ असा इशारा देण्यात आला आहे. भारतातील करोना-हाताळणीविषयी केंद्रीय नेतृत्वावर टीका होते आहे, ती या साऱ्यानंतर!

(संकलन : सिद्धार्थ ताराबाई)