गेल्या आठवडय़ात अमेरिकेच्या न्यायालयीन इतिहासात एक क्रांतिकारी पान लिहिले गेले. एका २६ वर्षीय कृष्णवर्णीय तरुणाला त्याच्या घरात घुसून ठार मारणाऱ्या महिला पोलिसाला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्याच्या निकालातून कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या, परंतु नेहमी शासकाच्या मस्तीत वावरणाऱ्या आणि कृष्णवर्णीय तरुणांना ‘लक्ष्य’ करणाऱ्या श्वेतवर्णीय पोलिसांना इशारा मिळाला. या निकालाचे वर्णन काही माध्यमांनी ‘ऐतिहासिक’ असे केले आहे.

घडले असे की, टेक्सास प्रांतातील डॅलस शहरात बॉथम जीन रात्रीचे जेवण वगैरे उरकून आइस्क्रीम खात बसला होता. इतक्यात अँबर गायगर त्याच्या घरात घुसली आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हा खटला विरळा का ठरतो, याचे स्पष्टीकरण ‘सीएनएन’ वृत्तवाहिनीच्या ऑनलाइन आवृत्तीतील लेख देतो. कृष्णवर्णीयांना लक्ष्य करणारे अनेक गुन्हे अलीकडे पोलिसांनी केले. परंतु त्यातून ते निर्दोष सुटले. काहींवरचे आरोप रद्द केले गेले, काही ठोस पुराव्यांअभावी वाचले, काहींचा बचाव मान्य केला गेला, असे या लेखात म्हटले आहे.

या खटल्याच्या निकालानंतर ‘..अखेर पोलिसांचे प्राणघातक कृत्य दोषी ठरले’ अशा शीर्षकाचे संपादकीय ‘लॉस एंजेलस टाइम्स’ने प्रसिद्ध केले. ‘गेल्या अनेक वर्षांत कृष्णवर्णीय तरुणांवर पोलिसांनी केलेल्या ‘हाय-प्रोफाइल’ गोळीबारांचा पाढा वाचणे म्हणजे भीती आणि दडपशाही कृत्यांची आठवण उगाळण्यासारखे आहे. पोलीस निरपराधांचा जीव घेण्यासारख्या चुका करतात. त्यांचे काही गुन्हे तर अट्टल गुन्हेगारांनाही लाजवणारे असतात. निष्पाप तरुणाला त्याच्या घरात घुसून ठार मारणे, हा गुन्हाही त्यापैकीच एक. बॉथम जीन हत्या खटल्यातून मोठा बदल घडेल, असे समजणे गैर आहे; परंतु किमान योग्य संदेश तरी जाईल,’ अशी टिप्पणीही अग्रलेखाच्या शेवटी केली आहे.

आरोपी अँबर गायगरला कमीतकमी २८ वर्षांची शिक्षा सुनावण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली होती. या संदर्भात खटल्यातील १२ न्यायाधीशांपैकी दोघांनी ‘एबीसी न्यूज’च्या ‘गुड मॉर्निग अमेरिका’ कार्यक्रमात निकालामागील भूमिका मांडली. त्यापैकी एक न्यायाधीश कृष्णवर्णीय महिला, तर दुसरा श्वेतवर्णीय पुरुष होता. हा पुरुष न्यायाधीश मुलाखतीत म्हणतो की, ‘अँबरने केलेली हत्या ही तिच्या हातून घडलेली चूक होती. त्याबद्दल आम्ही तिला यापेक्षा मोठी शिक्षा सुनावली असती तरी बॉथम परत येऊ शकत नव्हता. तिने गुन्हय़ाची कबुली दिली. दहा वर्षांनंतर ती आपले आयुष्य नव्याने सुरू करू शकेल.’ तर कृष्णवर्णीय न्यायाधीश म्हणाली, ‘आरोपीला जसा गुन्हा तशी शिक्षा आम्ही सुनावली पाहिजे, अशी अपेक्षा होती; पण बॉथमविषयी लोक जे काही सांगत होते, त्यावरून त्यानेही आरोपीला क्षमा केली असती, असे आम्हाला वाटले.’

निकालाचे वाचन सुरू असतानाच बॉथमच्या १८ वर्षांच्या भावाने न्यायाधीशांच्या परवानगीने आरोपी अँबरला आलिंगन दिले आणि ‘तुला आम्ही क्षमा केली आहे, तू तुरुंगात जावे असे आम्हाला वाटत नाही,’ असे भावुक उद्गार भर न्यायालयात काढले. आपल्या भावाची हत्या करणाऱ्यास आलिंगन देऊन क्षमा करणारा भावनिक क्षण हीसुद्धा एक स्वतंत्र ‘ह्य़ुमन इंटरेस्ट स्टोरी’ ठरली. अनेक माध्यमांनी आपल्या वाचकांना या भावनिक प्रसंगाची शब्ददृश्यात्मक अनुभूती दिली. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने तर ‘न्यायालयातले भावनिक क्षण ‘बॉथमलाही जगायचं होतं’ हे सत्य बदलू शकत नाहीत,’ अशी टिप्पणी केली.

हे सदर लिहीत असतानाच या खटल्यातील महत्त्वाच्या साक्षीदाराची हत्या झाल्याची बातमी थडकली. बॉथम जीनचा शेजारी जोशुआ ब्राऊन या आणखी एका कृष्णवर्णीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

पोलिसांच्या भीतीचा बळी ठरलेला मायकेल ब्राऊन, बंदूक खेळण्यातली आहे हे सांगत असतानाच पोलिसांनी ठार मारलेला १४ वर्षांचा तमिर राइस, स्वसंरक्षणासाठी बंदूक मोटारीत बाळगली म्हणून हत्या झालेला फिलँडो कॅस्टाइल, मोबाइलवर बोलत असताना मारला गेलेला स्टीफन क्लार्क.. हे सर्व तरुण कृष्णवर्णीय होते. पोलिसांनी केवळ संशय आला म्हणून, भीती वाटली म्हणून किंवा चुकून केलेल्या त्या हत्या होत्या. ते पोलीस अधिकारी सहीसलामत सुटले. म्हणून बॉथमला चुकून गोळ्या घातल्याचा आणि आपल्या मनात कोणताही द्वेष नसल्याचा बचाव करणाऱ्या अँबर गायगर बाईंना तुरुंगात पाठवणारा हा निकाल विरळा ठरतो. ती आणि पोलीस अधिकारी असलेल्या तिच्या विवाहित प्रियकरात झालेली मोबाइल संदेशांची देवाणघेवाण हा तिच्या मनातील वर्णद्वेषाचा पुरावा ठरला.

संकलन : सिद्धार्थ ताराबाई