यादवीग्रस्त सीरियाच्या उत्तर सीमेवरून सैन्य माघारी बोलावण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर तेथील माध्यमांत चर्वितचर्वण सुरू आहे. काहींनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य केले आहे, तर काहींनी त्यांच्या निर्णयाचे समर्थन. काहींच्या दृष्टीने ट्रम्प यांनी घेतलेली माघार म्हणजे एक प्रकारची हार आहे, तर काहींच्या मते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना दिलेले मोकळे रान आहे.

‘पुतिन इज द न्यू किंग ऑफ सीरिया’ असे भाष्य या विषयाचे तज्ज्ञ आणि ‘डेज् ऑफ द फॉल : ए रिपोर्टर्स जर्नी इन द सीरिया अ‍ॅण्ड इराक वॉर्स’ या पुस्तकाचे लेखक जोनाथन स्पायर यांनी ‘द वॉलस्ट्रीट जर्नल’मधील लेखात केले आहे. तुर्कीला उत्तर सीरियावर आक्रमण करण्यास अमेरिकेने जणू हिरवा कंदील दाखवून एकाच झटक्यात मध्य-पूर्वेतील शक्तीसंतुलन बिघडवले आहे. यात रशियाचीच सरशी झाली आहे, अशी टिप्पणीही स्पायर यांनी केली आहे.

ज्या दिवशी अमेरिकेचे लष्कर उत्तर सीरियातून माघारी परतू लागले, त्याच्या दुसऱ्याच दिवशी तेथील रशियन सैन्याने ईशान्य सीरियातील मनबीज शहराकडे कूच केले. याच अनुषंगाने अमेरिकेचे माजी विशेष दूत ब्रेट मॅक्गर्क यांनी-सैन्य माघारीचा निर्णय ही रशिया, इराण आणि आयसिसला दिलेली भेट आहे, अशी टीका केली. पाकिस्तानातील ‘डॉन’ने प्रसिद्ध केलेला कॉन्स्टॅटिन एगर्ट यांचा लेखही ब्रेट मॅक्गर्क यांचीच री ओढतो; परंतु अमेरिकेची ही भेट रशियासाठी गुंतागुंतीची ठरू शकते, असा इशारा देतो.

सीरियातील माघार ही डावपेचात्मक गंभीर चूक असल्याचे मत रिपब्लिकन नेते आणि सिनेट सदस्य मिच मॅकॉनेल यांनी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मधील लेखात मांडले आहे. सैन्यमाघारीमुळे एक राष्ट्र म्हणून अमेरिका आणि अमेरिकी नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल; शत्रू उचल खातील आणि अन्य देशांशी असलेल्या मित्रत्वाच्या संबंधांमध्ये बाधा येईल, असेही मॅकॉनेल म्हणतात. त्यांनी ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाची तुलना ओबामा प्रशासनाच्या इराकमधून सैन्य माघारी बोलावण्याच्या निर्णयाशी केली आहे. ओबामा प्रशासनाच्या इराकबाबतच्या विवेकशून्य कृतीमुळे ‘इस्लामिक स्टेट’चा उदय झाला, असे ते म्हणतात. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने आपल्या संपादकीय टिप्पणीतही सैन्यमाघारीच्या निर्णयाचे वर्णन ‘न सुधारता येणारी घोडचूक’ असे केले आहे.

सैन्यमाघारीच्या निर्णयावर टीका करणारी काही माजी लष्करी अधिकाऱ्यांची मते ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केली आहेत. कॅप्टन अ‍ॅलन केनेडी सीरियात सेवा बजावून नुकतेच परतले. ते म्हणतात : ‘नरसंहार रोखण्यासाठी मी लष्करात दाखल झालो होतो. परंतु संपूर्ण सैन्य माघारीमुळे आम्ही आमच्या कुर्द सहकाऱ्यांना वाऱ्यावर सोडून टर्कीच्या हवाली केले आहे.’ अमेरिकेचे आणखी एक माजी लष्करी अधिकारी अ‍ॅडमिरल विल्यम मॅक्रेवन यांनीही ट्रम्प यांच्यावर हल्ला चढवला आहे. ते म्हणतात, ‘आमच्या अध्यक्षांकडूनच राष्ट्राला धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेला आवश्यक असलेले नेतृत्वगुण ट्रम्प यांनी दाखवले नाहीत, तर ओव्हल ऑफिसमध्ये नवा माणूस बसवण्याची हीच वेळ आहे, असे समजावे लागेल.’

सैन्यमाघारीचे समर्थनही काही नियतकालिकांनी केले आहे. ‘नॅशनल रिव्ह्य़ू’ या नियतकालिकाच्या संकेतस्थळाने मॅथ्यू कॉन्टीनेटी या तज्ज्ञाचा ‘द एण्डगेम इन सीरिया’ हा लेख प्रसिद्ध केला आहे. त्यात ते म्हणतात, ‘ट्रम्प यांनी अमेरिकी सैन्याला अशा देशातून माघारी बोलावले आहे, जेथे ते कधीही नव्हते. सीरियातून घाईघाईने बाहेर पडण्याचे ट्रम्प यांच्या निर्णयाचे बीज २०११ मध्ये झालेल्या तेथील पहिल्या उठावात आहे. त्या वेळी निर्णायक कृती करणे आवश्यक होते, परंतु आम्ही ती केली नाही.’ कारण- ‘अमेरिकेतील लोकप्रिय किंवा उच्चभ्रू वर्तुळाला मध्य-पूर्वेत युद्ध नको असे वाटत होते आणि राजकीय नेतृत्व नेहमीच लोकानुनय करते,’ अशी टिप्पणीही कॉन्टीनेटी यांनी केली आहे

‘सीएनएन’ वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील लेखात निवृत्त लष्करप्रमुख वेजली क्लार्क यांनी ट्रम्प यांनी आपत्तीला आमंत्रण दिल्याची टीका केली आहे. सैन्यमाघारीमुळे अमेरिकेच्या जागतिक प्रभावाचीही मोठी हानी होणार आहे, असे निरीक्षण नोंदवले आहे. प्रत्येक लष्करी अधिकाऱ्यासाठी दबावातून घेतलेली माघार ही सर्वात कठीण अशी लष्करी कारवाई असते. शत्रूच्या दृष्टीने ही माघार असते आणि माघार म्हणजे पराभव, असे मार्मिक भाष्य या लेखात क्लार्क यांनी केले आहे.

संकलन : सिद्धार्थ ताराबाई