06 July 2020

News Flash

विराट बोलंदाजी!

कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेण्टी-२० अशा सर्वच प्रकारच्या क्रिकेट सामन्यांत सातत्यपूर्ण खेळ करून गोलंदाजांच्या काळजात धडकी भरविणारा भरवशाचा फलंदाज म्हणून सध्या विराट कोहली याने आपला चांगला

| November 10, 2012 03:03 am

कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेण्टी-२० अशा सर्वच प्रकारच्या क्रिकेट सामन्यांत सातत्यपूर्ण खेळ करून गोलंदाजांच्या काळजात धडकी भरविणारा भरवशाचा फलंदाज म्हणून सध्या विराट कोहली याने आपला चांगला जम बसविला आहे. सध्या तो भारतीय क्रिकेट संघाचा अविभाज्य घटक असला तरी भारतीय संघात प्रथमच निवड झाल्यानंतर पाहिलेले वैभव आणि त्या वेळी कर्णधार महेंद्रसिंग धोणी याच्यासमवेत सुरुवातीला संभाषण करताना उडणारी तारांबळ कोहली विसरलेला नाही. म्हणूनच आत्मविश्वास आणि घमेंड यांच्यात योग्य संतुलन साधणे कठीण असल्याचे विराट कोहली याने नम्रपणे सांगितले. रीड अ‍ॅण्ड टेलर आणि ऑलिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीतील कुतुब येथे ‘एक्स्प्रेस अड्डा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे मुख्य संपादक शेखर गुप्ता आणि ‘दी इंडियन एक्स्प्रेस’चे राष्ट्रीय क्रीडा संपादक संदीप द्विवेदी यांनी विराट कोहली याला बोलते केले. या वेळी कोहली यानेही कसलेल्या फलंदाजाप्रमाणे मैदानाबाहेरही अत्यंत मोकळेपणे प्रश्नांना उत्तरे दिली आणि येथेही आपला खेळ नैसर्गिकच असल्याचे दाखवून दिले. तथापि, गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फलंदाजीला जाताना आपण स्मशानवाटेकडे जात असल्याची भावना मनात होती, अशी प्रांजळ कबुली देण्यासही विराट कोहली कचरला नाही.

विश्वचषक आणि मी
विश्वचषकावर भारताने नाव कोरताच युवराजसिंगला रडू कोसळले, सचिनच्या डोळ्यांतूनही आनंदाश्रू ओघळले आणि हरभजनसिंगही भावनाविवश झाला. धोणीच्या डोळ्यांतही अश्रू दिसले. भारतातच विश्वचषक स्पर्धा असल्याने भारतानेच विश्वचषक जिंकावा, अशी सर्वाचीच इच्छा होती.
इंग्लंडचा संघ भारतात आला असून ही मालिका आमच्यासाठी मोठीच असेल, कारण त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरुद्धही मालिका आहे.या दोन्ही देशांच्या दौऱ्यावर संघ म्हणून भारताची कामगिरी दिलासा देणारी नव्हती. मात्र आता भावनाविवश होऊन चालणार नाही, तर प्रत्येक सामन्याचा विचार करून तोजिंकावाच लागेल. विश्वचषक स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात फलंदाजीला जाताना स्मशानवाटेकडे जात असल्याचे वाटले, कारण माझ्या आधी बाद होणारा फलंदाज होता सचिन तेंडुलकर. मैदानावर संपूर्ण सन्नाटा होता. काहीसा उदास झालो होतो, मात्र ती उदासीनता पहिले दोन चेंडू खेळल्यानंतर जाते. त्यानंतर गौतम गंभीरसमवेत ७० धावांची भागीदारी केली. या सामन्यात तुझे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते, अशी पावती स्वत: प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी दिली.

कोठून येतो आत्मविश्वास?
मी पुस्तके वाचत नाही. कोणाला तरी प्रभावित करण्यासाठी काही तरी करणे मला पसंत नाही. सामन्याच्या आधीच्या दिवशी रात्रीच्या पार्टीला गेलो तर मी काही तरी चुकीचे करीत आहे व त्याची फळे भोगावी लागतील याची मला जाणीव आहे. भारतीय संघ सध्या एका स्थित्यंतरातून जात आहे. भारतीय संघाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि त्यासाठी कळही सोसावी लागेल. उदयोन्मुख क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करून दाखविण्यास उत्सुक आहेत.  कर्णधार महेंद्रसिंग धोणी हा कोणतीही स्थिती असली तरी मैदानावर नेहमीच शांत असतो. या स्थितीतून मार्ग कसा काढावयाचा याबाबत त्याच्या वेगळ्या कल्पना आहेत. नव्यानेच भारतीय संघात निवड झाली तेव्हा धोणीशी बातचीत करताना दडपण होते, कारण धोणी जास्त बोलत नसे. तो सदैव रागावलेला असतो, असा समज होता. मात्र सतत कोणाशी तरी बडबड करणे त्याला जमत नाही, त्यामुळेच तो शांत राहण्याचे संतुलन राखू शकतो. एखाद्या उदयोन्मुख खेळाडूला क्रमांक तीनवर खेळण्याची संधी देऊन आपली गुणवत्ता दाखवून देण्यास सांगणे यासाठी मी धोणीचा सदैव ऋणी आहे. मीही त्याचा विश्वास सार्थ ठरविला याचा आनंद आहे. ऑस्ट्रेलियातील पहिल्या दोन सामन्यांनंतर तिसऱ्या सामन्यात माझी ११ खेळाडूंमध्ये वर्णी लागणार नाही, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र पर्थ येथील खेळीनंतर माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला.

अडथळ्यांशी सामना करताना
उदयोन्मुख क्रिकेटपटू ते भारतीय संघाचा अविभाज्य घटक अशी मजल मारताना किती आणि कोणते अडथळे पार करावे लागले याचा लेखाजोखाही या वेळी कोहली याने मनमोकळेपणाने मांडला. १९ वर्षांखालील क्रिकेट संघातील एक सदस्य या नात्याने स्वत:ला कसे विकसित करावे याचे भान नव्हते आणि ते मी सदैव मान्य करतो. मात्र ते तंत्र लवकरच आत्मसात केले. त्यामुळेच माझी भारतीय संघात निवड झाली. भारतीय संघातील सदस्यांना भेटता येईल का, असा विचार केवळ एका महिन्यापूर्वी मनाला शिवला होता. मात्र मीच आता भारतीय संघाचा एक सदस्य आहोत, ही भावनाच वैभव प्राप्त करून देणारी होती, असे कोहली म्हणाला. मात्र आयपीएल स्पर्धेदरम्यान काही तरी अनुचित घडले आणि आपली भारतीय संघातून गच्छन्ती झाली.राजकुमार शर्मा हे माझे प्रशिक्षक असून त्यांच्या गोतावळ्यातही चर्चा सुरू झाली. काय घडले याची शर्मा यांनाही कल्पना आली. मात्र माझी भारतीय संघातून गच्छन्ती होईपर्यंत तेही काही तरी गंभीर घडल्याचे मान्य करावयास तयार नव्हते. त्यांनी मला जवळ बसवून स्पष्टपणे खडसावले की, जे कृत्य केले आहेस ते सुधारले पाहिजे. मात्र मी काही तरी गैर केले आहे याची तोपर्यंत जाणीवच नव्हती. प्रशिक्षकांचे शब्द जिव्हारी लागले आणि क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करावयास हवे याची प्रकर्षांने जाणीव झाली. ऑस्ट्रेलियात प्रेक्षकांसमवेत घडलेल्या प्रसंगाबद्दलही कोहली याला खंत वाटते. चुका प्रत्येकाच्या हातून होतात. मात्र त्या देशात आपल्याकडून झालेली चूक ही घोडचूकच होती असे म्हणावे लागेल. त्या वेळी जी स्थिती उद्भवली होती त्याबाबतची ती तीव्र प्रतिक्रिया होती आणि त्याबद्दल आजही खेद वाटतो. एका मर्यादेत राहून सर्व गोष्टी आपण करू शकता, मात्र त्या दिवशी मी मर्यादांचे उल्लंघन केले, असे कोहली याचे म्हणणे आहे.
 आपण जेव्हा आक्रमक होतो तेव्हा आपल्याकडून उत्तम कामगिरी होते. त्याला मी क्रोध म्हणत नाही, कारण कोणी तरी आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचीच ती परिणती असते; परंतु जेव्हा मी आक्रमक होतो तेव्हाच माझ्याकडून अधिक दर्जेदार खेळ होतो. तथापि, आता मी बऱ्याच अंशी शांत झालो आहे. लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत याची जाणीव होण्यासाठी काही कालावधी लागतो. ऑस्ट्रेलियातील मालिका आणि आशिया चषक स्पर्धेत शतक झळकावल्यानंतर जी प्रतिक्रिया होती ती योग्य नव्हती याची जाणीव मला दूरदर्शनवरून झाली, असेही कोहली म्हणाला.

दैवावर अवलंबून राहणे आवडत नाही
भारताचा श्रेष्ठ फलंदाज राहुल द्रविड याच्याकडून चिकाटी आणि बचावाचे तंत्र घ्यावे, व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मनगटात जी ताकद आहे ती आपल्याला हवी आहे, सचिन तेंडुलकरकडून आपल्याला त्याच्यासारखा ऑन ड्राइव्ह मारता यावयास हवा आहे. सचिनसारखा अत्यंत योग्य ऑन ड्राइव्ह आतापर्यंत आपण पाहिला नाही. दबावाखालीही शांत राहण्याची वृत्ती आपल्याला धोणीकडून हवी आहे, तर सेहवाग ज्या पद्धतीने चेंडूला कट मारतो ती लाजवाब आहे, असेही कोहली म्हणाला. आत्मविश्वास आणि घमेंड यांच्यात योग्य संतुलन राखणे ही कठीण गोष्ट आहे. आत्मविश्वास आणि नम्रता एकाच वेळी टिकविणे अवघड आहे. मात्र हळूहळू या गोष्टी जमू लागल्या आहेत, असेही कोहली म्हणाला. दैवावर विश्वास आहे, मात्र नेहमीच दैवावर अवलंबून राहणे आवडत नाही. वाट अवघड असेल आणि कामगिरीत सातत्य नसेल तरच दैवाचा विचार करणे भाग पडते. अनेकदा मोठा त्यागही करावाच लागतो. भारतातील क्रिकेटपटू म्हणून अनेकांना मला भेटावयाचे असते, अनेक लोकांना त्यांना भेटवायचे असते. मात्र या गोष्टींवर र्निबध लादणे योग्य असते, असेही कोहली म्हणाला.

विराट बोलंदाजी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2012 3:03 am

Web Title: virat kohli talk
टॅग Virat Kohli
Next Stories
1 मनोरी, गोराई आणि उत्तनला ‘निवासी विकासा’ची आस!
2 देणगीदारांची नावे
3 देणगीदारांची नावे
Just Now!
X