उद्योग टिकला तर कामगार टिकेल. संप हे शेवटचे हत्यार आहे. ही दुधारी तलवार आहे. त्यामुळे कामगारांचे नाही तर मालकाचे डोके कापले जाते. तेव्हा संप हे हत्यार जबाबदारीने हाताळावे. कामगारांना आपल्या मागण्या मिळवायच्या असतील तर एकजुटीशिवाय पर्याय नाही.
स्वातंत्र्यसनिक, मुंबईचे माजी महापौर, गांधीवादी समाजवादी विचारसरणीचे ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांचे १३ जून २०१४ रोजी  निधन झाले.  डॉ. शांती पटेल यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२२ रोजी गुजरात राज्यात खेडा जिल्ह्य़ात बिरपूर या गावात शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्रख्यात डॉक्टर होते. सुरुवातीची १५ वष्रे ते खेडेगावात राहिले. त्यांचे प्राथमिक शिक्षण वडोदरा येथे झाले. मुंबईला जे.जे. हॉस्पिटलमध्ये एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेऊन १९५२ साली त्यांनी मेडिकलची पदवी घेतली. स्वातंत्र्यलढय़ात महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन डॉ. शांती पटेल यांनी ८ ऑगस्ट १९४२ ला झालेल्या ‘भारत छोडो’ आणि ‘करेंगे या मरेंगे’ या ब्रिटिशांविरुद्धच्या आंदोलनांत स्वत:ला झोकून दिले. महात्मा गांधींच्या सूचनेवरून कामगार वर्गही स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झाला पाहिजे. या उदात्त हेतूने डॉ. शांती पटेल यांनी वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेत असतानाच कामगार चळवळीत प्रवेश केला. शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉक्टरकीचा श्रीमंत व्यवसाय करण्याचे सोडून त्यांनी कामगारांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्या काळी डॉ. शांती पटेल यांना दिवंगत थोर समाजवादी नेते अशोक मेहता यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. स्वातंत्र्यलढय़ात त्यांनी भूमिगत राहून आंदोलन केले.  
राजकारणातदेखील डॉ. शांती पटेल यांनी मुंबईबरोबरच राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची पदे भूषविली आहेत. १९६६ साली मुंबई महानगरपालिकेमध्ये ते सलग ४ वष्रे सभागृह नेते होते, तर २१ वष्रे सलग नगरसेवक होते. शेवटच्या निवडणुकीमध्ये ८३ टक्के मताधिक्य घेऊन त्यांनी विक्रम केला आहे. १९७०-७१ दरम्यान डॉ. शांती पटेल मुंबईचे महापौर होते. १९७५ साली आणीबाणी जाहीर झाली, तेव्हा त्यांनी कामगार हक्कावर गदा आणणाऱ्या आणीबाणीला कडाडून विरोध केला.
आणीबाणीनंतर जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. त्या वेळेस डॉ. शांती पटेल मुंबई जनता पक्षाचे अध्यक्ष व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य होते. मुंबईचे अध्यक्ष असताना त्यांनी मुंबईतील ३४ आमदार निवडून आणून इतिहास घडविला. १९८० ते १९८६ दरम्यान ते राज्यसभेचे सदस्य होते. त्या वेळेसदेखील त्यांची राज्यसभेतील भाषणे गाजली आहेत.
मुंबईचे महापौर आणि सभागृह नेते असताना त्यांनी अनेक कामे केली आहेत. नवी मुंबईची कल्पना मांडणाऱ्यांपकी डॉ. शांती पटेल हे एक होते. दादर चौपाटी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व चत्यभूमीला त्यांनी जागा दिली. याशिवाय मुंबई शहरात रुग्णालय, शाळा, चॅरिटेबल संस्था उभारण्यासाठी चटईक्षेत्र वाढवून दिले.
डॉ. शांती पटेल यांनी कामगार चळवळीत १९४४ पासून गेली ७० वष्रे कार्य केले. स्वातंत्र्यलढय़ाबरोबर कामगार चळवळीतदेखील स्वत:ला झोकून देऊन कामगारांची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली. ९ जून २०१४ रोजी कामगार सदन येथील युनियनच्या कार्यालयात शेवटी ते आले होते. यापूर्वी नेहमीच ते युनियनमध्ये सातत्याने येत होते. वयाच्या ९२ व्या वर्षीदेखील ते कामगारांची सेवा करीत होते. १९५२ पासून ६२ वष्रे मुंबई पोर्ट ट्रस्ट विश्वस्त म्हणून त्यांनी कार्य केले. कामगार हिताबरोबरच उद्योग व राष्ट्रहित जोपासण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले. उद्योग टिकला तर कामगार टिकेल हे ते नेहमीच सांगायचे. स्वत: डॉक्टर व अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे वाटाघाटीत ते नेहमी सामूहिक सौदेबाजीतून कामगारांचे प्रश्न सोडवायचे. ते नेहमी सांगायचे, संप हे शेवटचे हत्यार आहे. ही दुधारी तलवार आहे. त्यामुळे कामगारांचे नाही तर मालकाचे डोके कापले जाते. तेव्हा संप हे हत्यार जबाबदारीने हाताळावे. बंदर व गोदी कामगारांचे अनेक पगारवाढीचे वेतनकरार झाले; परंतु कामगारांचे नुकसान न करता जास्तीत जास्त पगारवाढ कशी मिळेल, हा त्यांचा दृष्टिकोन होता. २५ ऑक्टोबर २०१३ रोजी जो बंदर व गोदी कामगारांचा वेतनकरार झाला, तो संपाशिवाय झाला. कामगारांचा एक दिवसदेखील वाया गेला नाही. कामगारांना आपल्या मागण्या मिळवायच्या असतील तर एकजुटीशिवाय पर्याय नाही, असे डॉ. शांती पटेल नेहमी आपल्या भाषणातून सांगत होते. कामगार चळवळीसमोरील आव्हानांना तोंड द्यावयाचे असेल तर सर्व कामगार संघटनांनी एकत्र आले पाहिजे. ते नेहमी आशावादी होते. कामगार चळवळीत काम करीत असताना त्यांनी कामगारांतून नेतृत्व तयार केले. नॅशनल युनियन ऑफ सी फेअर्स ऑफ इंडिया या खलाशी कामगारांमधून अ‍ॅड्. एस. के. शेटय़े, सुधाकर अपराज, विद्याधर राणे अशा विविध कामगार संघटनांमध्ये कामगारांमधून नेतृत्व तयार केले.  कामगार चळवळीतील एक अनुभवी व आदर्श नेता म्हणून त्यांच्याकडे कामगार वर्गाची नजर होती. डॉ. शांती पटेल यांनी बंदर व गोदी कामगारांची तसेच इतर उद्योगांतील कामगारांची शेवटपर्यंत त्यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा केली. गोदी कामगारांचे ते श्रद्धास्थान होते. गोदी कामगारांना त्यांनी पगारवाढ, निवृत्तिवेतन, रुग्णालय सेवा अशा विविध सुखसोयी मिळवून दिल्या आहेत.
डॉ. शांती पटेल यांच्या पत्नी लीलाताई पटेल यांचे २ फेब्रुवारी २००६ रोजी निधन झाले. लीलाताईदेखील लेखिका, सामाजिक कार्यकर्त्यां व उत्तम गृहिणी होत्या. १९४२ च्या लढय़ात त्यांनी शाळेत असताना शाळा बंद पाडण्यात पुढाकार घेतला होता. भिकाऱ्यांची समस्या या विषयावर त्यांनी शोधनिबंध लिहिला होता.  स्त्रियांकरिता शिवणवर्ग, दिवस व रात्र शाळा, वाचनालय, पाळणाघर चालू करून त्यांनी सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेतला. डॉ. शांती पटेल व लीला पटेल या दाम्पत्याने समाजासाठी महान कार्य केले आहे. गरिबांना मदत करणे हे कार्य त्यांनी चालू केले. डॉ. शांती पटेल व लीलाताई यांना सरकारकडून मिळणारी पेन्शनही ते गरजूंना देत होते. कामगारांचा सर्वागीण विकास व्हावा, कामगारांना लिहिण्यासाठी व्यासपीठ मिळावे म्हणून डॉ. शांती पटेल यांनी १९९७ साली ‘पोर्ट ट्रस्ट कामगार’ हा दिवाळी विशेषांक सुरू केला. त्यांनी कामगार चळवळीत घालून दिलेली शिस्त, संस्कार यापुढेही आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकत्रे चालू ठेवतील. बंदर व गोदी कामगारांतर्फे डॉ. शांती पटेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली!