इंटरनेट आपल्याला भरपूर काही देतो या शुद्ध भ्रमकैदेतून आपली सुटका कुणी करू शकत नाही. इंटरनेट आपल्याला देतो, त्यापेक्षा कैक पटींनी आपल्याकडून घेतो. वेळक्षती, संगणक व्यसनाधिनता, डाऊनलोड व्यसन, पोर्न अॅडिक्शनसह व्यक्तीसापेक्ष व्यसनांचा जनसागर या मायाजालाने केला आहे. आपल्या डिव्हाइस अथवा डेकस्टॉपवर इंटरनेटसोबत मांड मारून बसून राहिल्याने प्राप्त होणारे स्थूलत्व आणि इतर नेटव्यसनांपेक्षा अधिक घातक असा रोग नव्याने तयार होत आहे. इंटरनेट व्यक्तीचे कोणत्याही गोष्टीबाबत समाधान पूर्ण करू शकत नसल्यामुळे सतत काही ना काही शोधत असलेली नेटधारक पिढी आता ‘सर्च ब्लॉक’ अवस्थेच्या जवळपास जाऊन पोहोचली आहे. जगातील सर्वात मोठे डाऊनलोड राष्ट्र असलेल्या आपल्या देशात तयार होऊ पाहणाऱ्या या आजारावर वल्र्ड वाईड वेबच्या पंचविशीनिमित्ताने टाकलेला दृष्टिक्षेप.

गुगलपूर्वीच्या जगाशी भेद करायचा झाला तर अगणित मुद्दे हाती लागतील. ‘जो जे वांछील’ ते क्लीकवर समोर टाकणाऱ्या इंटरनेट युगाला गुगलने वरदान दिले. हिरोशिमा, नागासाकी येथील अणुस्फोट थिटा ठरावा इतका ज्ञान माहितीचा स्फोट नेटधारकांना उपलब्ध झाला. नेटच्या गुणगानात, गुगलच्या भक्तीमध्ये काळ फार सुकर वाटू लागला. सुरुवातीला वाटेल त्या विषयाची माहिती, मग संशोधनाअंति सुप्त ज्ञानक्षेत्रांचा विस्तार, मग गाणी, चित्रपट आदींच्या डाऊनलोडनंतर खासगी माहिती जिज्ञासा आणि नंतर ‘डाटाकिंग’ बनल्यानंतरही व्यक्तीचे ज्ञान समाधान काही होऊ शकले नाही. ग्रंथातून कायम मेंदूवर कोरल्या जाणाऱ्या माहितीपेक्षा क्लीकवर मिळणारे ‘इन्स्टण्ट ज्ञान’ या गुगलॅक्चुअल पिढीला अतिमहत्त्वाचे वाटू लागले. वेळ कमी करणारे आणि व्यक्तीला अधिक (आभासी) सक्षम करणारे नेटज्ञान पुरे असे म्हणण्याची अवस्था मात्र आली नाही. दररोज काही घेण्यासाठी मायाजालावर तासन तास बैठक मारणारी ही पिढी तेथून घेतलेल्या गोष्टीही आस्वादू शकत नाही आणि नव्या शोधाचा अंतिम टप्पा येत नसल्यामुळे समाधानाच्या अवस्थेतही जात नाहीए. त्यामुळे लवकरच ही पिढी ‘सर्चब्लॉक’ची शिकार झाल्यास नवल वाटून घ्यायला नको.

काय करायला हवे?
इंटरनेट व्यसन जोवर पूर्णपणे आपण मान्य करीत नाही, तोवर पूर्णपणे ते काढूही शकत नाही. इंटरनेट आपल्या भल्यासाठी असून आपले गुलाम आहे, आपण त्यांचे गुलाम नाही, हा विचार पक्का करून त्याचा उपयोग करावा.वापराच्या निश्चित वेळा ठरवून घ्याव्यात. गरजेपेक्षाअतिरिक्त संशोधन करण्याची सवय लागली असल्यास तातडीने थांबवावी. आपल्याला ज्ञानाच्या आधीच्या पायरीपेक्षा वरच्या पायरीवर नेणारे काय मिळते, अन् तसे मिळत नसेल, तर अनावश्यक संशोधनाला कात्री का लावू नये, असा विचार करावा. शक्यतो इंटरनेटरहीत आठवडय़ातील एक किंवा दोन दिवस ठेवावेत. ग्रंथवाचन, मैदानी खेळ आणि इतर छंदांना अधिक महत्त्व द्यावे. कुठलाही डाटा संग्रह आपल्या आवडीसाठी, समाधानासाठी असतो. त्यामुळे तो डाटा वाढविण्याऐवजी आस्वादण्यावर अधिक भर द्यावा. इंटरनेट बहुजन हिताय, बहुजन सुखाय यांच्यासोबत स्वसुधारणेत महत्त्वपूर्ण ठरेल अशा पद्धतीने त्याचा वापर करावा. हे सांगणे, ऐकणे आणि राबविणे अवघड असले, तरी अशक्य नाही. सर्चब्लॉकर्स बनण्यापासून या पिढीला वाचविणारे नक्की आहे.

शैक्षणिक प्रकल्पांतील गुगलसाम्य!
शाळा आणि महाविद्यालयात अल्पसंख्य हुशारगटाखेरीज कुठल्याही पिढीने आपले प्रकल्प (प्रोजेक्ट्स) हे ग्रंथाभ्यास आणि संदर्भ चाळणींतून केले नसतील. इंटरनेट आगमनाने मात्र अल्पसंख्य हुशारगटही क्षीण होत चालल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गुगलवरून कॉपी पेस्ट केलेली माहिती जशीच्या तशी वापरण्याची सवय शाळांपासून विद्यार्थ्यांमध्ये लागली आहे. त्यामुळे प्रकल्पातून मुलांना विषयाचे ज्ञान, आकलन आणि स्वतचे मत तयार करण्याची संधीच मिळत नाही. नेटवर असलेली माहिती अंतिम सत्य असल्याचे मानून प्रकल्पात कोंबली जात आहे.
उत्तम, योग्य आणि अचूक माहिती कोण सादर करतो यापेक्षा कॉपी पेस्ट कोण चांगले करतो, त्याला महत्त्व आले आहे. गुगलवर एका विषयांची हजार पाने असतात आणि हजार मतभिन्नता असलेली माहिती असते. यातील कुठली योग्य आणि अयोग्य याचा उलगडा न झालेली पिढी ज्ञान उतरविण्यापलीकडे काहीच करीत नाही. त्यामुळे शैक्षणिक प्रकल्पांतून मिळणाऱ्या खऱ्या शिक्षण आनंदाला ती मुकत आहेत. प्रकल्पांतील गुगलसाम्यामुळे तर शिक्षकांकडून त्यांना मिळणाऱ्या मार्कातही कमालीचे गुणसाम्य आढळत आहे. नेट माहितीच्या आधारामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन त्रोटक होत असल्याची खंत मात्र कुणाला राहिलेली नाही.

मेंदू गुगलीकरण!
निकोलस कार नावाचे पारंपरिक ज्ञानाचे पुरस्करर्ते असलेले एक अभ्यासक आहेत. ‘द बिग स्विच: रिवायरिंग द वर्ल्ड, फ्रॉम एडिसन टू गुगल’ नावाचा त्यांचा उत्तम ग्रंथ आहे. गुगलवरच सर्च केल्यास ‘इज गुगल मेकिंग अस स्टुपिड’ नावाचा दीर्घलेख सहज उपलब्ध होईल. कार यांच्यामते आपल्या मेंदूचे गुगलीकरण होत चालले आहे. आपल्या बुद्धीची क्षमता गुगल कमी करीत आहे. गुगलधार्जिणे आपण इतक्या मोठय़ा प्रमाणावर झालो आहोत की, आपण कुठल्याच गोष्टीबाबत ठाम विचार करू शकत नाही. विचारशून्यता मेंदूमध्ये रोवली जात आहे. याचा परिणाम म्हणजे इंटलॅक्चुअल कुणीच होत नाहीए. गुगलॅक्चुअल नागरिकांची फौज मात्र जगात जोमाने वाढत आहे. आपल्याकडील संगणकात खूप माहिती असली तरी आपण ज्ञानधारक होऊ शकत नाही. केवळ माहितीधारक बनू शकतो, हे कुणीच या पिढीला समजावून सांगत नाही. आपल्या निर्णयक्षमतेला दुर्बळ करण्यात इंटरनेट आणि गुगलचा मोठा वाटा आहे. याबाबत नव्या पिढीला आणि त्यांच्या मार्गदर्शकांना जागे करणे अशक्यप्राय गोष्ट बनली आहे. कारण आपण देशाच्या कानोकोपऱ्यांत वीज, पाणी, आरोग्य यांच्यासोबत इंटरनेट आवश्यक असल्याचे मानतो. विकास, सक्षमीकरण यांसाठी ते गावोगावी हवेच. पण विकासाची गरज पूर्ण झाल्यानंतरचा टप्पा हा इंटरनेटच्या अनावश्यक वापराचा आणि हजारो वर्षे प्रगल्भ होण्यासाठी लागलेल्या मानवी मेंदूला निकामी करण्याचा असतो.

उपभोगाच्या परिसीमेचा परिणाम!
इंटरनेट युग रुढ होण्याआधी ज्ञानप्रेमी, संगीतप्रेमी, सिनेमाप्रेमी आपापले छंद उत्तमरीत्या जोपासत. कॅसेट मागे पडून गाणी एमपीथ्री फॉरमेटमध्ये रुपांतरित होऊन सीडी रुपात दाखल झाली. सिनेमा संग्रहातही डीजिटल क्रांतीने छान दिलासा दिला. सीडी संग्रहक नंतर डाटा संग्राहक झाले. सिनेमा डीव्हीडी खरेदीपेक्षा डाऊनलोड करणे सोपे झाले. इंटरनेटच्या स्वस्ताईने आणि ई-बुक्सच्या सुळसुळाटामुळे माहिती, चित्रपट, संगीत यांचे संग्राहक मागे पडले आणि आता व्यसनांध वाढू लागले. खूप चांगल्या गोष्टी जमवणारे छंदी आणि तितक्याच वाईट गोष्टी जमवणारे व्यसनांध ही आपली पूर्वीची संकल्पना बाद होत चालली आहे आणि छंद आणि व्यसन यांच्यामधील सीमा पुसट होत चालली आहे. आयुष्यभर वापरला तरी संपणार नाही इतका डाटा गोळा करणारी आणि तरीही नव्या डाटासाठी हपापलेली ‘छंदनांध’ (छांदिष्ट आणि व्यसनांध) पिढी तयार होऊ लागली आहे. तिला आपल्या ताब्यातील जीबी, टीबी या प्रमाणातील संग्रहाचा अभिमान असतो मात्र तो संग्रह आस्वादायला त्यांच्याकडे वेळच नसतो. या काळामध्ये संगीत, चित्रपट आणि पुस्तके यांचे मोल कमी करून ठेवण्याचे काम इंटरनेटने केले आहे. फुकट मिळणाऱ्या कुठल्याही गोष्टीची किंमत व्यक्तीला कळत नाही. शिवाय दुर्मिळ संकल्पना बाद झाल्यामुळे आणि इंटरनेट उपभोगाची परिसीमा गाठल्यामुळे या पिढीला कोठे थांबावे याचे ज्ञान सर्चब्लॉक अवस्थेत गेल्याशिवाय लागत नाही. अन् सर्चब्लॉक अवस्थाही त्यांना अस्वस्थ करून सोडते ते वेगळे.

पारंपरिक तोटे
इंटरनेटच्या पारंपरिक तोटय़ांची उजळणी व्हावी म्हणून हा थेट भोवणारा मुद्दा चर्चिणे महत्त्वाचे. आज देशात विविध पाहणीसंस्थांनी केलेल्या अभ्यासात प्रमुख शहरांतील १२ ते १६ या वयोगटातील मुले इंटरनेटची ५० ते ७० टक्के व्यसनांध झाली आहेत. बेंगळुरूच्या संगणक उद्योगनगरीहून दिल्लीतील गुरगाव येथील इंटरनेट उपभोग अधिक आहे. पारंपरिक संगणक साधनाऐवजी, मोबाइल, टॅब आदी पूरक गॅझेट्सनी इंटरनेट धारकांसोबत इंटरनेट व्यसनांधांची संख्या वाढविली आहे. मानसिक आजार, निद्रानाशी विकार, विकृती पोषक कृत्ये आदी गोष्टी इंटरनेट वापरामुळे वाढत चाललेल्या आहेत. निर्बुद्धीकरणापासून या पिढीला वाचविणारा मसीहा जन्म घेण्याची शक्यता नाही. कारण जन्माला आल्यापासून इंटरनेट जोमात वापरणाऱ्या जाहिरातींचे आपण कौतुक करतो आणि लहान मुलांना गुगलगुहेत नेऊन सोडतो. चीन, जपान, ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका आदी राष्ट्रांमध्ये इंटरनेट व्यसनांध पिढीसाठी ‘सुधारगृहे’ उभारली जात आहेत. आपल्याला समस्येचाच पत्ता नसल्यामुळे सुधारणेला वाव इतक्यात तरी वाटत नाही.

पंकज भोसले
pankaj.bhosale@expressindia.com

चीनचा हिग्ज बोसॉनशोध!
चीन कुठल्याही क्षेत्रात मागे हटायला तयार नाही. विज्ञान क्षेत्रही त्याला अपवाद नाही. मागे आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी गॉड पार्टिकल म्हणजे हिग्ज बोसॉन शोधून काढण्यासाठी फ्रान्स-स्वीडनच्या सीमेवर एका खोल बोगद्यात लार्ज हैड्रॉन कोलायडर नावाचे महायंत्र ठेवून प्रयोग केला. आता चीननेही असेच यंत्र स्वबळावर तयार करून वेगळी चूल मांडण्याचे ठरवले आहे. याचा दुसरा अर्थ असा, की हिग्ज बोसॉन म्हणजे गॉड पार्टिकल अजून सापडलेला नाही व तो शोधून काढण्याची चीनची इच्छा लपून राहिलेली नाही. विश्वातील कुठल्याही कणाला जेव्हा वस्तुमान प्राप्त होते तेव्हा ते या हिग्ज बोसॉन कणामुळे प्राप्त होत असते. लार्ज हैड्रॉन कोलायडर यंत्रात इलेक्ट्रॉन व पॉझिट्रॉन यांची टक्कर वेगाने घडवून आणली जाते. चिनी वैज्ञानिक जे नवीन कोलायडर यंत्र तयार करणार आहेत ते आताच्या यंत्राच्या साठ टक्के इतके वेगवान असणार आहे, त्यात हिग्ज बोसॉन म्हणजे गॉड पार्टिकलचे स्वरूप अधिक अचूकतेने मोजले जाईल व मूलभूत भौतिकशास्त्रातील नियमितता समजण्याचा प्रयत्न केला जाईल असे इन्स्टिटय़ूट ऑफ हाय एनर्जी फिजिक्स ऑफ चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. हिग्ज कणाच्या स्वरूपावरून आपल्याला कण भौतिकशास्त्राचे बरेच ज्ञान होईल असे या संस्थेचे प्रमुख वँग यिफँग यांचे मत आहे. सध्याच्या कोलायडर म्हणजे आघातक यंत्रापेक्षा या यंत्रात ६० टक्के अधिक ऊर्जा तयार होणार आहे. हिग्ज कणाच्या अभ्यासासाठी त्याचे रूपांतर मोठय़ा प्रोटॉन कोलायडरमध्ये करण्यात येईल ज्यात जीनिव्हातील युरोपीय अणुसंशोधन संस्थेच्या लार्ज हैड्रॉन कोलायडरपेक्षा सातपट अधिक ऊर्जा निर्माण होईल. अमेरिकेचे भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल विजेते डेव्हिड ग्रॉस यांनी सांगितले, की मूलभूत भौतिकशास्त्रात चीनच्या आघातक यंत्राला मध्यवर्ती स्थान राहील. गेली अनेक दशके हिग्ज बोसॉनचा शोध चालू आहे. वैज्ञानिकांच्या मते हा कण अस्तित्वात असून तो सापडणे ही अवघी काही काळाची गोष्ट उरली आहे.

कर्णसंगणक!
पुढचा काळ अंगावर दागिन्यांसारख्या मिरवता येतील अशा यंत्रांचा असणार आहे. जपानच्या वैज्ञानिकांनी अलीकडेच कानात बसवता येईल असा व्यक्तिगत संगणक तयार केला असून तो डोळय़ांच्या लवण्याने किंवा जिभेने नियंत्रित करता येणार आहे. या संगणकाचे वजन १७ ग्रॅम म्हणजे ०.५९ औंस इतके असून त्यात ब्लूटूथ, जीपीएल, कंपास, गायरोसेन्सर, बॅटरी, बॅरोमीटर, स्पीकर व मायक्रोफोन या सुविधा आहेत. अंगावर बाळगता येणाऱ्या उपकरणात संगणकाचीही कल्पना आता प्रत्यक्षात येत असून गुगल ग्लास हे तशा तंत्रज्ञानाचे पहिले उदाहरण होते.
या कानात बसवण्याच्या संगणकाचे नाव इयरक्लिप टाइप वेअरेबल पीसी असे असून ती एक मायक्रोचिप आहे, त्यात माहिती साठवता येते. सॉफ्टवेअर लोड करता येते असे हिरोशिमा सिटी विद्यापीठाचे अभियंता काझुहिरो तानीगुची यांनी सांगितले. या संगणकाची रचना इकेबाना म्हणजे फुलांच्या रचनेवर बेतलेली असून कानात आपण रिंगा घालतो तसाच या संगणकाचा वापर करता येईल असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी असा काळय़ा रंगाचा पहिला संगणक तयारही केला आहे. २०१५ मध्ये ख्रिसमसच्या काळात त्यात आयपॉड व इतर यंत्रेही जोडता येतील व सॉफ्टवेअर प्रोग्रॅममधून हवे ते सॉफ्टवेअरही शोधता येईल. भुवई उंचावून, जीभ बाहेर काढून, नाकाची हालचाल करून, दात आवळून यात हा संगणक नियंत्रित करता येईल. यात अवरक्त किरणांचे संवेदक वापरले असून ते कान व इतर अवयवांच्या छोटय़ा हालचाली टिपतात व त्यावर हा संगणक चालतो. यात हाताचा वापर करावा लागत नाही.
एकप्रकारे हे संवेदक म्हणजे तिसरा हात म्हणून काम करतील. मोटारबाइकस्वार, अवकाशवीर, गिर्यारोहक यांना तसेच अपंगांनाही या संगणकाचा फायदा होईल. गिर्यारोहण करताना तुम्ही रात्रीच्या आकाशाकडे पाहून दिशा ओळखू शकाल. तुम्ही किती उंचीवर कुठल्या दिशेला, कुठल्या कोनात आहात हे समजेल. स्मार्टफोन इंटरनेटला जोडून तुम्ही दूरवरच्या लोकांशी संपर्कात राहू शकता तसेच या संगणकाच्या मदतीने घडणार आहे. एखाद्या ताऱ्याकडे जर दोन व्यक्ती एकाच वेळी बघत असतील तर त्यांचे आभासी नाते जोडले जाऊन त्यांच्या त्या ताऱ्याविषयीच्या प्रतिक्रिया एकमेकांना कळणार आहेत असे तानीगुची यांनी सांगितले.

सुपरहीरोची ‘पारखी’ नजर!
तुमची दृष्टी कमी असेल तर ती वाढवण्यासाठी किंवा तुम्हाला सुपर हीरोची दृष्टी प्राप्त करून देण्यासाठी वैज्ञानिकांनी एक नवीन अॅप म्हणजे उपयोजन शोधून काढले आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला मंद प्रकाशातही चांगले दिसते. ‘द न्यू अलटिम आयअॅप’ असे या उपयोजनाचे नाव असून, त्याच्या वापराने ते वापरणाऱ्याची दृष्टी बदलते, कारण मेंदूतील दृष्टी प्रक्रियांना वेगळी सक्षमता प्राप्त करून दिली जात असते. दिसायला अवघड पदार्थ या अलटिम आइजमुळे दिसतात त्यात रोजच्या कामातही तुम्हाला मदत होते. डोळय़ांकडून जी माहिती मेंदूकडे जाते तिची प्रक्रिया करण्याची पद्धत यात बदलली जाते व वापरकर्त्यांला पॉइंट सिस्टिमच्या मदतीने सक्षम केले जाते. कॅलिफोर्निया विद्यापीठातील अॅरॉन सेझ यांनी १९ बेसबॉलपटूंवर या अॅपचा वापर करून पाहिला आहे. त्यात प्रत्येक अॅथलिटला अलटिम आयचा वापर तीस मिनिटांत २५ वेळा करू दिला गेला तेव्हा त्यांची दृष्टी ३१ टक्के सुधारली. १९ खेळाडूंपैकी सात जणांना २०/७.५ इतकी दृष्टी लाभली तर त्यांना २० फुटांवरचे दिसू लागले. साधारण दृष्टीत आपल्याला केवळ साडेसात फूट अंतरावरचे दिसत असते. २०१२ व २०१३ मधील स्पर्धात भाग घेतलेल्या ११ खेळाडूंचे स्ट्राइकआउट इतर खेळाडूंच्या तुलनेत ४.४ टक्के इतके घटले. अॅथलिट्सना चेंडू अधिक स्पष्टपणे दिसू लागला व त्यांची दृष्टी सुधारली व ताणही कमी झाला. हे अॅप वापरणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना वाचन, वाहन चालवणे व निरीक्षण करणे ही कामे सोपी जातात असेही दिसून आले आहे.

मंगळाचे पाणीपुराण!
अंटाक्र्टिकात पडलेल्या मंगळावरील एका पन्नास हजार वर्षांपूर्वीच्या उल्कापाषाणाच्या आधारे तेथे पाणी होते असा निष्कर्ष नासाच्या वैज्ञानिकांनी काढला आहे. एकेकाळी मंगळावर जीवसृष्टीस अनुकूल स्थिती होती असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.नवीन अभ्यासानुसार नासाच्या हय़ूस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटरच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की या उल्कापाषाणाचे नाव यामाटो ०००५९३ असे असून त्याचे वजन १३.७ किलो आहे. त्यांनी या उल्कापाषाणाच्या रचनेचा अभ्यास केला असता त्यांना मंगळावर एकेकाळी पाणी होते असे पुरावे मिळाले आहेत. यामाटो या उल्कापाषाणात कोटय़वधी वर्षांपूर्वी मंगळावर घडलेल्या जैविक क्रियांचे सूचक पुरावेही मिळाले आहेत. या संशोधनातील प्रमुख लेखक असलेले जेट प्रॉपलशन प्रयोगशाळेचे लॉरेन व्हाइट यांच्या मते सध्या मंगळावर रोबोट म्हणजे यंत्रमानव पाठवण्यात आले असून त्यामुळे मंगळाच्या ऐतिहासिक पाश्र्वभूमीवर प्रकाश पडेल. आतापर्यंत उल्कापाषाणाचे जे संशोधन झाले आहे त्यानुसार मंगळावर १.३ अब्ज वर्षांपूर्वी जो लाव्हारस होता त्यापासून या उल्कापाषाणाची निर्मिती झाली असावी. साधारण १.२ कोटी वर्षांपूर्वी हा उल्कापाषाण मंगळावरून सुटला तो पृथ्वीवरील अंटाक्र्टिका भागात येऊन पडला ती गोष्ट ५० हजार वर्षांपूर्वीची आहे व तोपर्यंत तो अवकाशात प्रवास करीत होता. २००० मध्ये जपानच्या अंटाक्र्टिका संशोधन मोहिमेतील संशोधकांना हा उल्कापाषाण यामाटो हिमनदीत सापडला म्हणून त्याला यामाटो नाव दिले होते. मंगळावरील उल्कापाषाण व पृथ्वीवरील खडक तसेच चंद्रावरील खडक यांच्या रचनेत फरक असून सिलिकेट खनिजातील ऑक्सिजन अणू व मंगळावरील वातावरणात असलेले वायू यांचा संबंध मंगळावरील उल्कापाषाणात आहे. यामाटो ०००५९३ या उल्कापाषाणात अगदी सूक्ष्म नळीसारखी पाणी वाहून नेणारे आकार सापडले. या सूक्ष्म बोगद्यांच्या पृष्ठभागाचा पोत हा बसाल्टिक काचेच्या सारखा दिसून आला. त्यात काही स्फेरूल्स प्रकारचे नॅनोमीटर ते मायक्रोमीटर आकाराचे घटक दिसून आले व काबरेनेट व सिलिकेट थरापेक्षा ते वेगळे होते. हे दोन्ही गुणधर्म मंगळावर आता गोळा करण्यात आलेल्या काही खडकांमध्ये आहेत. एव्हर्ट गिब्सन यांच्या मते काबरेनेशियस घटक हे मातीच्या वेगवेगळय़ा अवस्थांशी संबंधित होते. एकेकाळी मंगळावर पाण्याचे साठे होते व त्यात कार्बनही भरपूर होता असे गिब्सन यांचे मत आहे. अॅस्ट्रोबायोलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.