मिनिटाला ६०० गोळ्या डागण्याची क्षमता असलेल्या एके ४७ चा जनक कलाश्निकोव्ह यांच्या निधनानंतर या रायफलच्या कामगिरीवर उलटसुलट चर्चा होत आहे. युध्दभूमीवर शत्रूशी दोन हात करण्यासाठी निर्मिलेली रायफल  कालांतराने दहशतवाद्यांच्याही हाती पडली आणि बदनाम झाली. या रायफलच्या शोधातून प्रश्न कितपत सुटले याचे मूल्यमापन अवघड आहे. मात्र, तिने अनेक नवीन प्रश्नांना जन्म दिला..
लष्कर, निमलष्करी दल, दहशतवादी, बंडखोर अशा सर्व घटकांना आपली वाटणारी आणि तिचा वापर नेमका कोणाविरुद्ध होणार आहे, त्यावरून तिच्याविषयी विभिन्न मतप्रवाह निर्माण झालेली ‘एके ४७’ रायफल आणि तिच्या आधुनिक आवृत्त्या सदैव चर्चेत राहिल्या आहेत. या रायफलीने आजपर्यंत केलेला नरसंहार इतिहासात अन्य कोणत्याही शस्त्राने झालेला नाही. सहा दशकांत वेगवेगळ्या श्रेणींत समोर आलेली ही रायफल सहजपणे हाताळता येणारी अन् किफायतशीर. यामुळे जगातील बहुसंख्य सैन्यदलांबरोबर दहशतवादी संघटनांमध्ये ती तितकीच लोकप्रिय ठरली. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करताना त्यांच्याकडे सापडणाऱ्या शस्त्रास्त्रांमध्ये एके ४७ चा वरचा क्रमांक हे त्याचे निदर्शक.
एके ४७ चे (कलाश्निकोव्ह) जनक जनरल मिखाइल कलाश्निकोव्ह यांच्या निधनामुळे या रायफलच्या कामगिरीवर सध्या वेगवेगळी चर्चा होत आहे. त्यात या रायफलचे समर्थन करणारा मोठा गट असला तरी तिच्या वापराने झालेल्या जीवितहानीवर बोट ठेवणारा दुसरा वर्ग आहे. रायफलच्या प्रवासाचा आढावा घेतल्यास या परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटण्यामागील कारणे लक्षात येतात. वास्तविक कोणत्याही शस्त्राची निर्मिती मुख्यत्वे स्व-संरक्षण हा मुद्दा लक्षात घेऊन केली जाते. हा उद्देश साध्य झाल्यावर त्या शस्त्राच्या विक्रीतून नफा कमविता येईल काय, यावर विचार सुरू होतो. एके ४७ चा शोध स्व-संरक्षणाच्या हेतूने लागला. भविष्यात रशियाची ही रायफल जगातील सर्वात संहारक शस्त्र म्हणून गणली जाईल याची कल्पना खुद्द तिच्या शोधकर्त्यांनी केली नसावी. जर्मनीच्या रायफलचा सामना करताना रशियन सैनिकांची होणारी दमछाक दूर करण्यासाठी कलाश्निकोव्ह यांनी सुरू केलेल्या संशोधनातून एके ४७ चा जन्म झाला. सुरुवातीला त्यात काही किरकोळ त्रुटी होत्या. त्या दूर केल्यावर ती सोव्हिएत लष्करात समाविष्ट करण्यात आली. चालविण्यास सोपी, वजनाने हलकी, विश्वासपूर्ण आणि गॅसआधारित तंत्रप्रणाली ही तिची वैशिष्टय़े. मिनिटाला ६०० गोळ्या डागण्याची तिची क्षमता आहे. अर्धस्वयंचलित आणि पूर्ण स्वयंचलित अशा दोन्ही पद्धतीने ती वापरता येते. वाळवंट, थंड प्रदेश अशा कोणत्याही युद्धभूमीवर ती कार्यान्वित राहते. सुरुवातीच्या काळात सोव्हिएत रशियाने तिचे संकल्पन दडविण्यावर कटाक्ष ठेवला. सोव्हिएतच्या लाल सेनेसाठी मोठय़ा प्रमाणात रायफलचे उत्पादन करावे लागणार होते. त्यामुळे कालानुरूप तिच्यात गरजेनुसार बदलही करण्यात आले. त्यातून ‘एकेएम’ ही आधुनिक हलकी रायफल तयार झाली. याशिवाय, घडी करता येणारी ‘एकेएमएस’ आकारास आली. हवाई छत्रीद्वारे उतरणारे सैनिक आणि वाहनांवर तैनात जवानांसाठी ती उपयुक्त होती. रशियाच्या मुख्य शस्त्रास्त्र उत्पादन करणाऱ्या इझमॅश प्रकल्पात एके ४७ च्या आवृत्तीचे उत्पादन सुरू झाले. साधारणत: तीन दशकांनंतर रायफलच्या संकल्पनेत फेरबदल करून एके ७४ ही आधुनिक रायफलही तयार करण्यात आली. एके १०१, एके १०३, एके १०७/१०८ असा तिचा प्रवास सध्या एके २०० या अत्याधुनिक रायफलपर्यंत येऊन पोहोचला आहे.
प्रभावी कामगिरीमुळे एके ४७ संपूर्ण जगात ओळखली जाऊ लागली. या रायफलद्वारे होणाऱ्या विलक्षण माऱ्याचे महत्त्व सर्वाच्या लक्षात आले. परदेशी शस्त्रास्त्रांची नक्कल करण्यात चीनचा हात कोणी धरू शकत नाही. या तंत्रज्ञानाची नक्कल करून चीनने एके ५६ तयार केली. हंगेरीने एके ४७ मध्ये बदल करून एकेएम ६३, एके ६३ रायफल बनविल्या. याच धर्तीवर इस्रायलने आरके ६२, साऊथ आफ्रिकेने आर ४ बनविली. या सर्व आवृत्तींचे मूळ एके ४७ मध्ये दडलेले आहे. उत्पादन आणि देखभालीचा फारसा खर्च नसल्याने आर्थिकदृष्टय़ा मागासलेले देशही तिच्याकडे आकर्षित झाले. काही दशकांत एके ४७ ही जगातील सर्वात घातक रायफल बनली. भारतीय सैनिकांकडे असणारी ‘इन्सास’ रायफलही ‘कलाश्निकोव्ह’च्या कामगिरीशी साधम्र्य साधणारी, परंतु अनेक बदल करून तयार झाली आहे. सद्य:स्थितीत जगात जवळपास पाच कोटी एके श्रेणीतील रायफल्स असल्याचा अंदाज आहे. इतक्या प्रचंड संख्येने खपलेल्या रायफलमुळे कलाश्निकोव्ह यांना मात्र आर्थिक लाभ झाला नाही. तिचे स्वामित्व हक्क सोव्हिएत रशियाची संपत्ती होती. रशियानेदेखील हे हक्क बऱ्याच विलंबाने प्राप्त केले. तिचे उत्पादन वाढविण्यासाठी सोव्हिएत रशियाने अनेक राष्ट्रांना तंत्रज्ञान हस्तांतरण कराराद्वारे ती त्यांच्या देशात बनविण्यास परवानगी दिली. मात्र तंत्रज्ञानाची नक्कल करून मोठय़ा प्रमाणात या रायफलचे उत्पादन झाले. जगातील लष्कर, निमलष्करी दलातील जवानांच्या हाती असेपर्यंत रायफलच्या वापरावर किमान त्या त्या राष्ट्राचे नियंत्रण होते, परंतु ती दहशतवाद्यांच्या हाती पडल्यानंतर मात्र एके ४७ ला टीकेचे धनी व्हावे लागले. दहशतवाद्यांच्या ताब्यात हे शस्त्र जाण्यास अमेरिका कारणीभूत ठरली.
१९८० च्या दशकात सोव्हिएत रशियाच्या फौजा अफगाणिस्तानमध्ये लढत होत्या. तेव्हा रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानातील मुजाहिदीन गटांना अर्थसाहाय्य दिले. त्यातून चीन व इतर देशांत बनविलेल्या कलाश्निकोव्ह दहशतवाद्यांच्या हाती पडल्या. एखाद्या देशातील शासन उलथवून टाकण्यासाठी ही रणनीती पुढे अमेरिकेने वारंवार अवलंबिली. त्याचा परिपाक  हळूहळू जगातील सर्व प्रमुख दहशतवादी संघटनांच्या हाती हे घातक शस्त्र लागण्यात झाला. आता यातील काही गटांनी त्याच रायफल अमेरिकेवर रोखल्या हा भाग वेगळा. पाकिस्तानचे धोरण त्यापेक्षा वेगळे नव्हते. भारताचा विचार केल्यास एकटय़ा जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून हस्तगत केलेल्या एकूण शस्त्रास्त्रांमध्ये एके आवृत्तीच्या रायफलची संख्या सर्वाधिक आहे. छुप्या युद्धासाठी दहशतवाद्यांनी तिचा वापर केला. काही वर्षांपूर्वी ओसामा बिन लादेनचे एके ४७ रायफल चालवितानाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नायजेरिया, सोमालिया, येमेन, सीरिया आदी देशांत अंतर्गत बंडाळीमुळे अराजकता निर्माण झाली. त्या प्रत्येक ठिकाणी रक्तपातासाठी बंडखोरांनी या रायफलला प्राधान्य दिल्याचे लक्षात येते. ही रायफल चालविण्याच्या प्रशिक्षणास फारसा वेळ द्यावा लागत नाही. तिच्या देखभाल वा स्वच्छतेसाठी खास व्यवस्थेची गरज नसते. रायफलच्या या जमेच्या बाजू दहशतवादी संघटना व बंडखोरांच्या पथ्यावर पडल्या. अनेक देशांत चाललेल्या संघर्षांत अल्पवयीन मुलेही पाठीवर ही रायफल लटकवत फिरताना दिसतात. या संपूर्ण घटनाक्रमामुळे जगात चाललेल्या हिंसाचाराला या रायफलला जबाबदार धरले गेले. त्याबद्दल कलाश्निकोव्ह यांनी माफी मागावी, अशी मागणी झाली होती, परंतु ही मागणी त्यांनी धुडकावली. कोणतेही शस्त्र जीवघेणे ठरू शकते, तर त्यात ते बनविणाऱ्याचा काय दोष, असा त्यांचा प्रश्न होता. जगातील बाजारपेठेशी त्यांना देणेघेणे नव्हते. या रायफलच्या निर्मितीचा उद्देश तर आपल्या देशांच्या सीमांच्या संरक्षणाचा होता, असा त्यांचा दावा होता. या रायफलचा वापर केवळ सैनिकांनी करणे अभिप्रेत होते. गुन्हेगारी प्रवृत्तींनी तिचा वापर करणे हे आपल्यासाठीदेखील क्लेशकारक असल्याचे ते सांगत असत.
बहुतेक राष्ट्रांतील सैन्यदल आणि दहशतवादी संघटनांची मुख्य भिस्त बनलेल्या या रायफलच्या श्रेणीतील एके ७४ ची खरेदी थांबविण्याचा निर्णय मध्यंतरी रशियाने घेतला होता. त्यांना तिच्या पुढील आवृत्तीची प्रतीक्षा आहे. ही विकसित आवृत्ती खरेदी करण्यासाठी भरभक्कम निधीची तजवीज करण्यात आली. सहा दशकांपासून जगात सर्वाधिक घातक शस्त्र ठरलेली ही एकमेव रायफल. तिच्यामुळे झालेला नरसंहार दुर्लक्षिता न येणारा. कोणताही प्रश्न बंदुकीच्या गोळीने सुटू शकतो, अशी धारणा अलीकडच्या काळात बळावत आहे. उलट, एकही गोळी न चालविता अनेक प्रश्न राजकीय मार्गाने सोडविता येऊ शकतात. त्याकडे लक्षच दिले जात नसल्याने या रायफलमुळे झालेल्या नरसंहाराचा दोष हा राजकीय नेतृत्वाला द्यायला हवा, असे कलाश्निकोव्ह यांनी म्हटले होते. मुळात, युद्धभूमीवर शत्रूशी दोन हात करण्यासाठी निर्मिलेली रायफल सैनिकांच्या हाती असणे समजता येईल, पण ती सैनिकांच्या बरोबरीने दहशतवाद्यांच्या हाती पडली आणि बदनाम झाली. कोणत्याही घटकाला दोन बाजू असतात. मग ते एखादा शोध असो वा एखादे आंदोलन. या रायफलच्या शोधातून प्रश्न कितपत सुटले याचे मूल्यमापन अवघड आहे, मात्र तिने अनेक नवीन प्रश्नांना जन्म दिला हे नाकारता येणार नाही.