दिगंबर शिंदे digambar.shinde@expressindia.com

पश्चिम महाराष्ट्र म्हटले, की काळी कसदार जमीन डोळय़ांपुढे उभी राहते. या जमिनीवरच या भागाने कृषी क्षेत्रात सुजलाम सुफलाम अशी झेप घेतली.  मात्र गेल्या काही वर्षांत याच भागात जमीन क्षारपड होऊन नापीक होण्याचे प्रमाण वाढत चालल्याचे सर्वत्र दिसत आहे. या आजारामुळे या पट्टय़ातील शेतीच धोक्यात आली आहे. आता या जमिनी पुन्हा लागवडीयोग्य करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Finance Ministry report predicts a comforting dip in inflation amid forecasted monsoon rains
महागाईत दिलासादायी उताराचा अंदाज; मोसमी पावसाच्या अनुमानाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाचा अहवाल
itching all over body but no rash sign of something serious illness
Health Special: अंगभर खाज येते व पुरळ कुठेच नाही… ‘ही’ असू शकते गंभीर आजाराची सुरुवात!
Increase in number of cancer patients in India
भारताला कर्करोगाचा विळखा आणखी घट्ट! जाणून घ्या कोणत्या कर्करोगाचा धोका वाढला…
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज

पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये जमीन क्षारपड होऊन नापीक होण्याचे गेल्या दोन दशकामध्ये प्रमाण जास्त दिसते. पूर्व भागातील दुष्काळी टप्प्यात असलेल्या माळरानावर द्राक्ष, डािळब ही नगदी पिके हमखास उत्पन्नाची म्हणून त्यांची लागवड वाढत गेली. मात्र काळजाच्या तुकड्यागत गाळवाट असलेल्या नदीकाठच्या जमिनी कसहीन बनल्याने नापीक झाल्या. या जमिनी पुन्हा  लागवडीखाली आणण्यासाठी क्षारपड जमीन सुधारणचे प्रयोग हाती घेण्यात येत असून यामुळे पुन्हा या जमिनी लागवडीखाली आणण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्र म्हटले, की कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगेच्या काठावरची काळी कसदार जमीन डोळय़ांपुढे उभी राहते. या कसदार जमिनीवरच या भागाने कृषी क्षेत्रात सुजलाम सुफलाम अशी झेप घेतली.  ऊस, भाजीपाल्याची मोठी लागवड होऊ लागली. मात्र गेल्या काही वर्षांत याच भागात क्षारपड होऊन नापीक होण्याचे प्रमाण वाढत चालल्याचे सर्वत्र दिसत आहे. या आजारामुळे या पट्टय़ातील शेतीच धोक्यात आली आहे. आता या जमिनी पुन्हा लागवडीयोग्य करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या आजारावरची कारणे शोधत त्याप्रमाणे उपाय केले जात आहेत.

जमीन क्षारपड, पाणथळ, क्षारयुक्त झाली, की ती शेतीयोग्य राहत नाही. ती अशी होण्याची अनेक कारणे आहेत. जमिनीची पोटातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे मुळाच्या सान्निध्यात हवा खेळती राहत नाही व पिकांना प्राणवायूचा पुरवठा कमी होतो आणि उपयुक्त जिवाणूची वाढ होत नाही. विद्राव्य क्षाराचे प्रमाण वाढल्यामुळे पिके पाणी कमी प्रमाणात शोषून घेतात. सोडियम व क्लोराईडचा पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. विद्राव्य क्षाराचे प्रमाण वाढते. मातीच्या कणावरील सोडियमचे प्रमाण वाढल्यावर जमिनीची घडण बिघडते, अशी माती ओली झाल्यावर चिकट बनते आणि उन्हाळयात कोरडी झाल्यावर कठीण व टणक बनते. घट्ट जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही.

एकदा का जमीन क्षारयुक्त झाली की यामध्ये साधे गवतही उगवत नाही, ऊसशेती तर दूरची गोष्ट. पडीक जमिनीमध्ये केवळ वेडी बाभळच आपला विस्तार करते. यामुळे अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक शेतकरी तर नावावर जमीन असूनही भूमिहीन ठरण्याची उदाहरणे या भागात आहेत. पाण्याची उपलब्धता असूनही जमीनच नापीक झाल्याने हाडाचा शेतकरी हतबल झाला. यावर संशोधन करून जलसंपदा विभागाने क्षारपड व पाणथळ जमीन सुधारणा मोहीम हाती घेतली आहे.

सांगली जिल्ह्यातील  मिरज, वाळवा, पलूस व तासगांव तालुक्यातील कालपरवापर्यंत माणूस पेरलं तर उगवणारी गाळवट जमीन आज क्षारपड आणि पाणथळ झाली आहे. अशा जमिनींची सुधारणा करण्यासाठी पुढील उपायांचा एकात्मिकपणे वापर करणे गरजेचे आहे.

निचरा पद्धतीचा वापर

क्षारपड व पाणथळ जमिनींच्या सुधारणेसाठी निचरा पध्दतींचा वापर करणे अतिमहत्त्वाचे असते. जमिनीत निचऱ्याचे प्रमाण वाढणार नाही तोपर्यंत कोणतीही भूसुधारके वापरून क्षारपड जमिनी लागवडीखाली आणणे शक्य होणार नाही. म्हणून निचरा पध्दतीची आखणी ही तांत्रिकदृष्टया व्यवस्थित होणे गरजेचे असते. ही आखणी करताना क्षारपड क्षेत्राचे सर्वेक्षण, कंटुर नकाशा, निचऱ्याचे पाणी निर्गमित करण्याची व्यवस्था, मातीतील क्षारांशी संलग्र असणारे भौतिक व रासायनिक गुणधर्म, सच्छिद्रता, भूमिगत जलाची पध्दती आणि पीक पध्दती आदी बाबींचा विचार करावा लागतो.

निचरा पध्दतीमुळे पुढील फायदे मिळतात. जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. पिकांच्या कार्यक्षम मुळांची वाढ होते. तापमान संतुलित राखण्यास मदत होते. विविध पध्दती पिकाच्या वाढीसाठी योग्य असे वातावरण जमिनीत असणाऱ्या पोषक जिवाणूंची वाढ होते. तसेच भूपृष्ठावर क्षार साठविण्याची क्रिया मंदावते आणि जमीन लागवडीखाली येते. पाण्याचा निचरा होत असल्याने वापसा येत असल्याने पिकांचे बीजांकुरण होण्यास मदत होते.

जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी उघडे चर व भूमिगत निचरा या दोन पध्दतीचा वापर करता येतो. यापैकी भूमिगत निचरा पध्दती अधिक लाभदायी ठरते. जमिनीची धूप थांबते, उघड्या चरीसाठी जमीन गुंतवण्याची गरज नसते. जमिनीखाली ३ ते पाच फूट खोल सच्छिद्र नलिका वापरून अतिरिक्त पाणी बाहेर काढले जाते. यामुळे मशागत, काढणी व अन्य कामे करण्यात कोणताही अडथळा येत नाही. देखभाल अथवा दुरूस्तीची किमान २५ वर्षे गरज पडत नाही.

भूमिगत सच्छिद्र पाईप

जमिनीच्या पृष्ठभागाखाली ०.१ ते १.५ मीटर खोलीवर सच्छिद्र पी.व्ही.सी. ड्रेनेज पाईप टाकून त्या पाईपाभोवती फिल्टर म्हणून ४.५ ते १० सें.मी. जाडीचा चाळ वाळूचा थर किंवा कापडी फिल्टर (जिओ टेक्सटाईल फिल्टर) गुंडाळून पाईप जमिनीमध्ये गाडाव्यात. या पध्दतीत मुख्य नळी, उपमुख्य नळ्या व उपनळया यांच्या जाळ्यांची अशाप्रकारे रचना केली जाते,की जेणेकरून पिकांच्या मुळांच्या कक्षेतील क्षार व अतिरिक्त पाणी मातीतून पाझरुन प्रथम उपनळ्यामध्ये येते आणि उपनळ्यातील पाणी उपमुख्यनळ्यामध्ये येऊन मुख्य नळीतून शेवटी हे पाणी नैसर्गिक निगमस्थान उदा. ओढा, ओहोळ किंवा नदी इत्यादीमध्ये नेऊन सोडावे. ज्या ठिकाणी असे नैसर्गिक निगमस्थान उपलब्ध नसेल त्या ठिकाणी मुख्य नळीतील पाणी सम्पवेल (विहीर) किंवा शेततळ्यामध्ये एकत्र करून हे पाणी उपसा करावे लागते.

दोन उपनळ्या (लॅटरल ड्रन) मधील अंतर -निचरा पध्दतीच्या यशस्वीतेसाठी दोन लॅटरल पाईपमधील अंतर योग्य ठेवणे अति महत्त्वाचे असते. हे अंतर मातीची जलसंचालकता, अभेद्य श्राची खोली, निचरा योग्य सच्छिद्रता आणि कमी कराव्या लागणाऱ्या भूमिगत पाण्याची पातळी इत्यादी बाबींवर अवलंबून असते. भारी ते मध्यम खोल काळ्या जमिनीसाठी हे अंतर ३० मीटरच्या दरम्यान ठेवावे.

लॅटरल व कलेक्टर पाईपसाठी  ढाळ – सपाट जमिनीतील निचरा प्रणाली वापरताना उतार दिल्यास पाण्याचा  निचरा होण्यास अडथळा येणार नाही. पण त्याचबरोबर त्या निचरा पाईपची खोली १५ सें.मी. पेक्षा कमी होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. निचरा पाईपला जास्तीतजास्त २ टक्के उतार द्यावा. पण वेगवेगळ्या व्यासाच्या पाईपसाठी वेगवेगळा कमीत कमी ढाळ द्यावा लागतो, तो पुढीलप्रमाणे-

जमिनीचे व्यवस्थापन

जमिनीचे सपाटीकरण – ज्या जमिनी उंच सखल आहेत किंवा अति चढ उताराच्या आहेत, अशा जमिनीसाठी सपाटीकरण करणे आवश्यक आहे. शेतात उंचवटय़ाच्या ठिकाणी पाणी पोहचत नाही किंवा कमी प्रमाणात पोहोचते व सखल भागात ते वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात साठते. शिवाय वाजवीपेक्षा जास्त उतार असेल तर वाफ्यात किंवा सन्यात दिलेले पाणी उताराऱ्याच्या दिशेने निघून जाते व सन्यांना किंवा वाफ्यांना पाणी कमी उपलब्ध होते. क्षार समस्या असलेल्या जमिनीत व पाण्याची पातळी ज्या जमिनीत जास्त वाढलेली आहे, त्या ठिकाणी पाणी साचू देऊ नये. पावसाचे पाणीसुध्दा ते उताराच्या दिशेने चरीत सोडणे गरजेचे आहे, त्यामुळे पाणी तुंबून न राहिल्यामुळे जमिनीत पाण्याची पातळी कमी ठेवता येते. त्यामुळे भारी जमिनीत ०.०५ ते ०.२५ टक्के, मध्यम जमिनीत ०.२० ते ०.४० टक्के व हलक्या, रेताडम् जमिनीत ०.२५ ते ०.३५ टक्के उतार समाधानकारक असतो.

पाणी नियोजन – जमिनीची क्षारता कमी करण्यासाठी व क्षारपड जमिनीची सुधारणा झाल्यानंतर जमिनीत पाण्याची पातळी वाढू नये या साठी भरमसाठ पाण्याचा वापर कमी केला पाहिजे. ठिबक सिंचनासारखे प्रभावी अस्त्र वापरले पाहिजे. ठिबक सिंचनातून भूगर्भातील मचूळ अथवा खारवट पाण्याचा उपयोग कार्यक्षमरीत्या करता येतो. पाण्याची प्रत, क्षाराचे प्रकार व प्रमाण तसेच जमिनीची प्रतवारी पहाणे हे आवश्यक असते.

जमिनीची मशागत – जमिनीत खोलवर मशागत केल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून पाणी मुरण्याची क्षमता वाढते व पृष्ठभागावरील क्षार खोलवर जाण्यास मदत होते. सब सॉयलरसारखे अवजार वापरून खोलवर नांगरणी करता येते.

माती परीक्षण – खराब जमिनीचे व्यवस्थापन करण्यापूर्वी या जमिनी कोणत्या प्रकारच्या आहेत, त्याची तपासणी करावी व नंतर सुधारणेचे उपाय करावेत. खतांची मात्रासुध्दा माती परीक्षण करून द्यावी.

रासायनिक खते – क्षार व चिबड जमिनीतून नत्राचा बऱ्याच प्रमाणात ऱ्हास होतो. त्यासाठी नत्र खताची मात्रा शिफारशीपेक्षा २५ टक्के जास्त देणे फायद्याचे ठरते. त्याशिवाय स्फुरद, लोह, व जस्ताची कमतरता सुध्दा आढळते, त्यासाठी कंपोस्ट खतासोबत रासायनिक खते वापरणे गरजेचे असते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकविता येते.

कंपोस्ट कल्चरचा वापर – क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी अनेक मार्गाचा एकत्रितपणे अवलंब करावा लागतो. कंपोस्ट कल्चरचा वापर वगैरे टाकाऊ सेंद्रिय पदार्थापासून कंपोस्ट खत तयार करून क्षारपड मार्गावर असणाऱ्या जमिनी थोपवून धरण्याचा एकमेव मार्ग आहे. कंपोस्ट खताचा क्षारपड जमिनीत वापर केल्याने माती कणांची रचना बदलते आणि हवा, पाणी यांचे प्रमाण प्रमाणशीर राहते.

क्षारपड जमीन सुधारणा करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कृतिकार्यक्रम हाती घेतला आहे. याचे नियोजन सध्या करण्यात येत असून या खर्चासाठी जलसंपदा विभागाकडून अनुदान देण्याचा विचार आहे. यातून नापीक जमीन लागवडीखाली आणण्याचे प्रयोजन आहे.

प्रिया लांजेकर-कुलथे, कार्यकारी अभियंता, संशोधन विभाग.

जमीन नापेर झाल्याने काळ्या आईवर जिवापाड प्रेम करणारा शेतकरी अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. शेतीपासून बाजूला जाणारा शेतकरी पुन्हा आपल्या शेतात राबण्यास सज्ज असला तरी त्याला मदतीचा हात शासनाकडून देण्याचे प्रयत्न सुरू असून काही मदत सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शहाजी पाटील, इस्लामपूर.

अतिपाण्याचा वापर आणि रासायनिक खतांचा वापर आणि पिकांची अदलाबदल न केल्याने क्षारपड जमिनीची समस्या निर्माण झाली आहे. क्षारपड जमीन सुधारणा करून पुन्हा लागवडीखाली आणली तरी पिकासाठी ठिबक अथवा तुषार सिंचन पध्दती  अवलंबली तर जमीन पुन्हा नापेर होण्याचा धोका लांबवता येतो. यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.

विश्वासराव पाटील, इस्लामपूर.