शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मागील निवडणूक चांगलीच गाजली. जातीय विद्वेषाच्या प्रचारातून रामदास आठवले यांचा पराभव झाला. बाळासाहेब विखे-पाटील यांना धडा शिकविण्याच्या उद्देशानेच राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा राष्ट्रवादीकडे ठेवताना शिर्डीमध्ये आठवले यांना काँग्रेसच्या गळ्यात मारले. काँग्रेसजनांनी आठवले यांची उमेदवारी फारशी गांभीर्याने घेतलीच नाही आणि आठवले यांचा दारुण पराभव झाला. साईबाबा मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद भूषविलेले भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेच्या वतीने निवडून आले, तरीही सर्वपक्षीय खासदार म्हणून वावरू लागले. कोणालाही न दुखविता त्यांनी राजकारण केले. शिवसेना-भाजपला बरोबर ठेवतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीची नाराजी ओढवणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली. शिवसेनेने वाकचौरे यांची फेरउमेदवारी जाहीर केली असली तरी त्यांचे अद्याप तळ्यात-मळ्यात आहे. विखे-पाटील यांच्याशी संबंध ठेवून प्रसंगी काँग्रेसच्या उमेदवारीचा मार्ग त्यांनी मोकळा ठेवला आहे. काँग्रेसमध्ये नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. रावसाहेब कसबे, लहू कानडे, प्रेमानंद रूपवते यांच्याही नावांची चर्चा आहे. तरीही काँग्रेसचे प्राधान्य खासदार वाकचौरे यांनाच असेल. एकूणच खासदार कोणत्या पक्षातून लढणार हाच चर्चेचा विषय ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा मतदारसंघ : शिर्डी
विद्यमान खासदार : भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना<br />मागील निकाल :  रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले काँग्रेस बंडखोर प्रेमानंद रूपवते यांचा पराभव.
जनसंपर्क
शिर्डीत मुख्य कार्यालय, प्रत्येक तालुक्यात संपर्क कार्यालय, कुठेही कधीही भेटणारा खासदार म्हणून ओळख. प्रत्येक गावाला भेट, मात्र वेळेच्या नियोजनाचा अभाव.
सारी बाबांची कृपा!
साईबाबांच्या शिर्डी मतदारसंघाचा खासदार असल्याने दिल्लीत विकासकामे खेचून आणण्यासाठी मदत होते. बाबांची ही कृपा आहे. सर्व मंत्री मदत करतात, वारकऱ्यांचा टोल माफ केला. निळवंडेच्या कामासाठी एक हजार ८०० कोटींचा निधी तसेच पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी वळविण्यासाठी प्रयत्न केला. नगरपालिकांच्या भूमिगत गटारींसाठी केंद्राकडून ३७५ कोटींचा निधी आणला. सर्व खासदारांमध्ये प्रश्न विचारण्यात सहावा क्रमांक आहे, ३०५ कपात सूचना मांडल्या. केंद्राच्या विविध समित्यांवर काम केले. – खा. भाऊसाहेब वाकचौरे

मतदारसंघातील कामगिरी :
*मतदारसंघातील प्रत्येक गावात एक तरी विकासकाम. प्रामुख्याने ४६० सर्वधर्मीय सभागृह व हायमॅक्स दिवे, महिन्याचा पगार देवस्थानांना, शाळांना संगणक व विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन.
*शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व शिर्डीचा आदर्श रेल्वेस्थानकात समावेश, दौड-मनमाड रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणाचे काम सुरू, दुहेरीकरणासाठी प्रयत्न.
*पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून ३०० गावे जोडण्याला ७२ रस्त्यांना मंजुरी, खेड ते सिन्नर हा १ हजार २५० कोटींचा रस्ता मंजूर.
*शिर्डी, शनिशिंगणापूर, नेवासे, देवगड, पुणतांबे, अगस्ती आदी देवस्थाने जोडून त्यांचा धार्मिक पर्यटन विकासासाठी प्रयत्न.
*कोपरगाव, शिर्डी व संगमनेर येथील
भूमिगत वीजवाहिनीसाठी
६६ कोटींच्या वीजवाहिनीला मंजुरी.
लोकसभेतील कामगिरी
*उपस्थित केलेले प्रश्न : ६८४
(तारांकित : ५७, अतारांकित : ६२७)
*नियम ३७७ अंतर्गत उपस्थित केलेले मुद्दे : ५, विशेष उल्लेख : ५, खासगी विधेयके : ८
लोकसभेत मांडलेले महत्त्वाचे प्रश्न :
*दिल्ली – मनमाड/कोपरगावसाठी सुपरफास्ट गाडी सुरू करणे, शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांसाठी सुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी ’शेतमजूर व बिडी कामगारांच्या विविध समस्यांचा पाठपुरावा
*ग्रामीण भागात खासगी दूरसंचार कंपन्यांचे जाळे
*ग्रामीण भागात शौचालयांची सुविधा, रेल्वे पुलांची देखभाल
एकूण हजेरी : २०९ दिवस (३१६ दिवसांपैकी)

खासदारांना भूमिकाच नाही
वाकचौरे यांना वैचारिक भूमिका नाही. ‘गंगा गए गंगादास, जमना गए जमनादास’ असे वागत कधी इकडे तर कधी तिकडे असतात.  हे चांगले लक्षण नाही. त्यांच्यामुळे शिवसेनेलाही बळ मिळालेले नाही. सभामंडप म्हणजे विकास नाही. केंद्र व राज्यात त्यांच्या पक्षाची सत्ता नसल्याने वाकचौरेंना कुणी विचारत नाही. सर्व जात व धर्मीयांना बरोबर घेऊन त्यांना जाता आले नाही. – प्रेमानंद रुपवते

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An account of mp shirdi mp in seesaw condition
First published on: 11-08-2013 at 04:43 IST