गेल्या रविवारी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) केरळात दाखल होण्याची तारीख पुढे गेल्याचे जाहीर केले. दरम्यान अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सून वेळेवर आला असला तरी आपल्याकडे त्याचे केरळात आगमन झाल्यानंतरच मान्सूनचा हंगाम सुरू झाल्याचे मानले जाते. त्यामुळे मुळात त्याला केरळात पोहोचण्यास उशीर का, या उशिराचा पावसाच्या आधी वर्तवण्यात आलेल्या अंदाजावर परिणाम होईल का, एकूण पाऊसपाणी बरे होईल की नाही, असे अनेक प्रश्न उद्भवणे साहजिक आहे.

मान्सूनला उशीर का होणार?
नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आणि त्यानंतर पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘रोअनू’ चक्रीवादळ हे मान्सूनच्या उशिराचे कारण.
* मे महिन्यात चक्रीवादळे निर्माण होतातच. जेव्हा मेच्या दुसऱ्या पंधरवडय़ात अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा ते चक्रीवादळ मान्सून वाऱ्यांना अंदमानच्या समुद्रात खेचते.
* पण अशा वेळी बाष्प चक्रीवादळाबरोबर गेल्यास मान्सूनच्या पुढच्या प्रवासावर त्याचा परिणाम होतो. एरवी मान्सून १ जूनला केरळात येतो.
* यंदा ती तारीख ७ जून असेल, असा आयएमडीचा अंदाज आहे. अर्थात या अंदाजात ४ दिवस पुढे-मागे होण्याची शक्यता असल्याचेही आयएमडीने म्हटले आहे.

पावसाच्या अंदाजाचे काय?
देशात वर्षभरात पडणाऱ्या पावसाच्या जवळपास ७५ टक्क्य़ांहून अधिक पाऊस मान्सूनच्या हंगामात पडतो. गेल्या वर्षी ‘एल नीनो’ स्थितीच्या परिणामामुळे मान्सूनला फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता आणि त्याप्रमाणे देशात १४ टक्के कमी पाऊस झाला होता. या वर्षी ‘एल नीनो’ ओसरून ‘ला नीना’ किंवा ‘न्यूट्रल’ अशी परिस्थिती निर्माण झाली तर मॉन्सून सरासरीइतका किंवा चांगला पाऊस देईल, असे मत हवामानशास्त्रज्ञ वर्तवत होते. यंदा हवामानाचा अंदाज देणाऱ्या विविध संस्थांनी चांगल्या मान्सून पावसाची शक्यता वर्तवली आहे. ‘आयएमडी’च्या सांख्यिकी मॉडेलनुसार यंदा सरासरीपेक्षा १०६ टक्के पाऊस होईल असा अंदाज आहे, तर ‘स्कायमेट’ने सरासरीच्या १०५ टक्के पावसाचा अंदाज दिला आहे. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मिटिऑरॉलॉजी’च्या आकडेवारीनुसार सरासरीच्या १११ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे.

मान्सूनच्या उशिराचा पावसावर परिणाम काय?
मान्सून उशिरा येणार म्हणजे पाऊसही कमी पडणार असे नाही. गेल्या वर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा दोन दिवस आधीच आला होता. पण एकूण पाऊस कमी झाला होता. हवामानाचे अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी पावसाबद्दल दिलेल्या शक्यता पाहता मान्सून केरळमध्ये उशिरा येण्याने पावसाला फटका बसेल अशी भीती बाळगण्याचे कारण नाही.
मान्सून केरळला पोहोचल्यानंतर त्याच्या पुढच्या मार्गक्रमणावर अनेक स्थानिक वातावरणीय बाबींचा परिणाम होत असतो. कमी दाबाचे तयार होणारे पट्टे ही त्यातलीच एक बाब. यामुळे ‘केरळमध्ये उशिरा म्हणजे देशात इतर ठिकाणीही उशिरा’ असाही अर्थ काढता येणार नाही.
शिवाय केरळमधील ६० टक्के वेधशाळांमध्ये जेव्हा सलग दोन दिवस २.५ मिमी किंवा त्याहून जास्त पावसाची नोंद होते तेव्हाच निकषानुसार मान्सून केरळमध्ये प्रस्थापित झाला असे म्हटले जाते. पण हा निकष पूर्ण न करू शकणारा सलग पाऊस चांगला नाही असे नाही.

आत्ता मान्सूनसंबंधीची वातावरणीय स्थिती काय?
‘रोअनू’ हे चक्रीवादळ शनिवारी वायव्य बंगालच्या उपसागरावर होते. उत्तर ओडीशा आणि पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी त्यामुळे मोठय़ा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. ‘आयएमडी’ने या दोन्ही राज्यांच्या किनारी भागात चोवीस तासांसाठी मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला होता. मिझोराम, दक्षिण आसाम, मणिपूर आणि त्रिपुरातही चोवीस तासात मोठय़ा पावसाचा अंदाज होता.
मान्सूनच्या प्रतीक्षेत असताना अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना जेरीस आणले आहे. यात चक्रीवादळाचा आणि देशातल्या उष्णतेच्या लाटेचा थेट संबंध नसला तरी चक्रीवादळ उत्तरेकडून उष्ण व कोरडे वारे आणि पश्चिमेकडून बाष्पयुक्त वारे खेचून घेते. हे दिवस मेघगर्जनेसह होणाऱ्या पावसासाठीही अनुकूल असतात. हा ढगांचा गडगडाट सुरू झाला की त्या प्रदेशातील उष्णतेची लाट कमी होण्यास त्याचा फायदा होतो. राजस्थानमध्ये अजून एक दिवस, तर पश्चिम मध्य प्रदेश आणि विदर्भात काही दोन दिवस तीव्र स्वरूपाची उष्णतेची लाट राहण्याची शक्यता ‘आयएमडीने’ वर्तवली आहे. त्यानंतर या लाटेची तीव्रता कमी होऊ शकेल.

संकलन- संपदा सोवनी