शेखर सोनाळकर

भारतीय मुस्लिमांनी१९२० मध्ये मायदेश सोडून आधी अफगाणिस्तान व त्यामार्गे तुर्कस्तानात जाऊ पाहणे हा ‘खिलाफत चळवळी’तील महत्त्वाचा भाग असून १०० वर्षांपूर्वी ही चळवळ फसली, हा एक दृष्टिकोन. तोच खरा, असे मानून एखाद्या धर्माविषयी एकतर्फी माहिती देण्याऐवजी प्रत्यक्षात खिलाफत चळवळ काय होती आणि ‘हिजरत’ म्हणजे काय, याकडे अधिक सखोलपणे पाहिल्यास काय दिसते, हे सांगणारे टिपण ..

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
article about society s attitude towards sports careers
चौकट मोडताना : सहज स्वीकार नाहीच

‘लोकसत्ता’च्या १७ मेच्या अंकात, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र माधव साठे यांचा ‘खिलाफत चळवळीतील फसलेले हिजरात’ हा लेख वाचला. या लेखातील काही विधानांची शहानिशा झाल्यास, त्या लेखाचा एकतर्फी दृष्टिकोन उघड होईल. ‘१ ऑगस्ट १९२० ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि त्याच दिवशी महात्मा गांधी यांनी खिलाफत चळवळीची अधिकृत घोषणा केली’. किंवा, ‘सुमारे १,५०० वर्षांपूर्वी मोहम्मद पैगंबरांचा मदिनेत पराभव झाला आणि ते अ‍ॅबिसिनिया येथे आले. या पराभवानंतर त्यांनी जाहीर केले की ज्या भूमीत इस्लाम नाही ती भूमी इस्लामची शत्रू मानावी, जिहाद करून कब्जा करावा अथवा ती भूमी सोडून द्यावी. याला हिजरात म्हणतात’.. ‘हिजरत स्वतंत्र चळवळ नव्हती तिची बीजे तेव्हाच रुजली जेव्हा भारतावर इस्लामचे पहिले आक्रमण झाले’. याविषयीच्या उपलब्ध माहितीची शहानिशा केल्यास निराळे,अधिक स्पष्ट चित्र दिसते..

पहिल्या महायुद्धाच्या सुमारास मुसलमानांचे सहकार्य मिळावे या हेतूने खिलाफतीच्या (तुर्की साम्राज्याच्या) अखंडत्वाबद्दल मुसलमांना ब्रिटिशांनी अनेक आश्वासने दिली होती. त्यावर विसंबून सुन्नी-शिया व अहमदियांनी ऑटोमनविरोधात ब्रिटिशांना साथ दिली. पहिल्या महायुद्धात जर्मनीसह लढणाऱ्या तुर्कस्तानचा पराभव झाला. ऑक्टोबर क्रांतीनंतर सत्तेवर आलेल्या रशियन कम्युनिस्ट सरकारने मित्रराष्ट्रांमध्ये झालेल्या युद्धकालीन गुप्त करारांचा गौप्यस्फोट केला. यापैकी ‘सायकेस-पिकॉट करारा’त ऑटोमन तुर्काचे साम्राज्य दोस्त देशांनी वाटून घेऊन त्याचे तुकडे करण्याचा इरादा होता. तुर्कस्तानचा सुलतान हा अनेक शतके खलिफा मानला जात होता. मक्का, मदिना आणि जेरुसलेम या मुस्लिमांच्या पवित्र स्थळांच्या संरक्षणाची जबाबदारी खलिफाची होती. विजयानंतर मक्का, मदिना, (इराकमधील) करबला व मजाफ आणि (पॅलेस्टिनमधील) जेरुसलेम ही सारी मुस्लीम धर्मीयांची पवित्र स्थळे मुस्लिमांच्या हातात न राहता, भारत ज्यांच्याशी लढत होता, त्या ख्रिश्चन ब्रिटिशांच्या अमलाखाली आली. ख्रिश्चन-मुस्लीम यांच्या अनेक शतके क्रूसेड-जिहाद लढाया झाल्या होत्या. धर्मस्थळांच्या सुरक्षिततेच्या चिंतेने संतापलेल्या सुमारे २०,००० भारतीय मुसलमानांनी अफगाणिस्तानचा राजा अमानुल्लाच्या शब्दावर विश्वास ठेवून ब्रिटिश भूमीत आपण राहणार नाही, अशा निश्चयाने हिजरत करून मुस्लीम राष्ट्र अफगाणिस्तानात जाण्याचे ठरविले. यात काहींना जीव गमवायला लागला आणि काही लुटलेही गेले. ब्रिटिशांवर अवलंबून असणाऱ्या अफगाण सरकारने अफगाणिस्तानात नव्याने हिजरतींना येण्यास मनाई केली. त्यामुळे हिजरत रूढार्थाने ‘फसले’.

‘लखनौ करार’ आणि लोकमान्यांचा पाठिंबा

हिंदू-मुस्लीम यांच्यात फूट पाडून राज्य बळकट करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न होते. यातून लॉर्ड कर्झनने १९०५ मध्ये हिंदूबहुल व मुस्लीमबहुल अशी बंगालची फाळणी केली. व्हाइसरॉय लॉर्ड मिंटो यांनी मुस्लीम नेत्यांना निरोप देऊन १९०६ मध्ये खोजा मुस्लिमांचे नेते आगाखान यांच्या नेतृत्वाखाली सिमला येथे शिष्टमंडळ भेटायला बोलावले. या शिष्टमंडळाने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली. मोर्ले-मिन्टो सुधारणांद्वारे (१९०९) ब्रिटिशांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले. मोतीलाल नेहरू व गोखलेंनी अशा स्वतंत्र मतदारसंघाला जाहीर विरोध केला. १९१० च्या अलाहाबाद काँग्रेस अधिवेशनात हिंदू महासभेची स्थापना झाली. मोतीलाल नेहरू, सुरेंद्रनाथ बॅनर्जी व भूपेंद्र बसू यांनी हिंदू-मुस्लिमांच्या अशा स्वतंत्र संघटनांना विरोध केला. भारतीयांत फूट पडण्याच्या ब्रिटिशनीतीला विरोध केला. ‘लखनौ करार’ करून अल्पसंख्याकांना लोकसंख्येपेक्षा अधिक मतदारसंघ दिले. याचे शिल्पकार मोहम्मद अली जिना आणि लोकमान्य टिळक होते. भारतीयांत एकजूट झाल्याने ब्रिटिशांना लखनौ करारावर आधारित ‘गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९१९’ बनवावा लागला.

गांधीजींनी १९१९ मध्ये जुलमी रौलट कायद्याच्या विरोधात असहकार चळवळीचा प्रचार सुरू केला होता. नोव्हेंबर १९१९ ला दिल्लीत खिलाफत चळवळीचे अधिवेशन झाले. मुस्लिमांचा राग ओळखून खिलाफत व असहकार चळवळ एकत्र लढविण्याचे गांधीजींनी ठरविले. त्यांना तुर्की साम्राज्यापेक्षा भारतीय मुस्लिमांची काळजी होती. लोकमान्यांचे खिलाफत व असहकार चळवळीला समर्थन गांधीजींनी मिळविले. २० एप्रिल १९२० च्या ‘केसरी’मधून टिळकांनी आपल्या ‘काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्षा’चा जाहीरनामा प्रकाशित केला. जाहीरनाम्यात खिलाफतीच्या चळवळीला पाठिंबा, भाषावार प्रांतरचना, मुलामुलींना सक्तीचे मोफत शिक्षण अशा कलमांचा समावेश होता. लोकमान्यांचे निधन १ ऑगस्ट १९२० ला झाले. २ लाखांच्या समुदायासमोर गांधीजींनी ‘असहकार चळवळ ही लोकमान्यांना श्रद्धांजली ठरेल’ असे सांगितले, पण चळवळीची अधिकृत घोषणा केली नाही, आणि ‘त्याच दिवशी’ गांधीजी ज्या चळवळीबद्दल बोलले, ती खिलाफत नव्हे – असहकार!

काँग्रेसच्या आधी गांधीजींनी खिलाफतीला व्यक्तिगत पाठिंबा जाहीर करून मुस्लिमांशी चर्चा करून त्यांचा पाठिंबा अहिंसा आणि असहकार चळवळीला मिळवला होता. खिलाफत व असहकार चळवळ एकाच वेळी करण्याच्या निर्णयाला सी. आर. दास, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल या प्रमुख नेत्यांनी मान्यता दिली. निर्णय घेण्यासाठी काँग्रेसचे अधिवेशन झाले. अ‍ॅनी बेझंट अनुपस्थित राहिल्या. मदनमोहन मालवीय यांनी आपला विरोध आहे असे कळविले. चळवळ जोमाने सुरू होईल, मुस्लिमांचा प्रचंड प्रतिसाद आहे पाहून सगळे ठरावाच्या बाजूने होते. ठरावाच्या विरोधात जिनांनी भाषण केले! मतदान झाले. विरोधात फक्त दोन मते पडली.

जिना, मुस्लीम लीग यांनीच विरोध केला आणि हिंदू महासभेने व इतरांनी विरोध केला नाही, हा इतिहास आहे. हिंदू नेते स्वामी श्रद्धानंद व १५ वर्षांचे मार्क्‍सवादी भगतसिंग व चंद्रशेखर आझाद आंदोलनात सामील झाले. आचार्य नरेंद्र देव आणि सुभाष बाबूंनी खिलाफत आंदोलनाचे समर्थन केले आहे. कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी १९२० ला शिक्षण सोडले आणि ते असहकार आणि खिलाफत आंदोलनात सहभागी झाले. तर मॉस्कोच्या सल्लय़ाने कॉ. शौकत उस्मानी व बी. सी. पाल आंदोलनात सामील झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘खिलाफतीमुळे मुस्लिमांचे सहकार्य काँग्रेसने मिळवले आणि हे गांधीजींमुळे शक्य झाले,’ असेही लिहिले आहे. याचे कारण असे की, असहकार चळवळीसोबत झालेल्या या खिलाफत चळवळीत हिंदू-मुस्लिमांचे अभूतपूर्व ऐक्य निर्माण झाले. अलीबंधू (शौकत अली आणि महंमद अली) आणि गांधीजींनी खिलाफत-असहकार असे एकत्रित आंदोलनाचे नेतृत्व केले. महंमद अली यांनी मी पैगंबरांनंतर गांधीजींचा शब्द मानतो असे जाहीर केले. हिंदू धार्मिक पुढारी स्वामी श्रद्धानंद यांना दिल्लीच्या जामा मशिदीत व सरोजिनी नायडू या महिला नेत्यांना कलकत्त्याच्या जामा मशिदीत मुस्लिमांनी आदराने बोलावून शुक्रवारच्या नमाजानंतर त्यांचे प्रमुख भाषण ठेवले. देशभर हिंदू देशभक्त नेत्यांची भाषणे मशिदीत आयोजित केली गेली. हिंदू-मुसलमान प्रथमच जाहीररीत्या एकमेकांच्या हाताचे पाणी पिऊन एकजूट जाहीर करू लागले. आंदोलनकर्त्यां मुस्लिमांना हिंदू आपल्या घरात पहिल्यांदा जेवणास बोलावू लागले. ‘अस्पृश्यता पाळणार नाही’ अशी जाहीर शपथ लोक घेऊ लागले. अनेक मुस्लिमांनी- महंमद अली यांनी- गोमांस खाणे सोडले. ईदच्या दिवशी परंपरेने गोमांस खाणाऱ्या मुस्लिमांनी गोमांस न खाण्याचा जाहीर निर्धार केला. पुरीचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती, डॉ. किचलू व अलीबंधू यांच्यावर ब्रिटिश सरकारने देशद्रोहाचा आरोप ठेवला होता. शंकराचार्य यांनी कोर्टात खुर्चीवरून उठण्यास नकार दिला. त्यांनी माफी न मागता, न्यायाधीशांना ‘मी तुम्हाला व तुमच्या कोर्टाला मानीत नाही,’ असे सुनावले होते.

देशभरातील तुरुंग सत्याग्रहींनी भरून गेले. लोकांच्या मनातील ब्रिटिशांबद्दलची भीती नाहीशी झाली होती. काँग्रेसवर बंदी घालण्यात आली. यामुळे ‘महात्मा गांधींनी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि त्याच दिवशी खिलाफत चळवळीची घोषणा केली’ हे सांगताना जणू टिळक असेपर्यंत खिलाफत आंदोलन करता आले नाही असे साठे सुचवितात. लो. टिळकांनी खिलाफत चळवळीला आधीच पाठिंबा दिलेला होता व ते त्या वेळच्या भारताचे एकत्रित आंदोलन होते.

रवींद्र साठे सांगतात तसा ‘हिजरात’ असा शब्द नसून ‘हिजरत’ हा शब्द आहे.  मोहम्मद पैगंबर यांनी मुस्लीम धर्म मक्का येथे स्थापन केला. मक्का व्यापारी शहर होते. मक्केतील काबा येथे अरबांच्या कुळप्रमुखांच्या मूर्ती होत्या. तेथे दरवर्षी पूजेसाठी अरब येत असत. यामुळे मक्केची आर्थिक भरभराट झाली होती. मूर्तिपूजेला इस्लामचा विरोध होता. मूर्तिपूजा झाली नसती तर यात्रेकरू येणार नाहीत व आपले आर्थिक नुकसान होईल अशी भीती होती. मक्केतल्या भ्रष्ट पुरोहितांची रोजीरोटी मूर्तिपूजेवर अवलंबून होती.

अरबी मूर्तिपूजकांत मुलींना जन्मत:च जमिनीत पुरून ठार करण्याची, लग्न न करता स्त्रिया ठेवण्याची चाल होती, याला व सावकारी व्याजाला मोहम्मद पैगंबरांनी विरोध केला. ते सांगत एकच परमेश्वर आहे, तो सर्वत्र आहे, तो सर्वाचा आहे. अबू तालिब हे पैगंबरांचे काका. ते प्रतिष्ठित व्यापारी होते. काकांनी पैगंबरांना संरक्षण दिले. काका अबू तालिब व व्यापारी पत्नी खातीजा यांचा मृत्यू झाला, त्यांचे संरक्षण नाहीसे झाले. अनेक दैवते मानणाऱ्या स्थानिक मूर्तिपूजक अरबांनी मोहम्मदांना त्रास दिला, त्यांचा छळ केला. पैगंबरांनी अनुयायांना प्रतिकार करू नका सांगितले. लोक त्यांच्यावर तिरस्काराने थुंकत, दगड मारीत, तरीही ते पैगंबरांच्या आज्ञेनुसार मुस्लीमविरोध करीत नसत.

पैगंबरांनी आपल्या अनुयायांना स्वेच्छेने हिजरत करून दुसऱ्या गावी जाण्यास सांगितले. त्यानुसार काही मुस्लीम अ‍ॅबिसिनियाला गेले (इसवी सन ६१५-६२१). पैगंबरांचा खून करण्याचा कट शिजत होता, याची माहिती मिळाल्याने ते रातोरात मदिनेला रवाना झाले (सन ६२२). ज्या मक्केत दिव्य बोध प्राप्त झाला, जेथे सतत १३ वर्षे अन्याय सहन केला, ती भूमी नाइलाजाने सोडून प्रेषितांनी मुस्लिमांसह मदिनेकडे प्रयाण केले. या स्थलांतराला ‘हिजरत’ असे म्हणतात. अ‍ॅबिसिनियाची हिजरत ऐच्छिक होती, मदिनेची हिजरत अनिवार्य होती. केवळ हिजरत असे म्हटल्यास त्याचा अर्थ ‘मदिनेला जाणे’ असा होतो.

मक्केत इस्लामच्या अनुयायांची संख्या २०० पेक्षा कमी होती. मदिनेत काही एकेश्वरी लोक होते. त्यांनी एकेश्वरी ज्यू धर्मात जाण्याचा प्रयत्न केला. पण वेगळ्या वंशाचे असल्याने ज्यूंनी त्यांना आपल्या धर्मात स्वीकारले नाही. मक्केत येऊन पैगंबरांशी चर्चा करून इस्लामचा स्वीकार केलेले अनेक जण मदिनेत आधीपासून होते, त्यामुळे मदिनेत पैगंबरांचे स्वागत झाले. मदिनेत इस्लामच्या तत्त्वांचा-धर्माचा खरा विकास झाला. मदिनेत पोहोचल्यावर पैगंबरांनी ज्यूंशी समझोता केला. मदिनेत वेगळा धर्म असलेल्या ज्यूंचे मूलभूत अधिकार, त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य, त्यांच्या प्रार्थनास्थळांचा आदर करण्याचा समझोता पैगंबरांनी केला. यास ‘मिसाक मदिना’ अर्थात ‘मदिनेचा वचननामा’ म्हणतात. मदिनेत ज्यू, ख्रिस्ती, सबियान, मगियान आणि बुतपरस्त (मूर्तिपूजक) अशा पाच धर्माचे बहुधर्मीय सरकार स्थापन झाले. सुरुवातीला मोहम्मदांचे अनुयायी मक्केकडे तोंड करून नमाज पढत असत. पैगंबरांनी जेरुसलेमकडे तोंड करून प्रार्थना करण्याचा आदेश पाठवला. पैगंबरांनी ज्यू व ख्रिश्चनांना सुचविले होते की एकाच धर्मस्थळात, वेळा वाटून घेऊन, सगळे आपापली प्रार्थना करू या.

साठे म्हणतात तसा पैगंबरांचा ‘मदिनेत पराभव’ कधीही झाला नाही आणि पैगंबर कधीही अ‍ॅबिसिनियाला गेलेले नाहीत. पैगंबरांच्या काळात जेथे इस्लामचे राज्य नाही ती भूमी इस्लामची शत्रू मानावी (दार अल हर्ब) असे पैगंबरांनी कधीही सांगितलेले नाही. अशी भूमी सोडावी असेही सांगितले नाही. अ‍ॅबिसिनिया व मदिना येथे इस्लामचे राज्य नव्हते. तेथे मुस्लिमांना पाठविले होते. मक्केत धर्मपालन करणे अशक्य झाले, असे झाल्यास तो देश सोडा, एवढाच याचा अर्थ आहे. त्यांचे काका अबू तालिब यांनी कधीही इस्लामचा स्वीकार केला नही, तसेच पैगंबरांची एक पत्नी ख्रिश्चन होती, ती चर्चमध्ये जात असे. या दोघांना इस्लाम स्वीकाराची जबरदस्ती पैगंबरांनी केली नव्हती. पैगंबरांच्या नंतरच्या काळात मात्र धर्मप्रसारासाठी मुस्लिमांनी तलवारीचा वापर केला, युद्धे करून इस्लामचा प्रसार केला. पैगंबरांना ईश्वराचा पहिला आदेश आला तो ‘इकरा’ म्हणजे शिका असा होता. यामुळे पैगंबरांच्या नंतर ५०० वर्षे अरबस्तानात ज्ञानसाधना झाली. त्या काळातील जगातील सर्वात आधुनिक ज्ञान इस्लामी अरबस्थानात होते. तेथून ज्ञान युरोपात गेले. अल्जिब्रा शब्द अरबी आहे. नंतर इस्लाम कट्टरपंथीय झाला व नवीन ज्ञानविकासाला गैरइस्लामी व यामुळे चुकीचे ठरविले जाऊ लागले आणि अरबस्थानाच्या ज्ञानक्षेत्राचा अध:पात झाला.

कुराण अथवा हदीसमध्ये दार उल इस्लाम आणि दार उल हर्बचा उल्लेख नाही. (हदीस = पैगंबराचे उपदेश व आदेश, कुराण = देवाचे आदेश). दार उल इस्लाम आणि दार उल हर्बचा या पैगंबरांच्या नंतरच्या काळातील इस्लामच्या संकल्पना आहेत. दार उल इस्लाम म्हणजे इस्लामचा शरिया कायदा जेथे आहे आणि दार उल हर्ब म्हणजे इस्लामचा कायदा जेथे चालत नाही, तडजोडीने स्वीकारलेले राज्य. भारतीयांची हनाफी विचारधारा ख्रिश्चन-ज्यू व मुस्लिमांचे एकत्रित राज्य ही संकल्पना मानते.

‘आझाद’ यांचा उदारमतवाद..

१८०३ मध्ये ब्रिटिश साम्राज्य वाढत आहे पाहून शाह अजीज वलिउल्लाह यांनी फतवा काढून सर्वप्रथम भारताला दार-उल-हर्ब म्हणजे ‘युद्धाचे घर’ घोषित केले होते. १८१८ मध्ये बरेली धर्मपीठाने ब्रिटिश भारताला दार-उल-हर्ब जाहीर केले. याचाच अर्थ रवींद्र साठे यांच्या प्रतिपादनाप्रमाणे इस्लामच्या आगमनाच्या वेळी हा विचार रुजला हे खरे नाही. तसे असते तर भारताला दार-उल-इस्लाम करण्यासाठी जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केले असते. बंगाल ते राजस्थान असा संपूर्ण उत्तर भारत व दक्षिणेत ७०० वर्षे मुस्लीम राजवटी होत्या तरीही मुस्लीम लोकसंख्या १५ टक्क्यांच्या वर गेलेली नाही. हिंदू धर्माचे अर्थ लावणारे जसे अनेक पंथ आहेत तसेच इस्लामचे अर्थ लावणारे वेगवेगळे पंथ आहेत. यापैकी वहाबी विचारधारा जगातील अनेक अमानवीय दहशतवादी संघटनांचे प्रेरणास्थान आहे.

मौलाना अबुल कलाम आझाद यांनी मांडणी केली की कुराण हाच ईश्वरी ग्रंथ असून हदीस ही मानवी भाष्ये आहेत. ‘प्रेषित मोहम्मदांना सर्वधर्मीय सरकार स्थापन करायचे होते’ असा आझाद यांचा दावा होता. त्याचा नेमका अर्थ असा की, इस्लामच्या राजवटीत दार उल इस्लाम (शरिया कायदा लागू करा) व अनेकधर्मीय भूप्रदेशांत इस्लामचे राज्य आणा असे प्रेषितांचे आदेश नाहीत. आझाद हे देशासाठी त्याग करणाऱ्या गांधीजी व सरहद्द गांधींप्रमाणे धार्मिक असूनही धर्माचा उदार अर्थ लावीत असत. या उदार विचारांसाठीदेखील आपण त्यांचे कृतज्ञ राहिले पाहिजे.

देश समर्थ-समृद्ध करण्यासाठी, तसेच अनेक दिवसांचे युद्ध करण्यासाठी देशात उत्पादन व औद्योगिक-आर्थिक सामर्थ्य आवश्यक असते. आर्थिक विकासासाठी शांतता, स्थैर्य व देशांतर्गत ऐक्य आवश्यक असते. यासाठी सर्व भारतीयांनी हिंदू विशेषत: मुस्लिमांनी आधुनिक झाले पाहिजे. इस्लामसमोरील खरा मुद्दा हा निर्णय कुरणाच्या आधारे घ्यायचा की आधुनिक जगाने मान्य केलेली मानवी मूल्ये, भारतीय संविधानाच्या आधारे निर्णय घ्यायचा असा आहे. मशिदीत- दर्ग्यात- मंदिरात स्त्रियांना प्रवेश देताना धर्माचा आधार न घेता संविधानाचा आधार घेणे हे मूल्य रुजवावे लागेल. हाजी अली व शबरीमाला येथे स्त्रियांना प्रवेश देताना धर्माचा आधार घेणारे कट्टरपंथीय दोन्ही धर्मात निर्माण होणार नाहीत हे पाहावे लागेल.

एका धर्माच्या कट्टरपणाला उत्तर दुसऱ्या धर्माने कट्टर होणे हे नाही. सर्व भारतीयांना आधुनिक शिक्षण देणे, आधुनिक जगाची मूल्ये रुजवणे, विज्ञाननिष्ठ, लोकशाहीवादी, सेक्युलर व संवेदनशील नागरिकांचा भारत निर्माण करणे हे उत्तर आहे. हे उत्तर न शोधता इस्लामबद्दल व धर्माबद्दल उदार विचार मांडून देश घडवणाऱ्या महामानवांबद्दल गैरसमज दृढ करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. यापासून देशाने सावध राहिले पाहिजे.